'अनुमती'च्या निमित्ताने गप्पा अभिनेत्री रिमा यांच्याशी

Submitted by पूनम on 11 June, 2013 - 01:08

एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. १९८० सालच्या ’आक्रोश’, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो'मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे.

रिमा यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असलेला ’अनुमती’ हा पुरस्कारप्राप्त चित्रपट येत्या १४ जूनला प्रदर्शित होत आहे. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे.

’तू तू मैं मैं’ ही रिमा यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधीसरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्या एका मोठ्या कालावधीनंतर ’तुझं माझं जमेना’ या नवीन मराठमोळ्या मालिकेमधून नुकत्याच आपल्या भेटीला आल्या आहेत. सासू-सून संबंधांवर असूनही या मालिकेचं वेगळेपण अगदी तिच्या सेट्सपासूनच आपल्या मनात ठसतं.

Reema.jpg

'अनुमती'च्या प्रदर्शनाचं औचित्य साधून रिमाजींशी गप्पा मारायची संधी मिळाली. त्यांच्या सेटवरच त्यांनी भेटायला बोलावलं. अतिशय ज्येष्ठ कलाकार असूनही त्यांनी साधेपणा जपलेला आहे. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

एका ज्येष्ठ अभिनेत्रीशी झालेला हा संवाद...

’अनुमती’ आता लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल थोडं सांगाल का?

आत्ताच्या काळात दूरचित्रवाणी मालिकांनी लोकांचा मेंदू बधीर करून टाकलेला आहे. प्रेक्षकांना सतत एक इन्जेक्शन द्यायला लागतं, असा एक ठाम समज करून घेतलेला आहे मालिका तयार करणार्‍यांनी. त्यामुळे मालिकांमध्ये नको तितकं ’नाटकीकरण’ सुरू आहे. त्यासाठी इतक्या खोट्या, कचकड्याच्या गोष्टी आणल्या जातात त्या कथेमध्ये की सगळं भडक होत जातं. या सगळ्यांपेक्षा वेगळी, हटके असलेली साधीसरळ गोष्ट, एका मध्यमवर्गीय माणसाची आहे ’अनुमती’मध्ये आणि मला या कथेतलं साधेपण आवडलं. मुळात ती गोष्ट मला मनापासून आवडली होती. त्या माणसाचा सगळा प्रवास आणि बायकोवरच्या आत्यंतिक प्रेमापोटी होणारी त्याची तडफड, याची ही गोष्ट आहे. त्याला पैसे उभे करायचे आहेत, पण ते तो उभे करू शकत नाहीये. आणि आत्ताच्या काळातला माणूस असूनही त्याला व्यवहारज्ञान नाहीये - असं असणं हा म्हटलं तर एक मोठा तोटा आहे. पण तो माणूस तसाच आहे. या कथेमध्ये कोणी व्हिलन नाहीये. असं असतानासुद्धा ती गोष्ट एका अत्यंत उत्कट भावनेची होते. एका नवर्‍याचं आपल्या बायकोवर असलेलं प्रेम आणि त्यासाठी करावी लागणारी विलक्षण धडपड असा तो प्रवास आहे. हे कथेचे साधेपणाचे सगळे मुद्दे मला आवडले.

पण जी व्यक्ती अंथरुणाला खिळलेली आहे आणि जिच्या जगण्याची काहीही शक्यता नाही, तिच्यासाठी इतकी धडपड करावी का?

अशी धडपड असतेच. ज्या व्यक्तीवर आपलं आत्यंतिक प्रेम आहे, तिच्यासाठी कोणीही माणूस असंच करेल आणि करायलाच पाहिजे. त्यामुळे मला ती कथा पटली मुळात. पण या भावनेचंच लोकांना आश्चर्य वाटतं इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. आपण बदललो आहोत फार, अति प्रॅक्टिकल झालो आहोत. मला वाईट वाटतं याचं.

या चित्रपटातल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगाल?

या प्रवासामध्ये त्या अगतिक माणसाची जी बालमैत्रिण आहे, तिची व्यक्तीरेखा मी साकारली आहे. या मैत्रिणीशी आपलं लग्न व्हावं, अशी कधीकाळी त्याची इच्छा असते. पण ते तसं कधीच होत नाही, कारण तिच्या बाजूनं काहीच नसतं. आणि ती त्याची बालमैत्रिण असल्यामुळे त्यांची दोघांचीही आपापली लग्न होईपर्यंत एक चांगला काळ त्यांनी एकत्र घालवलेला असतो एकमेकांबरोबर. त्यांचा एक छान ग्रूप असतो. त्याची इच्छाही तिला माहित असते, पण तो कधीही मर्यादा ओलांडत नाही. आणि त्या एका वळणावर ती येते त्याच्या आयुष्यात. तो तिच्या घरी येतो पैसे मागायला, पण मागू शकत नाही. पण तिला कळते त्याची अवस्था त्याची रिकामी झोळी बघून. हे सगळं गजेंद्रनं (अहिरे) कथेमधून आणि दिग्दर्शनामधून इतकं सुंदर मांडलं आहे. या कथेमध्ये माझ्या व्यक्तिरेखेची मांडणी फार सुरेख आहे.

anu4.jpg

’अनुमती’च्या निमित्तानं गोविंद निहलाणींबरोबरही तुम्ही अनेक वर्षांनी काम केलंत..

