बृ.म.मं २०१३ अधिवेशनानिमित्त पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 June, 2013 - 03:05
’स्वच्छ पाण्यासारखा नितळ-प्रवाही आणि स्फटिकासारखा पारदर्शक’ असा स्वर लाभला आहे, असं कवी शंकर वैद्य ज्यांच्याबद्दल म्हणाले, त्या स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर बॉस्टन इथे होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात आपला कार्यक्रम सादर करणार आहेत.

पद्मजाताईंचं जीवन म्हणजे अविरत सुरू असणारी एक स्वरमैफल आहे. ’निवडुंग’ या चित्रपटातली त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली आहेत. शिवाय 'ही शुभ्र फुलांची ज्वाला', 'रंग बावरा श्रावण' आणि 'घर नाचले नाचले' या तीन ध्वनिमुद्रिकांमध्ये पद्मजाताईंनी कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणी, सुरेश भट, ग्रेस आणि शांता शेळके या श्रेष्ठ कवींच्या कविता गायल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना 'गीत नया गाता हूँ' या अल्बममध्ये त्यांनी आवाज दिला. 'जिंदगीकी जुबान' या त्यांच्या गझलगायनाच्या ध्वनिमुद्रिकेचं रसिकांनी प्रचंड कौतुक केलं. तसंच, 'मंगलदीप' या अनुप जलोटा यांनी संगीतबद्ध केलेल्या भजनांच्या अल्बमचंही रसिकांनी स्वागत केलं. दोन वर्षांपूर्वी 'मेघा रे', 'एका उन्हाची कैफियत' आणि हिंदी सुफी भजनांची 'रंग'... अशा तीन नव्या ध्वनिमुद्रिका पद्मजाताईंनी रसिकांसाठी सादर केल्या.

पद्मजाताईंनी देशविदेशात शेकडो कार्यक्रम करून श्रोत्यांची वाहवा मिळवली आहे. ’भक्तिरंग’, 'मंगलदीप', 'मेहफील ए गझल' हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. भारत सरकारचा ’पद्मश्री’, स्वरानंद प्रतिष्ठानाचा ’माणिक वर्मा पुरस्कार’ असे अनेक मानाचे सन्मान त्यांना लाभले आहेत.

गेली तीन दशकं आपल्या जादुई सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या पद्मजाताईंशी बीएमएमच्या अधिवेशनाच्या निमित्तानं मायबोलीकर योगेश कुलकर्णी यांनी संवाद साधला.ppj2.jpg

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात तुमचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याबद्दल काही सांगाल का?

सगळ्यांत प्रथम मी बीएमएमच्या आयोजकांचे मनापासून आभार मानते. त्यांनी माझा स्वतंत्र कार्यक्रम मुख्य अधिवेशनापूर्वी, म्हणजे ४ जुलैला आयोजित केला आहे. माझ्यासाठी आणि रसिक प्रेक्षकांसाठीही अतिशय ’खास’ असा हा कार्यक्रम आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे मराठी बांधव एकत्र येणार आहेत, चार दिवस गुण्यागोविंदानं नांदणार आहेत, हे माझ्या दृष्टीनं मोठा सण साजरा करण्यासारखंच आहे, आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्व मराठी बांधवांना भेटण्याची आणि आपली कला त्यांच्यासमोर सादर करण्याची ही सुंदर संधी आहे. जेव्हा बँक्वे डिनरचा वेगळा कार्यक्रम ठरवण्यात आला, तेव्हा मी आयोजकांना एवढीच विनंती केली, की संगीत हे माझ्यासाठी अध्यात्म आहे आणि सूर हा परमेश्वर आहे. तेव्हा माझ्या या पूजेमध्ये सर्व रसिकांनी सामील व्हावं, आधी त्यांची मनं तृप्त करावीत आणि मगच पोटं तृप्त करावीत!

या कार्यक्रमात कुठली खास गाणी गाणार आहात?

