झपाटलेला

Submitted by आशूडी on 12 June, 2013 - 14:10

प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीत त्याच्या हातून अशी एखादीच कलाकृती घडून जाते की जी त्याची 'सिग्नेचर' होते. त्यानंतर त्यानं काहीही केलं नाही तरी चालेल इथपर्यंत रसिक त्यावर फिदा झालेले असतात. हा माईलस्टोन त्याच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावून ठेवतात. किंबहुना त्यासाठीच तो कायम स्मरणात राहतो. अमिताभचा डॉन, सचिन दिग्दर्शित अशी ही बनवाबनवी आणि महेश कोठारेचा झपाटलेला हे सगळे याच प्रतीचे.

२० वर्षांपूर्वी 'झपाटलेला' ने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासाचं नवीन पानच लिहीलं. मूळ कल्पना जरी कुठूनतरी 'प्रेरणा' घेऊन आलेली असली तरी त्या चित्रपटानं जे करुन दाखवलं ते त्याआधी कधी झालं नव्हतं. गब्बर नंतर प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिलेला खलनायक जर कुणी असेल तर तात्या विंचू. त्याचा थरार, त्याची भीती आणि त्याचा गोंडसपणा हे केवळ योगायोगानं तयार झालेलं रसायन नव्हतं. तात्या विंचू या नावातच त्याचा नैसर्गिक वेगळेपणा उठून दिसतो. महेश कोठारेच्या कवट्या महाकाळ, टकलू हैवान, गिधाड गँग अशा मुधोळकरी बालसाहित्यातून जन्मलेल्या खलनायकांच्या रांगेत तात्या विंचू मात्र अव्वल ठरतो. याचं श्रेय अर्थातच दिलीप प्रभावळकर आणि त्या गोल घार्‍या डोळ्यांच्या, भुरुभुरु उडणार्‍या सोनेरी केसांच्या बाहुल्याला!

खरंतर झपाटलेला हा चित्रपट म्हणजे महेश कोठारेचा नेहमीचाच फॉर्म्युला होता. भोळ्या भाबड्या लक्ष्याला कुणीतरी क्रूरकर्मा खलनायक छळणार आणि मग 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' सिद्ध करत तो त्याच्याशी झटापट करताना इन्स्पेक्टर महेश देवासारखा धावून येऊन त्याची सुटका करणार. पण ज्या पध्दतीने संपूर्ण चित्रपटभर थरार आणि विनोद यांचे ना कम ना ज्यादा मिश्रण जमले आहे ते करणे खुद्द महेश कोठारेलाही पुन्हा जमले नाही. हल्ली अमिताभ जसा कोणत्याही सिनेमामध्ये 'अमिताभ'च वाटतो तसा तेव्हा लक्ष्या होता. त्याच्या भूमिका जर दुसर्‍या कुणी केल्या असत्या तर त्या नक्कीच वेगळ्या झाल्या असत्या. तो कोणतंही काम इतक्या सहजतेने करत असे की 'असं' काहीतरी करणं, नव्हे - सतत करत राहणं हे किती अवघड आहे हे आता तो नसताना समजतं. त्या समकालीन मराठी चित्रपटातली गाणी संगीत इतकं उल्लेखनीयही नव्हतं की आजच्यासारखे फक्त गाण्यांच्या आधारे चित्रपट चालावेत!वेशभूषा, नृत्य इत्यादींबद्दल बोलण्यासारखे तरी काय होते? तरीही झपाटलेला ने रातोरात गल्ले जमवले. प्रेक्षकांच्या पिढ्यानपिढ्या झपाटून टाकलेल्या काही मोजक्या कलाकृतींमध्ये याचा समावेश झाला.

