'फेफे' कवी उर्फ 'फेसबुक फेमस' कवी होताना...

Submitted by आनंदयात्री on 25 June, 2013 - 07:56

भाग पहिला - 'आत्म'लक्षण

एखादा छानसा फोटो, प्रोफाईल पिक म्हणून लावा!
वार्‍यावर भिरभिरणारी मुलगी (मुलगीच!)
डोंगराच्या कड्यावर लोळणारा मुलगा तिथे दिसायला हवा!
पावसात तरारणारं पान, निळ्या छटांचं आभाळ
नुसतंच एखादं घड्याळ, प्रगल्भ सचिंत काळ
एखादी दीपमाळ, एखादी तलवार
एखादा सूर्यास्त, ढगांची रूपेरी किनार!
अधूनमधून प्रोफाईल पिक बदलत रहा.
तुमची रसिकता सगळ्यांना दाखवत रहा!

*************

भाग दुसरा - 'सामुहिक'लक्षण

आता पुढची गोष्ट म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये शिरा
तुमच्यासाठी तशाही सगळ्याच अभेद्य चिरा
निवडा, त्यातल्या त्यात एखादा गजबजलेला
मुखवटा ओढा जत्रेमधला, खूप काळापासून हरवलेला

इतरांच्या कविता पोस्ट व्हायला सुरूवात झालीये
शब्दांची बासुंदी आटवायला घ्या
प्रतिसादात घालता येईल
इतपत साठवायला घ्या

मराठीत कौतुक करण्यासाठी शब्द कमी नाहीयेत!
'दमदार, लाघवी, आर्त, सशक्त, हृदयस्पर्शी, मोहक शब्दकळा,
सुगंधित, अफ्फाट, अच्चाट, देखणं, जीवघेणी, अवकळा'
असे जन्मात न कळलेले आणि लिहिलेले शब्द........
......... वापरा!
अरे हो... 'अप्रतिम', 'क्लास', 'सुपर्ब' हे राहिलेच की!
'हॅट्स ऑफ', 'दंडवत', 'साष्टांग' हे देखील उरलेच की!
.......हेही वापरा!

'आवडली नाही' हेही आठवणीने लिहा कधीतरी.
रूचिपालटच... पण मुद्दामहून... करा कधीतरी
पण नकारात्मक प्रतिसादही चतुराईने द्या,
नाहीतर लिहिणार्‍याचा इगो दुखावला जायचा!
तुम्हालाही कविता पोस्टायच्या आहेत म्हटलं!
आधीच मक्षिकापात व्हायचा!
आता असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमा आठवणीने मागा!
मिळेल समोरच्या नजरेत तुम्हाला अगदी हक्काची जागा!
आपलं व्यक्तिमत्त्व सालस, डाऊन टू अर्थ वगैरे वाटतं!
तुमच्या इमेज बिल्डींगला मजबूत स्ट्रक्चर लाभतं!

*************

भाग तिसरा - 'प्रस्थापित'लक्षण

आता लिखाण पोस्ट करा.

गद्य-बिद्य असलं तरी एंटर मारून अलग करा,
अर्थापासून शब्दांना नक्की विलग करा!
(आधुनिक कविता अशीच असते असं ऐकलं आहे तुम्ही!)
विरामचिन्हंही अधून मधून पेरत चला.
(अहो म्हणजे किमान तीन चार डॉट्स देत चला)
गझल-बिझल लिहायची असेल तर मग
सर्वात आधी गुरूचं नाव आठवा!
आणि गझलेपेक्षाही 'गझलियत'चा
जयघोष मुखात बसवा!

'सांभाळून घ्या, नुकत्याच कविता लिहायला लागलोय' हे म्हणाच!
अहो तुमच्या कवितेसाठी एवढं तरी कराच!
तुम्हीच तिला कविता म्हटलं नाही तर
बाकीचे म्हणतील का?
इतकं कमावलेलं पुण्य मग
फळाला कधी येईल का?