कविवर्य कुसुमाग्रज, इंदिरा संत, शंकर रामाणी, सुरेश भट, आरती प्रभू यांसारख्या दिग्गजांच्या आणि काही नवोदित कवींच्या कविता सादर करण्याचा माझा मानस आहे. 'केव्हा तरी पहाटे..'सारखी सदाबहार गझलही या कार्यक्रमात असेल. ती माझ्या गुरूंनी, पं. हृदयनाथ मंगेशकरांनी माझ्याकडून 'निवडुंग'साठी २९ वर्षांपूर्वी गाऊन घेतली. आजही ती तितकीच ताजी वाटते. 'दिवे लागले..' हे मी स्वरबद्ध केलेलं शंकर रामाणींचं उत्फुल्ल गीत, जे तुमच्या नसांनसांत उत्साह निर्माण करतं, ते गाणार आहे. तसंच 'निवडुंग'मधील 'लव लव करी पातं.. 'ही. माझ्या गुरुजींच्या, पं. हृदयनाथजींच्या बंदिशी किंवा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून, मा. दीनानाथांकडून आणि त्यांच्या गुरूंकडून, म्हणजे उस्ताद आमीरखाँ साहेबांकडून शिकून बांधलेली, उदाहरणार्थ, 'सुहास्य तुझे..' , 'मी मज हरपून बसले गं..' , तसंच परजबहारमधील 'ये याम लललाम..'वर बेतलेलं ’हे श्यामसुंदर’ अशी काही गाणी, गझला, भजनं, कविता मी सादर करणार आहे.नवोदित कवींच्या काही रचना गाण्याचा तुमचा मानस आहे का?

अर्थातच. माझा 'मेघा रे' हा अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला. त्यामधील 'मेघा रे, तू गरजत ये, बरसत ये..' हे शुभदा सुभेदारांनी लिहिलेलं गाणं मी गाणार आहे. त्यात कवयित्री परमेश्वराला विनवते, की तू बाळकृष्ण होऊन ये, दुडुदुडू ये, धावत ये आणि ही पृथ्वी सुजलां सुफलाम्‌ करुन टाक. या कार्यक्रमात माझी काही नवीन गाणी तर असतीलच, पण काही जुनी गाणी मी माझ्या पद्धतीनं सादर करणार आहे. अलीकडे दुबईत झालेल्या ’मिफ्ता’च्या कार्यक्रमात ’रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ मी माझ्या पद्धतीनं गायले होते. पं. हृदयनाथजींनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वरांची ही रचना आहे. या रचनेचा मूळ बाज तोच ठेवून मी माझ्या शैलीत त्यात बदल करून ते गाणं गायलं आहे. तर अशीही काही वेगळी गाणी असतील.

तुम्ही परदेशात याआधी कार्यक्रम केले आहेत, तर या कार्यक्रमांच्या काही खास आठवणी सांगाल का?