आता गोष्ट झपाटलेला-२ ची. वीस वर्षांनंतर पुन्हा तोच चमत्कार घेऊन रसिकांपुढे येणं हे फार अवघड आव्हान होतं. जुन्या कथेशी कुठेतरी लागेबांधे जुळवत नव्या कलाकारांसोबत नव्या कथेला सादर करणं सहजसाध्य नसणारंच. जेव्हा मूळ चित्रपटाचा भक्कम आधारस्तंभच - लक्ष्मीकांत बेर्डे - गमावलेला असतानाही हे आव्हान स्वीकारणं धाडसाचंच होतं.वीस वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाचा जेव्हा सिक्वेल येतो तेव्हा काळाच्या गतीने अनेक संदर्भ बदललेले असणार हे गृहीत धरुन प्रेक्षकांनी तेवढी सूट द्यायला हवी.झपाटलेला २ रसिकांसाठी अनोखी भेट घेऊन येतो ती म्हणजे ३ डी ची. केवळ कमाल! पहिल्या झपाटलेला मध्ये एखादा बाहुला चालतो, बोलतो हा जसा चमत्कार वाटत होता तसेच उच्च दर्जाचे चमत्कार करत चित्रपट पुढे सरकतो. चित्रपटाचा नायक आदिनाथ कोठारे कुठेही 'लक्ष्याचा लेक' असल्याचा फुटकळ आविर्भाव करण्याचा प्रयत्नही करत नाही हे विशेष. मकरंद अनासपुरेही त्याच्या स्वतःच्या शैलीतच समोर येतो. विनोदाची अधिकाधिक बाजू त्याने सहज तोलून धरली आहे हा मोठाच दिलासा. लक्ष्मीकांत बेर्डे सारखं किंवा त्याच्या जवळपास जाणारं काम कुणीही करु शकत नाही, त्याची नक्कल करण्याचा अयशस्वी प्रयत्नही करु नये हीच या चित्रपटाद्वारे त्याला दिलेली श्रध्दांजली. आदिनाथ कोठारेचा वावर आश्वासक आहे. मराठीमध्ये दिसायला चांगले आणि बरा अभिनयही जमणारे असे 'हीरो' नेहमीच कमी होते- आहेत. त्या मोजक्यांपैकी एक म्हणून आदिनाथची लवकरच गणना होईल.

सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्या चित्रपटांच्या यादीत आणखी एकाची भर एवढाच काय तो त्यांना झालेला फायदा. त्या दोघींकडून चित्रपटाला मिळालेलं योगदान शून्य. मुली जरी पुण्याच्या फर्गसन कॉलेजात बी.ए. करत असल्या किंवा न्यूज रिपोर्टर असल्या तरी कोणत्या ठिकाणी कसे कपडे घालावेत हा 'साधा कॉमन सेन्स' ही त्यांना नसावा याचं आश्चर्य वाटलं. पुण्यातही काही 'विशिष्ट' भाग सोडले तर इतरत्र सहज कुणी घालणार नाहीत असे मिनीज, हॉल्टर नेक ड्रेसेस या पोरी श्रीरंगपूरच्या जत्रेत घालून स्वैर बागडत असतात आणि त्यांचे त्यांचे हीरो सोडले तर इतर कुणी त्यांना एकदाही वळून बघत नाहीत यातच काय ते आलं. सहज मनात आलं, पहिल्या झपाटलेला मध्येही पूजा पवार आणि किशोरी अंबिये यांची काय विशेष कामगिरी होती? त्यांचे कपडे तर म्युझियममध्ये ठेवण्याजोगे. पण तेव्हा ते खटकत नव्हतं. वीस वर्षांचा फरक फरक तो हाच महाराजा!

अवधूत गुप्तेचं पार्श्वसंगीत थरारपटाला शोभेलसं मस्त जमलं आहे. पण लावणी आणि गणपतीच्या गाण्यात त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. तिथे मात्र अजय अतुलच हवे असं प्रकर्षानं जाणवलं. 'मदनिके' गाणं चांगलं झालंय पण तो तर अवधूतचा हातखंडा. 'मदनिके' सारखं कानात घुमत असताना मला चुकून विडंबनच सुचायला लागलं- ' सदनिके... सदनिके.. किती झाले तुझे गं मोल!'