प्रतिसादांमध्ये तुमच्या ओळखीचेच सगळे शब्द असतील.
दरवेळी एकदोन नवीनही कळतील!
प्रतिसाद कळो अथवा न कळो, तरी लाईक कराच.
प्रतिसादांचं गवत फोफावताना बघाच!
तुमचं मन तुम्हाला खाईल, पण ती शक्यता कमीच!
एवढी फिल्डींग लावल्यावर कौतुकाची हमीच!
पण जरी नापसंती आलीच, तरी, तिलाही लाईक करा.
तुमचा खिलाडूपणा थोडा सादर करा!
मनात भले कितीही त्यांचा अनुल्लेख करा,
पण आभार मानताना त्यांचा खास उल्लेख करा!
गझल असेल तर तंत्राच्या चुका वगैरे विचारा
काफिया सुचवा एखादा, जसे किनारा, निखारा...

दर दोन प्रतिसादांनंतर तुमचा प्रतिसाद दिसला पाहिजे!
टीआरपीचा जिम्मा हा ज्याचा त्यानेच घेतला पाहिजे
लिखाण नुसतं पोस्ट करून भागणार नाही पुढे!
ग्रुपमध्येही ग्रुप जमवा, भेटी घडवा, गिरवा पुढचे धडे!
'सादरीकरणात ही कविता अजून थेट पोचते'
असं म्हटल्यावर संमेलनामध्ये जागा पक्की होते!

*********

भाग चार - 'विलक्षण'

आता खरं तर विचार करायलाही अवधी नाही
लाटेमध्ये वाहत जाण्याखेरीज कुठे उरलंय काही?
एका फसव्या दिशेचा प्रवास आता सुरू होतो आहे
येणारा प्रत्येक दिवस कवितेपासून तुम्हाला दूर नेतो आहे...
तर ते जाऊ द्या...
आपण बदलू सगळ्याच व्याख्या...
मी तुला लाइक करतो, तू मला कर लाईक
आपण दोघे मिळून मग तिला करू लाईक!
लाँग टर्मचा विचार थोडा केला पाहिजे ना?
एकमेकांसोबत हा करार केला पाहिजे ना?
कवी व्हायचं आहे? मग फेमस होऊ आधी!
कविता जमेल नंतर, 'लाईक' करू आधी!

******

आता ही कविता मी पोस्टेन तेव्हा सगळं लक्षात असू द्या बरं!
वेगळीच कविता आहे, जरा सांभाळून घ्या बरं!

- नचिकेत जोशी

http://anandyatra.blogspot.in/2013/06/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हालाही कविता पोस्टायच्या आहेत म्हटलं! >>>> Rofl
. 'अप्रतिम', 'क्लास', 'सुपर्ब'
'हॅट्स ऑफ', 'दंडवत', 'साष्टांग' Lol

@ आया
खर खरं सांग.. माझ्या थोपु प्रोफाइलवर नजर आहे ना तुझी ? Wink

Lol Awesome... And congrats that you wrote it... I kept thinking on the right way to express but I am sure now, it cant be any better.. Happy

भारीच...

जवळपास सगळेच मुद्दे अगदी पटण्यासारखे.... छानच.
"गद्य-बिद्य असलं तरी एंटर मारून अलग करा,
अर्थापासून शब्दांना नक्की विलग करा!
(आधुनिक कविता अशीच असते असं ऐकलं आहे तुम्ही!)" >>> हे तर "अगदी अगदी" म्हणण्याइतकं.
"येणारा प्रत्येक दिवस कवितेपासून तुम्हाला दूर नेतो आहे..." >>> पूर्ण सहमत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
पण, कविता म्हणून जास्त लांबल्यासारखी वाटली.
त्यामुळे खमंगपणा, खुसखुशीतपणा उतरल्यासारखा जाणवला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
"पण नकारात्मक प्रतिसादही चतुराईने द्या,
नाहीतर लिहिणार्‍याचा इगो दुखावला जायचा!" >>> नचिकेत, तुझ्या बाबतीत नकारात्मक प्रतिसादाने इगो दुखावण्याची शक्यता वाटत नसल्याने चतुराईचा विचार करण्याची मला गरज भासली नाही..... Happy

Happy

Biggrin

Pages