मी गायला सुरुवात केली १९८१मध्ये, मुंबई दूरदर्शनवर. त्यामुळे आता माझ्या सांगीतिक कारकिर्दीला जवळपास ३२ वर्षं पूर्ण होतील. मी १९८४पासून अमेरिकेत कार्यक्रम करते आहे. मी आतापर्यंत दुबई, लंडन, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, स्वित्झर्लॆंड अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत. अमेरिकेच्या माझ्या पहिल्याच दौर्‍यात चारपाच कार्यक्रम ठरले होते. त्या काळी हे सगळं ठरवायलाच दोनतीन महिने लागायचे, कारण आजसारखी संपर्काची साधनं तेव्हा नव्हती. माझा पहिला कार्यक्रम टोरंटोला झाला, त्यानंतर कार्यक्रम खूप आवडल्यानं लगेचच आयोजकांनी सगळीकडे फोनाफोनी करुन माझे पंचवीस कार्यक्रम ठरवले. तीन महिने मी कार्यक्रम करत होते. सुरुवातीला खूप मजा आली, पण नंतर घरच्या आठवणीनं अगदी रडूच कोसळलं होतं. ८४ साली सगळं खूपच वेगळं होतं, भाषा नवीन, लोक नवीन, त्यांचे उच्चार वेगळे. पण सगळ्यांनी अतिशय प्रेमानं कार्यक्रम आयोजित केले. जग आता तांत्रिक बदलांमुळे खूप जवळ आलं आहे. नुकताच आलेला एक सुंदर अनुभव म्हणजे मी ऑस्ट्रेलियात काही कार्यक्रम केले. त्यात मेलबर्नला माझ्या मुलानं, आदित्यनं गिटार वाजवलं. त्यानं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि त्याला आता म्यूझिक टेक्नॉलॉजीसाठी जॉर्जिया टेक विद्यापीठात प्रवेशही मिळाला आहे. तो विख्यात गिटारवादक पं. नरेंद्र साळसकरांकडे तो सध्या शिकत आहे. तर तिथे त्यानं गिटार वाजवण्यापूर्वी मी त्याची ओळख करून दिलेली नव्हती, कारण त्याच्या सांगीतिक कारकिर्दीची ती सुरुवात होती. त्यानं पहिली आलापी छेडताच जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो मी कधीच विसरू शकत नाही. तिथल्या काही ओळखीच्या लोकांनी इथे भारतात घरी फोन करून सांगितलं, की 'पद्मजा छानच गायली, पण तिचा मुलगा तिच्याहून ग्रेट आहे!' ही माझ्यासाठी खूप मोठी पावती होती.

९२ साली मी दुबईला गेले होते पहिल्यांदा. त्यावेळेला मी 'केव्हा तरी पहाटे..' कार्यक्रमात गायला सुरुवात केली आणि संपूर्ण हॉल माझ्याबरोबर 'केव्हा तरी पहाटे..' गात होता. इतकी मजा आली, त्यानंतर मला असं जाणवलं, की अरे, रसिकांनाही आपल्याबरोबर गायला आवडतं. त्यानंतर माझ्या कार्यक्रमात प्रत्येक रसिक आपापल्या पद्धतीनं मनापासून आनंद घेत गात असतो. मी गाते ते परमेश्वराच्या चरणी सूर अर्पण करण्याकरता! तो आध्यात्मिक आनंद मलाही मिळत असतो आणि रसिकांनाही मिळत असावा. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून माझा आनंद द्विगुणीत होतो.

अधिवेशनाच्या निमित्तानं होणार्‍या कॉसमॉस-बीएमएम सारेगम स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी तुम्ही परीक्षक म्हणून काम करणार आहात, तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? तुमच्या स्पर्धकांकडून काय अपेक्षा आहेत?

केवळ याच स्पर्धेसाठी नव्हे, तर गाण्याचा खरंच गांभीर्यानं विचार करणार्‍या सर्वच स्पर्धकांना माझी अशी विनंती आहे, की जी गाणी गायची आहेत, त्यांतल्या सुरांचा खोलवर जाऊन अभ्यास करा, उच्चारांचा अभ्यास करा. त्यांतल्या तालात एक उपजत लय असते, तिचा अभ्यास करा. शब्दांवर, उच्चारांवर, स्वरांवर, तालावर, लयीवर जशी तुम्ही मेहनत घ्याल, तशीच मेहनत तुम्ही गाण्यातला भाव व्यक्त करण्यावरही घ्या, कारण ’भाव’ हा संगीताचा आत्मा आहे. त्या भावनेशिवाय जर तुम्ही गायलात, तर गाणं रुक्ष होईल. त्यामुळे गाण्यात लालित्य आणण्यासाठी प्रयत्न करा. शास्त्रीय संगीत, विशेषत: जर ते पं. जसराजजींच्या गाण्यासारखं लालित्यपूर्ण गायलं गेलं, तर ते अगदी वेगळं जाणवतं आणि हृदयाला भिडतं. मी स्वतः अतिशय तपशिलात जाऊन, अभ्यास करून मगच गाते, त्यामुळे मला या गोष्टींचं महत्त्व जास्त वाटतं. आयुष्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल, तर तुम्हांला तपशिलात जाऊन अभ्यास केलाच पाहिजे. आधीपासूनच तयारी सुरू करा, म्हणजे तुम्हांला ताण जाणवणार नाही. मला विचाराल तर, काही प्रमाणात ताण येणं हे चांगलंच. काहीच ताण नसेल तर तुमची तयारी कदाचित नीट होणार नाही. पण इतकाही ताण घेऊ नका, की त्याचा तुमच्या गाण्यावर परिणाम होईल. तुम्ही २००% तयारी केली असेल तर तुम्ही नक्कीच १००% गाऊ शकाल, याची मला खात्री आहे.

