|| कृष्णम् वंदे जगद्गुरुम् || ह्याचा खरा अर्थ काय असावा . . . .

Submitted by परब्रम्ह on 1 July, 2013 - 12:00

|| श्री गणेशाय नम: ||

नमस्कार मायबोलीकर !

आज अचानक प्रेरणा झाली आहे आणी मी पुनःश्च भगवंताच्या लीलांचे पृथक्करण करुन आपणा सर्वांच्या बरोबर वाटुन घेण्यास बसलो आहे.

पुराण शास्त्रांतील गोष्टी ह्या नुसत्याच वेळकाढू भाकड गोष्टी नसुन त्यातुन आपल्याला काय शिकुन अवगत करुन घ्यायचे आहे, भक्ति म्हणजे अर्थपूर्ण रितीने काय, जेव्हा तो परमेश्वर अवतार घेतो त्याची काय कारणे असावित, त्या अवतारांचे संपूर्ण जीवनच आपल्या सर्वांसाठी कसे बोधपूर्ण असु शकेल ह्याचा एक अल्पसा प्रयत्न मी ईथे करीत आहे.

प्रसंग सत्य घटना आणी आपला इतिहास आहे, गोष्टीरुपाने सागतांना थोडाफार वक्तव्याचा फरक झालाच असणार परंतु त्यामुळे मूळ सत्यता बदलली नाही.

श्रीकृष्ण अवतार : अवतरताच जगद्गुरु !

बाहेरील झंजावात आता पुष्कळ जोर धरुन होता, तीव्र वेगाने वाहणार्‍या वायुने सर्व वृ़क्षांची अवस्था अशी करुन टाकली होती कि, आत्ता ते वृक्ष मुळापासुन उखडतात कि काय ! त्या गहन अंध:कारात एकही आशेचा किरण दिसुन येत नव्हता, पावसाने तर वार्‍या सोबत जणु काय स्पर्धा चालवली होती, तीव्र कडाडत्या ध्वनिने मेघांचे साम्राज्य जलधारांबरोबरच विद्युत प्रकाशानेही दर्शनास येत होते.

वसुदेव कारागृहाच्या द्वारापासुन आत मागे वळला, नुकत्याच अवतरुन झालेल्या त्या इवल्याश्या पुत्राच्या रुपातील भगवान महाविष्णु आपल्या रुपा बरोबरच आपला मेघांप्रमाणे श्यामवर्णी रंग घेऊनच अवतरला होता, आणी आता अगदी निरागस आनंदाने उजव्या पायाचा तो अगदी ईवलासा अंगठा अगदी मुखापर्यंत ओढून चोखायचा प्रयत्न चालु होता. बाहेरच्या जगताच्या संकटांशी पूर्ण अनभिज्ञ ( ? ), ते गोंडस मनोहर रुप आपल्या माता पित्याकडे उत्सुकता भरल्या डोळ्यांनी निरखून पाहात होते.

देवकीला राहावले नाही, तिने मोठ्या कळकळीने परमेश्वराची प्रार्थना केली " देवा ! तूच आला आहेस आणी तुझ्या ह्या निष्पाप सुंदर रुपाला मी कुठे लपवुन ठेवु त्या कंसा पासुन ? आत्ता जातील त्याचे हे बाहेरच उभे असलेले सेवक आणी सांगतील त्या कंसाला, आता मी काय करु ? देवा ! तूच तार आता ह्याच क्षणाला ! "
वसुदेव, देवकिची अवस्था पाहुन कासाविस होत होता, काय करु देवा आता ?
" मला घेऊन ह्या कारागृहाच्या बाहेर चल ! " वसुदेवाच्या मनापासुन परंतु कसलीही अपेक्षा न ठेवता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आले होते.
अचानक झालेल्या ह्या प्रेरणेने वसुदेव गोंधळला होता, "असे कसे शक्य होईल देवा ?"
"वसुदेव ! प्रयत्न करण्यास मनाची आवश्यकता श्रमांपेक्षा जास्त असते ", वसुदेवाने आणखीन वेळ न दवडता, जवळच ठेवलेली एक टोपली ( खाण्या साठी पदार्थ ह्याच टोपलीत पुरवली जात होती कारागृहात बहुतेक ), उचलली, आपले उत्तरीय त्यात नीटपणे ठेवुन बाळासाठी गादी बनवली आणी एका बाजुचा शेला वेगळा ठेवला त्याला पावसापासुन झाकण्यासाठी ( बाळ ओला तर होणारच पण कमीतकमी त्याच्या अंगावर ते पावसाचे मोठे मोठे थेंब पडुन त्याला असह्य न व्हावेत याकरीता ).
देवाचे स्मरण नामोच्चार करीत इवल्या भगवंताला त्या टोपलीत ठेवला आणी त्या ऊत्तरीयाच्या टोकाने त्याला चांगला झाकून टोपली उचलुन डोक्यावर घेतली ( कारण जरी कोणाची दृष्टी पडलीच तरी तान्हे बाळ दिसु नये ह्या उंची वरुन, पित्याची भोळी माया ! ), आणी निघाला कारागृहाच्या द्वाराकडे मनात कोणताही किंतु न ठेवता . . . .

