आपल्या जोडीदारासह पहावा असा 'अनुमती' (चित्रपट)

Submitted by केदार जाधव on 14 June, 2013 - 15:16

सर्वात आधी मी चित्रपटाच्या प्रिमिअरला जाण्याची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे
आभार मानतो . माझ्या ओळखीच तस कुणीच या क्षेत्रात नसल्याने अस काही घडेल असा मी
कधी विचारही केला नव्हता .त्यामुळे आधीच सगळीकडे मी "हवा" करून ठेवलेली होतीच .
पण सुखद धक्का बसला तो ह्या लोकांचा साधेपणा पाहून .
विक्रम गोखले काय किंवा दिलीप प्रभावळकर काय, आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांच्या
मानाने कितीतरी मोठी माणसं . पण त्यांच्या वागण्यात , बोलण्यात त्याचा लवलेश
ही नव्हता .
नंतर झालेला छोटेखानी स्वागत समारंभ ही छान .
प्रिमिअर बद्द्ल अजून कितीतरी लिहिता येईल पण जस हॉटेल कितीही छान असेल ,
सेवा कितीही चांगली असेल , तरी जोवर अन्नपदार्थ चांगले नाहीत तोवर त्याला अर्थ
नसतो , तसेच इथेही .
आणी खर सांगायच तर इथला पदार्थ ५ स्टार होता .

तर चित्रपटाबद्दल,
त्याची बायको अत्यवस्थ आहे . तिच्या उपचारांचा खर्च अवाढव्य आहे . एक रिटायर्ड
शिक्षक असलेला तो हा खर्च पेलू शकत नाही . मुलगा मदत करू इच्छित नाही . उलट
त्याच म्हणण आहे की उपचार थांबवावेत आणी आईला मरू द्याव . त्यासाठी वडिलानी
सही करावी म्हणून मुलगा प्रयत्न करतोय . पण उपचार चालू राहिले तर ती वाचूही शकते
. त्याला हे मान्य नाही , तिच्या उपचारांसाठी काहीही करायची त्याची तयारी आहे
. पण काहीही म्हणजे काय ? तरीही तो जंग जंग पछाडतो .
याच वळणावर त्याला त्याची कॉलेज मधील मैत्रिण भेटते , ती त्याला जीवनाचा वेगळाच पैलू
दाखवते .
तो या पैशाची सोय करू शकतो का ? आपल्या बायकोला पुढे जायची "अनुमती" देऊ शकतो का ? हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहायलाच हवा .

या चित्रपटाच सगळ्यात मोठ यश म्हणजे हा सिनेमा तुम्हाला पटतो , तुमच्यापर्यंत
पोचतो . तुम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो .( "चिमणी पाखर" बघताना हसणार्या माझ्यासारख्याचेही २-३ दा माझेही डोळे ओले झाले ,कारण जे चाललय ते
तुमच्याआमच्या आयुष्यात घडू शकत ,त्यात काही अतिशयोक्ती नाही हे जाणवत होत ). सर्वात महत्वाच म्हणजे
कारूण्याची झालर असली तरी हा काही निराशावादी सिनेमा नाही . इथे कितीही हताश
झाला असला तरी विक्रम गोखले लढायच थांबलेला नाही .
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे कुणाला बळजबरीने खलनायक केलेल नाही . प्रत्येक जण आपल्या परिस्थितीमुळे तस वागतोय . तसा मुलगाही चुकत असला तरी प्रॅक्टीकल आहे (हा शब्द वापरला की तत्व , कर्तव्य सगऴ विसरल की चालत) अशी मुल आपण आसपासही पाहतो .

अभिनयाबद्दल बोलायच झाल तर हा चित्रपट विक्रम गोखलेंचा आहे . आपल्या बायकोवर
जिवापाड प्रेम करणारा , तिला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारा ,
आपण काहीही करू शकत नाही हे दिसताना हताश झालेला नवरा त्यानी समर्थपणे उभा
केलाय .
नीना कुलकर्णीना फारसा वाव नसला तरी त्यानी उत्तम काम केलय . मुलाच्या भूमिकेत
सुबोध भावेही ठिकठाक , किशोर कदम नेहमीप्रणाचे अव्वल . अरूण नलावडे छोट्या भूमिकेतही भाव खाऊन जातात . सई चा लूक आणी अभिनय दोन्ही सुखद . रीमा लागूची भूमिका तशी
छोटीशी असली तरी चित्रपटाला एक वेगळ वळण देणारी आणी त्यानी ती आपल्या उत्स्फूर्त अभिनयाने जिवंत केलीय .
तांत्रिक बाजूही अगदी व्यवस्थित सांभाळली गेली आहे . गजेंद्र अहिरेंच दिग्दर्शनही सुरेख .
फोटोग्राफीच विशेष कौतुक करायला हव . कोकण काय सुरेख टिपलय ! संगीतही अप्रतिम . गाणीही चित्रपटाला पुढे घेऊन जातात .

कदाचित बाळबोध वाटेल , पण आजच्या "Make up and Brake Up" पिढीने (हे लोण आता
सांगली -कोल्हापुरातही पसरलय) सहजीवन म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगणारा
हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे अस मला वाटत.
उणीव काही असेल तर ती फक्त मार्केटींग आणी मार्केटींग . "मार्केटींग नाही
म्हणून प्रेक्षक नाही आणि प्रेक्षक नाही म्हणून मार्केटींग परवडत नाही " हे
दुष्टचक्र आहे हे मान्य आहे , पण यावर काही उपाय तर शोधायलाच हवा ना ? इतका
चांगला चित्रपट आला आहे हे लोकाना कळलच नाही तर काय उपयोग आहे ?

पण माऊथ पब्लिसिटी सुद्धा नक्की फरक पाडू शकते . मी माझ्या सगळया परिचिताना
आवर्जून पहायला सांगितलाय (मराठी आहे म्हणून नाही तर एक चांगली कलाक्रुती
म्हणून ) . मी स्वतःही कविताबरोबर परत बघणार आहे .
तुम्हीही (शक्य असल्यास ) आपल्या जोडीदारासह नक्की पहावा असा
चित्रपट ..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages