मनोमनी सावरलो होतो

Submitted by निशिकांत on 8 July, 2013 - 06:29

स्वप्न पाहता विरहाचे मी आत जरा घुसमटलो होतो
जाग येउनी स्वप्न भंगता मनोमनी सावरलो होतो

सुटकेचा नि:श्वास टाकला शत्रूंनीही मी मेल्यावर
दुष्ट तयांचे डाव उधळण्या पुरून त्यांना उरलो होतो

पैलू नाही कधी पाडले यत्न करोनी आयुष्याला
चाकोरी अन् परंपरांच्या प्रभावात मी घडलो होतो

मोठा भाऊ कडेवरी अन् बहीण ओझे घेउन चाले
तिच्या जिवाला खंत न त्याची बघून मी गहिवरलो होतो

खिशात माझ्या दमडी नव्हती तरी इरादे बुलंद माझे
पाय न टिकले धरणीवरती, आकाशी वावरलो होतो

विद्रोहाची हिंमत नव्हती प्रवाहपतितासमान जगलो
सुखात होतो, पण मी माझ्या नजरेमधुनी पडलो होतो

काय अपेक्षा मनी धरावी? न्यायदेवते गांधारी तू !
कोण पारडे कसे झुकवितो, बघून मी भेदरलो होतो

आसपासच्या घराघरातुन धूर पाहिला मी सोन्याचा
संपत्तीचा वास तिथे पण असाच मी धुरकटलो होतो

हात सखीने दिला, काढण्या चिखलामधुनी "निशिकांता"ला
लगावली, मात्रा, यमकांच्या दलदलीत मी फसलो होतो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्रोहाची हिंमत नव्हती प्रवाहपतितासमान जगलो
सुखात होतो, पण मी माझ्या नजरेमधुनी पडलो होतो<<< अप्रतिम

सुटकेचा नि:श्वास टाकला शत्रूंनीही मी मेल्यावर<<< २ मात्रा कमी पडत असाव्यात, मेल्यावरती करावे लागेल बहुधा!

ही गझलही आपल्याकडून प्रत्यक्ष भेटीत ऐकली असल्याचे आठवले काका

मस्तच्चय गझल

सुटकेचा नि:श्वास टाकला शत्रूंनीही मी मेल्यावर<<< मात्रा माझ्या मते बरोबर
पण बेफीजी म्हणतात तो शब्द "मेल्यावरती" हा जास्त सुलभ असा आहे त्याकरिता मग "ही" काढावा लागेल जो जरासा भरीचाच वाटेल असा आहे ..मग असे होईल >>>>सुटकेचा नि:श्वास टाकला शत्रूंनी मी मेल्यावरती<<<<
मात्रांबाबत सहज एक प्रश्न उपस्थित झाला म्हणून विचार केला तो मत म्हणून नोंदवला गै स न Happy

चूक भूल द्यावी घ्यावी .....