आय अ‍ॅन्ड मी: भाग १

Submitted by चैर on 2 July, 2013 - 05:03

आज सकाळी:
**
जॉन आज कधी नव्हे ते चर्चला पळाला होता. गेल्या दोन-अडीच वर्षांत असं कितीतरी वेळा झालं होतं. आपण जे करतोय, वागतोय ते खरंच बरोबर आहे की चुकीचं असा प्रश्न त्याला खूपदा पडला होता! तो स्वतःच स्वतःला कन्फेशन द्यायचा आणि माफ पण करून टाकायचा! त्याने मुद्दामच चर्चला जायचं, कन्फेशन बॉक्समध्ये बसायचं टाळलं होतं. चुकून आपल्या तोंडून काही नको ते बाहेर पडलं तर? पण आज गोष्ट वेगळी होती. 'देवाने, कायद्याने मला शिक्षा केली तरी चालेल पण एका सरळसाध्या, भलं काम केलेल्या माणसाचा निष्कारण जीव जाऊ नये' असं त्याला मनापासून वाटत होतं. आफ्टरऑल, एक दिवस अभिषेकला पोलिस, जेलच्या कचाट्यातून सोडवून या सगळ्यात आणणारा, अडकवणारा तोच तर होता. मेणबत्ती लावून तो प्रेय करायला पुटपुटला.
"गॉड प्लीझ सेव्ह अभिषेक! प्लीझ…"
**
रीमा अजूनही धक्क्यातून सावरलेली नव्हती. औषधांनी शरीरावरच्या किरकोळ जखमा भरून निघत होत्या. मानसिक जखमा भरून यायला आजूबाजूची दोन-चार ,माणसं, तिचे बाबा सगळे तर आजूबाजूला होते पण-
पण अभि तिथे नव्हता! तिने आजपर्यंत त्याचा कधीच सिरीयसली विचार केला नव्हता. त्याने वेळोवेळी तसं इंडिकेट करूनसुद्धा नाही. दोन दिवसापर्यंत तिच्याकडे तसं असण्याला तिची कारणं होती. पण आता-- तिला स्वतःलाच ती कारणं फुटकळ वाटायला लागली होती. निदान एकदातरी त्याच्याशी बोलता येईल का?
"बाबा, अभिचं काही कळलं का?" सकाळी कॉफी घेऊन बाबा तिच्या बेडपाशी आल्यावर तिने विचारलं. त्यांनी हताशपणे नकारार्थी मान डोलवली.
**
कुरतडकरांचं घर नॉर्मल होतं. प्रिया सकाळी कॉलेजला निघायच्या तयारीत होती. तिचे वडील श्रीनिवास कुरतडकर बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसले होते.
"आई, मी येते गं"
"अगं, चहा नाही घेणारेस का?" सीमाताईंनी किचनमधून विचारलं.
"नाही गं…मी मानसीमध्ये जातेय. आम्ही जर्नलस लिहीणारोत. तिथे होईल चहा!' म्हणून ती निघून गेली. सीमाताई श्रीनिवाससाठी चहा घेऊन आल्या. त्यांचं पेपर वाचण्यातून बराच वेळ लक्षच गेलं नाही. सीमाताई पदराने कपाळावर आलेला घाम पुसत बाल्कनीतून बाहेर पाहत बसून राहिल्या.
श्रीनिवासचं लक्ष गेल्यावर पेपरची पुरवणी उघडत त्यांनी विचारलं-
"आज तुझा चेहरा का उतरलाय? बरं वाटत नाहीये का?". बायकोचं काहीच उत्तर आलेलं नाही ते बघून त्यांनी पेपर बाजूला ठेवला.
"सीमा…काय झालंय?"
"कुणास ठाऊक…खूप अस्वस्थ वाटतंय…"
"डॉक्टरकडे जायचंय का?"
"नाही…नाही…मला काही होत नाहीये…राग येणार नसेल तर एक विचारू का?" त्या काय विचारू शकतात याचा पुरेपूर अंदाज आलेला श्रीनिवासने काहीही उत्तर न देता पुन्हा पेपरच्या पुरवणीमध्ये डोकं घातलं.
"अहो, ऐकताय ना? प्लीज जरा चौकशी करायची का? पहाटेपासून माझा जीव खूप घाबराघुबरा होतोय…अभी बरा असेल ना?" अभिचं नाव ऐकल्यावर श्रीनिवासने हातातला पेपात टेबलवर फेकला आणि जागचे उठून रागात म्हणाले-
"तुला किती वेळा सांगितलंय…तो मला कधीच मेलाय…आता तो जिवंत असो, मेलेला असो, मरायला टेकलेला असो…मला काही देणं-घेणं नाही"
'किती अभद्र बोलताय' सीमाताई स्वतःशीच म्हणाल्या.
त्यांनी आन्हिकं आटपून दत्तापाशी दिवा लावला-
"देवा, माझ्या अभिची काळजी घे"
**
'तो' जेलच्या 'एवढ्या मोठ्या' कोठडीत एकटाच होता. मागे एकदासुद्धा त्याला याच ठाण्यात, याच कोठडीत ठेवलं होतं. तेव्हा अजून दोन-चार भुरटे चोर, पाकीटमार, बेवडे, गर्दुल्ले अशी सहा-सात माणसं होती. तेव्हा हीच कोठडी किती लहान वाटली होती- त्या लोकांच्या गोंगाटाने अगदी नकोसं झालं होतं आणि आता ही भयाण शांतता नकोशी वाटत होती. गेली अखंड रात्र त्याने जागून काढली होती. केलेल्या कुठल्याच गोष्टीबद्दल त्याला अजिबात पश्चाताप वाटत नव्हता. जेव्हा पकडला गेला तेव्हा त्याला क्षणभर वाईट वाटलं होतं खरं…आयुष्यात पहिल्यांदा पाय घसरला तो क्षण आठवला. कधीच मागे टाकलेले नातेवाइक, मित्र सगळं आठवलं.…पण क्षणापुरतंच! यावेळी आपण फार सहजासहजी सुटणार नाही याची त्याला खात्री होती.
त्याला पुन्हा एकदा आदल्या रात्रीचा 'तो' प्रसंग आठवला. त्याने चिडून हाताची मुठ जमिनीवर आपटली. हातालाच इजा झाली म्हणून हात मागे घेतला आणि छताकडे पाहत भेसूर हसला.
**
अभिषेक कुरतडकर हिंदुजामध्ये आय.सी.यु मध्ये ऍड्मीट होता. खूप मशिन्स आणि नळ्यांनी त्याला वेढलेलं होतं. डॉक्टरने त्याची कंडीशन क्रिटीकल असल्याचं सांगितलं होतं. गेले १२ तास त्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न चालू होते. पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. अभिषेक वाचणं आता जवळपास अशक्य वाटायला लागलं होतं.