माझी स्पर्धकांना अशीही एक विनंती, की तुमच्या सगळ्यांमध्ये निरोगी स्पर्धा असू द्या, ही काही शेवटची स्पर्धा नाहीये. अजून एक महत्त्वाचं म्हणजे, कधीकधी काय होतं, की आपल्याला खूप चांगलं गाता येतं असं वाटतं आणि परीक्षकांनी कौतुक केलं की स्वर्ग दोन बोटंही उरत नाही. तर तसं करू नका. अतिशय विनम्र राहा. तुम्ही विनम्र असलात, तर परमेश्वर तुम्हांला खूप पुढे नेतो. माझ्यापुढे जे आदर्श आहेत, पं. डी. व्ही पलुस्कर, बडे गुलाम अली खाँसाहेब, उस्ताद आमीर खाँसाहेब, लताबाई, आशाबाई, पं. हृदयनाथजी, माझे गुरू पं रामनारायणजी, या सगळ्यांपुढे आपण लहान आहोत. आपल्याला या शिखरांपर्यंत पोहोचायचा प्रयत्नतरी करायचा आहे, हे सातत्यानं जाणवत असतं. त्यामुळे जितकं जास्त या सूरसागरात डुंबाल, तितकी त्याची खोली जाणवायला लागेल. समर्थ रामदासांनी जे म्हटलं आहे, 'अभ्यासोनि प्रगटावे | अन्यथा झाकोनि असावे | प्रकटोनि नासणे । बरे नव्हे|' ते अगदी योग्यच आहे.

स्पर्धा घेतल्यामुळे भारतामध्ये किंवा भारताबाहेर भारतीय संगीताच्या संवर्धनासाठी काही मदत होते का?

निश्चितच मदत होते. कुठल्याही स्पर्धांमुळे काय होतं, की लोकांचा गाण्यातला सहभाग वाढतो. स्पर्धक त्यानिमित्तानं गाण्याची तयारी करतात, जुनी गाणी पुन्हा ऐकली जातात. त्यांच्यावर मेहनतही घेतली जाते. नाहीतर आता माझ्या मुलाच्या वयाची मंडळी आहेत, त्यांना 'तिन्ही सांजा..'सारखी भा.रा. तांब्यांची गाणी कशी माहीत असणार? पण ती आज पुन:पुन्हा स्पर्धांमधून ऐकली गेल्यामुळे पुनरुज्जीवित झाली आहेत. आणि चांगलं काय, वाईट काय हेही लोकांना आता बर्‍यापैकी कळायला लागलेलं आहे. कुठला स्पर्धक तांत्रिकदृष्ट्या जोरकस गातो, कोणाचा सूर थोडा कच्चा आहे, कोण चांगले गायला, कोणाच्या गाण्याची निवड चुकली, हे आज टीव्हीवर गाणी ऐकताना सामान्य श्रोते सांगू शकतात. माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे.

भारताबाहेरच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दल तुम्हांला काय वाटतं? त्याच्या प्रसारासाठी काही विशेष प्रयत्न करायला हवेत का?