हो. श्याम बेनेगलांच्या ’कलयुग’नंतर गोविंदबरोबर आत्ताच काम केलं. आमच्या दृष्टीनं गोविंदनं आमच्या चित्रपटासाठी काम करायला होकार देणं, हीच एक खूप मोठी गोष्ट होती. त्यानं किती देखणं छायांकन केलं आहे, ते तुम्हांला चित्रपटात दिसेलच. गोविंदमुळे एकूण चित्रपटालाच एक ठेहराव आला. प्रत्येक फ्रेमचा अर्थ काय आहे, ही फ्रेम अशी का आहे, या गोष्टी कळल्या की खूप फरक पडतो. रांगोळी जशी ठिपक्याठिपक्यांतून चांगली रेखली जाते ना, तसं झालं गोविंदमुळे. खूप मदत झाली आम्हांला त्याची. हल्ली आठ-दहा दिवसांत भराभरा चित्रीकरणं संपवून टाकतात त्या चित्रपटांचं मला अप्रूप वाटतं.

विक्रम गोखल्यांना ’अनुमती’साठी उत्कृष्ट अभिनेत्याचं राष्ट्रीय पारितोषक मिळालं, याबद्दल काय सांगाल?

मी आणि विक्रमनं चित्रपट नाहीच केलेत जवळजवळ एकत्र फारसे. त्यामुळे अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणं, हा एक वेगळाच अनुभव होता. चित्रपटाच्या ट्रायल शोनंतरच मी विक्रमला म्हटलं होतं की, विक्रम आतातरी या सिनेमासाठी तुला कोणतातरी मोठ्ठा पुरस्कार मिळायलाच हवा. त्यामुळे राष्ट्रीय पारितोषक जेव्हा त्याला जाहीर झालं, तेव्हा मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, त्याचा हक्कच होता तो. खरंतर विक्रमची कारकीर्द बघता, उशीरच झाला आहे हा पुरस्कार मिळायला. विक्रमनं अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत, पण त्यांची दखल घेतली गेली नाही. आमच्या पिढीचे सर्व, आम्ही तसे लो-प्रोफाईल नट आहोत. आम्ही बक्षिसं मॅनेज करणार्‍यांपैकी नाही. त्यामुळेच मला या पुरस्काराचं जास्त कौतुक वाटतं. सन्मानानं त्याला देण्यात आलेलं पारितोषक आहे हे.

राष्ट्रीय पारितोषक मिळण्यासाठी विक्रम गोखल्यांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याला इतका वेळ का लागावा? आपण कुठे कमी पडतो का राष्ट्रीय पातळीवर?

आताचे दिवस असे आहेत, की आपण सतत इतरांच्या नजरेत कसे राहू, हे बघावं लागतं. त्यात आम्ही कमी पडत असू कदाचित. आता असं आहे, की शिंक आली तरी ती फेसबुकवर जायला पाहिजे, त्याबद्दल ट्वीट करायला पाहिजे, त्यावर ब्लॉग लिहिला पाहिजे. आम्हांला ते जमत नाही अजून, त्यामुळे आम्ही मागे पडत असू. पण मला हे काही न करताही महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार मिळाला. मग असं वाटतं, की आपण योग्य मार्गावर आहोत. किमान आम्हांला रात्रीची शांत झोपतरी लागते. हे पुरस्कार वगैरे मॅनेज करण्यात जी शक्ती लागते, त्यानं मन:शांती नाहीशी होते. त्यापेक्षा मग असं वाटतं, की आपलं हे चालू आहे तो मार्ग योग्य आहे. दिल्लीची पारितोषकांची नामांकनं करणारी, ते जाहीर करणारी ती लॉबीच वेगळी आहे. त्यांची विचारसरणी, संस्कृती सगळंच वेगळं आहे महाराष्ट्रापेक्षा. त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणं हे आमच्या पिढीच्या कलाकारांना नाही जमत.

पण मग पुरस्कार मिळायचा कधीकधी राहूनच जातो, किंवा खूप उशिरा मिळतो..

पुरस्कार नाही मिळाला तर अडत काहीच नाही. तुमचं आयुष्य चालू राहतं, तुम्ही चांगल्या भूमिका करत असताच. पण तरीसुद्धा अभिनेता म्हटल्यानंतर वयाच्या या विशिष्ट वळणावर जर असे पुरस्कार आपण होऊन दिले गेले, तर कृतार्थता येते ना अभिनेत्याच्या आयुष्यात. एक समाधान तर मिळतं, की आपण इतकी वर्ष काम केलं, त्याचं चीज झालं.. किमान सल तरी नाही राहत. काम तर चालू असतंच, मरेपर्यंत आम्ही अभिनयच करणार. लोकांचं प्रेम मिळतं, ज्यामुळे आम्हांला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. आताच्या काळात बाजारीकरण झालंय बक्षिसांचंसुद्धा.. उठसूठ काहीतरी इव्हेंट करतात आणि त्यात बक्षिसं देतात. त्यात काही स्वारस्य नाही वाटत मला. पण हे जे वर्षानुवर्षं दिले गेलेले मानाचे पुरस्कार आहेत, ते मिळणं मला वैयक्तिकरीत्या महत्त्वाचं वाटतं.

