मातृत्व

Submitted by vaiju.jd on 4 July, 2013 - 13:39

॥ श्री ॥

रोज सकाळी उठून फिरायला जायची सवय खूप वर्षे होती. खरे सांगायचे तर उठताना जरा येतो कंटाळा वगैरे ,’उद्यापासूनसुरू करू !’ असे वाटते. पण एकदा त्या फिरण्याचा ’चस्का’ लागला नां की राहावतच नाहीझोपून! सकाळची शांत वेळ, ताजी हवा, झाडे-पाने ताजी तवानी, पक्षी किलबिलाट करत असलेले, सूर्ययेण्याची हलकी हलकी चाहूल आणि अशात कुणाचे कोण लागत नाही असे आपण! आपले मनही ताजेआणि रिकामे असल्याने आजूबाजूच्या निसर्गाचा खूप आनंद घेता येतो. सगळ्या वातावरणातल्याताजेपणाचा स्पर्श होऊन आपणही हलके हलके, शांत , समाधानी होऊन जातो. हा अनुभव आहे माझाकितीतरी वर्षे सलगपणे! कितीतरी ओळखीचे चेहेरे भेटतात वर्षनवर्ष येणारे!

अशी सकाळी फिरायला गेलेलीअसताना रस्त्यात चार कुत्र्याची पिल्ले दिसली. छोटी बाळे सगळीचगोजिरवाणी दिसतात तशी ही पण दिसत होती. दोन तांबडी, एक काळे आणि एक काळेपांढरे खेळतहोती. त्यांची आई पलीकडे पहुडली होती. मी राऊन्ड मारुन आले तर पिले भांडत होती. काळ्यापांढर्यापिलाकडून बाकीची काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न करत होती. ते पिलू चटकन पळून रस्त्याच्या त्याबाजूला गेले. मी थांबून बघत होते, मी सहजच काळ्यापांढार्‍या पिलापाशी जाऊन पाहिले. रस्त्यावरचेमोडके प्लॅस्टिकचे बॉलपेन त्याने उचलून आणले होते. ते चावत ते त्याच्याशी खेळत होते आणि त्याचीभावंडे त्यासाठी भांडत होती. मला गंमत वाटली.

मी परत राऊन्ड मारुन अलिकडच्या कोपर्‍यावरून वळले तेव्हा एक रिक्षा आवाज करत भरधाव माझ्या समोरून पुढे गेली की मी त्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकला आणि क्षणात पिलांच्या केकाटण्याच्या आणि कुत्र्याच्या रडण्याच्या आवाजाने वातावरण भरून गेले. पुढे येऊन पहाते तर रस्त्याच्या मधोमध काळेपांढरे पिलू मरून पडले होते. त्याची आई रडत रडत पंजाने त्याला हलवून उठविण्याचा प्रयत्न करत होती. त्याची भावंडेपण रडक्या आवाजात ’कुकू’ करत त्याच्याकडे बघत होती. ऐकवत नव्हते. काही मिनिटांपूर्वी खेळात असलेले ते पिलू!

माझ्यासारखे चालायला आलेले काहीजण थांबले होते. चेहर्‍यावर खिन्नता, दु:ख होते. मी काही विचारण्याच्या आतच एकजण ओळखीचे म्हणाले ,’ हे रिक्षावाले उद्दाम हो!’ बघवत नव्हते पण घरी निघून जावे वाटेना. मी एक राऊन्ड मारुन परत आले तर पिलाची आई रडत पिलापाशी बसून होती. भावंडे तिच्याशेजारी काहीच आवाज न करता बसून होती. ते मोडके पेन त्या पिलाजवळ धुळीत पडले होते. मी तिथे थांबले मागून येणार्‍या बाई म्हणाल्या ,’ शेवटी आईची माया हो! वाईट वाटणारच’. मी चुकचुकले.

घरी आले तरी विसरता येईना. नंतरही दोन दिवस फिरायला जावेसे वाटले नाही. पण जखमेवर खपली धरतेच!

एकदा कर्नाळ्य़ाच्या पक्षी अभयारण्याकडे फिरायला गेलो. जरा पुढे पर्यंत फिरून आल्यावर अभयारण्याच्या गेटपाशी असलेल्या हॉटेल मध्ये चहा प्यायला थांबलो. दाट जंगल असल्याने तिथे माकडांच्या टोळ्या असतात. छोटी छोटी माकडे येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांकडून खाऊ मिळतो कां म्हणून रस्त्याच्या कडेला बसलेली असतात. काही टाकले, पडले की उड्या मारत घाईने येऊन उचलता. हुशार,चलाख असतात.