अचानक लक्षात आलं कि पायातल्या आणी हातातल्याही बेड्या निखळुन पडल्या, कारागृहाची द्वारे सताड उघडी पडली, कंसाचे सर्व सेवक गाढ निद्रेच्या अधीन झाले होते, त्या कडाडत्या विद्युत ध्वनींनाही न जुमानणार्‍या निद्रेच्या अधीन. . . .
वसुदेव तसाच भराभर चालत अगदी बाहेर आला, देवा आता ? "गोकुळात घेऊन चल ", पुनः प्रेरणेने वसुदेवाला एक निश्चित दिशा मिळाली होती आणी तो आता द्रुत गतीने मार्गक्रमणाला लागला.

यमुनेच्या तीरावर येऊन पाहिले तो काय ? ती दुथडी भरुन वाहात होती, " हे परमेश्वरा ! रक्षण करा !" निघाला तसाच त्या तिव्र जलौघाकडे, त्यात शिरुन पुढे निघाला, पाण्याची पातळी ही वाढत होती, नाकापर्यंत पाणी येऊन जोराने वाहात जात होते, कसाबसा स्वतःचा तोल सांभाळत डोक्यावरील तान्ह्याला काही ईजा होऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणखीन पुढे खोल पाण्यात आला, ईथे पात्राच्या मधे पाणी उसळ्या मारत होते जणु, त्या पाण्याच्या उसळण्यात वसुदेवाला वाहुन नेण्याऐवजी त्याच्या डोक्यावरल्या भगवंताचे दर्शन व्हावे अशीच ईच्छा जास्त जाणवत होती.
अचानक एक मोठीच लाट पाण्यात वाहात आली आणी अगदी वसुदेवाच्या ही डोक्यावरुन वेगाने वाहात पुढे गेली, आपला तोल सांभाळत वसुदेवाने टोपली आणखीनच घट्ट धरुन निर्धाराने पलिकडच्या तीरावर जाण्यासाठी पाण्यात पाऊल उचलले मात्र !
हे काय ? पाणी कुठे गेले ? अचानक ईतके खालच्या पातळीवर कसे काय जाईल पाणी ? आत्ता तर डोक्यावरुन वाहायला लागले आणी आता अगदी गुडघ्यांपर्यंतच कसे काय आले ?
आणखीन विचार न करता झटकन पात्राच्या बाहेर येऊन गोकुळाचा मार्ग धरला. . . .
गोकुळातही जणु निद्रादेविचे एकछत्री राज्य होते ! सगळे घरांमध्ये अगदी गाढ झोपले होते, त्या वादळातही.
पटकन नंदाच्या घरात आला, त्याच्या शयन कक्षेत यशोदा नुकत्याच जन्मलेल्या अपत्या शेजारीच झोपली होती.
वसुदेवाने आपला तान्हा तिच्या शेजारी ठेवुन ते यशोदेचे बाळ उचलले ( ईथे त्याला हे करण्यास ही प्रेरणाच झाली असावी कारण त्याच्यासारख्या पापभिरु मनुष्याने आपले मूल ठेवुन दुसर्‍याचे घेऊन त्याला संकटात लोटावे अश्या प्रवृत्तीचा तो नव्हताच ).
यशोदेला तर मायेच्याच प्रभावामुळे हे सुद्धा ज्ञात नव्हते कि आपल्याला कन्या प्राप्ति झाली कि पुत्र प्राप्ती ?

परतीच्या मार्गावर त्याला पुन्हा तेच वादळ, पुन्हा पात्रातील वाढणारे पाणी आणी कारागृहात आल्यावर जसेच्या तसे सेवकांचे पहारा देणे, हातापायात पुन्हा अपोआपच बेड्या पडणे आणी इतकेच नाही, तर त्या यशोदेच्या अपत्याच्या टाहो फोडुन रडण्याच्या आवाजापर्यंत सगळे झाले.
ती एक कन्या आहे हे उमजताच वसुदेव-देवकीच्या दु:खाला अंत राहिला नव्हता, आता हिला तो कंस सोडणार नाहिच, विचार मनात आलासुद्धा नव्हता आणी कंसाचे पाऊल त्यांच्या कक्षात पडले.
त्या लहानश्या कन्येचे पाय धरुन त्याने तीला भिंतीवर फेकण्यासासाठी विचारच केला असावा तोच ती त्याच्या हातातुन निसटुन समोर प्रत्यक्ष झाली. . . .
ते तेजस्वी अष्टभुज रुप पाहुन सर्वांचे डोळेच काही क्षणांसाठी अंध झाले होते. . . . " त्या अतिदिव्य मूर्तीने हंसुन कंसाला उद्देशुन सांगितले . . . ." मी त्याच्या अथवा त्याच्या भक्तांशिवाय कोणाच्याही हातात कधीच येत नाही कंसा ! तू ज्याचे प्राण घेऊ इच्छितोस तो तर ह्या सर्वच चराचराचाच प्राण आहे आणी आता तर गोकुळात आहे !"
आणी ती महामाया आपल्या स्व-स्वरुपात विलीन झाली.

त्या सर्वच्या सर्व देवतांस माझे अनंत प्रणाम . . . .
-----------------------------------------
मायबोलीकरहो ! असे आहे कि, ह्या जगद्गुरुने अवतरताच ( जन्मत:च म्हणणे योग्य नाही कारण तो प्रगट झाला होता जन्मला नव्हता ).

शिकवण दिली ती अशी असावी कि . . . .

