येऊरच्या 'हिरव्या सख्या'

Submitted by उमेश वैद्य on 17 June, 2013 - 04:57

काल ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरून जाताना सहज लक्ष डावीकडे गेलं आणि समाधी लागल्यासारखा मी पहातच राहिलो. ठाण्याची हरित रेखा येऊर हिल रेंज मला खुणावत होती. सुरू झालेल्या पावसाने मस्त हिरव्या रंगाची शाल तिने पांघरली होती. एरवी बराच काळ गरीबीत दिवस कंठणाऱ्या बाईला अचानक श्रीमंती वैभव प्राप्त व्हावं आणि तिचं नाक अभिमानाने वर येउन आपले वैभव दाखवण्यासाठी तीने जसं लोकांच लक्ष वेधून घ्यावं अगदी तसचं येऊरच्या टेकड्या माझ्या मनाला ओढत होत्या.

पावसामुळे हवा धुंद, कुंद झालेली. 'गडद निळ्या' जलदांनी आकाशात दाटी केल्यामुळॆ सहस्त्ररश्मी सूर्य नि:ष्प्रभ ठरलेला, अगदी टेकड्यांच्या माथ्यावर अलगद येणार्या ढगांच्या पुंजकेदार झिरझिरीत ओढण्यांमधून ही घेऊ का ती घेऊ! अशा संभ्रमात पडलेल्या नवथर तरूणींसारख्या या टेकड्या, त्यांचे ते विभ्रम मनाला मोहीनी घालत होते. मला वाटलं ह्यांच दर्शन न घेतलेला ठाणेकर काय पण मनुष्यही करंटा!

एरव्ही या टेकड्यांची आठवण येते तॊ एखाद दुसर्या प्राथमीक शाळेच्या शिक्षकांना आपल्या वर्गाची एक दिवसाची सहल नेण्यासाठी आणि मग या टेकड्यांवर नेणार्या ईवल्या वाटाच आपल्या अंगभर लहान लहान मुले वागवत दिवसभर बागडतात. कुणी चाळीशी पार केलेला माझ्यासारखा नव - वृध्द जवान पोट कमी करण्यासाठी या टेकड्यांची वाट घरतो तेंव्हा त्याचा हा उत्साह बघून टेकड्या मनातच हसतात. प्रेमी युगुलांच एकांत-कूजन ऐकत ऐकत या टेकड्यांचीच डोळे मिटून समाधी लागत असेल. आणि जेंव्हा 'थोडी थोडी पीया करो' असं म्हणत मद्यपानाच्या कल्पनेनं आधीच नशा चढलेली मद्यप्यांची टोळकी या टेकड्यांचा आसरा घेतात तेव्हा ते दु:ख विसरण्यासाठी पाना पानातून दाटणा-या मिच्च अंधारात या टेकड्यांचे मूक रूदन सुरू होत असते.

सह्याद्रीचा पश्विमेकडील भाग अरबी समुद्राशी आपला उत्तूंग बाणा सोडून देऊन छोट्य़ा टेकड्यांचे रूप घेतो अन अशी लांबच लांब रांग सागर सीमेलगत दिसते. ठाण्याच्या वाट्याला आलेल्या येऊरच्या या टेकड्या अशांपैकीच. एकेकाळी 'अति घनदाट वने' या सदरात मोडणारा हा भाग 'तुरळक झाडी' या सदरात देखील मोडेल की नाही ही शंकाच आहे. हिरवे धडोते आणि खालून वर चढू पहाणा-या घरा-खोपटांचे ठिपके दुरून या वस्त्राला पडलेल्या भोकांसारखे दिसतात. तरीही या हिरव्या सख्या ठाणेकरांच्या जीवनात आनंद भर भरून ओतताहेत. ऊंच ढगांकडून भेट मिळालेलं पाणी पूर्वेकडच्या उतारावरून पायाशी असलेल्या तलावांत सोडताहेत. विषण्ण, क्लांत मनांना प्रफुल्ल करण्याचं काम करताहेत आणि या त्यांच्या निरामय स्नेहात ठाणेकरांच्या पिढ्यान पिढ्या जगताहेत.

आत्ताही या अशाच अकृत्रीम हिरव्या स्नेहाने माझे मन आकृष्ट करून घेताहेत आणि जणू सांगतायत "पहा आम्ही जगतोय्". हिरवाईची कत्तल आणि आणि निसर्ग संपत्तीचा नाश ही कुळ्कथा सा-या पृथ्विचीच आमच्या देशात तर या कथेचा अक्राळ विक्राळ अध्याय. पण असं जरी असलं तरी माणसाच्या मनाला अशी भुरळ पाडण्याचं काम हा निसर्ग सोडत नाहिये. तो काही कृतघ्न नाही माणसासारखा.

मी भानावर आलो. चकचकीत पुलांवरून उड्डाणॆ करीत रस्त्यावरून मी पुढे चाललो.पाणथळलेला ट्रॅफिक त्याच्या कोंडीचे एक अंग झालो. येऊरच्या या हिरव्या सख्या एकीकडे राहिल्या पण ते द्रुश्य आणि त्यांचे विभ्रम माझ्या मनातून जायला स्वार्थी मानवी जगाचे आणखी काही ठसे मारून घ्यावे लागतील.

उ. म वैद्य.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो वैद्य त्या येऊरचे जरा फोटो पण टाका की जमल्यास, छान लिहीलयं.:स्मित: येऊरचे जंगल पण मस्तए. येऊर विषयी बरेच ऐकले आणी वाचले आहे, पण फोटो मात्र पहायला नाही मिळाले कधी.