या बक्षीससमारंभांबद्दल आपलं मत काय आहे?

खरंच कोणीही येतं आणि पुरस्कार देतं आजकाल. मला तर त्यामागचं गणितच कळत नाही. मी तर अशा समारंभांना उपस्थितही राहत नाही. बरं, ते पुरस्कार इतक्या चुकीच्या भूमिकांसाठी दिले जातात, की असं वाटतं या भूमिकेसाठी मला का पुरस्कार देताय? नको, नको. हे चुकीचं आहे. माझ्या बाबतीत हे होतं आणि तो पुरस्कार मी नाकारते, आणि मग लोकांना वाटतं की मी उद्धट आहे. पण मला असं वाटतं, की मला ज्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळावा असं वाटतं, तिच्यासाठी पुरस्कार मिळाला तर खरं. आणि आपल्याबरोबर इतर मानांकनांच्या नावांची जी रेंज दिसते ना, ती बघून आपण गप्पच होतो. बक्षिसं नक्की कशी निवडतात, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे नक्की, हे लागेबांधे एकदा लक्षात आले, की मग शांत व्हायला होतं. असं वाटतं की नकोच ती बक्षिसं आणि नकोच ते समारंभं.

’अनुमती’सारखे चित्रपट आता चित्रपटमहोत्सवांपुरतेच मर्यादित राहत नाहीत. ते व्यवस्थित प्रदर्शित होतात. मिळालेल्या पुरस्कारांमुळे तर अशा चित्रपटांबद्दल एक उत्सुकता निर्माण होते. याबद्दल काय सांगाल?

आपल्या चित्रपटात आता तो बनवण्याच्या किंवा पटकथेच्या पातळीवर खूपच चांगले बदल होऊ लागले आहेत. एक मधला काळ असा आला, की सपक, विनोदी, फार्सिकल असेच सिनेमे बनत. तो एक प्रवाह अजूनही चालू आहे आणि चालूच राहणार. कारण जेव्हा आपण महाराष्ट्राच्या अंतर्भागात जातो, तेव्हा लोकांपर्यंत पोहोचायला असेच सिनेमे आवश्यक असतात. पण, शहरांतल्या लोकांना बघण्यासाठीही एक वेगळा प्रवाह खुला झालेला आहे, जे महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठीही उत्तम, वेगळे सिनेमे बनायला लागले आहेत. ’जोगवा’, ’बालक पालक’सारखे वेगळे सिनेमे आज बनत आहेत. एक बुद्धीजीवी वर्ग आहे शहरात ज्याला उत्तम कथानक, उत्तम अभिनय असलेले चित्रपट बघायला आवडतात, त्यांच्यासाठी असे सिनेमे बनत आहेत, हे फार चांगलं आहे. आणि मी अजून सक्रिय आहे, अशा सिनेम्यांत काम करू शकते, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.

anu32.jpg

’तुझं माझं जमेना’ या मराठी मालिकेतून तुम्ही अनेक वर्षांनी टीव्हीवर दिसायला लागलात. इतकी मोठी विश्रांती घ्यायचं काही खास कारण होतं का?

मराठी मालिकांमधून मध्यमवर्ग नाहीसाच झालेला आहे. बासूदा, हृषिदा, सई यांच्या चित्रपटांमधून मध्यमवर्ग दिसायचा. आता या वर्गासाठी टीव्हीवर काही नसतंच. अतिरंजित विषय आहेत सगळे. प्रत्येक मालिकेत सगळे बडे उद्योगसम्राट आहेत, ज्यांच्याशी साधा प्रेक्षक कनेक्टच होऊ शकत नाही. अशा पार्श्वभूमीवर ही मालिका माझ्याकडे आली. साधी, सरळ गोष्ट आहे, या मालिकेतली माणसं हाडामासाची आहेत, त्यांच्यात सर्व स्वभाव दडलेले आहेत- मत्सर आहे, राग आहे, आनंद आहे आणि तरीसुद्धा सर्व पात्रांमध्ये एक सुसंस्कृतता आहे. अशी एक ताणतणावविरहित, अतिरंजित नसलेली मालिका आम्ही करतोय. माझी व्यक्तिरेखा म्हणजे एक साधी, निवृत्त हेडमास्तरीण बाई, जिला विनोदाचं अंगं आहे, जिला स्वत:च्या आशा-अपेक्षाही आहेतच सूनेबद्दल. पण स्वत:ला मोल्ड करण्याची ताकदही तिच्या संस्कारांनी तिला दिली आहे. हे बारिकसारिक कंगोरे दाखवायला आम्हांलाही बरं वाटतं. अशा भूमिका मिळतच नाहीयेत सध्या करायला. कटकारस्थानं मालिकांमध्ये इतकी वाढली आहेत ना, की मला भीती वाटते कधीकधी.

