झाली संध्याकाळ…….

Submitted by आनंद पेंढारकर on 29 June, 2013 - 12:19

झाली संध्याकाळ सखे गं झाली संध्याकाळ…….

सूर्य फिकटला बघ थकलेला
पश्चिम ओढी रक्तिम शेला
परतीच्या अंधूक दिशेने अन बगळ्यांची माळ
झाली संध्याकाळ सखे गं झाली संध्याकाळ…….

गोठयात घुमे व्याकूळ हंबर
चोची उठल्या घरट्यातून वर
शेतावरती आई म्हणूनी टाहो फोडी बाळ
झाली संध्याकाळ सखे गं झाली संध्याकाळ…….

दिवस तुझ्यासोबत छूमंतर
स्पर्शाने मिटलेले अंतर
रात्रभराच्या स्वप्नांशी अन जुळलेली नाळ
झाली संध्याकाळ सखे गं झाली संध्याकाळ…….

आनंद पेंढारकर……

Group content visibility: 
Public - accessible to all site users