कितीही आणी कशीही संकटे आली अथवा परिस्थीती कितीही कठीण असली आणी तुम्ही जर त्याही परिस्थीतींमध्ये जर मला मस्तकावर धारण ( आपल्या त्या क्षणीच्या अत्त्युच्च मानसिक पातळीवर ) करुन, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवुन भक्तिभावाने बसवलेत, तर तुमची सर्व बंधने तुटुन पडतील, तुम्ही बंधनमुक्त व्हाल, पहार्‍यावर वाट पाहात बसलेली सेवकरुपी अधीक येऊ घातलेली सर्व संकटे निष्प्रभ होतील.
वादळ रुपी अत्यंत कठीण परिस्थीतींमध्ये तुमचे सर्व मार्ग प्रशस्त होतील.
दुथडी भरुन वाहाणार्‍या जीवनरुपी ज्ञानाच्या आत्यंतिक खोलात माझ्या बरोबर जाल तेव्हा त्या ज्ञानाच्या प्रभावाने माझ्याशी संयोग पाउन तुमच्या मार्गात ते उत्कृष्ट ज्ञान ही तुम्हाला नम्रतेने वाट देईल ( म्हणजेच त्या ज्ञानाच्या योगे तुमचे मार्ग सोपे होतील ), आणी तुम्ही माझ्या सान्नीध्यात भवजलाचे - जीवनाचे, अतिकठीण पात्रही अगदी सहज ओलांडुन जाल.
आपल्या गंतव्या पर्यंत आपल्याला शरण आलेल्या भक्ताला जो भक्तिने वा मायेने, वात्सल्याने मला मस्तकावर ( मनाच्या अत्त्युच्च पातळीवर ) जो धारण करतो त्याला अशक्य काहीही नसते.
परंतु . . . .
मला सोडुन देऊन जर तुम्ही मायेला मस्तकावर धारण कराल तेव्हा तुमची सर्व संकटे तुम्हाला पुन्हा भेडसावुन सोडतील, तुम्ही पुन:श्च आपल्या भूतकालीन परिस्थीतीत लोटले जाल आणी पुन्हा तुम्ही त्याच बंधनांत पडाल.

तेव्हा मी तुमचा असुनही तुमच्या सान्नीध्यात नसेन कारण तुम्ही स्वतःच मला दूर करुन आलेले असाल.
आणी ज्या मायेला तुम्ही बरोबर घेऊन याल ती तुम्हाला अनिश्चित संकटांत सोडुन निघुन जाईल.

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परब्रम्ह,

तुमची तळमळ पोहोचली.

>> गोष्टीरुपाने सागतांना थोडाफार वक्तव्याचा फरक झालाच असणार परंतु त्यामुळे मूळ सत्यता बदलली नाही.

अशाच एका गोष्टीरूपी फरकाची आठवण झाली. थोडा अवांतर प्रतिसाद आहे. सांभाळून घ्यावे ही विनंती. Happy

श्रीकृष्णाच्या जन्माचे वेळी पावसाचे तांडव चालू होते असं साधारणपणे मानलं जातं. याचं कारण बहुधा आजचा गोपाळकाला (श्रावण कृष्णाष्टमी) ऐन पावसाळ्यात येतो, हे असावं. मात्र श्रीकृष्णाचा जन्म सुमारे ७५०० वर्षांपूर्वी झाला आहे. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दरवर्षी ऋतू सुमारे २० मिनिटे आगोदर येतात. त्यामुळे ७५०० वर्षांपूर्वी ऋतू १,५०,००० मिनिटे ( = ७५०० * २०) अगोदर आलेले असणार. तर १,५०,००० मिनिटे म्हणजे सुमारे १०४ दिवस ( = साडेतीन महिने) होतात. म्हणून आज जो पावसाळा ज्येष्ठ-आषाढ-श्रावण-भाद्रपद असा असतो तो १०४ दिवस पुढे असणार. म्हणजे पावसाचे चार महिने अर्धभाद्रपद-अश्विन-कार्तिक-मार्गशीर्ष-अर्धपौष असे असणार. साहजिकच श्रावणात भर उन्हाळा ( = आजच्या वैशाखाचं वातावरण) असणार.

प.वि.वर्तक यांच्या म्हणण्यानुसार हरिवंशामध्ये कृष्णजन्माचे वेळी गोकुळी जमिनीवर कोरडे शेण (गोवर्‍या) पसरल्या असल्याचा उल्लेख आहे. वर्तकांचा मूळ (इंग्रजी) लेख इथे मिळेल : http://www.hindunet.org/hindu_history/ancient/mahabharat/mahab_vartak.html

त्यामुळे निष्कर्ष काढावासा वाटतो की एकतर कृष्णजन्मी पाउस पडला नाही, किंवा पडला असलाच तर तो वळवाचा असावा. वळवाच्या पावसाने यमुनेला मोठा पूर येणे अशक्य आहे. मात्र उन्हाळ्यात हिमालयातले बर्फ वितळून नद्यांच्या पातळ्या वाढतात. कृष्णजन्मीचा पूर हिमविलयाचा असावा.

आता माझी रिक्षा Proud : पृथ्वीच्या परांचन गतीवर इथे भाष्य सापडेल.

अर्थात या चिकित्सेमुळे लेखाच्या मूळ उद्दिष्टास धक्का लागत नाही.

आ.न.,
-गा.पै.