आणि अचानक रस्त्यावरून जाणार्‍या कुणीसे खाऊ टाकला. तो घ्यायला आलेल्या माकडाला मागून येणारी कार खाडकन धक्का मारुन निघून गेली. माकड जोरात फेकले गेले आणि गतप्राण झाले. सगळे क्षणात घडले. आम्ही दोघे, मी आणि नवरा कारमधून उतरत असताना हे सगळे नजरेला पडले. दु:खदायक होते. चहा पिण्याची ईच्छा मरून गेली. इतक्यात एक मोठ्या वयाची माकडीण तिथे आली. तिच्या पोटाला पोर होते ते तिने चटकन बाजूला रस्त्याकडेला ठेवले आणि येऊन त्या पिलाला उठवण्याचा , उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागली. पडलेल्या पिलाहून थोडे मोठेसे एक पिलू माकड माकडिणीच्या येऊन तेही त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागले.

रस्त्याच्या कडेला अनेक माकडे झुंड करून जमा होती. ती उतरून आली नाहीत. पण ती माकडीण,पोटाशी पोर घेऊन , आणि शेजारी असलेले दुसरे छोटे माकड, वाहन आले की रस्त्याच्या कडेला आणि रस्ता मोकळा झाला की रस्त्याच्या मध्ये धावत होती. ती माकडीण इतका करुण आकांत करत होती की ती त्या पिलाची आई आणि ती तिन्ही तिची बाळे असणार हे कळत होते. तिचा हृदयद्रावक आवाज ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले तसा नवरा उरकते घेत मला गाडीत बसवून घेऊन आला. त्या प्रसंगाची आठवण नंतर कित्येक दिवस मला छळत होती.

हे दोन्ही प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडले ते ही प्राण्यांच्या आयुष्यातले! आठवले की मला दु:ख होतेच,चुटपुट लागते. रिक्षावाल्याने वेगावर नियंत्रण ठेवले आणि प्रवाशांनी रस्त्यात चाळा म्हणून माकडांना खायला घालणे टाळले तर टळू शकण्यासारखे! निसर्गाचे नियम, नियतीचा न्याय, पर्यावरणाचा समतोल,असे मुद्दे उपस्थित करून, ‘ त्यात काय इतके दु:ख करण्यासारखे?’ असेही कुणी म्हणेल. कारण आजकाल माणसांचे अपघात होतात तेव्हाही माणसे थांबत नाहीत मदतीसाठी, दुर्लक्ष करून निघून जातात. पण मला त्या बद्दल काही म्हणायचेच नाहीये.

एक श्वानमाता, तिची एकावेळी चार अपत्ये आहेत पण तरी त्यातल्या एकाला आपण मुकलो, हे कळल्यावर तिने किती शोक केला!

त्यात काय तीन आहेत नां उरलेली, असे ती अजिबात वागली नाही किंवा त्या माकडमाऊलीला आपले पिलू मृत झाले याचे दु:ख तेवढेच तीव्र होते. मोठे एक आणि पोटाशी दुसरे होते तरी त्या पडलेल्या पिलाची माऊली आहोत हे तिने रडून रडून दाखवून दिले.प्राण्यांमध्ये मातृत्त्वाची भावना, वात्सल्याची ओढ किती मोठ्या प्रमाणावर असते हे मी समोर अनुभवले. गाईला वासरू येऊन चिकटले की पान्हा फुटतो हे तर आपल्या सर्वांचे ज्ञात सत्य आहे.