या सगळ्यात स्वर्गाच्या दाराशी एक अजबच भांडण सुरु झालं होतं. स्वर्गाचा रखवालदार या अजब भांडणाने भांबावला होता! अभिषेक कुरतडकरची दोन मनं - 'I आणि Me' एकमेकांशी भांडत होती.
I म्हणत होता- 'अरे कशाला हा मरायचा, स्वर्गबिर्गात जायचा अट्टाहास? आपल्याला वाचवायला लोक झटतायत. त्यांना आपली किंमत आहे, आपली गरज आहे. आपण त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे"
Me म्हणत होता- 'हे तुझं नेहमीचं आहे! जरा कुणी कौतुक केलं की विरघळतोस. अरे तुला कळतंय का? आपण स्वर्गाच्या दाराशी उभे आहोत. अख्खा जन्म लोक इथे यायला धडपड करत असतात. आत्ता वाचलो-परत गेलो तर पुढच्या वेळी एवढं पुण्य तरी पदरी असेल का काय माहित? त्यापेक्षा आत चल. नको ते जगणं, नको ती माणसं, नको तो मनःस्ताप! कुणीतरी म्हटलंच आहे- मरेपर्यंत फाशी शिक्षेत काही गम्मत नाही! मरेपर्यंत जगणं हीच खूप वाईट शिक्षा आहे"
रखवालदार आता काहीसा वैतागला होता. ही चर्चा- भांडण जे काही चाललंय ते कधी संपणारे का? असा त्याला प्रश्न पडला होता. I ला इथे राहायचं नव्हतं आणि Meला परत जायचं नव्हतं.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users