यमनियम

Submitted by भारती.. on 27 June, 2013 - 05:45

यमनियम

यमनियमांचा सक्त पहारा आयुष्यावर मीच लादला
आणि स्वत;वर आरोपांचा प्रदीर्घ खटलाही चालवला

किती आतली वीज जळाली सिद्धांतांची शोधत पाने
पापण्यांमधून नीज पळाली अंतरातली जळता राने
वर्तनातल्या आवर्तनांचा प्राणपणाने शोध घेतला

संघर्षाचे अटळपणाने क्षण जेव्हा सामोरे आले
मी जे घाव दुज्यांवर केले ते आधी माझ्यावर झाले
अन उरलेले घाव समोरून- असा दुहेरी लढा झेलला

अता जरा निवळली वादळे -संज्ञेमधले कंपन मिटले
शांतीभावना आली दाटून असे आपले मला वाटले
'काय संतुलन असेच असते ?' मी विचारले एकांताला

मौनातून ना उत्तर आले हसले कुणी की भासच होता
पायांखालील परिचित रस्ता तोच पोचला बघताबघता
दूर अपरिचित कुरणांमध्ये..विस्मरणाचा वारा सुटला

त्या वार्‍याचे सुगंध चंचल श्वासांमध्ये भरून घेणे
उतरून ओझे तनामनाचे त्या वार्‍यावर विरून जाणे
परतीच्या वाटा नाकारून- धुंदी अशी झोंबे जीवाला

यमनियमांचा मीच पहारा- मीच मला मुक्तही करावे
वर्तनातल्या आवर्तनांचे अर्थ सुसंगत लावत जावे
खटल्यातून निर्दोष सुटावे ठेवून साक्षी आकाशाला ..

भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!
सुंदर.. पोहोचली..
<<मी जे घाव दुज्यांवर केले ते आधी माझ्यावर झाले
अन उरलेले घाव समोरून- असा दुहेरी लढा झेलला >>
सर्वच सुंदर आणि अर्थ पुर्ण.....

ताई
मी यमनियम पहिल्यांदा ऐकतेय शब्द!
स्वतःला काचणार्‍या स्वतःच्याच नियमांना ह्यापेक्षा सुंदर शब्द नसावाच...

एकदा कुणीतरी मला म्हणाले होते "आपण आपली दु:खे स्वतः निवडतो" का कुणास ठाऊक मला राहून राहून हे वाक्य आठवलं तुझी कविता वाचताना... त्यात शेवटी तू ह्यातून मुक्त होण्याची जेव्हा इच्छा (की स्वतःलाच रिक्वेस्ट) करतेस, तेव्हा तू निवडलेलं दु:ख त्यागतेस असंही वाटलं!

खटल्यातून निर्दोष सुटावे ठेवून साक्षी आकाशाला ..
>> हे भारीच! आणि तितकंच अशक्यप्राय Happy

क्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी आत्ता वाचताना हा माझा शेर आठवतोय............

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा ,
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

बागेश्री
>>एकदा कुणीतरी मला म्हणाले होते "आपण आपली दु:खे स्वतः निवडतो" का कुणास ठाऊक मला राहून राहून हे वाक्य आठवलं तुझी कविता वाचताना... त्यात शेवटी तू ह्यातून मुक्त होण्याची जेव्हा इच्छा (की स्वतःलाच रिक्वेस्ट) करतेस, तेव्हा तू निवडलेलं दु:ख त्यागतेस असंही वाटलं!>>
-मनकवडे निरीक्षण!

खटल्यातून निर्दोष सुटावे ठेवून साक्षी आकाशाला ..
>> हे भारीच! आणि तितकंच अशक्यप्राय
अंहं तुला माझ्या वयात आल्यावर कळेल कसं शक्य होतं ते .. Happy

वैभव, सुशांत, कोकण्या,धन्यवाद म्हणणे हा परकेपणा,एकूण कवितेवर एकूण असाच लोभ असू द्यावा..

सुंदर. आवडली.

