'अनुमती'च्या निमित्ताने दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 5 June, 2013 - 15:17

सतत नवनवीन प्रयोग करत दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणार्‍या मराठी दिग्दर्शकांमध्ये श्री. गजेंद्र अहिरे अग्रभागी आहेत. २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' या चित्रपटांपासून कारकिर्दीला सुरुवात करणार्‍या गजेंद्र अहिर्‍यांनी 'सरीवर सरी', 'सैल', 'बयो', 'शेवरी', 'सुंबरान', 'पारध', 'समुद्र' असे उत्तम चित्रपट प्रेक्षकांपुढे सादर केले आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत.

'अनुमती' हा गजेंद्र अहिरे यांचा नवाकोरा चित्रपट येत्या १४ तारखेला महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवले आहेत, अनेक पारितोषिकं पटकावली आहेत.

'अनुमती' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. गजेंद्र अहिरे यांच्याशी साधलेला हा संवाद -

gajendra.jpg

’अनुमती’ची कथा तुम्हांला कशी सुचली?

माझी एक असिस्टंट होती, तिची आजी पडली एकदा पाय घसरून, आणि ती आयसीयुमध्ये होती. आजी आजारी असल्यामुळे मग ती असिस्टंट चित्रीकरणासाठी वगैरे येऊ शकत नव्हती. बरेच दिवस तिची आजी दवाखान्यात होती. मग एकदा जेव्हा ही माझी असिस्टंट भेटली, तेव्हा तिनं सांगितलं की हॉस्पिटलावर त्यांचा पाचेक लाख रुपये खर्च झाला होता तोपर्यंत. मी म्हटलं बापरे... किती डेंजर आहे हे सगळं! तेव्हा ती म्हणाली, असं काही नाही, ती तीनचारदा जाऊन आली आहे आयसीयुमध्ये यापूर्वी. आम्ही यावर हसलो, तशी ती म्हणाली, पण यावेळी माहीत नाही, बहुतेक ती परत येणार नाही. पण तिची आजी आली परत. आनंदाचीच गोष्ट ही, पण ती जे काय हॉस्पिटलाचे अनुभव सांगत होती, आणि झालेल्या खर्चांचे आकडे वाचत होती, ते ऐकून मला वाटलं की किती भीषण आहे हे सगळं! आम्ही त्यावेळी हसत होतो खरं, पण असहायतेतून आलेलं हसू होतं ते. नंतर मी या सार्‍या प्रकाराचा खूप विचार केला, आणि मला एक गोष्ट सुचली. अगोदर ’ब्लॅक ह्युमर’ पडद्यावर दाखवावा, असं वाटत होतं, पण नंतर ’अनुमती’ची पात्रं आपोआप मनात तयार झाली, आणि त्यातूनच ’अनुमती’ची पटकथा मी लिहून काढली.

तुमच्या आजवरच्या बहुतेक सर्वच चित्रपटांमधली पात्रं ही अतिशय खरी वाटतात. ’अनुमती’तली पात्रंही खूप खरी आहेत.

हा माझ्या काम करण्याच्या पद्धतीचाच भाग आहे. वास्तववादी सिनेमा तयार करण्याच्या सवयीतून सिनेम्यातलं पात्रं खरी असायला हवीत, ही जाणीव आपोआप येते. आसपास दिसणारी, आसपास वावरणारी पात्रं मला आवडतात. आपला भोवताल जो आहे, तोच जर (चित्रपटात) उभा राहिला नाही, तर माझा चित्रपट ’फिल्मी’ होईल. ते मला नाही करायचं. चित्रपट असला तरी तो वास्तववादीच असायला हवा. चित्रपटातल्या घटनांवर, पात्रांवर प्रेक्षकांनी विश्वास टाकायला हवा, अशीच माझी धडपड असते. त्यातूनच खरी पात्रं उभी करण्याचा सतत प्रयत्न होत राहतो.

anumati1.jpg

’अनुमती’त विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रिमा, सुबोध भावे, किशोर अभ्यंकर, आनंद अभ्यंकर अशी तगडी पात्रयोजना आहे. चित्रपट लिहितानाच ही पात्रयोजना डोक्यात होती का?

नाही, नाही, असं काहीही झालेलं नाहीये. आधी माझ्या डोक्यात पात्रयोजना वेगळीच होती. ’वेगळी’ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कथा डोक्यात आकार घेत होती, आणि त्यानुसार पात्रयोजना बदलत होती. मग कथा एकदा निश्चित झाल्यावर पात्रयोजनाही लगेच पक्की झाली.

वेगवेगळ्या अभिनयशाळांची, अभिनयाची पार्श्वभूमी असलेली नटमंडळी या चित्रपटात आहेत.

काय आहे माहिती का, ही सगळी नटमंडळी मोठी आहेतच. मला त्यांच्या मोठेपणाविषयी आदर आहेच, पण ही फार गुणी माणसं आहेत मुळात. मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून सेटवर येतो, तेव्हा मी दिग्दर्शक असतो आणि मग माझ्यासाठी समोर सई ताम्हणकर आहे, की विक्रम गोखले आहेत, की रिमाताई आहेत, की अजून कोणी पहिल्यांदाच काम करत असलेली मुलगी आहे, हा फरक नसतो. माझी नटमंडळीही असा फरक करत नाहीत. ते तिथे काम करायला येतात आणि काम करतात, मी तिथे काम करायला येतो आणि मी काम करतो. पॅकअप झाल्यानंतर माझ्यासाठी ही सगळी पुन्हा मोठी माणसं असतात.

