एक शान्त सुन्दर सकाळ

Submitted by अमित M. on 12 June, 2013 - 03:00

फार दिवसांपासून डोक्यात होत की कुठेतरी सकाळी सकाळी एकट जाव नी शांत बसून निसर्गाची गुंजरव कान देऊन ऐकावी. अक्टोबर उजाडला आणि थंडीची जाहिरात करण्यासाठी पुण्यात सगळीकडे धुक्याने हजेरी लावायला सुरूवात केली. तेव्हा हि संधी साधून मी माझ्या मित्राबरोबर गुंजवणे dam च्या परिसरात भटकायच final करून टाकल. गुंजवणे dam तसा काही फार लांब नाही. पुण्यापासून अगदी 40 - 50 km परिघात हे ठिकाण आहे. पुण्याहून सिंहगड रोड ने सरळ जायचं आणि मग सिंहगडाच्या पायथ्याकडे न जाता डोणजे फाट्याला उजवीकडे वळायच. तिथून थेट १५ - २० km अंतर गेल कि आंबी फाट्याला डावीकडे वळायच आणि मग एक छोटासा घाट पार करून गुंजवणे backwater पाशी पोचता येत.
Gunjawane.jpg
ठरल्याप्रमाणे सकाळी 6:10 च्या आसपास मी कोथरूड डेपोला पोचलो. मित्राला उचलून आम्ही महात्मा सोसाइटी मधून, वारजे मार्गे सिंहगडरोडला लागलो. डोणजे फाट्याला आतमधे वळल्यावर गावातून घाटात दाखल झालो. घाटाच्या एका वळणावर बाइकला वेसण घातली आणि एका उन्चवट्यावरून पूर्वेकडे नजर टाकली. सकाळचा सुखद गारवा हवेत जाणवत होता. दाट धुक्याच्या दुलईतून झाडांचे शेंडे डोक वर काढत होते. समोर उभा आडवा रांगडा सिंहगड पसरला होता आणि त्यामागून उगवणाऱ्या रविराजाची कोवळी सोन-किरणे त्या पिंजलेल्या कापसात अडकून पडली होती. पूर्व दिशा पिवळसर तांबड्या रंगाने उजळून निघाली होती.
Dhuk.jpg
आमच्या मनात आणि कॅमेऱ्यामधे ही छबी सामावून आम्ही पानशेतच्या दिशेने निघालो. थोडीफार मजल मारली असेल नसेल आणि भुकेची जाणीव झाली. मग काय, आंबी फाटा मागे टाकून आम्ही थेट पानशेत गाठल. गावातच गरमागरम पोहे, आम्लेट आणि वाफाळलेला चहा मारुन थोड मागे येउन अम्बी फाट्याला आतमध्ये वळलो. एका लहानश्या घाटाच्या उतरंडीवरून छोट्याश्या खिंडीतून पुढे येउन गुंजवणे dam backwater पाशी आलो.
Back wAter.jpg
8-8:30 वाजले होते तशा तुरळक प्रमाणात गावातल्या स्प्लेनडर आणि बुलेट्स दिसायला लागल्या. मधेच एखादा ट्रॅक्टर अडखळत अडखळत वळणा-वळणाने दूरवर जात दिसेनासा होत होता. तो संपूर्ण परिसर हिरवट-तांबस रंगाच्या गवताने अच्छादुन गेला होता. गवताच्या शेंड्यावरचे सफेद रेशमी तुरे वाऱ्यावर डोलत होते आणि सोनसकाळी नाजूक कीरणे त्यावर पडून ते सोनेरी भासत होते. मधेच येणार्या वाऱ्याच्या झुळकेने गवातावर एक सोनेरी लकेर उमटून लगेच लुप्त होत होती.
Gavat.jpg
समोरच निळ्याशार पाण्यात स्थलांतरित बदके सकाळी सकाळी आपापल्या पिल्लाना घेऊन मासेमारी करत होती. मधेच एखादा कोतवाल पाण्याच्या पृष्ठाभागाला समांतर उडत माशाचा माग काढायचा तर समोरच नेम धरून खंड्याचा बाण कुठेतरी सपकन पाण्यात घुसत होता. लहान लहान लार्क जातीचे तुरेवाले चिमणी एवढे पक्षी आमची चाहून लागून भुरर्दशी शेजारच्या गावातून उडायचे आणि पलीकडे गावतात गायब व्हायचे . दूरवर एक ग्रे हेरॉन तपश्चर्या करत पाण्यात पाय रोवून उभा होता तर थोडासा लांब एका टेकाडाच्या उतरंडीवर चरणार्या गुरांच्या गळ्यातील घन्टाची मधुर किणकिण या चित्रपटाला सुमधुर पार्श्वसंगीत देत होती.
थोडे फोटो काढून आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो. तिथे शेतकरी आपापल्या गुराना चारा वैरण करून आंघोळ घालत होते. गायी-म्हशी बैल मनसोक्त पाण्यात डुंबत होते आणि शेतकरी आपल्या हाताने त्यांच्या अंगावर पाणी उडवून त्याना घासून पुसून स्वच्छ करायच्या मागे होते. बाकीची गुरे कोवळ्या हिरव्या गवतावर चरत होती आणि त्यांच्या पायाशी आश्रयाला अलेले डझन भर बगळे इकडेतिकडे उडणार्या किड्यांवर ताव मारत होते. आम्ही फोटो काढावेत म्हणून थोडे जवळ गेलो आणि सगळे एकसाथ उडून आमच्या डोक्यावरून पलीकडे जाऊन बसले.
Bail.jpgBirds.jpg
तिथेच गवतावर आम्ही बराच वेळ शांत बसून होतो. खर तर पुढे कादवे घाटात जायची खुप इच्छा होती पण वेळ कमी होता म्हणून थोडे फोटो काढुन मन शांत झाल्यावरच आम्ही परतीचा रस्ता धरला ....पुढचा कादवे घाट पुन्हा कधीतरी पायाखालून घालायचाच या निश्चयाने!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!!
मस्त फोटो.