जर असं कळलं, की ही मालिका अगदी गोडगोड होते आहे, आणि ती सनसनाटी बनवण्यासाठी, किंवा टीआरपी वाढवण्यासाठी या मालिकेमध्ये नको त्या गोष्टी आणाव्या लागणार आहेत, तर काय वाटेल?

वाईट वाटेल. कारण मग तो उद्देशच हरवतो ना कामाचा. पण मला नाही वाटत असं होईल, कारण महेश (मांजरेकर) स्वत: लक्ष घालतो आहे यात. शिवाय मालिका अजून चारेक महिनेच चालणार आहे. वर्षानुवर्षं चालणार्‍या मालिकांमध्ये मला काम करायचं नाहीये. पण सव्वाशे भागांची, सहाच महिने चालणारी ही मालिका आहे, त्यामुळे ती आहे त्याच ट्रॅकवर राहील. वर्षानुवर्षं चालणार्‍या मालिकांचा तो प्रॉब्लेम होतो. त्यांना मालिका चालवण्यासाठी त्यात पाणी घालावं लागतं, नवीन ट्रॅक आणावे लागतात आणि मग ती भरकटते. ’तुझं माझं जमेना’ ही चार कुटुंबांची कथा आहे. काय घडतं त्या कुटुंबात?- त्याची गोष्ट. नवीन पिढीला ही आपलीशी वाटेल, अशा पद्धतीचे काही प्रसंग येतील आता पुढे. हिंदी तर सोडाच, पण मराठी मालिकांमध्येही डोक्यावरून पदर घेणार्‍या बायका दाखवतात, किंवा सजवलेल्या बाहुल्या असतात. अशा बायका कुठे दिसतात आता? बरं जुन्या पिढीत तशा बायका असतीलही, पण नवीन मुली? एकीकडे मॉडर्न म्हणवतात, पण विचार अजूनही मागासच आहेत त्यांचे. आजच्या खूनखराबा आणि बदला, अपमान यांतच अडकलेल्या आहेत आणि त्या अत्यंत बेगडी वाटतात.

अनेक मराठी अभिनेते, जे हिंदी-मराठी असं दोन्हीकडे काम करतात, ते असं म्हणतात, की हिंदीमध्ये आम्ही केवळ पोटापाण्यासाठी काम करतो, पण कामाचं समाधान मराठीमध्ये मिळतं. हे खरं आहे का?

हिंदीचा कॅनव्हास खूप मोठा आहे. तो चित्रपट आज जगभरात पोचतो. जगभरातले लोक एका हिंदी सिनेमात गुंतलेले असतात. त्याच वेळी मराठी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेची व्याप्ती त्या मानानं मर्यादित असते. अजूनही मी विचार करते तो मराठीतूनच करते. त्यामुळे या भाषेशी नाळ अगदी घट्ट जुळलेली आहे. त्यातून आपल्याकडे विपुल, समृद्ध साहित्य लिहिलं गेलेलं आहे आणि आपल्याकडे एक उत्तम प्रेक्षकदेखील आहे. मग आपल्याला फक्त त्यांची अभिरुची विकसित करायला हवी आहे, जी आत्ता टीव्ही आणि भयानक हिंदी सिनेम्यांनी बधीर करून टाकलेली आहे. आणि फक्त हिंदीच का? हॉलीवूडमध्येही बहुतांश सिनेमे हे रक्तपातानं भरलेले असतात. त्यांच्याकडेही गोड, रोमॅंटिक चित्रपट बनत असत की. पण आता मारधाडीचेच सिनेमे बनतात. मग किमान आपल्या हातात प्रादेशिक प्रेक्षकांना वेगळं काहीतरी देण्यासारखं उरतं, तो आपण प्रयत्न करायचा.

तुम्ही बरंच निवडक काम करता. मग जेव्हा मनासारखं काम मिळत नाही, त्यावेळी असुरक्षित वाटतं का?

