निर्मितीप्रक्रिया- बोरकरांच्या शब्दात..

Submitted by भारती.. on 16 June, 2013 - 11:41

निर्मितीप्रक्रिया- बोरकरांच्या शब्दात..

काही शब्द वर्षानुवर्षे आपला पाठपुरावा करतात.त्यांच्या अर्थांच्या सावल्या अवतीभोवतीच्या छायाप्रकाशात सरमिसळल्यासारख्या वाटतात.त्यांची संदर्भसूत्रे रोजच्या घटनामध्ये विखुरलेली दिसतात.या अशाच घटनांमधून हे शब्द जन्मले होते..कोणताही शब्द पोकळीत थोडाच संभवतो?

असल्या या शब्दांची एक तर जन्मवेळ खडतर असते किंवा जन्मदाते जोरकस असतात..कठीण शब्दांना न बिचकता बोलायचे तर त्यांच्यामागचा अनुभवव्यूह इतका प्रभावी असतो की ते शब्द जणू प्रति-अनुभव असे सदैव चैतन्यमय,प्रेरणादायी ठरतात..

''मृगजळीचा मीनचसा वणवणलो मी दिगंत
ऊन आज थकून जरा सांजावत घे उसंत

'रण आरूण वन दारूण भ्रमलो दिग्मूढपणे
तीच आज पायतळी तृणकुरणे जलपुलिने

प्रतिबिंबित प्राणांतून बघून असा नजराणा
गवसे मज प्रसवाकुल पहिला काळोख पुनः ''

कविश्रेष्ठ बा.भ.बोरकरांचे हे शब्द..एका समग्र आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करुन समेवर येणारे शब्द.

उन्हाने तळपणार्‍या, भयाने कोळपून टाकणार्‍या, संवेदनाहीन करणार्‍या घटनांना ओलांडत प्रवासाअन्ती कवि एका सुखद टप्प्यावर आलाय..त्याच्या पोळलेल्या पावलांखाली लहरी नियतीने आज चक्क 'काव्यगत न्यायाचा' सिद्धांत मान्य करुन हिरवी कुरणे अंथरलीत,त्याच्या भगभगलेल्या डोळ्यांसमोर शीतल निळी तळी दिसू लागलीत.आजवरच्या त्याच्या प्रवासाची एका अर्थी सुखद सांगता झालीय.

एका गोष्टीत मात्र कोणताही बदल झालेला नाही..त्याची साथसोबत त्या कष्टमय प्रवासात करणारी त्याची प्राणसखी प्रतिभा या सुंदर समृद्ध क्षणीही तशीच पल्लवित झालीय जशी ती पूर्वीच्या वैशाखवणव्यात त्याला आतून जगण्याचे बळ देत होती. निर्मितीचा पहिला काळोख , तो प्रसवाकुल काळोख ..वेदनांनी व्याप्त, पण नवनिर्मितीची ग्वाही देणारा. त्याचसाठी तर सगळा अट्टाहास. प्रतिकूल काळात अनुभवलेला तो काळोख आजही या अनुकूलतेच्या ऋतुमध्येही त्याला नव्याने गवसतोय.
असे झाले म्हणूनच ही हिरवीनिळी शीतल समृद्धी त्याच्यासाठी सुखान्त आहे. अन्यथा..

मग ही परिपूर्त अवस्था.
काही शोधायाचे नाही : सारे इथेच येणार
काही मागायाचे नाही: माझा हातच देणार
दिठी उलटली आत प्राणां लागले पाझर
आता घागरीत भरे सारा रूपाचा सागर
हा रूपवाद , ही सौंदर्यासक्ती , त्यांच्या जीवनशैलीचेच वैशिष्ट्य, सामर्थ्य , आणि म्हणूनच अटळपणे त्यांची मर्यादाही.

शिडे पांढरी स्वप्नवेडी दिगंती धुक्यातील जैशा प्रभेच्या तृषा
सुरूंच्या वनातून काळोख हिंडे करूनी जरा गारव्याची नशा
विषादातला गोडवासा खुळा मी अकेला जसा चंद्र माडांतला
खिरोनी जरी बिंबतो जागजागी कळेना असे कोण यांच्यातला

तम-स्तोत्र लिहिणाऱ्या या कवीने काळोखाचे आणि प्रसवाकुलतेचे अनन्य नाते सतत कवितेत आणले आहे. काळोख,जो प्रतिभेच्या प्रकाशाचे कोंदण असतो.

घटका घटका काळोखातच बसून असतो असा
उरातला गोंजारत नवख्या शब्दांचा कवडसा
लवलवता तो स्रवतो आंतर-चंद्राचा वारसा
उमाळुनी तळ नकळत होतो गगनाचा आरसा
काळोखातच पडे कवडसा असे गोड हे जिणे
त्यांत भोगिता चवदा भुवने खुंटावे बोलणे..

या तिमिरात सुरांचं आणि स्पर्शांचंही जग अधिक तीव्रतेने उलगडत जातं.
कधी पीळ भरून लकेर उठे
तिमिरामधुनी तिमिरात मिटे
पुळणीवर मी मज विस्मरता
पायात अचानक लाट फुटे

काळोख, एकांत ,आत्मविस्मृती, निर्मिती .
मग निर्मितीचा आणि प्रीतीचा संबंध काय ?
कवितेचा आणि जगण्याचा संबंध काय ?

सुखद असो दु:खद वा
वरद तुझे स्मरण सखे
पाऊस वा ऊन असो
हृदयी कविताच पिके..

इतका साधा आहे तो संबंध आणि इतका सर्वव्यापी.चेतनादायी सखीला स्मरणारा आणि त्याच वेळी ज्या परमसख्याचे प्रतिभा हे देणे आहे ,त्याला क्षणही न विस्मरणारा.

झिणीझिणी वाजे बीन
सख्या रे,अनुदिनी चीज नवीन
सौभाग्ये या सुरांत तारा
त्यांतून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजवणारा
सहजपणात प्रवीण ..

अशी निर्मितीक्षमता असण्यासाठी कविचे हृदय ही गोष्ट खासच असली पाहिजे. बोरकरांच्या शब्दात, त्यांचे चित्त म्हणजे नित्यनिरंजनाची प्रतिबिंबे साकारणारा आरसा. अभिमान लपत नाही त्यांच्या शब्दातून, श्रीमंती लपवण्यासारखीही नाही ही.
''कायाकल्पित सिद्ध शब्द असले नि:शब्द साकारती
मायानाट्यविलास जेवी विभूचे ऐश्वर्य विस्तारिती
माझे चित्त सकंप गूढ विभूचा चित्रस्रवी आरसा
त्याचा विश्वविकाससंविद असा वर्धिष्णु वा वारसा ''

या सृजनशीलतेची शक्ती कशी ? तर जग वन्ही होते तेव्हा गुप्त-शीतल-धारांनी मनाला भिजवणारी.
''सृजनाच्या आधारशिलेवर पाय रोवुनी अचल रहा
अश्रद्धेचा कलह माजता दिगंबराची शान पहा
अंगातून अंगार पेटता ज्योत दिसे तो मोज दहा
त्या ज्योतीचे कढ गिळुनी तू चिरकरुणेने द्रवुनी वहा ''

मग हा पुनरुच्चार , हे अभिमानी निमंत्रण कवीने दिलेले, त्याच्या प्रियेला ? त्याच्या ज्ञात अज्ञात सुहृदांना-वाचकांना ? की निर्मात्यालाच?

'' मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे
मी प्रणयकळेचे हासू
मी कणवकळेचे आसू
का खोट्या विनये बासू ?
सुख वाहतसे ..
.................................
ये बिंबून घे लवलाही
माझा न भरवसा काही
भरतीच्या धुंद प्रवाही
मी पोहतसे.. ''

बोरकर, तुमच्या निर्मितीक्षेत्राचा शोध घेताघेता या रस-धुंद प्रवाहांत खेचले जातो आम्ही, किती सुखाचे हे डुंबत रहाणे..

भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीतै
चिंब भिजवलंत या रसास्वादाने.. मला खरं तर आभारच मानावे लागतील बोरकरांबद्दल लिहील्याने. Happy

मी विझल्यावर त्या राखेवर
नित्याच्या जनरितीप्रमाणे
विस्मरणाचे थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या राखेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळित विखुरल्या कविता माझ्या
धरतिल चंद्रफुलांची छत्री..............

भारतीताई, निर्मितीप्रक्रिया, निर्मितीविश्व यांबद्दल अधिकाधिक समजून घेण्याची इच्छा आहे. ती अशा लेखांमुळे पूर्ण होत आहे... समृद्धही करत आहे.