श्रीकृष्ण आत्मतत्वाचे मूर्तिमंत रूप आहेत. प्राणीमात्रांमध्ये चेतनेच्या स्वरूपात ते उत्तरोत्तर अधिक अभिव्यक्त होतात. मनुष्यात या चेतन तत्वाचा पूर्ण विकासच आत्मतत्वाची जागृती होय. जीवन सृष्टीतून उद्धृत व विकसित होते. त्रिगुणात्मक सृष्टीच्या रूपात श्रीकृष्णाच्याही तीन माता आहेत. 1- रजोगुणी प्रकृतिरूप देवकी जन्मदात्री माता आहे. 2- सत्गुणी सृष्टीरूप माता यशोदा आहे. तिचा वात्सल्य व प्रेमरस पिऊन श्रीकृष्ण मोठे झाले. 3- याव्यतिरिक्त तमसरूपी पूतना माता आहे. तिला आत्मसृष्टीचे अंकुरण आवडले नाही. म्हणून वात्सल्याच्या अमृताऐवजी ती विष पाजते. मात्र, कृष्णास काहीही न होता पूतनेस आपला प्राण गमवावा लागतो. सृष्टीचेच तामस तत्व चेतन तत्वाचा विकास खुंटवण्यास असमर्थ असल्याचा संदेशच यातून मिळतो. भौतिक सृष्टीत विनाशाच्या असंख्य क्रिया सुरू असतानाही जीवन विकासाचा क्रम अखंड राहिला आहे. व्यक्तीच्या अध्यात्मिक विकासाच्या शक्यतांमधे वाढ झाली आहे. श्रीकृष्ण चेतनेचेच रूप असून त्रिगुणात्मक सृष्टीपासून निर्मित आपल्या मन व बुद्धीमध्ये चेतनेचा प्रकाश मन-बुद्धीच्या गुणस्थितीनुसारच होत असतो. मन-बुद्धीच्या विकासासोबतच कृष्ण चेतनेची प्रभाही अधिक प्रकाशित होत असते. श्रीकृष्ण जन्मकथेतून हे तत्वच अधोरेखित होते.

कृष्ण जन्म लहानांसाठी गोपाळ काल्याचा प्रसाद आहे तर वद्धांना भक्ती आणि मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा, सुगम करणारा आहे. परंतु, जीवनाचा मधला टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण असतो. उषा:कालाची लालिमा घेऊन जीवन प्रकाशमान व्हायचे असते. आपल्या यश किरणांनी, तेजाने दाही दिशा प्रकाशवान, स्फूर्तीवान करण्याचा काळ म्हणजे तारुण्य.

आजपर्यंत आपण गोपाल काला भरभरून खाल्ला, जागरण केलं, खूप लोणी खाल्लं. परंतु, जीवनाचा हा टप्पा वेगळा आहे. ज्या भूमीत आपण जन्म घेतला, तिथला धर्म, नीती आणि त्यामधून मिळणारा संदेश गाठी बांधून आपलं तारुण्य चमकावणे गरजेचे असते. जीवनाचा हा पाया जेवढा अधिक मजबूत असेल. तेवढाच भक्कम आधार जीवनाला देता येईल.

आजची तरुण पिढी निराशेची शिकार आहे. बदलत्या परिस्थितीत सकारात्मक विचार, आत्मचिंतन, ह्या गोष्टींचा अभाव झाला आहे. म्हणूनच जीवनात येणारा प्रत्येक प्रश्न त्यांना भंडावून सोडतो. त्यातून मार्ग काढणे त्यांच्या दृष्टीने अशक्य वाटते. आत्मबळ कमी असल्याने एका अनामिक भीतीच्या आधीन असतात, अशा वेळी पौराणिक कथा त्यांना आधार देतात.

समाधानाचा मोठा गुरू मंत्र आहे. जेव्हा आपण आपले कर्तव्य पूर्ण करतो, त्यावेळी मिळणारे आत्मिक समाधान यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे. हाच जीवन संदेश भगवान श्रीकृष्ण गीता या अलौकीक ग्रंथातून देतात. कृष्ण हे संसारी पुरुष होते. ते कधी तपश्चर्या करायला गेले नाही, की एकांतवासात बसले नाही. जिथे जेव्हा त्यांची आवश्यकता होती तेव्हा ते सदैव तत्पर अन हजर असत. जीवनाच्या प्रत्येक नात्याशी कस समरस व्हावं हे कृष्ण चरित्र सांगतं.

कृष्णं वंदे जगद्गुरुम् याचा अर्थ माझ्या मते जो कृष्ण जगातील सर्वांचा गुरू (आहे) त्याला मी पण माझा गुरू मानून मी नमस्कार करतो.

भगवान श्रीकृष्णांना माझा गुरू मानतो. त्यांनी गीतेत बरेच काही काही सांगितले आहे. पण कै. लोकमान्य टिळकांनी सांगितल्याप्रमाणे कर्मण्ये वाSधिकारस्ते हे सर्वात उपयुक्त नि महत्वाचे.

कुठले कर्म करायचे? तर आपले कर्तव्य? कर्तव्य काय? तर ब्राह्मणांचे कर्तव्य विद्याभ्यास नि विद्यादान. नि क्षत्रियांचे कर्तव्य अधर्म नि अन्याय यांचा विरोध करणे.
ब्राह्मण कोण, क्षत्रिय कोण? गुणकर्मविभागशः! आई बाप कुणि का असेनात.

सध्याची परिस्थिती अशी दिसते की हे सगळे विसरून उगीच ज्याचा रोज काही उपयोग नाही त्या गोष्टींचा उहापोह करण्यात वेळ घालवायचा!!

अजूनहि वेळ गेली नाही. धर्म म्हणजे काय ते समजून घ्या नि मग म्हणा, हिंदू आहोत म्हणून.
भगवान श्रीकृष्णांना स्वतःचे गुरू माना.

