थोपवावे मी कसे?

Submitted by निशिकांत on 3 July, 2013 - 03:13

पेटलेल्या काहुराला
शांतवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

पाळणाघर विश्व माझे
माय करते नोकरी
ऊब मायेची न तेथे
दु:ख सलते अंतरी
गात अंगाई स्वतःला
झोपवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

खेळणी भरपूर आहे
खेळतो मी एकटा
ना मला ताई न दादा
मीच मोठा, धाकटा
काचणार्‍या वेदनांना
जोजवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

अक्षरे गिरवून घेण्या
माय ना बाबा घरी
शिक्षणाचे तीन तेरा
मी रित्या कलशापरी
चित्र भावी जीवनाचे
रंगवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

कोक देते, चिप्स देते
ती घरी आल्यावरी
वेळ फिरवायास नसतो
हातही पाठीवरी
तृप्ततेचे स्वप्न नेत्री
जागवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

जन्म पुढचा द्यायचा तर
दे मला गरिबा घरी
हक्क आईचा मिळावा
ऐक माझे श्रीहरी
दु:ख तुज सोडून इतरा
दाखवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?
.

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सूंदर

गात अंगाई स्वतःला
झोपवावे मी कसे?............... वा

कोक देते, चिप्स देते
ती घरी आल्यावरी
वेळ फिरवायास नसतो
हातही पाठीवरी ................ हेही खास

चांगली रचना
Happy

फार आवडली. कविता सुरू झाल्यापासून यथोचित वळणे घेत मुक्कामावर पोचल्यासारखी, वेलस्ट्रक्चर्ड आणि परिपक्व भाषाशैलीची वाटली / आहे.

धन्यवाद.