सुदैवानं मला नेहमीच कामं मिळत गेली. आताही अनेक ऑफर येत असतात, पण मी काम माझ्या अटींवरच स्वीकारते. घाण्याच्या बैलाला जुंपावं तसं मला सतत मिळेल ते काम करत राहायला नाही आवडत. मला अधूनमधून कामातून विश्रांती घ्यायला आवडते. लोकांच्या डोळ्यात आपण सतत भरलं पाहिजे, आपल्याला काम मिळत राहावं, म्हणून आपण जे समोर येईल ते ते केलं पाहिजे, हे असं माझ्या बाबतीततरी कधी झालं नाहीये. आणि नाही मिळालं काम तर नाही ना, तो वेळ मी अजून काही करण्यासाठी वापरू शकेन. त्यामुळे मला काम मिळेल की नाही, असा विचारच मी कधी करत नाही. जेव्हा येईल तेव्हाचं तेव्हा बघू. असुरक्षितता या शब्दाचं भूत लोकांच्या मानेवर बसलं आहे. हां, आता कधीकधी हेही होतं, की आत्ता काम मिळतंय तर करून घेऊ. पण त्या नादात तुम्ही इतके ओव्हरएक्स्पोज होता, की लोक कंटाळतात तुम्हांला. माझं मत असं, की अधूनमधून थांबणं आवश्यक आहे. त्या ब्रेकमध्ये जगात इतर लोक काय करत आहेत, ते बघा, वाचा, अपडेट करा स्वत:ला. अर्थात, तो एक पंधरा वर्षाचा काळ माझाही होऊन गेला आहे जेव्हा मी प्रचंड काम केलं. पण आता नाही. आता मनासारखं काम मिळेपर्यंत मी ब्रेक घेते. ’तू तू मैं मै’नंतर मी मालिकाही नाही केली, कारण विषयही चांगला नव्हता. आता ’तुझं माझं जमेना’ ही मालिका माझ्या पिंडाला साजेशी आहे, सगळी आपलीच लोकं आहेत, त्यामुळे मला मस्त मजा येतेय.

जेव्हा आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा अतिशय दुर्दैवी अपघात झाला, तेव्हा अशी चर्चा होती, की या इण्डस्ट्रीत टिकून रहायचं असेल, तर भयंकर धावपळ, अति काम, रात्रीबेरात्री प्रवास हे सगळं करावंच लागतं..

देवाच्या कृपेनं मला भूमिका मिळत गेल्या. पण आता इतका प्रचंड बदल झालेला दिसतोय... ही नवीन मुलं मुंबईत येतात. मुंबईमधले आणि जिथे त्यांचं कुटुंब असेल तिथले - असे दोन्हीकडचे खर्च भागवायचे म्हणजे त्यांना दुप्पट काम करणं भागच आहे. घरं, घराचे हप्ते, यायला-जायला सोपं पडावं म्हणून कार, मुलांचे खर्च - हे सगळं जुळवायचं म्हणजे अधिकाधिक काम करावं लागतं. एक दुष्टचक्र झालेलं आहे, ज्यात सगळेच कलाकार अडकले आहेत, त्यामुळे मग उरापोटी काम करावं लागतं. सगळ्यांना माहीत आहे, की नक्की समस्या काय आहे, पण ती एक व्यवस्था झालेली आहे, ज्यातून बाहेर पडण्याचा कोणाला काही मार्ग सापडत नाहीये. टेलिव्हिजनवर काम करणारे लोक इतके गुणी आहेत. मला प्रश्न पडतो, की ते जे काम करतात, ते ते मनापासून एन्जॉय किती करत असतील आणि अपरिहार्य आहे म्हणून किती करत असतील? मी हेमांगी कवीचं उदाहरण देईन. मी तिचं विनोदी मालिकांमधलं काम पाहिलं आहे, आणि मी तिचं नवीन नाटक ’ठष्ट’ही पाहिलं आहे. काय रेंज आहे त्या मुलीची! मी थक्क झाले पाहून. तिला खरंतर टीव्हीवर फार्सिकल करायची काहीच गरज नाहीये. पण तिला हे करावं लागतं कारण तिला जर या इंडस्ट्रीत टिकून राहायचं असेल, तर ती लोकांना सतत दिसत राहायला हवी. स्पर्धा इतकी आहे, की आपण सतत दिसत राहायला हवं, कारण तुम्ही नसाल, तर तुमची जागा घ्यायला अजून दहाजण तयार आहेत. व्यवस्थेचे बळी आहेत ते. इतकं विचित्र झालेलं आहे सगळं...

आणि नुसतंच कलाक्षेत्र का? हा जो सध्या स्पॉट फिक्सिंगचा खेळ चालू आहे, ते काय आहे? पन्नास लाख, साठ लाख हे आकडे कोणालाही भुरळ घालू शकणारे आहेत. त्यांना स्वत:च्या कामाची खात्री नाही, आत्मविश्वास नाही, की ते जे काम करत आहेत त्यात ते उत्तम आहेत. आणखी एक म्हणजे इथे इतके मोठ्ठाले स्टेक्स आहेत.. मिळाला की इतका पटकन एवढा पैसा मिळतो, की पोरांची डोकी फिरतात. कॉल सेंटरमधली मुलं घ्या. इतका पैसा मिळतो, की मग त्या विशिष्ट जीवनशैलीची सवय लागते, चटक लागते आणि ती जीवनशैली कायम टिकवण्यासाठी मग मिळेल ते काम करावं लागतं.

तुमच्यासारखे ज्येष्ट अभिनेते काम करत असले, की सेटवर बाकीचे लोक थोडे दडपणाखाली वावरतात का?