तुम्हाला अभिप्रेत अर्थ कळला नाही असे वाटते. विस्ताराने लिहाल का?- संज्ञेमधले कंपन मिटले? यमनियमांचा मीच पहारा- मीच मला मुक्तही करावे? अर्थात मला हवा तो अर्थ मी घेतला आहे पण त्यामुळे कविता विसंगत आहे असे वाटते आणि त्यातच मजा आहे असे वाटते आहे....

सुसुकु,शुम्पी,
अगदी थोडक्यात कविता आपल्या अंतर्विरोधांवर, त्यामुळे सतत मनात चाललेल्या द्वंद्वावर (स्वतःवर चालवलेल्या खटल्यावर आहे ). 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन' अशा अस्तित्वानुभवावर एका अर्थी आहे.आपल्या 'वर्तनातल्या आवर्तनांवर' - जी चक्रवत येतात, आपले आपल्यालाच परके करतात्,त्यांच्यावर आहे.या सगळ्याला अर्थातच स्त्रीत्वाचे परिमाणही आहे पण त्यातूनही अलिप्त होऊन लिहिण्याचा प्रयत्न आहे.
कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचं अंतर्याम अशाच संघर्षाने व्याप्त असेल असं मला वाटतं.

>>डोंट बी टू हार्ड ऑन युरसेल्फ सांगते आहे का कविता?>>
होय शुम्पी, तसेच काहीसे, पण टू इझीही नाही येथपर्यंत येणे, खूप समजून घेत स्वतःला, सर्वांना, समाजाला, खूप त्रास सोसून झाल्यावर ते अवतरते.
आभार Happy

अंहं तुला माझ्या वयात आल्यावर कळेल कसं शक्य होतं ते .. <<<<< काय उत्तर दिलंत राव !! नतमस्तक !!!

या सगळ्याला अर्थातच स्त्रीत्वाचे परिमाणही आहे पण त्यातूनही अलिप्त होऊन लिहिण्याचा प्रयत्न आहे.<<< येस्स !!! अगदी खरंय !!!

सुंदर विचार.

ही कविता वाचल्यावर माझ्या मनात या ओळी डोकावत होत्या - "आपुलाचि वाद आपणासी ..... "

भारती, जियो!!! Happy

कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचं अंतर्याम अशाच संघर्षाने व्याप्त असेल असं मला वाटतं. >>> येस्स! पहिल्या दोन ओळी रिलेट झाल्यावर पुढची प्रत्येक ओळ स्वतःलाच काहितरी विचारते आणि टिकमार्क करत जाते.

भारतीताई खूप सुंदर कविता.
मी ही यमनियम हा शब्द पहिल्यांदाच वाचला.
कवितेतल्या सगळ्याच ओळी रिलेट होत जातात.
खटल्यातून निर्दोष सुटावे ठेवून साक्षी आकाशाला .. >> खूप छान.
सुरुवात आणि शेवट तर अप्रतिम आहे.

खूप धन्स सर्व सुहृदांचे..हे माझ्या अंतरीचे काही तुमच्यापर्यंत पोचवताना मला आनंदही होतो अन थोडी धाकधुकही असते Happy

मी तरी यमनियम हा शब्दा अष्टांगयोगात जे यम आणि नियम (DOs & DONTs) असतात त्यांचा मिळून बनलेला जोडशब्द अशा अर्थाने घेतला.

यमनियम
यम हा साक्षात् धर्म आहे. तो नुसती मृत्यूची देवता नाही. म्हणूनतर युधिष्ठीराचा तो पिता आहे.
यमधर्माने(?) सांगितले ते नियम.
धारयति इति धर्मः तो धर्म. म्हणजेच, समाजात वागणे जगणे कसे, ते नियम.

समाजात रहायचे, तर समाजात वागण्याचे नियम मला माझ्यावर लादून घ्यावेच लागतात. फ्रिडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटिज. तीच तर कविता आहे. तेच तर चिंतन आहे.