कविश्रेष्ठांचे शब्द , त्यात तुमच्या शब्दांत रसास्वाद.. दुग्धशर्करा योग! Happy

मग हा सृजनशक्तीचा पुनरुच्चार , हे अभिमानी निमंत्रण कवीने दिलेले,
त्याच्या प्रियेला ?
त्याच्या ज्ञात अज्ञात सुहृदांना-वाचकांना, तुम्हाआम्हाला ?
की त्याच्या निर्मात्यालाच?

अतिशय आवडले !

बाकीबाब बोरकर हे नाव नक्षत्राप्रमाणे मराठी साहित्यात लखलखत असून त्यांच्या कवितेवर भाष्य करणेसाठीदेखील तितकीच प्रतिभा लेखकाच्या अंगी असणे गरजेचे असते आणि ती प्रतिभा भारती बिर्जे-डिग्गीकर यांच्यात किती ताकदीने भिनली आहे हे वरील अगदी छोट्या समजाव्या अशा लेखातून प्रकट झाली आहे. माझ्यासारख्या वाचकाला तर ह्याच विषयावर भारतीताईंकडून अगदी प्रदीर्घ म्हटला जावा असा लेख वाचायला खूप आवडेल.

बोरकरांनी दिलेल्या निर्मितीप्रक्रियेवर बोलायचे झाल्यास लेखातील मुद्यांनाच पुढे नेऊन असेही मी म्हणेन की त्यांची कविता वाचताना मनावर उमटलेल्या अशा एखाद्या दृष्याचा ते आधार घेतात की त्यानी ते दृश्य शब्दबद्ध केले म्हणजे वाचकासमोर ते चित्र अगदी जिवंतपणे उभे राहतेच.... उदा.

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

"नयनांचे दल हलले गं".... यामध्ये एक विलक्षण [तितकीच मोहक म्हणावी] अशी हालचाल आहे आणि तीमध्ये सारे जग डळमळून जाण्याची शक्ती आहे. या निर्मितीप्रक्रियेबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास बोलणारी वा लिहिणारी व्यक्ती काव्यप्रांतात तितक्याच सहजसुलभतेने विहार करणारी असावी लागते. बोरकर आणि रेगे ह्या दोन कविंचा काव्यात्मक अनुभव हा मुळी भाषात्म आहे; जो दोघांनीही आपापल्या परीने फुलविला आहे.

"रसपूर्ण शब्दांच्या धुंद प्रवाहात खेचले जातो आम्ही....." अशी भारतीताईंची कबुली आहे. खरी आहे ती.... पण ज्यावेळी प्रवाहात असतो त्याचवेळी अन्यांची इच्छाही असते की त्या रसपूर्ण शब्दांची व्याप्ती तरी किती आहे ते तुमच्यासारख्याने समजावून सांगावे....हा प्रवाह अखंडित राहो.

वाचन आनंद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

अशोक पाटील

वा! अशोकसर, तुमची प्रतिक्रियाही फार आवडली..

त्यांच्या कवितेवर भाष्य
करणेसाठीदेखील तितकीच
प्रतिभा लेखकाच्या अंगी असणे
गरजेचे असते
आणि ती प्रतिभा भारती बिर्जे-
डिग्गीकर यांच्यात
किती ताकदीने भिनली आहे हे वरील
अगदी छोट्या समजाव्या अशा लेखातून
प्रकट झाली आहे.>>सहमत.

धन्यवाद.

संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी.

असावीस पास, जसा स्वप्‍नभास,
जिवी कासावीस झाल्याविना.

तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची.

तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे.

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल;
भुलीतली भूल शेवटली.

बा. भ. बोरकर....

सुंदर लेख.. वाचुन आनंद झाला..
आभारी आहे..