झक्की !

जरा पुढे येऊन नीट समजावुन सांगाल काय हे तुम्ही कुणाला उद्देशुन म्हणत आहात ?
-----------------
तर ब्राह्मणांचे कर्तव्य विद्याभ्यास नि विद्यादान > > > >

हे तर आम्ही आमच्या वैयक्तिक माहिती मध्ये लिहिलेच आहे जेव्हा मा.बो. ली कर झालोत तेव्हां. कि अध्यात्माचे अध्ययन आणी अध्यापन शक्यतो दोन्हीही करतो.
-----------------------------------------------
भगवान महाविष्णु आणी भगवान शंकर हे दोघेही माझे गुरुसुद्धा आहेतच. त्यात ह्यांचे ह्या दोन्ही ( परब्रह्माचे हे दोन्ही अवतार सगुण रुपी . . . .), अवतारांचे पुढील अवतारही अनायासे आलेच.
---------------------------------

झक्की . . . . क्षमस्व, परंतु माझे काही अनुभव आणी रोजची दिनचर्या ह्यात परमेश्वर आणी मी ह्यात काहिच अंतर नसल्याने कधी-कधी मी जे काही लिहितो ते एकदम कळण्यासारखे नसेल ही . . . .कैक वेळेस माझे भाषण वा लिखाण जे माझ्याकडुन होते ते ही असेच असावे . . . .

तुम्ही जे वर म्हणता त्यात पूर्ण तथ्य आहे पण हे सगळे माझ्यासाठी मागे राहिले आहे . . . . फळाची ईच्छा न करताच मी आपले कर्तव्य ईथेही करतच असतो, जे उमजतं ते वाटुन घेण्याचं !
एव्हढेच आहे तर मग क्षर आणी अक्षर ह्या दोन्हीही गोष्टी एकच आहेत हेसुद्धा कळालेच असेल ? कि नाही अजुन ?

------------------------------------------------------------
सध्याची परिस्थिती अशी दिसते की हे सगळे विसरून उगीच ज्याचा रोज काही उपयोग नाही त्या गोष्टींचा उहापोह करण्यात वेळ घालवायचा!! > > > >

कोणत्या गोष्टींचा उपयोग नाही ? आणी खरेच नसेल तर हे मायबोली ला सांगा ना कि धार्मिक वगैरे असे क्षेत्र लिखाणासाठी देऊ नका ! मग नाही लिहिणार आम्ही असे काही !

आणी हा सगळा उहापोह वाटतो तर कृष्णाला गुरु करुन उगीच वेळ का घालवत आहात ?
------------------------------------------------------------------

झक्की . . . . . मला ईथे कोणाचा अपमान करण्याची ईच्छा नसते, संवय नाही आणी असे मी कधीच करणार ही नाही . . . . .

आश्चर्याची गोष्ट आहे केव्हढी ही ! मी जे रोज जगतो, अनुभवतो, उमजतो तसेच लिहितो ही, सर्वांनाच ते उमजुन यावं अथवा कळावं असा माझाही आग्रह नाही, मग उगीच माझ्यामागे का आपला वेळ दवडता ईथे ?

मी जे रोज करतो, अन्नग्रहण करतो ते माझा देवसुद्धा माझ्याच बरोबर करतो आणी हे रोजचेच आहे, त्यात सगळ्यांना सांगत दवंडी पिटत नाही जात मी कारण हे सगळे रोजनिशी आहे, साधे आहे, सरळ आहे . . . .मी जिथे आलो अथवा पोहोचलो आहे तिथे सर्वांनी यावे ही सदिच्छा आहेच, मी पुढे असुन मार्ग दाखविन पण येण्यार्‍याच्या मार्गातला अंधार तो स्वतःच दूर करु शकतो तेव्हाच तो मला पाहु शकेल आणी मग दिशाहीन न होता पाऊलावर पाऊल ठेवुन येऊ शकेल.

नमस्कार . . . .

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

परब्रम्ह,

मी ऐकलेला अर्थ सांगतो. समजा कोण्या एका साधकाला गुरूप्राप्तीची तळमळ आहे, पण गुरू भेटत नाहीत. तर त्याने आपली साधना श्रीकृष्णास गुरू मानून पुढे चालू ठेवावी. प्रत्यक्ष गुरू भेटल्यावर प्रश्न मिटला.

आ.न.,
-गा.पै.

सध्याची परिस्थिती अशी दिसते की हे सगळे विसरून उगीच ज्याचा रोज काही उपयोग नाही त्या गोष्टींचा उहापोह करण्यात वेळ घालवायचा!! अजूनहि वेळ गेली नाही. धर्म म्हणजे काय ते समजून घ्या नि मग म्हणा, हिंदू आहोत म्हणून.

हे मी तुम्हाला वैयक्तिक रीत्या उद्देशून लिहीले नाही. समाजात तसे दिसले म्हणून म्हंटले.

परंतु माझे काही अनुभव आणी रोजची दिनचर्या ह्यात परमेश्वर आणी मी ह्यात काहिच अंतर नसल्याने
अभिनंदन. तुमच्या जीवनाचे सार्थक झाले. जे बहुतेक कुणालाच आजकाल जमत नाही, ते तुम्हाला जमले.

कोणत्या गोष्टींचा उपयोग नाही ? आणी खरेच नसेल तर हे मायबोली ला सांगा ना कि धार्मिक वगैरे असे क्षेत्र लिखाणासाठी देऊ नका ! मग नाही लिहिणार आम्ही असे काही !
आणी हा सगळा उहापोह वाटतो तर कृष्णाला गुरु करुन उगीच वेळ का घालवत आहात ?