>>यमनियमांचा सक्त पहारा आयुष्यावर मीच लादला
आणि स्वत;वर आरोपांचा प्रदीर्घ खटलाही चालवला
<<
मस्तच! माझ्या नातवंडांच्या मराठीच्या पुस्तकात ही कविता शिकवायला आली तर मला नवल वाटणार नाही इतकी उत्कट व उत्तम झाली आहे..

>> मी तरी यमनियम हा शब्दा अष्टांगयोगात जे यम आणि नियम (DOs & DONTs) असतात त्यांचा मिळून बनलेला जोडशब्द अशा अर्थाने घेतला.
मीही. Happy

मी तरी यमनियम हा शब्दा अष्टांगयोगात जे यम आणि नियम (DOs & DONTs) असतात त्यांचा मिळून बनलेला जोडशब्द अशा अर्थाने घेतला.>>> मी सुद्धा.

समाजात रहायचे, तर समाजात वागण्याचे नियम मला माझ्यावर लादून घ्यावेच लागतात. फ्रिडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटिज. >>> नुसता समाज नव्हे, आपली सद्सद्विवेकबुद्धीही आपल्यावर नियम लावत असते. कधी कधी आपलं मन त्या बुद्धीपेक्षा प्रबळ होतं. तेव्हा परत संघर्ष करुन आपण ते ताळ्यावर आणायचा प्रयास करतो. मला वाटतं भारतीने स्वत्:चा स्वतःशी संघर्ष इथे अप्रतिमरित्या मांडला आहे. शशांकने वर म्हटले आहे "आपुलाच वाद आपल्याशी".

यमनियमांचा सक्त पहारा आयुष्यावर मीच लादला
आणि स्वत;वर आरोपांचा प्रदीर्घ खटलाही चालवला<<< वा!

किती आतली वीज जळाली सिद्धांतांची शोधत पाने<<< जबरदस्त ओळ!

वर्तनातल्या आवर्तनांचा प्राणपणाने शोध घेतला<<< प्रासादिक अभिव्यक्ती आणि गुंगवणारी ओळ!

शांतीभावना आली दाटून असे आपले मला वाटले<<< असे आपले मला वाटले - व्वा!

मौनातून ना उत्तर आले हसले कुणी की भासच होता<<< सुंदर

दूर अपरिचित कुरणांमध्ये..विस्मरणाचा वारा सुटला<<< या ओळीसाठी जेव्हा केव्हा भेटाल तेव्हा सस्नेह हस्तांदोलन विनंतीपूर्वक!

उतरून ओझे तनामनाचे त्या वार्‍यावर विरून जाणे
परतीच्या वाटा नाकारून- धुंदी अशी झोंबे जीवाला<<< मस्त मस्त

यमनियमांचा मीच पहारा- मीच मला मुक्तही करावे<<< चकित करणारी ओळ!

<<<

गिफ्टेड कवयित्री आहात.

धन्यवाद.

अगदी प्रभावीपणे आशय उतरलाय कवितेत..... मस्तच कविता.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

यमनियम या शब्दाचा अर्थ नीटसा समजत नव्हता. त्यामुळे २ दिवसांपूर्वी कविता वाचूनही काय प्रतिसाद द्यावा ते
कळत नव्हते. वरील एका प्रतिसादात अर्थ स्पष्ट केला गेल्याने त्यासंदर्भाने कविता वाचल्यावर व्यवस्थित समजली.

बंडोपंत,
योगाशी संबंधीत अर्थांव्यतिरिक्त यम व नियम या शब्दांचे इतर अर्थही आहेत. भारतीबाईंनी ही कविता योगक्रियेबद्दल नक्कीच केलेली नसेल असे वाटते. Wink त्यांनी योजिलेले शब्द त्याच अर्थ स्पष्ट करून सांगू शकतील. पण ते असो. तुमची लिंक वाचली नाही, कारण उघडली नाही. नेट स्लो असावे कदाचित.
रच्याकने : मोल्सवर्थ वर इंटरेस्टिंग अर्थ आहेत.

Pages