पण माणसांचे काय? वर्तमानपत्रात रेल्वेस्टेशनवर सापडलेल्या मुलांचे फोटो किंवा मंदीरात सोडलेल्या मुलांची छायाचित्रे ’या मुलांचे पालक कोण?’ म्हणून आलेले दिसतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होते. ते निष्पाप चेहेरे बघताना त्यांच्या मातेला कसे त्यांना सोडावेसे वाटले असेल? कां सोडावेसे वाटले असेल?असा प्रश्न छळतो. प्राणी, पक्षी यांनी ठराविक काळानंतर जबाबदारी झटकली तरी चालते. पण ते तसे करत नाहीत, मग आपण माणसे आपल्याला बुद्धी, वाणी, हास्य किती गोष्टी जास्तीच्या मिळाल्या आहेत.,बेजबाबदार कसे वागतो? आपले जगण्याचे, चारित्र्याचे, नितीमत्तेचे नियम असे कां आहेत की ज्यामुळे आपले मनुष्यपण ठाशिव, ठसठशीत होण्याऐवजी खिळखिळे, डळमळीत दिसून येते. भोवतालच्या समाजाचा आधार वाटण्यापेक्षा, त्याचे भयच व्यापून उरते की मातृत्वासारखी गोष्ट शाप वाटते आणि निष्पाप जीव सोडून दिले जातात. माता झाल्यावर ’हे मूल माझे आहे आणि मी माता आहे’ हे ठामपणे जगाला सांगायचे धैर्य तिला होत नसेल तर त्याच्या कारणांसाठी समाजाच्या एकूण मानसिकतेत बदल व्हायला हवा.

आज जरी शेतात सीता आणि पाण्यात कर्ण सोडले जात नसले तरी परिस्थिती फार बदललेली नाही. शेताच्या जागी रेल्वेस्टेशन आणि नदीच्या ऐवजी देवालये आली आहेत एवढेच! (तसेही शेतजमीनी आणि नद्या उरल्यात कुठे? आणि जास्तीत जास्त गर्दीच्या ठिकाणीच प्रायव्हसी जास्त मिळते हेही खरेच!) ही परिस्थिती बदलायला हवी. ’तर्पण’ देण्यापुरते पहाटेच्या अंधारात मातृत्व मान्य न करता भर रस्त्यात कोणाही आईला ताठ मानेने आपले आईपण जाहीर करता यायला हवे, मग ते कन्येचे असो वा पुत्राचे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैजु ताई, खूप भिडणारं, बोचणारं लिहिलय... जागं करणरं, अस्वस्थं करणारं अन विचार करायला लावणारही.

कालच माईंच्या (सिंधुताई सपकाळ) मांजरी येथिल संस्थेला भेट देण्याचा योग जुळून आला. प्रवेश दारापासून विशेष लक्ष वेधून घेतले ते तिथल्या स्वच्छ्तेने अन प्रेमळ शिस्तीने, गेट, पार्कींग, ऑफिस, स्वयंपाकघर, बेसिन्स एकदम चकाचक. निघताना शाळेतून येणारी मुलेही एका रांगेत अतिशय शिस्तीत येत होती. त्या गणवेषधारी, अज्ञाधारी मुलांच्या चेह-यावरच समाधान मला इतक काही देवून गेल की बास !

त्यांच्या आगमनानंतर लगेचच गॅसवर चहाच आधण चढवल्या गेल्याच भारी अप्रूप वाटल मला ममताच जातीने सगळीकडे लक्ष होत यात, इतकच नव्हे तर परीसरात जोपासलेले गेलेली अन डवरुन आलेले जाई - मोगरा ही तिच्याच घरातून संस्थेत आणलेली इथल्या सशक्त संगोपनाचे द्योतक होते.... अशा या जगनमातॄत्वाच्या घडून आलेल्या दर्शनाने मी कृतकृत्य झाले

-सुप्रिया.

धन्यवाद साती, अंजू,विजय,शुगोल,चैत्राली,दाद,नंदिनी,कुसुमिता,जाई, सुप्रिया, पुरंदरे शशांक .
सुप्रिया ताई तुमची प्रतिक्रिया आवडली. सिंधुताइंचा आश्रम मांजरी ला कुठे आहे?

लेख आवडला.
>> माता झाल्यावर ’हे मूल माझे आहे आणि मी माता आहे’ हे ठामपणे जगाला सांगायचे धैर्य तिला होत नसेल तर त्याच्या कारणांसाठी समाजाच्या एकूण मानसिकतेत बदल व्हायला हवा.>> +१
याबाबतीत मला इथले कायदे आवडतात. कोर्टामार्फत पितृत्व शाबीत करता येते. पित्याला आर्थिक जबाबदारी टाळता येत नाही. समाजाकडून मदत मिळते. आमच्या स्कूल डिस्ट्रिक्टमधे प्रेग्नंट टिन्स आणि टिन मॉम्सना शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी alternative school आहे. या वर्षी ग्रॅड्युएशन समारंभात सगळ्यात जास्त टाळ्या एका नव्या आईसाठी होत्या. Happy