आपल्याकडच्या अनेक मोठमोठ्या, दिग्गज कलाकारांनी आपलं संगीत तिथे नेलेलं आहे. उदाहरणार्थ, भारतरत्न पं. रवीशंकरजी, आपले अब्बाजी उ. अलारखाँसाहेब, उ. अली अकबर खाँसाहेब, उ. झकिरभाई, पं. हरिप्रसाद चौरासिया, उ. शाहिद परवेझ आणि माझे तिन्ही गुरू अशा अनेक चांगल्या, गुणी मंडळींनी आपलं संगीत भारताबाहेर नेलं आहे आणि तिथल्या लोकांमध्ये या गाण्याविषयी खूप चांगली आवड निर्माण केली आहे. त्यामुळे तिथल्या मंडळींनाही एक अप्रूप असतं, ती मंडळी फार आसुसलेली असतात चांगलं संगीत ऐकण्यासाठी. मी जेव्हा ’८४ साली पहिल्यांदा गेले अमेरिकेत, तेव्हा फार कमी कलाकार परदेशात जायचे, पण आजकाल खूप कलाकार तिथे जातात, मोठमोठे कार्यक्रम करतात. ही आपल्या संगीताच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. जरी आपण म्हणतो, की पाश्चात्त्य संगीताचा आपल्याकडे खूप प्रभाव वाढत आहे, तरी प्रत्येक पिढीगणिक संगीत हे बदलत असतं आणि आपल्यालाही त्यानुसार मूळ पारंपरिक संगीताचा बाज ठेवून थोडेफार बदल करावे लागतातच, हे लक्षात घ्यायला हवं. सगळीकडे ओरड सुरू असते, की चांगलं संगीत ऐकू येत नाही. पण आपण जर चांगलं काही दिलं नाही, तर चांगलं पसरणार नाही. तुम्ही पेराल तसंच उगवेल. अभिजात शास्त्रीय संगीत सुगम संगीतामध्ये माळून किंवा शब्दांमध्ये माळून लालित्यपूर्णरीत्या सादर करण्याचा मी माझ्या परीनं एक छोटासा, खारीच्या नखाएवढा प्रयत्न करते. हे रसिकांना नक्कीच भावतं, असा माझा अनुभव आहे. यामुळे नवीन, चांगले श्रोते तयार होतात.

ppj1.jpg

पं. जसराज, पं. हृदयनाथ मंगेशकर आणि पं. रामनारायण या तुमच्या तीन गुरूंबद्दल सांगाल का?

संगीतमार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजींविषयी सांगायचं म्हणजे त्यांची गायन शैली ही अतिशय मृदू, मुलायम, रेशमी आहे. एखाद्या गोंडस बाळाला जसं आपण आंजारतो गोंजारतो ना, त्याप्रमाणे त्या सुराला आंजारतगोंजारत, अतिशय लालित्यपूर्ण शैलीत ते शास्त्रीय संगीत सादर करतात. त्यामुळे कुठेही रुक्षपणा येत नाही .

पं हृदयनाथजींच्या 'भावसरगम'मध्ये गायचा कित्येक वर्षं योग आला. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आवाजाचा फोकस कसा असावा, आवाजाची, सुरांची फेक कशी असावी, माईकसमोर कसं गावं, खर्जापासून ते तारसप्तकापर्यंत रेंज कशी वाढवायची या अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यांच्या वडिलांच्या अनेक अनवट रागांच्या बंदिशी त्यांच्याकडून मी शिकले. त्यांचा मोठेपणा असा, की मी वयानं लहान शिष्या असूनही, त्यांनी अनेकदा स्टेजवर मला शेजारी बसवून अगदी आदरानं अर्धा कार्यक्रम गाऊन घेतला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला मी 'मागे उभा मंगेश..' किंवा 'चांदणे शिंपीत जाशी..'सारखी तीनचार गाणी गात असे. त्यानंतर 'मी रात टाकली..' किंवा 'जांभूळ पिकल्या झाडाखाली..'सारखी युगुलगीतं त्यांच्याबरोबर गायचे. मग त्यांची तीनचार स्वतंत्र गाणी. मग मध्यांतर आणि परत असाच कार्यक्रम असायचा. पं. हृदयनाथांनी आणि लतादिदींनी मला सतत खूप प्रोत्साहन दिलं.