मला सेटवर आनंदी वातावरण आवडतं. चांगले सिनेमे किंवा चांगल्या मालिकांच्या सेटवरही आनंदी, कंफर्टेबल वातावरण असलं ना, तर ते पडद्यावरही दिसतं. हे एका घरासारखं असतं.. मनात आनंद असेल तर ते कुटुंब सुखी असतं. त्यामुळे मी मुद्दाम माझ्या सहकलाकारांबरोबर, स्पॉट बॉईजबरोबर मिसळते, जो जेवण देतो त्याच्याशी गप्पा मारते. एका कुटुंबासारखं वातावरण तयार होतं. सेटवर तुम्ही सहा महिने एकत्र असणार. अशा वेळी छान खेळीमेळीचं वातावरण असेल ना, तर वेळही चांगला जातो आणि त्याचा परिणाम तुम्हांला पडद्यावर चांगला दिसतो. आणि नवीन मुलामुलींबरोबर मी खूपच कम्फर्टेबल असते, कारण मलाही एक मुलगी आहे जी साधारण याच वयाची आहे. त्यांच्या गप्पा मला आवडतात, मला मजाही येते खूप.

हिंदीत त्याच त्याच प्रकारच्या भूमिका मिळाल्यामुळे काम थांबवलं आहे का?

काम थांबवलं असं नाही. पण तेच तेच रोल आपण किती वर्षं करणार? ते एका लाटेसारखं असतं. तिच्याबरोबर आपण वर वर जातो आणि खालीही येतो. पण न जाणो आपल्याला एखादा वेगळा रोलही मिळून जायचा, म्हणून सध्या थांबले आहे. मला काय काम मिळेल पुढे, मिळेलही की नाही, असा विचार मी करत नाही. त्यापेक्षा मी स्वत:ला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवायचा प्रयत्न करते. कारण संधी अशी पटकन येते. मग असं होऊ नये, की संधी यावी समोर आणि आपल्याला ती घेता येऊ नये.

तुम्ही नाटकंही अनेक केली आहेत.. इतक्यातच तुम्ही ’सासू माझी ढांसू’ मध्ये दिसलात. इतक्यात एखाद्या नाटकात काम करण्याची योजना आहे का?

स्पष्ट सांगायचं, तर चांगली नाटकं सध्या नाही मिळत. ’सासू माझी ढांसू’ हे एक ग्रेट नाटक वगैरे नाहीये. पण मी ते केलं कारण असा विषय मी कधी केला नव्हता, आणि दुसरं कारण म्हणजे प्रशांत (दामले). काशीनाथ घाणेकरांनंतर प्रशांत एकमेव असा अभिनेता आहे की ज्याच्या मागे प्रचंड चाहतावर्ग आहे आहे. त्याच्या एका नावावर प्रयोग हाऊसफुल्ल होतात. पण अक्षय (पेंडसे) गेल्यामुळे आम्ही ते नाटकच बंद केलं. नाटकांसाठी मी अजूनही तयार आहे. पण नाही मिळत आहेत चांगल्या संहिता हेही आहेच.

नाटकाचे दौरे वगैरे करायची तुमची तयारी असते का?

दौर्‍यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण आता मीही माझ्या अटींवर काम करते. अंतर्गत भागांमध्ये नाट्यगृहांची अवस्था खूप वाईट आहे. सांगलीला ’नाटकाची पंढरी’ वगैरे म्हणतात, पण नाट्यगृहांची व्यवस्था भयंकर आहे तिथे! मुंबईपुणेनाशिक वगळता सगळीकडेच गचाळ व्यवस्था असते, आणि लोकही नाही येत नाटकं बघायला. मग माझं म्हणणं, की फक्त कलाकारांनीच जीव टाकायचा का? बरं, तेही करू, पण संहिताच नाही मिळत चांगली. ती मिळाली तर मी अजूनही करेन नाटक. खरंतर मला नाटक करायला आवडतं. वर्षातून एकतरी नाटक करावं, अशी माझी इच्छा असते. नाटक मला जिवंत ठेवतं. स्वत:ला सतत तपासून बघायला मिळतं नाटकामधून. नाटक सतत घडवत असतं तुम्हांला. तुमचे सेन्सेस अजून शाबूत आहेत ना, तुमचे रिफ्लेक्स, प्रतिक्रिया चांगल्या आहेत ना, तुमची स्मरणशक्ती काम करते आहे ना, पाठांतर शाबूत आहे ना, हे फक्त नाटकातून कळतं. म्हणून मला नाटक करणं मनापासून आवडतं.

हे क्षेत्र इतकं बेभरवशाचं आहे, की या क्षेत्रात निखळ मैत्री होऊ शकते का?

होऊ शकते. मी बहिर्मुख नाही. मला अगदीच मोजके मित्र-मैत्रिणी आहेत - या क्षेत्रातले आणि बाहेरचेही. पण होऊ शकते मैत्री. कारण ती मुळात एक देवाणघेवाण आहे. दोघं कसं त्या मैत्रीकडे बघतात, त्यावर ते अवलंबून आहे. स्पर्धा आहे, एकमेकांची कामं मिळवणं वगैरे प्रकार आहेत, पण सर्व टक्केटोणपे खाल्ल्यानंतर जर तुम्ही उरलात एकमेकांसाठी, तर ती खरी मैत्री. पण हे समजायला वयाची पन्नाशी उजाडावी लागते. कारण तोवर बराचसा निचरा झालेला असतो. तेव्हाही उरलात तर आहात तुम्ही मित्र. नाहीतर कामानिमित्त झालेली ओळख असं समजायचं.