राघवेंद्र कडकोळ, अभिजित चव्हाण आणि प्रभावळकर दमदार अभिनय, आवाजाच्या आधारावर आपल्याला पहिल्या झपाटलेल्याशी पटकन जोडून देतात. वीस वर्षांनंतरही प्रभावळकर फक्त आवाजावर टाळ्या आणि शिट्ट्या घेतात तेव्हा विलक्षण कौतुक वाटते.फक्त त्यांचं संपूर्ण चित्रपटात (आत्म्या-भुताच्या रुपाने का होईना) एकदा तरी दर्शन व्हायला हवं होतं असं राहून राहून वाटतं. मधू कांबीकरने जुन्या आणि नव्या काळाशी सांगड सुरेखपणे साधली आहे. कितीही सुधारणा झाल्या तरी खेड्यातलं रांगडेपण पूर्णपणे पुसलं जात नाही हे ती सहज दाखवून देते.इन्स्पेक्टर महेशरावांबद्दल बोलायला शब्द कमी आहेत. वय वाढलं तरी त्यांची स्मरणशक्ती, नजर आणि नेम अचूक आहेत! कसे ते क्लायमॅक्सला पहालच. आपल्या गोजिर्‍या तात्या विंचू बद्दल सांगायचं तर ३ डी मध्ये तो अक्षरशः जिवंत होतो! त्याच्या काही हालचाली इतक्या विलोभनीय आहेत की आणखी थोड्या करामती हव्या होत्या असं वाटतं.
जेव्हा आताचीही लहान मुलं तात्या विंचूला घाबरुन किंचाळतात तेव्हा पुन्हा एकदा प्रभावळकर आणि त्या बाहुल्याला दाद मिळते.

'मराठी चित्रपटातही आम्ही हे करु शकतो' हे महेश कोठारेने वीस वर्षांनंतरही तेवढ्याच ताकदीने सिध्द केले आहे याचा अभिमान तर आहेच! खूप वर्षांनंतर आपण आपल्या शाळेत जुन्या आठवणी शोधायला जावं आणि तिथलं चित्र बर्‍यापैकी बदललेलं पाहून 'कालाय तस्मै नमः' म्हणावं अन मागे फिरावं याशिवाय आपल्या हातात दुसरं काय असतं? त्या आठवणी, तो गोठलेला गतकाळ हे आपलं संचित असतं.झपाटलेला -२ पहायला जाताना आपलं हेच लाखमोलाचं देणं असतं - नॉस्टॅल्जियाचं. ते सोबत घेऊन आपण संपूर्ण सिनेमा पाहतो आणि नव्याचं कौतुक करता करता मनातल्या मनात 'जुनं ते सोनं' अशी नकळत कबूलीही देतो. हे दोन्ही चित्रपटांचं यश आहे. एका संपूर्ण पिढीला 'झपाटलेला' आणखी एक पिढी झपाटतो आहे याचे साक्षीदार आपण आहोत हे काय कमी आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिक्षण एखाध्या वृत्तपत्रात पाठवण्याच्या दर्जाचं आहे...

झपाटलेला मध्ये प्रिया अरुण नव्हती, भलतीच कोणीतरी होती. Happy

>> खलनायक जर कुणी असेल तर तात्या विंचू.
अगदी अगदी. माझे पहिले याहू अकाउंट होते तात्या विंचू. Proud
मस्त लिहीले आहेस डॅशू.

चित्रपट ३ डी मधे बघण्याची फार उत्सुकता लागली आहे आता.... नक्की बघायला हवा.

आणि इस्कू बोलते है रीव्ह्यु लिखना. अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रोफेशनलसारखा रीव्ह्यू लिहिला आहेस. खासकरून त्या नॉस्टॅल्जियाशी पूर्ण सहमत. तात्या विंचू हे कॅरेक्टरच भारी जमून गेलं होतं.

शेवटच्या परिच्छेदाला प्रचंड अनुमोदन Happy

परीक्षण आवडलं... केवळ तात्या विंचु अन मराठीतील ३ड याकरता मुव्ही पाहिलाय हा Happy

झपाटलेला-१ जर पुन्हा थिएटर मधे लावला तर तो मात्र तुफान चालेल Wink

मस्त लिहिलय! मी आपलं नवीन झपाटलेला आला त्या निमित्ताने जुन्या बाफं वर पोस्टी पडल्या आणि त्यामुळे बाफं वर आला अशा समजुतीने इथे आलो. मी खरं तर आज की कालच रसपंच्या रिव्युचे टायटल बघून म्हंटलो की कसा का असेना पण "फॉर ओल्ड टाईम्स सेक" मी झपाटलेला-२ नक्की बघणार. हा लेख बघून बरं वाटलं, आणखिन एक्साईटमेंट वाटत आहे हा सिनेमा बघाण्याकरता.
शेवटच्या परिच्छेदाबद्दल परत माझ्याकडूनही अनुमोदन! झपाटलेला मध्ये नॉस्टॅलजिया हा खुप मोठा भाग आहे. तो सिनेमा आला तेव्हा खुप लहान होतो असं नाही पण भर दुपारी सिनेमा बघताना सुद्धा टरकल्याची चांगले लक्षात आहे (बाहुला एका रात्री किशोरी अंबियेला गाठतो तो शॉट बहुतेक). ह्या बरोबरच आणखिन आठवतो तो सगळ्या पोट्ट्यांनी अगदी "बाय हार्ट" केलेला महामृत्युंजयमंत्राचा जाप! Lol अगदी तात्या विंचूच्या आवाजात नक्कल चालायची!
चाईल्ड्स प्ले त्या आधी बघितलेला असून सुद्धा झपाटलेला बघायला जी मजा आली त्याला काही तोड नाही.
एका जुन्या झपाटलेला फ्यान कढून तुला शब्बास्कीची थाप घे आशुडी! Happy