पं. रामनारायणजींनी जे शिकवलं ते अफाट होतं! स्वरस्थान म्हणजे काय, सुरात गाणं म्हणजे काय किंवा परिपूर्णत्व म्हणजे काय, हे मला त्यांच्या सारंगीतून ऐकायला मिळालं.

मी खरोखरच खूप भाग्यवान, की या तिन्ही गुरूंनी मला खूप शिकवलं. चांगलं - वाईट काय, याचं भान दिलं. दिग्गज गुरूंकडे शिकण्याचा फायदा काय, हेही कळलं. चांगल्या गोष्टीची गोडी लागावी लागते आणि हे फक्त चांगला गुरूच करु शकतो.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ज्या रचना असतात, त्या गायला जरा कठीण असतात, असं ऐकायला मिळतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे?

गंमत काय आहे, की मला पहिल्यापासूनच आव्हानात्मक गोष्टी करायची सवय आहे, किंवा तशी माझी वृत्तीच आहे म्हणा ना. साधंसोपं काही करण्यापेक्षा काहीतरी आव्हानात्मक, वेगळं आणि कठीण पण तरीही दर्जेदार, उत्तम करण्याकडे माझा इतका जबरदस्त कल आहे, की त्यांची शैली आपोआप माझ्या रक्तात उतरली आहे, झिरपली आहे, आणि त्याचा मी खूप आनंद घेते. १९८१ सालच्या ऑगस्टमधलं 'धुंद मंद ही अशीच' हे माझ्या कारकिर्दीतलं पहिलंच टीव्हीवरचं गाणं. तुम्हांला लक्षात येईल, की किती जबरदस्त कठीण, आव्हानात्मक गाणं होतं ते! हे गाणं लताबाईंनी ऐकलं आणि त्यांनी संगीतकार अनिल मोहिले यांना फोन करून विचारलं की, "ही मुलगी कोण? इतर मोठे कलाकार या कार्यक्रमात असताना हिनं संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकलाय! हिच्याकडून मला गाऊन घ्यायचंय". त्यानंतर त्यांनी माझ्याकडून ’निवडुंग’ची गाणी गाऊन घेतली. ही सगळी परमेश्वराची कृपा आहे.

गाण्यात, ध्वनिमुद्रणाच्या तंत्रात खूप बदल झाले आहेत. त्याबद्दल तुम्हांला काय वाटतं?

हे बदल वैश्विक आहेत. पूर्वी अ‍ॅनलॉग रेकॉर्डिंग असायचं, आता ते डिजिटल असतं. अ‍ॅनलॉगमधलं जे सुरांमधलं भिजणं होतं ते जाऊन डिजिटलमुळे थोडा रुक्षपणा आला आहे. चांगले रेकॉर्डिस्ट चांगलं ध्वनिमुद्रण करूही शकतात. पण सगळ्या वादकांनी एकत्र बसून वाजवल्यामुळे एक वातावरणनिर्मिती होते. माझी पहिली सीडी 'ही शुभ्र फुलांची ज्वाला'. त्यातलं 'सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ हे गाणं गात असताना तीसचाळीस वादक काचेच्या बाहेर बसले होते. सॅक्सोफोनचे भारतातले सगळ्यांत मोठे वादक, मनोहारीसिंगजी, ज्यांनी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवलेला आहे, ते माझ्या समोर बसलेले...तसंच प्रख्यात सरोदवादक झरीन दारूवाला समोर बसलेल्या... असे सगळे दिग्गज कलाकार वाजवत असताना त्यांचा जो थेट सूर कानावर पडतो, आणि त्यात जे भिजून जाणं असतं, ते अवर्णनीय आहे. अशा पद्धतीच्या ध्वनिमुद्रणाचा मी कित्येक वर्षं जो काही आनंद घेतलाय, तो अपरिमित आहे. आता वेगवेगळे वादक येतात, मग वेगवेगळ्या वेळी वाजवून जातात. यात गाण्याच्या अर्थाच्या दृष्टीनं जे भिजणं असतं, ते त्या मानानं कमी असतं. गाण्याचे शब्द काय आहेत, ते वादकांना माहितीसुद्धा नसतं. त्या वेळेला कसं असायचं की, 'माझ्या घरी मी पाहुणी' किंवा 'दाबून माझा हुंदका' हे शब्द मी गात असताना, त्यांच्याही कानावर पडत होते, त्याप्रमाणे त्यांच्याही हातातून तो भिजलेला सूर येत होता. माझ्याही गळ्यातून तो उतरत होता. या सगळ्या एकत्रीकरणानं वेगळीच वातावरणनिर्मिती होऊन जाते.

श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?

' जे जे उत्तम, उदात्त, उन्नत' असंच आपलंसं करा, जवळ करा. जे अभिजात संगीत आहे, त्याला कवटाळा. मी माझ्या सांगीतिक कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच ठरवलं होतं, की दर्जेदार काव्य आणि उत्कृष्ट संगीत असेल तरच मी गाईन. मी हे जे पहिल्यापासून व्रत घेतलेलं आहे, ते आजतागायत सांभाळलं आहे. आणि रसिकांनीही तेच सांभाळावं, त्यालाच प्रोत्साहन द्यावं.

तुमच्या भविष्यकाळातील योजनांविषयी काही सांगू शकाल का?

झाल्याशिवाय काही सांगणं योग्य नव्हे, पण तरी, एक हिंदी भजनाचा मोठा प्रोजेक्ट, तसंच अजून इतरही प्रोजेक्टस्‌ माझ्या हातात आहेत. शिवाय काही हिंदी उत्तम कविताही मी गाणार आहे.

अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये तुमचा सहभाग असतो, त्याबद्दल सांगाल का?

दर महिन्याला मी टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लेटलेट्‌स् डोनेट करत असते. हे मी फेसबुकवरही लिहिलेलं असल्यामुळे काही चाहतेही येतात. अंशुमान विचारेंसारखे चांगले कलावंतही माझ्या विनंतीला मान देऊन तिथे प्लेटलेट्‍स् डोनेट करून गेले आहेत. आपल्या भारतात प्लेटलेट्‌स्‌विषयी इतकं अज्ञान आहे, की कोणी त्या द्यायला तयार होत नाही किंवा माहीत नसल्यामुळे दिल्या जात नाहीत. गरीब रुग्णांना दररोज तीन-तीन हजार रुपये खर्च करून त्या विकत घ्याव्या लागतात. असे हजारो रुग्ण तिथे टाटा रुग्णालयात रांगेत बसलेले असतात. आपल्याला परमेश्वरानं जे काही दिलेलं आहे, त्यातलं थोडंसं आपणही इतरांना द्यावं, अशी माझी भावना आहे. माझा मुलगा आदित्य काय किंवा माझे इतर विद्यार्थी काय, ज्यांना कुणाला त्या त्या वेळेला शक्य असेल, त्या सगळ्यांना दर महिन्याला मी तिथे घेऊन जात असते. टाटा रुग्णालयाचे ब्लड ट्रान्स्फ्यूजन विभागाचे प्रमुख डॉ. राजाध्यक्ष यांनी मला या गोष्टीसाठी प्रेरित केलं. फक्त गाणं एके गाणं न करता आपल्या सामाजिक जाणिवासुद्धा आपण जागृत ठेवाव्यात, इतरांनाही मदत करावी, असं मला वाटतं. तसंच मी 'आनंदवन', नॆशनल असोसिएशन फॊर द ब्लाइंड, किंवा 'कमला मेहता अंधशाळा' या सगळ्यांशी अनेक वर्षं निगडीत आहे. कै. श्री. बाबा आमट्यांचे आशीर्वाद मला लाभले आहेत, आणि त्यांनी सांगितलेला संदेश तर आयुष्यभर जतन करण्यासारखा आहे -

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

दु:ख उधळावयास आता आसवांना वेळ नाही.