तुमची श्रद्धा व तुमचे ज्ञान उच्च आहे हे समजून येते. तुम्ही हा उहापोह करावा. त्यात मी मा़झे मत मांडले म्हणजे आपोआप तुमचे मत खोडायला निघालो असे नव्हे.

माझ्या समजुतीप्रमाणे तुम्ही ज्ञानमार्गाने प्रवास केला. बरेच लोक अनेक कारणांनी तसे करू शकत नाहीत. उदा. मी. तेंव्हा मा़झ्या सारख्या लोकांनी हा उहापोह करण्यात अर्थ नाही. तरी कृष्ण गुरू का?

ज्ञान, कर्म व भक्ति हे तीन मार्ग मुक्तीसाठी भगवंतांनी सांगितले आहेत. काही ज्ञानमार्गाने जातात. काही भक्तिमार्गाने जातात. ज्ञान मार्गावर रहाण्यासाठी बुद्धि लागते, निष्ठा, श्रद्धा नि प्रयत्न लागतात. त्यात मी अपुरा पडतो. भक्तिमार्गहि श्रद्धेचा अभाव असल्याने जमणार नाही. म्हणून कर्ममार्ग समजून आचरणात आणण्यासाठी मी कृष्णाला गुरू मानतो.
ज्ञान व श्रद्धा या दोन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. तेंव्हा तुमच्या मताचा मी उपमर्द करीन किंवा निषेध करीन असे मनातहि आणू नका.

सध्याची परिस्थिती अशी दिसते की हे सगळे विसरून उगीच ज्याचा रोज काही उपयोग नाही त्या गोष्टींचा उहापोह करण्यात वेळ घालवायचा!! अजूनहि वेळ गेली नाही. धर्म म्हणजे काय ते समजून घ्या नि मग म्हणा, हिंदू आहोत म्हणून.

हे मी तुम्हाला वैयक्तिक रीत्या उद्देशून लिहीले नाही. समाजात तसे दिसले म्हणून म्हंटले.

परंतु माझे काही अनुभव आणी रोजची दिनचर्या ह्यात परमेश्वर आणी मी ह्यात काहिच अंतर नसल्याने
अभिनंदन. तुमच्या जीवनाचे सार्थक झाले. जे बहुतेक कुणालाच आजकाल जमत नाही, ते तुम्हाला जमले.

कोणत्या गोष्टींचा उपयोग नाही ? आणी खरेच नसेल तर हे मायबोली ला सांगा ना कि धार्मिक वगैरे असे क्षेत्र लिखाणासाठी देऊ नका ! मग नाही लिहिणार आम्ही असे काही !
आणी हा सगळा उहापोह वाटतो तर कृष्णाला गुरु करुन उगीच वेळ का घालवत आहात ?

तुमची श्रद्धा व तुमचे ज्ञान उच्च आहे हे समजून येते. तुम्ही हा उहापोह करावा. त्यात मी मा़झे मत मांडले म्हणजे आपोआप तुमचे मत खोडायला निघालो असे नव्हे.

माझ्या समजुतीप्रमाणे तुम्ही ज्ञानमार्गाने प्रवास केला. बरेच लोक अनेक कारणांनी तसे करू शकत नाहीत. उदा. मी. तेंव्हा मा़झ्या सारख्या लोकांनी हा उहापोह करण्यात अर्थ नाही. तरी कृष्ण गुरू का?

ज्ञान, कर्म व भक्ति हे तीन मार्ग मुक्तीसाठी भगवंतांनी सांगितले आहेत. काही ज्ञानमार्गाने जातात. काही भक्तिमार्गाने जातात. ज्ञान मार्गावर रहाण्यासाठी बुद्धि लागते, निष्ठा, श्रद्धा नि प्रयत्न लागतात. त्यात मी अपुरा पडतो. भक्तिमार्गहि श्रद्धेचा अभाव असल्याने जमणार नाही. म्हणून कर्ममार्ग समजून आचरणात आणण्यासाठी मी कृष्णाला गुरू मानतो.
ज्ञान व श्रद्धा या दोन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. तेंव्हा तुमच्या मताचा मी उपमर्द करीन किंवा निषेध करीन असे मनातहि आणू नका.

गा.पै.

प्रयत्न चांगला आहे . . . .

आता मी थोडी फोड करुन हे वाटुन घ्यायचा प्रयत्न करतो.

मी ऐकलेला अर्थ सांगतो
ऐकलेला अर्थ नको आहे ( ऐकलेले असल्याने त्यात केलेला प्रयत्न नाही ), काय वाटतं ते सांगावे-काय वाटतं म्हणजेच काय अनुभवास येतं ( आणी वाटणं किंवा अनुभवणं झालं म्हणजे प्रयत्न स्वतः हून केला आहे हे कळतं ), कारण ईथे हे स्वतःच करणे अत्यंत आवश्यक असते.
--------------------------------
समजा कोण्या एका साधकाला गुरूप्राप्तीची तळमळ आहे, पण गुरू भेटत नाहीत

ईथे गुरु हवा आहे कि भगवान हवा आहे ?

