मुलांच्या दु:खाबद्दल (Grief) संवेदनशील होऊया!

Submitted by सीमा गायकवाड on 6 July, 2013 - 12:25

पालकाचा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामूळे मुलांमध्ये दिसणार्‍या मानसिक समस्यांवरती ग्रिफ थेरपी (Grief Therapy) करतात.

मृत्यू, त्याचा शोक किंवा दु़:ख आणि त्यामधून बाहेर पडणे याला ग्रिव्हिंग (Griving) म्हणतात. जवळच्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो त्यानंतर मुले किंवा प्रौढ व्यक्ती दु:खाच्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतात आणि ही प्रक्रिया होणं गरजेचं असतं.

मृत झालेल्या व्यक्तीबद्दलच्या भावना, ती व्यक्ती जाण्याने निर्माण झालेली पोकळी, अभाव याबद्दल व्यक्त होत राहणं हा या प्रक्रियेचा महत्वाचा भाग असतो. हे आपापलं करणं मुलांना शक्य होत नाही. कारण आपल्याला नेमकं काय वाटतंय हे व्यक्त करण्याची भाषा त्यांच्यामध्ये विकसित झालेली नसते, त्यामूळे मुलं ग्रिव्ह (Grieve) करू शकत नाहीत म्हणजेच इतरांच्या मदतीशिवाय दु:खातून बाहेर पडू शकत नाहीत. .

आपला समाज मात्र याबद्दल फारशी संवेदनशीलता दाखवताना दिसत नाही कारण मुलांना दु:ख होतंय किंवा वेदना होतेय (pain) ही जाणिवच मूळी मोठ्या व्यक्तींना प्रचंड त्रासदायक किंवा वेदनादायक ठरत असते, ही वेदना आपल्याला होऊ नये म्हणून मोठी माणसं काय करतात? तर 'मुलांना कसलं आलंय दु:ख'? असं म्हणून या वास्तवाकडे दुर्लक्ष करतात (Denial). परिणामी दु:खाबद्दल बोलायला मृत व्यक्तीबद्दल बोलायला मुलांना स्पेस मिळत नाही. मुलं जरी स्वतःहून बोलायला लागली किंवा रडायला लागली तर त्रास होईल म्हणून बर्‍याचदा मुलांचे लक्ष दुसरीकडे वेधले जाते (Distraction). अशा परिस्थितीमध्ये मुलांचे दु:ख बाहेर न पडल्याने त्यांची घुसमट होत असते. ही जास्ती प्रमाणात झाली तर मुलांमध्ये मानसिक ताणतणावाची विविध लक्षणे दिसू शकतात.

काही वेळेला संवेदनशील व्यक्ती आजूबाजूला असतील (आजी, अजोबा, मावशी, मामी, काका, शिक्षक इ,) तर ते मुलांना बोलायला स्पेस देतात, आधार देतात. अशा मुलांमधले दु:ख बाहेर पडू शकते आणि त्यांच्यामध्ये अशा समस्यांचे प्रमाण कमी दिसते.

दुर्दैवाने आपल्या समाजात असं होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. पाश्चात्य समाज त्यामानाने याबाबतीत ब/राच संवेदनशील आहे. दु:खाबद्दलची भाषा, ते व्यक्त करण्यासाठी स्पेस देणे या गोष्टी आजूबाजूची मंडळी जागरूकतेने करताना दिसतात. शाळांमध्ये देखिल काऊन्सेलर अशा मुलांबरोबर ग्रिफवर्क (Grief Work) करतात.

माझ्या शाळेमध्ये अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, चिडचिड करतो, मित्रांशी पटत नाही यासाठी ८ वर्ष वयाच्या एका मुलाला शिक्षिकेने माझ्याकडे पाठवले, त्याच्याशी बोलताना मागच्या वर्षी वारलेल्या त्याच्या आजोबांचे दु:ख, शोक व्यक्त करण्याची संधी/स्पेस त्याला मिळाली नव्हती हे लक्षात आल्यावर मी त्याच्याबरोबर ग्रिफवर्क (Grief Work) केले आणि त्याची लक्षणे बर्‍यापैकी कमी झाली.

आपल्याकडे देखिल यासंदर्भातली जाणिव वाढली पाहिजे, जेणेकरून वेळिच मुलांना यासंदर्भात मदत करून पुढे येणार्‍या वेगवेगळ्या समस्यांचा प्रतिबंध करता येऊ शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या प्रकारच्या कौन्सुलिंगबद्दल दिलेल्या माहितीसाठी आभार. या विषयाकडे या निमित्ताने लक्ष वेधलंत. अशा वेळी काय करायचं हे खरंच कळत नाही. तुम्ही खूप छान सांगितलंय.

( सामाजिक, कौटुंबिक गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील विषयांवर मायबोलीवर इथून पुढे संतुलित मतं वाचायला मिळतील असं आपल्या मायबोलीवरच्या उपस्थितीने वाटून गेलं. Happy )

संवेदनशील विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन.
या सर्व प्रक्रियेतून गेल्यामूळे लेखाबरोबर स्वतःला खूप जास्त प्रमाणात रिलेट करू शकले. माझी आई गेली तेव्हा मी जेमतेम ८ वर्षांची होते, शिवाय आई किंवा वडीलांच्या मृत्यूमूळे किती नुकसान होऊ शकते हे आत्ता या वयात कळतेय, तेव्हा कळत नव्हते. आजूबाजूचे लोक असंवेदनशील होते असं म्हणणं चूक ठरेल पण ग्रिफवर्क करावं इतकं एक्स्पोजर नक्कीच नव्हतं (कुणालाच)
आज हा लेख वाचल्यावर जाणवलं की ते करणं किती गरजेचं होतं आणि आपलं किती नुकसान झालंय. आणि ती नुकसान भरपाई बहुतेक आयुष्यभर चालेल.
या लेखाच्या माध्यमातून एक वेगळी जाणिव निर्माण केल्याबद्दल आभार.
निदान माझ्या आयुष्यात तरी पुढील पिढीस अशा कोणत्याही प्रकारच्या नुकसानाला सामोरं जावं लागू नये यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!