कुठलंही दु:ख कुरवाळत न बसता, कुठेही हताश न होता कामाला लागा आणि यशस्वी व्हा...खूपच छान. वेळात वेळ काढून ही मुलाखतीची संधी दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

धन्यवाद!

ppj3.jpg

***


टंकलेखनसाहाय्य - शुगोल, अश्विनी के.

***


श्रीमती पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं दुसरं छायाचित्र त्यांच्या खाजगी संग्रहातून
पहिलं व तिसरं छायाचित्र - श्री. योगेश कुलकर्णी

***
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झालीये मुलाखत.

दर महिन्याला मी टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लेटलेट्‌स् डोनेट करत असते. आपल्याला परमेश्वरानं जे काही दिलेलं आहे, त्यातलं थोडंसं आपणही इतरांना द्यावं, अशी माझी भावना आहे.>> हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर अजून वाढला.

छान मनमोकळी मुलाखत Happy

दर महिन्याला मी टाटा हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लेटलेट्‌स् डोनेट करत असते. आपल्याला परमेश्वरानं जे काही दिलेलं आहे, त्यातलं थोडंसं आपणही इतरांना द्यावं, अशी माझी भावना आहे.>> हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर अजून वाढला.>>>> +१

छान झाली आहे मुलाखत. Happy

>>
जेव्हा बँक्वे डिनरचा वेगळा कार्यक्रम ठरवण्यात आला, तेव्हा मी आयोजकांना एवढीच विनंती केली, की संगीत हे माझ्यासाठी अध्यात्म आहे आणि सूर हा परमेश्वर आहे. तेव्हा माझ्या या पूजेमध्ये सर्व रसिकांनी सामील व्हावं, आधी त्यांची मनं तृप्त करावीत आणि मगच पोटं तृप्त करावीत!
<<
हे वाचून फार बरं वाटलं. मला त्या कार्यक्रमाबद्दल वाचल्यापासून ते खटकत होतं.

धन्यवाद! मलासुद्धा एवढ्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेण्याचा हा पहिलाच अनुभव... खूपच छान वाटलं जेव्हा त्या अगदी मनमोकळेपणाने बोलल्या, सगळ्याच प्रश्नांना खूप छान प्रतिसाद दिला!

धन्यवाद माबो, मला ही संधी दिल्याबद्दल!

अतिशय सुरेल मुलाखत ........खरच पद्मजा ताईना कडक सलाम .....योगेश आणी त्याची टिम , मनापासुन आभार ....

अभिनंदन योगेश तुला हा मान मिळाल्याबद्दल !
पद्मजा फेणाणी यांचा आवाजातही विशेष नजाकतता आहेच. !

छान झाली आहे मुलाखत... Happy (त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कल्पना नव्हती.)

छान मुलाखत!
>>त्यांच्याबद्दलचा आदर अजून वाढला. >> +१

आम्ही नाय पाहिला.
ज्यांनी पाहिला ते म्हणाले की यू डिड्न्ट मिस एनीथिन्ग. Proud
आम्ही प्रॉव्हिडन्स वॉटरफ्रन्ट्चे फायरवर्क्स पाहिले.

गायिका म्हणून एवढ्या आवडत नाहीत पण प्लेटलेट डॉनेट करतात आणि इतरांना करायला लावतात हे वाचल्यावर आदर वाटला.

मुलाखत छान कव्हर केलीय.

पद्मजा,
''स्वप्नातल्या करांनी स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?

स्वप्नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य ?
स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले

स्वप्नातल्या परीला स्वप्नात फक्त पंख
दिवसास पाय पंगू अन हात शापलेले ''

विंदांनीच लिहावं अन तुम्हीच त्यातलं खोल खोल दु:ख खरवडून बाहेर काढावं.

प्रणाम.