गुरु भेटत नाही कारण गुरु ओळखायची क्षमता असुनही ओळखत नाही, गुरु भेटण्यासाठी शिष्य होण्याची पात्रता आली कि त्वरित समोर गुरु दत्त म्हणुन उभा दिसतो, म्हणजेच ईच्छा झाली तीव्र पणे सगळी गात्रे, विचार, इंद्रिये, कर्मेंद्रिये, मन , बुद्धी हे सर्व एकाच ध्येयावर केंद्रित केले कि आपल्या आपण गुरु भेटतो.
गुरु नेहेमी तत्पर असतो पण जोपर्यंत शिष्य म्हणुन कुणी येत नाही तोपर्यंत तो भेटणे शक्य नाही.

मग हा गुरु मनुष्य रुपी असो, ज्ञान रुपी असो, अनुभव रुपी असो, भेटतो अवश्य.
----------------------------------

आता हे पहा . . . .

गुरु, ज्ञान आणी देव हे तिन्ही एकच असतात, त्यांत फरक करुन पायर्‍या आपण बनवतो . . . .गुरु मिळाला कि ज्ञान देईल, ज्ञान मिळाले कि देव भेटेल . . . . .
काय हे !
अहो भगवान सर्वत्रच आहेच कि ! करावी सुरुवात त्याच्याच भक्तिस मग पाहा ?

गुरु भेटत नाही म्हणुन श्रीकृष्णालाच गुरु करु या, असे ठीक नाही . . . . अहो त्याची भक्ति आरंभ करा . . . .बाकि कश्याचीच गरज लागणार नाही कधीच.

हेच ते गुह्य . . . .कारण गुरु म्हणजे कोणीतरी मनुष्य शरीर धारीच असला पाहिजे हे असे नसतेच.

वेळ न दवडता भगवत् भक्ति संपूर्ण योग्य रितीने केली कि गुरुची आवश्यकता राहात नाही कारण भक्ति जितकि तीव्र होत जाऊन मनुष्य जसजसा भगवंताच्या समीप जाऊ लागतो तसतसा तो त्याचा अनुभवच त्याचा गुरु असतो . . . . त्याच्याच अनुशंगाने भक्त पुढे अचुक पणे भगवत प्राप्ति करुन घेतो.

झक्की,

नाही, काळजी करु नका, तुम्ही काही चुकिचे बोललात असे नाही, समाजाचाच प्रश आहे हा, जो ते समजत नाहित, तुम्ही समोर आलात तुम्हालाच बोललो, म्हणुनच म्हणालो कि क्षमस्व . . . .

आज माझे मन सर्वत्र आहे, आणी मला सर्वच जण ईथे सारखेच प्रीय आहेत.

तुमची पात्रता आहे आणी तुमची समज थोडीशी प्रस्तावीत व्हावी हा माझा उद्देश आहे.

मी एक उदाहरण माबो वर कोणाला तरी दिले ते ईथी तुम्हाला सांग तो.

आपण पृथ्वीवर आहोत आणी पृथ्वी अकाशात आहे हा एक दृष्टीकोण झाला. . . . म्हणजे विचार करा कि तुम्ही पृथ्वीवर अत्ता जसे आहात तसेच राहुन आकाशाकडे पाहा. तुमच्या दृष्टीच्या आवाक्यात फारच थोडे आकाश वइतर ग्रह-तारे असतील.
------------------------
आता असी विचार करा कि तुम्ही स्वतः च आकाशत आहात आणी अंतरिक्षातुन पृथ्वीकडे पाहात आहात.
झाले ? सर्व काही व्याप्त होते कि नाही ? आता ह्या दृष्टीकोणातुन पृथ्वी आणी असे अनेक ग्रह, तारे तुमच्या आवाक्यात उमजुन येतील.

आपण विचार संकुचित राहु देऊ नयेत, विचार शक्य तितके विस्तारित करावेत म्हणजे जास्तीत जास्त ज्ञान उमजुन येईल.

समज भीन्न झाली कि उमज सुधा भीन्न होणार.

आणखीन एक गोष्ट : माझा मार्ग भक्तिचा आहे, ह्यामार्गाने आज ज्ञात नाही किती वर्षे झाली चालत आलो आहे, पण केव्हातरे देव बरोबर चालतांना जाणवला, आताही आहेच , ह्या मार्गातच कर्मे केव्हा धून्य झाली माहिती नाहे कारण सर्व कर्मे आता फक्त करायची आहेत ह्या शरीराने म्हणुन होणार, ज्ञान ? फारसे नाही कारण त्याची आवश्यकताच भासली नाही, जे काही थोडे थोड्के मिळाले ते असेच चालता चालता . . . .

नमस्कार Happy

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

परब्रम्ह,

१.
>> मनुष्य जसजसा भगवंताच्या समीप जाऊ लागतो तसतसा तो त्याचा अनुभवच त्याचा गुरु असतो . . . .

सगळ्यांना हे जमेल असे नाही.

२.
>> ईथे गुरु हवा आहे कि भगवान हवा आहे ?

माहीत नाही!

३.
>> ऐकलेला अर्थ नको आहे ( ऐकलेले असल्याने त्यात केलेला प्रयत्न नाही ),

तुमचं बरोबर आहे. माझे प्रयत्न त्यात नाहीत. तुम्हाला खालील मजकुराचे अनुभव आलेत का?