कादवे घाट म्हणजे पानशेत, वरसगाव घरणाच्या जवळुन एक रस्ता लवासाकडे जातो तो का?
त्या रस्त्याने केलीये भटकंती. अप्रतिम... Happy

सन्दिप पबे घाट बराच अलिकडे आहे. हे ठिकाण कादवे घाटाच्या आधी आहे.
झकासराव तुम्हि म्हणताय तो रस्ता वेगळा आहे आणि तोपण अत्यन्त सुन्दर आहे. पान्शेत च्या अधी आम्बी फाट्याला डावीकडे वळायच आणि तेथुन थेट सरळ कादवे घाटात जाता येत. महाराजानी सुरतेची लूट याच मार्गाने स्वराज्यात आणली होती अस मी आन्तरजालावर वाचल Happy त्याबद्दल पुढे लिहीनार आहेच !

पान्शेत च्या अधी आम्बी फाट्याला डावीकडे वळायच आणि तेथुन थेट सरळ कादवे घाटात जाता येत>> बाइक घेवुन जाता येइल का?
जाइन म्हणतोय. Happy

पान्शेत च्या अधी आम्बी फाट्याला डावीकडे वळायच आणि तेथुन थेट सरळ कादवे घाटात जाता येत>> गुगल म्पेस वर रस्ता दिसत नाहिये. एक पाबे घाट रस्ता आणि एक तुम्ही गेलेला तो रस्ता ह्याच्या मध्ये नीट रस्ता दिसत नाहिये.

झकासराव, दुचाकि च घेउन ज. खरी मजा त्यातच आहे. गुगल वर हा घाट आणि रस्ता दिसत नाही. त्यापेक्षा खाली दिलेला मार्ग follow करा. आंबी फाट्याला डावीकडे वळलात कि धानप गावाला बगल देउन शिर्केवाडी मार्गे तुम्ही सरळ कादवे घाटात पोचाल. तुमच्य्या प्रवसाकरिता शुभेच्छा !