आताच्या पिढीप्रमाणे तुम्हीही नेटसॅव्ही, टेकसॅव्ही आहात का?

हो, मी करून घेतलं स्वत:ला. मला वेळ लागला सुरुवातीला. किती ईमेल आयडी लक्षात ठेवायचे, पासवर्ड लक्षात ठेवायचे.. मृण्मयीनं ( माझी मुलगी) तर हात टेकले होते. ती कंटाळली मला शिकवून शिकवून. मग एक दिवस मी जाऊन आयफोनच विकत घेतला आणि मग त्यातलं सर्व शिकले. आता मी निदान फोटो पाठवू शकते, ईमेल वाचू शकते, पाठवू शकते. दिग्दर्शक ज्या पटकथा पाठवतात, त्या फोनवर वाचू शकते. फेसबुक, ट्वीटरवर मी लोकांना फॉलो करते. मोठमोठी चांगली मंडळी कशी एकमेकांना ट्वीट करतात, ते मला वाचायला आवडतं. कामापुरतं मी सगळं शिकले आहे. तंत्रद्न्यानाची ही चांगली बाजूही आहे, जी मला आवडते. मला काही त्यात खोलात शिरायचं नाहीये, पण मी अगदीच अनभिज्ञही नाहीये. सुरुवातीला मला अगदीच अडाणी वाटायचं. ही पोरं बसलेली असत माझ्या शेजारी, पण ती काय बोलत ते कळायचंच नाही. पण आता तसं नाही. आता मीही त्यांच्या बोलण्यात भाग घेऊ शकते. किमान समजू तरी शकते की ते कशाबद्दल बोलत आहेत

तुम्हांला इतर काय छंद आहेत?

अभिनयाव्यतिरिक्त सांगायचं तर कसला छंद असा नाही. हाच छंद आणि हाच व्यवसाय. वाचायला आवडतं, पण या क्षेत्रामुळे ती आवड आता गरज आहे. मला भटकायला मात्र भरपूर आवडतं. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते, मी मुंबईच्या बाहेर पळते. मुंबईत आता काही राहिलेलंच नाही. कारण मुंबईत एक अख्खा दिवस फिरायचं असेल, तर एकतर तुम्हांला कोणत्यातरी मॉलमध्ये जावं लागतं, नाहीतर हॉटेलमध्ये. त्यापेक्षा मुंबईबाहेर पळते मी. काही आवडती ठिकाणं वगैरे अशी नाहीत. पुढच्या महिन्यात मी स्पेनला जात आहे, पण मी अलिबागमध्येही तितकीच खूश असते.

anu1.jpg

***

रिमा यांचं सुरुवातीचं छायाचित्र - पौर्णिमा

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच मुलाखत! खूप आवडली!

बहिर्मुख म्हणजे एक्स्ट्रोवर्ट का? मी पहिल्यांदा वाचला हा शब्द.

फार मस्तं बोलल्यायेत रिमा ताई, खूप आवडल्या गप्पा !
हा 'तुझ माझं जमेना ' सेट वर घेतलाय का फोटो ?
पाहिलं त्यांना आज या साडीत :).

बहिर्मुख म्हणजे एक्स्ट्रोवर्ट का? मी पहिल्यांदा वाचला हा शब्द.
<< मी पण Happy , कॉमन सेन्स ने मीही एक्स्ट्रॉव्हर्ट हाच अर्थ घेतलाय !

सुरेख मुलाखत. एका अप्रतिम अभिनेत्रीची अप्रतिम मुलाखत. .. मस्त प्रश्ण.

मला तिचं ( हो एकेरीच.... कारण आपण हक्काने लता, आशा, किशोर, रफी, नाना, म्हणतोच ना!!!! आवडत्या कलाकारांना जवळकीने आपण एकेरीच संबोधतो) प्रत्येक काम आवडलं आहे. अगदी सलमान आणि ठोकळ्या राहूल रॉय ची आई म्हणुनही..... तिची मुलाखत वाचनात नव्हती.

शेवटी तिनेही मान्य केलं नाटक हे नाटक च........ आपण मराठी प्रेक्षक खरच सुदैवी आहोत. अनेक कसलेले कलाकार , नाटकाच्या माध्यमातुन आपण जवळुन पाहिलेले आहेत. रीमा खुप अपडेट वाटली. तिचं प्रत्येक काम निर्मळ असतं. सध्या तिच्या "तुझं नी माझं जमेना" मधल्या सासूबाईं वर फिदा आहे.....

( रच्यकने.... परवा एका कार्येक्रमाच्या प्रक्षेपणात ती आणि नाना शेजारी बसले होते... अचानक "पुरुष" नाटक आठवलं... अंगावरुन सर्र्कन काटा गेला.....)