पानभर लिहूनही कुठेही spoiler alert टाकावा लागला नाही ह्याचे विशेष कौतुक.>>>>>> +१!

झपाटलेला..!

खरंतर २० वर्षांपूर्वी लक्ष्याने त्याच्या बहारदार अभिनयातून आणि दिलीप प्रभावळकरांनी त्यांच्या 'आवाजाद्वारे' अजरामर केलेला चित्रपट! दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शाळकरी वयात पहिल्यांदा जेव्हा हा चित्रपट पाहिला, त्यावेळी चित्रपट संपल्यानंतरचे कित्येक दिवस 'मी..तात्या विंचू' हा एकच डॉयलाग दिलीप प्रभावळकरांच्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न मी करत होतो. नाही जमलं ते. पहिल्या झपाटलेल्याचं हेच झपाटलेपण घेऊन नव्या थ्री-डी अवतारातल्या झपाटलेला बघायला मोठ्या उत्साहात मी सिनेमागृहात पाऊल टाकलं.

चित्रपटाची खतरनाक सुरूवात पाहून आता पुढचे दोन-अडीच तास चांगलं मनोरंजन होणार या कल्पनेने मी पुरता आनंदून गेलो. कुबड्या खवीस, बाबा चमत्कार आणि खुद्द श्री श्री तात्या विंचू यांना पाहून आता खुप काही थरारक पाहायला मिळणार या विचाराने खुश झालो. पण कोठारेंनी हि खुशी फार काळ टिकून दिली नाही. चित्रपटाला सुरूवात झाल्यांनतरच्या अर्ध्यातासापर्यंत चित्रपट व्यवस्थित वाटतो, पण तिथून पुढे ते संपुर्ण चित्रपट संपेपर्यंत तो इतका रटाळ वाटू लागतो कि कुठून दुर्बुध्दी सुचली आणि इतका टुकार चित्रपट पाहायला आलो असं वाटू लागतं. हतबल होऊन मग आदित्य कोठारे, सोनाली कुलकर्णी, मंकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, दिपक शिर्के या सगळ्यांचा कृत्रिम अभिनय पाहण्यावाचून आपल्या हातात काहीच पर्याय नसतो.

दिपक शिर्के आणि आदित्य कोठारेची दर पाच-दहा मिनिटांनंतर जी काय निरर्थक पकडा पकडी दाखवलीय ते पाहून आपल्याच थोबाडात मारून घ्यावसं वाटतं. हे आणि असलेच असंख्य टुकार प्रसंग एकत्रित गुंफून महेश कोठारेंनी झपाटलेला - २ या चित्रपटाची निर्मिती केलीय. या सगळ्यातही चित्रपटाच्या कुठल्या दोन भक्कम बाजू असतील तर त्या म्हणजे थ्री-डी इफेक्ट आणि तात्या विंचू या खलनायकासाठी दिलीप प्रभावळकरांनी दिलेला आवाज! चित्रपट संपल्यानंतर या दोन गोष्टी आपल्या स्मरणात राहत आपण सिनेमागृहाच्या बाहेर पडतो.

एकुणात काय तर पहिल्या चित्रपटाच्या जवळपासही हा झपाटलेला -२ फिरकत नाही आणि आपल्याला प्रचंड निराश करतो.

सहीच परीक्षण आशू.. पहिला झपाटलेला आवडला होता.. हाही पाहीन म्हणतो मुख्यतः स्पेशल इफेक्टस साठी.