आभार सर्वच सुजाण रसिकांचे.खरेच बाकीबाब हा विषय फार मोठा, मी त्यांच्या अल्प ओळींचा पाठपुरावा केला, त्याही अशा की मला दिवसरात्र झपाटून टाकणार्‍या विषयाशी, निर्मितीप्रक्रियेशी , संबंधित. एरवी बोरकरांचा निसर्ग, प्रणय, अध्यात्म, जीवनदर्शन,जीवनासक्ती हे सगळेच अद्भुत सौंदर्याने व्याप्त.
वरदा, तुम्ही लिहिलेल्या ओळी सदोदित मनात असतात.
सुशांत,किरण,विक्रांत,अंजली,तुमच्या वयोगटानेही या शब्दांचा ठेवा जपून ठेवावा, पुढे न्यावा. आपले वैभव तिजोरीत ठेवून दरिद्र पांघरून रहाणार्‍या कृपणासारखे आपल्या मायबोलीला रहावे लागू नये.
या ओळी मुख्यत्वे 'चैत्रपुनव' संग्रहातील. त्यांचे चित्रवीणा,गितार वगैरे अन्य संग्रह, चांदणवेलसारख्या स्वयम कुसुमाग्रजांनी संपादित केलेल्या निवडक कविता .. ओळ न ओळ सुंदरतेने निथळणारी अशी विशुद्ध अनुभूती..
अश्विनीमामी, बोरकर आणि मर्ढेकर यांची बाधा उतरणे कठीण.
अशोकजी,
>>माझ्यासारख्या वाचकाला तर ह्याच विषयावर भारतीताईंकडून अगदी प्रदीर्घ म्हटला जावा असा लेख वाचायला खूप आवडेल >>
असे वाटत असेल तुमच्यासारख्या व्यासंगी माणसाला तर तो माझा सत्कारच ! इथे तर पांडित्याचा अभाव आहे , नाही म्हणायला एक कवीहृदय मात्र आहे लिहिण्याचे धारिष्ट्य करायला लावणारे.असो. नक्की प्रयत्न करेन.
तुम्ही एका श्वासात केलेला बोरकर अन रेगे यांचा उल्लेख अत्यंत अर्थपूर्ण आहे,कारण शब्दांची अनेकस्तरी अर्थमयता सुंदरता या दोघांच्याही कवितेत वेगवेगळ्या प्रकारे उमटते. येथे पु.शि. रेग्यांनी केलेले एक मार्मिक खोचक कवी-विधान आठवत आहे कारण पुनः या लेखाच्या विषयाशी,निर्मितीप्रक्रियेशीच ते संबंधित आहे..
''*सौंदर्याला असल्या असण्याचा हक्कच ना
प्रज्ञेतच फक्त तयें उजळावे आणि पुनः
जळत जळत घडवाव्या प्रतिमा
निस्तुल काळ्या काळ्या पाषाणातून..

छिन्नीला या माझ्या एक भुकी धार असे
शब्दांना अर्थ उष्ण, मूढे, तुज सांगू कसे !''
(* इथे 'सौंदर्य' आहे की 'लावण्य' तेवढेच नीट आठवत नाहीय, बघावे लागेल..)
भारती

त्यांच्या कवितेवर भाष्य करणेसाठीदेखील तितकीच प्रतिभा लेखकाच्या अंगी असणे गरजेचे असते आणि ती प्रतिभा भारती बिर्जे-डिग्गीकर यांच्यात किती ताकदीने भिनली आहे हे वरील अगदी छोट्या समजाव्या अशा लेखातून प्रकट झाली आहे. >>>>> +१००

हा लेख व त्यावरील प्रतिसाद ( बोरकरांच्या इतर कविता ) - दोन्हीतून मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय ....

भारती....

तुम्हाला प्रतिसादात 'रेगे' यांचा उल्लेख केल्याचे आवडले हे वाचून समाधान झाले. वास्तविक बोरकर हे स्वतंत्र असे चर्चेचे झाड आहे आणि त्याभोवती घालायला मिळेल तितके रिंगण घेता येईल तथापि सौंदर्यवादी प्रवृत्तींचा ज्या ज्या वेळी उल्लेख होत राहील त्या त्या वेळी अगदी केशवसुतांपासून सुरुवात करावी लागते आणि त्या ओघाने मग रेगे, इंदिराबाई यांच्या कवितांमध्ये ती सौंदर्यवादी प्रवृत्ती कशी विशुद्ध स्वरूपात येते तर बोरकर, बापट, पाडगांवकर, कांत आदी कवींच्यामध्ये कशी मिश्र स्वरूपात आढळून येते यावर चर्चा अपरिहार्य असते.... किंबहुना एकाच्या कवितेचे मर्म तपासताना बाजूला त्याच्या पंगतीत बसू शकणार्‍या दुसर्‍या....त्याच्याच दर्जाच्या कवीचा प्रवास पाहणे अपरिहार्यच म्हणावे लागेल.