>> कितीही आणी कशीही संकटे आली अथवा परिस्थीती कितीही कठीण असली आणी तुम्ही जर त्याही
>> परिस्थीतींमध्ये जर मला मस्तकावर धारण ( आपल्या त्या क्षणीच्या अत्त्युच्च मानसिक पातळीवर )
>> करुन, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवुन भक्तिभावाने बसवलेत, तर तुमची सर्व बंधने तुटुन पडतील, तुम्ही
>> बंधनमुक्त व्हाल, पहार्‍यावर वाट पाहात बसलेली सेवकरुपी अधीक येऊ घातलेली सर्व संकटे निष्प्रभ होतील.
>> वादळ रुपी अत्यंत कठीण परिस्थीतींमध्ये तुमचे सर्व मार्ग प्रशस्त होतील.
>> दुथडी भरुन वाहाणार्‍या जीवनरुपी ज्ञानाच्या आत्यंतिक खोलात माझ्या बरोबर जाल तेव्हा त्या ज्ञानाच्या >> प्रभावाने माझ्याशी संयोग पाउन तुमच्या मार्गात ते उत्कृष्ट ज्ञान ही तुम्हाला नम्रतेने वाट देईल ( म्हणजेच
>> त्या ज्ञानाच्या योगे तुमचे मार्ग सोपे होतील ), आणी तुम्ही माझ्या सान्नीध्यात भवजलाचे - जीवनाचे,
>> अतिकठीण पात्रही अगदी सहज ओलांडुन जाल.

आ.न.,
-गा.पै.

गापै,
हो, अनुभव अवश्य आलेला आहे, आणी संपूर्ण जगात कोणिच नव्हते, एक ह्यानेच माझ्या सर्वच चराचराला विस रुन जी हाक दिली तीला त्वरित ऊत्तर दिले,

ज्यांना हे ज्ञात आहे माझ्याबद्दल तेच सांगु शकतील कि असे सुद्धा होऊ शकते ह्या जगात, भवंताच्या कृपेने.

/

परब्रम्ह आपण हे जे चालवले आहे ती एक प्रकारची बुवाबाजी आहे
खरे भक्त असाल तर दोन गोष्टी करान (आपाण "परब्रम्ह" नाही आहत हे तर नक्कीच जाणून आहे मी )

१) हे असले गरजेपेक्षा जास्त चर्वितचर्वण करणे दुसर्‍या भाषेत अक्कल पाजळणे थांबवा यातून काहीही मिळणार नाही कुणालाच
२) परब्रम्ह हे आपले सदस्यनाम बदलून खरे नाव जे असेल ते घेवून वावरा
स्व्तःला परब्रम्ह असे नाव लावले की आध्यात्म समजते लोकाना समजावता येते असे नाही .... मी वै भव वसंतराव कुलकर्णी आहे आणि हेच नाव मी सांगतो आपण काय परब्रम्ह आहात का मग परब्रम्ह असले भंपक नाव का लावता

आपले संभाषणकौशल्य शब्दातले कारुण्य भावनेतली अति(गरजबाह्य) समर्पित्वृत्ती पाहून तर मानवाने माणूस म्हणून काही मनाला हाड बीड कणा बिणा ठेवावा की नको अश्या शंका उपस्थित करणारे आहे
आणि जर नको असे आपले उत्तर असेल तर देवाने ते दिलेच कशाला

काय मिळतय आपल्याला हे सर्व करून यावर लख्खपणे शंका घ्यावी व आपला निषेध करावा असा विचार आला आहे पण तो मनातच दाबून ठेवतोय तूर्तास

नुसते शहाणे नका होवू ज्ञानी व्हा !!!!!!!!!!

वैवकु थोडे धिराणे घ्या !
कोणी गधा असा आयडी घेतला म्हणुन तो गधा होत नाही तेच परब्रह्म असा आयडी घेतल्याने तो परब्रह्म होत नाही. त्यांनी जो काही विषय दिला तो चर्चेसाठीच आहे ना. तुम्हाला चर्चा करायची नसेल तर सोडुन द्यावे. निदान हा विषय तरी वितंडवाद करणारा नाहीच आहे.
तेच जर ते प्रसिध्दीलोलुप असते तर नक्कीच खर्‍या आयडीने वावरले असते ना.
असो.

परब्रम्ह,

>> हो, अनुभव अवश्य आलेला आहे,

असं असेल तर 'कृष्णं वंदे जगद्गुरूम' या उक्तीचा ठाम अर्थ तुम्हांस ठाऊक हवा. लेखाच्या शीर्षकात 'असावा' हा शब्द पाहून माझा वाटलं की तुम्हीही माझ्यासारखेच अनंताचे प्रवासी आहात. पण तुम्ही तर अगोदरच मुक्कामी पोचलेले दिसता.

अशा परिस्थितीत फक्त एक सुचवू इच्छितो. लहान तोंडी मोठा घास घेतोय, त्याबद्दल क्षमा असावी. अनुभव वाचकांसमोर मांडायचा असेल तर ज्ञानोबामाऊलींसारखा नितळपणे मांडावा. त्याकरिता श्रीगणपती आणि श्रीसरस्वती या देवतांचे सहाय्य घ्यावे. असे अनेकांनी केले आहे.

पुढील कथनास शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.

आम्ही आमचे विचार जे ठामपणे निश्चित आहेत तेच बोलून दाखवले आहेत, फक्त ते आम्ही कोणावर लादत नाही, त्याची आवश्यकता ही नाही, ह्यासाठी त्याच नितळपणे असावा हा शब्द वापरला आहे.

मला वाटतं कि आपले विचार वाटुन घेण्याचा अधिकार सर्वांनाच असतो, तेच केलं आहे.

बाकि ते ७५०० वर्षे . . . . ? समाधान झालं नाही.

शुभेच्छांबद्दल आभार ! Happy

Pages