आशुडे मस्त मस्त. फक्त टीका व वरीजनलशी तुलना करत बसण्यापेक्षा चांगले काय घ्यावे हे कळले पाहीजे खरच. Happy

खूप छान लिहीले आहे. ही भावली मिळेल काय. म्हणजे मर्चंडाइज! जसे आपण डायनासोर्चे चित्र असलेला डबा, स्पाइडी वाला टीशर्ट घेतो तसे?

मस्त परिक्षण Happy
पाहणारच .
आपल होत काय की मराठी सिनेमा "आपला" आहे या नादात स्वतःच त्याच्या अपेक्षा खूप वर नेऊन ठेवतो .
अनुमती , हा भारत माझा गरजेचे आहेतच पण असे कमर्शिअल सक्सेस देणारे चित्रपट ही गरजेचे आहेत अस माझ मत .
(४ वर्षे बेंगलोर मधे अतिशय आचरट कन्नड चित्रपट सुपरहिट होताना पाहिलेला -- केदार जाधव)

उत्तम परिक्षण कसं असावं याचा नमुना म्हणून द्यावा असा हा लेख वाटला. चित्रपटाचं कथानक कुठेही उघड न करता प्रामाणिकपणे लिहिलेलं हे परिक्षण मनाला भावून गेलं. लेखाच्या शेवटी चित्रपटाविषयी वाचकालाच विचार करायला लावणारं आणि पहावा कि नाही याचा निर्णय घेण्यास त्यालाच प्रवृत्त करायला लावणारं परिक्षण हे सर्वोत्कृष्ठ म्हणावे लागेल. परिक्षण कधीही वाचकाच्या मनात चित्रपटाविषयी पुर्वग्रह निर्माण करणारे नसावे. अर्थात हे आपले माझे वैयक्तिक भाबडे मत. पण माझ्या या कसोटीला तंतोतंत उतरणारं तुमचं परिक्षण वाचून आज खरोखर आनंद झाला. अभिनंदन आणि धन्यवाद!

सुंदर रिव्ह्यु लिहिला आहे. Happy प्रत्येक शब्दाला अनुमोदन, विशेषतः नॉस्टॅल्जिक व्हॅल्युबद्दल.

मी नॉस्टॅल्जिक व्हॅल्यु फक्त डोक्यात ठेऊन सिनेम्याला गेलो, त्यामुळे अपेक्षा केल्यापेक्षा खूप जास्त पदरात पडलं. तात्या विंचु आणि प्रभावळकर- दोघांनी कमाल केली आहे.

आदिनाथ प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर आहे. त्याला चांगली कामं आणि चांगले दिग्दर्शक मिळायला हवेत.

मला शनिवार-रविवार तिकिट मिळालं नाही. काल, म्हणजे वीकडेला सुद्धा सिनेमा ८०% हाऊसफुल होता- ही कमाल बर्‍याच दिवसांनी बघायला मिळाली. शिवाय मागे कुणीतरी म्हणल्याप्रमाणे बाहुल्याच्या एंट्रीला शिट्या- ही गोष्ट आणखी कुठे घडली नसेल. थिएटरमालकांना आता कमी शोज लावल्याचा पश्चात्ताप होत असेल.

मराठी चित्रपटात प्रयोग सुरू झालेत ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासोबत गल्ला जमवणारे, शिट्याटाळ्यारोळ्यांवाले सिनेमे झालेच पाहिजेत. नाहीतर प्रयोग कशाच्या जोरावर आणि कुणासाठी करणार?

रविवारी सहकुटुंब झपाटलेला २ पाहिल्यानंतर काल योगायोगाने झी क्लासिकवर झपाटलेला (१ ) हिंदी ( खिलोना बना खलनायक ) चालू होता. मुलांनी आणि मीही हा सिनेमा संपूर्ण पहिला. झपाटलेला २ पेक्षा जास्तच मजा आली. तेव्हा तंत्रज्ञान इतके पुढारलेले नसतानाही तात्या विंचूच्या करामती आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव अंगावर काटा आणतात. रामदास पाध्येंनी किती मेहनत घेतली असेल?

अश्विनीमामी,
या वेळी महेश कोठारेंनी तात्या विंचूचे बाहुले विक्रीला आणले आहेत (शारुक्ने रा- १ च्या वेळी आणले होते तसे. ) एबिपी माझावर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी या बाहुलीचे अनावरण केली होते.

Pages