ओघवती मुलाखत एकदम....रिमा एक अभिनेत्री म्हणून अत्यंत आवडते आधीपासूनच! आज एक व्यक्ती म्हणून तिच्याबद्दल जाणून घ्यायला मिळालं..मस्त वाटतंय...रिमा समोर बसून नेहमीच्या लकबीने हातवारे करत बोलतेय असंच जाणवत होतं वाचताना Happy

मुलाखत आवडल्याचे कळवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मित्रहो!

रिमाताईंसारख्या ज्येष्ठ कलाकाराला थेट जाऊन भेटणे, त्यांची मुलाखत घेणे ही माझ्यासारख्या सामान्य बाईसाठी खूप मोठी संधी होती. दडपण आले होते. पण त्यांना भेटल्यावर एकदम नाहीसे झाले ते. त्या एकदम 'प्रोफेशनल' वाटल्या. कोणतेही आढेवेढे न घेता मस्त बोलल्या.. त्याचेच प्रतिबिंब मुलाखतीत उतरले आहे.

मुलाखतीसाठी पूर्वतयारी म्हणून सहज गूगलवर त्यांच्याबद्दल बघत होते, तर खरंच आंतरजालावर त्यांच्याबद्दल फारशी काही माहिती नाहीये! आता मात्र 'रिमा' असं सर्च केलं तर ही मुलाखत नक्की दिसेल Happy

अर्थातच हे सर्व शक्य झालं ते मायबोली प्रशासनामुळे आणि त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे. मी त्यांची ऋणी आहे!

ओघवती मुलाखत एकदम....रिमा एक अभिनेत्री म्हणून अत्यंत आवडते आधीपासूनच! आज एक व्यक्ती म्हणून तिच्याबद्दल जाणून घ्यायला मिळालं..मस्त वाटतंय...रिमा समोर बसून नेहमीच्या लकबीने हातवारे करत बोलतेय असंच जाणवत होतं वाचताना
>>>> +१०००
पूनम मस्त गं Happy

अत्यंत सुंदर झाली आहे मुलाखत. अगदी खरीखुरी उत्तरे आणि उत्तम प्रश्नावली. भाषा नितांत सुंदर आहे मुलाखतीतली. शब्दांकन केले की बाईंची शैली भाषा अशीच आहे?

दूरदर्शनवर दिल्ली केंद्रातर्फे काही नाटके सादर होत. एके दिवशी सहज बघता बघता अभिनयाची जुगलबंदी दिसली. नाटक हिंदीत होते पण कलाकार यशवंत दत्त आणि रिमा होते. दोघेही वेगळ्याच गेटप मधे होते.
कथानक माझ्या अंदाजाप्रमाणे अजगर आणि गंधर्व चे भाषांतर होते.
कुणाला आठवतय का ते नाटक ? दोघेच होते त्यात. या दोघांनी मराठीत नाटक केल्याचे आठवत नाही.

रिमा, पुरुष नाटकातली ओरिजीनक "अंबू" नंतर अनेक जणींनी हि भुमिका केली, तरी तिची सर आली नाही.

>>( रच्यकने.... परवा एका कार्येक्रमाच्या प्रक्षेपणात ती आणि नाना शेजारी बसले होते... अचानक "पुरुष" नाटक आठवलं... अंगावरुन सर्र्कन काटा गेला.....)>>

अगदि मीरा का मोहन - माझ्या मनात तर रीमा "नाना आणी मी पुरूष नंतर एकत्र काम केलच नाही, हो ना रे" असं काहीसं म्हणेल की काय असही वाटुन गेलं.

मुलाखत वाचताना, ती ऐकतोय असच वाटत होतं, हेच मुलाखतकाराच यश.

शुभेच्छा !

पौर्णिमा, छान रंगलीये मुलाखत. प्रश्नं अगदी मोजक्या शब्दांत आहेत... पण योग्यं शब्दांत नेमके... अन रिमाची उत्तरं तितकीच सहज... कसलाही अभिनिवेष नाही अशी.
जरूर बघणार हा चित्रपट.
रच्याकने... (बी ने विचारलय वरती)... मुलाखतीत रिमाचे संवाद जसेच्या तसे ठेवलेत की, पौर्णिमा हे तुझं शब्दांकन कौशल्यं?
बाई, खरच असं सहज बोलत असतिल असं वाटतय.

धन्यवाद! धन्यवाद मंडळी Happy

मुलाखत घेताना रिमाताई बर्‍यापैकी असंच बोलल्या आहेत. आपण त्यात फेरफार करू शकत नाही, करूही नयेत असा संकेत आहे. पण मुलाखत ही प्रश्न-उत्तरं अशी छापिल कधीच होऊ शकत नाही. शिवाय बोलण्याच्या ओघात आलेलं सगळंच हे छापलं पाहिजे असं नसतं. त्यामुळे योग्य शब्दांकनही करावं लागतंच Happy

चिनूक्सने ही मुलाखत फाईन-ट्यून केली आहे. त्याचे विशेष आभार!

Pages