रेगे तर शब्द निर्मितीप्रक्रियेचे जादूगारच हे तुम्हासही मान्य व्हावे असे मी म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही :

"....जे मत्त फुलांच्या कोषांतून पाझरले,
निळ्या लाघवी दंवात उलगडले,
जे मोर पिसांवर सावरले....
....... डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी
झनन-झांझरे मी पाहिले...."

~ किती छोटे छोटे शब्द...आणि किती देखणा मोरपिसारा उलगडला आहे या पाचसहा ओळीतून ! 'झनन-झांझरे मी पाहिले...' म्हणज कवीला नेमके असे कोणते सौंदर्य त्या क्षणी सापडले त्याचा मागोवा मग रसिकाने घ्यायचा आहे.

रेग्यांचे विधान देताना तुम्ही "गंधरेखा' या कवितेचा रास्त उल्लेख केला आहे {तिथे 'लावण्याला' असा उल्लेख आहे}. वास्तविक रेगे यांच्या काव्याला प्रत्येक दशकातील टीकाकार सर्वाधिक महत्व देत असल्याचे दिसून येते ही बाब मला विशेष वाटते. चित्रे, कोलटकर, ढसाळ आदींचे काव्य मराठी भाषेला पुढे नेणारे नक्कीच आहे पण ज्यावेळी बोरकर रेगे इंदिराबाई यांच्या प्रांगणात वाचक बागडायला जातो त्यावेळी त्याला जीवनदृष्टीच्याबाबतीत प्राप्त होणारा आनंद बहुमोलाचा आहे.

अशोक पाटील

भारतीतीई, अशोक जी ,वरदा ,कोकण्या ,आणि सर्वच
लिहा .....अजून अभ्यास करून लिहा ......मी वाचतोय शब्द अन् शब्द ......साठवतोय काळजात !!!!

आणि बोरकर.... तुम्हाला साष्टांग दंडवत
________________/\_________________

निर्मिती ही तशी नेणिवेच्या प्रांतातील गोष्ट, विशेषतः कवितेची निर्मिती.

पराकोटीच्या सुंदर शब्दकळेने , अर्थवत्तेने निथळणारे कवितेतले शब्द नेमके कसे अवतरतात यावर सर्वांनाच कुतुहल असते पण अस्तित्वाशी निगडित असलेली निर्मितीप्रक्रिया अस्तित्वाइतकीच गूढ, तेव्हा कवीने स्वतःच त्याबद्दल लिहूनही सर्व उत्तरे मिळत नाहीतच..एक अननुभूत आनंद मात्र मिळतो.

कवितेच्या एका काहीशा अगम्य वाटणार्‍या (पण माझ्यासाठी केवळ रसास्वाद हा साराच ) या अंगावर बोरकरांच्या मनात घोळणार्‍या काही ओळींच्या निमित्ताने अगदी थोडेसेच लिहावेसे वाटले. कवितेवर स्वनिरपेक्ष प्रेम करणार्‍या अनेकांना त्यातून थोडेसे काही जरी मिळाले असले, तरी मला मात्र पुष़्कळ आनंद झाला आहे..

धन्स शशांकजी,वैभव, माशा, आपल्या जिव्हाळ्याचाच हा विषय.
आभार अशोकजी पुनः एकदा या सार्थ प्रतिसादातून केलेल्या व्हॅल्यू अ‍ॅडिशनसाठी! रेग्यांच्या 'झनन झांजरे' चा उल्लेख अगदी समर्पक.''ते तशाच एका लजवंतीच्या डोळ्यांमध्ये, डोळ्यांपाशी झनन-झांझरे मी पाहिले | पाहिले, न पाहिले...."या त्या ओळी. 'झाड माझे एक त्याला आग्रहाची लाख पाने | आणि माझी बंडखोरी घोषतो मी गात गाणे ||'' ही त्यांची कवी-भूमिका..
चित्रे, कोलटकर ढसाळ यांबद्दलचे विधानही पटणारे. दि.पुं.च्या दिपवून टाकणार्‍या बुद्धीमत्तेमुळे त्यांच्या कवितेतली हवीहवीशी नेणीव-मात्रा कमी पडते म्हणून मला त्यांचे गद्य-लेखन अधिक आवडते. पण हे पुनः स्वतंत्र विषय!