वर जी नावं आली आहेत, ती त्यांच्या पात्रांना न्याय देत, तनमन झोकून काम करत असतात. माझं काम हे की, त्यांच्यातले अंगभूत गुण माझ्या चित्रपटासाठी बाहेर काढणं, आणि त्यांचा उपयोग करून घेणं. दिग्दर्शकाचं हेच तर काम असतं. दिग्दर्शन हे काही ठोकळेबाज काम नाहीये, त्याला प्रतिभेची गरज लागते. माझा सिनेमा चांगला करणं, कलाकारांकडून उत्तम काम करून घेणं, हे माझं काम आहे. एखादा नट जर साचेबद्ध काम करत असेल, आणि ते माझ्या पात्राला शोभून दिसत नसेल, तर माझ्या पात्राला योग्य दिसेल, असंच काम मला त्या नटाकडून करवून घेता आलं पाहिजे.

गोविंद निहलाणी यांनी छायालेखन करावं, असं तुम्हांला का वाटलं?

एखाद्या चित्रपटासाठी का होईना, पण गोविंद निहलाणींबरोबर काम कारायचं, हे माझ्या डोक्यात होतं खूप वर्षांपासून आणि ही स्क्रिप्ट लिहून झाल्यावर मला असं वाटलं, की आपण त्यांना या चित्रपटासाठी विचारायला हवं. मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना वाचून दाखवली स्क्रिप्ट. आता हीच पटकथा का, याला उत्तर नाही. मला ही पटकथा त्यांच्यासारख्या थोर छायालेखकासाठी योग्य वाटली. मुद्दा क्षमतेचा नव्हता, त्यांच्या जाणिवांचा, संवेदनशीलतेचा होता. त्यांच्यासारख्या छायालेखकासाठी पटकथाही तितकीच तगडी हवी. मला असं वाटत होतं की, छायालेखकाला चित्रपटातल्या संवेदनशील पात्रांना न्याय देता यायला हवा, त्याला ८५च्या काळातलं वातावरण उभं करता यावं, पण तो चित्रपट मात्र आजचा वाटायला हवा, चित्रीकरण साधं पण अत्यंत संवेदनशील असावं, पण या साधेपणातून येणारा परिणाम मात्र साधा असता कामा नये. हे अवघड साध्य करायला या क्षेत्रातला मोठा माणूसच हवा. म्हणून मी गोविंद निहलाणींना विचारलं.

त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

अप्रतिम. फारच सरळ माणूस. इतका मोठा दिग्दर्शक, पण अतिशय निगर्वी. निहलाणींचा चित्रपटाच्या, आणि सामाजिक परिस्थितीबाबतचाही विचार फार मोठा आहे, आणि तरी ते आणि आपल्या वयाचे होऊन वागतात. खरं म्हणजे निहलाणींचा आवाका किती मोठा, हे सांगायची गरज नाही, अख्ख्या जगाला ते माहीत आहे. व्यक्तिश: मला त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाला. माझ्या कामात त्यांच्याकडून आलेल्या बर्‍याच गोष्टी मला घेता आल्या.

anumati2.jpg

’अनुमती’च्या संगीताची बाजू तुम्ही सांभाळली आहे. संगीत अप्रतिम झालं आहे या चित्रपटाचं. संगीताची बाजू आपणच सांभाळावी, असं का वाटलं?

चित्रपट लिहितानाच चाली डोक्यात तयार झाल्या होत्या, त्यामुळे त्याच चाली वापरायचं ठरलं. त्या चाली त्या त्या प्रसंगाला चपखल बसतात, असं मला वाटलं, आणि मग संगीताची बाजू मीच सांभाळायची, असं ठरवलं.

या चित्रपटात प्राची दुबळ्यांचं जे गाणं आहे, ते अप्रतिम झालं आहे.

त्या गाण्याच्या चांगलं होण्यात नरेंद्र भिडेचा खूप मोठा वाटा आहे. त्यानं जेव्हा चित्रपटाचं पार्श्वसंगीत केलं, त्यावेळी आम्ही हे गाणं केलेलं आहे. त्यामुळे नरेंद्रसारखा प्रगल्भ संगीतकार माझ्याबरोबर त्या गाण्यासाठी होता.

विजया मेहतांना चिं. त्र्यं. खानोलकर एकदा कुठल्याशा ऐतिहासिक नाटकाबद्दल म्हणाले होते की, हे नाटक अश्लील आहे, कारण प्रेक्षकांच्या डोळ्यात बोट खुपसून अश्रू काढले आहेत नाटककारानं. तुमच्या चित्रपटांच्या बाबतीत असं म्हणता येत नाही. भावनांचं प्रदर्शन हे त्या प्रसंगाला बोजड ठरत नाही. तर, चित्रपट लिहिताना किंवा दिग्दर्शन करताना तुम्हांला असं वाटत नाही का की, आपल्याला वास्तववादी चित्रपट तर तयार करायचा आहे, पण प्रेक्षकांच्या ’भावनांना हात घालणं’, त्यांना रडायला लावणं, हे प्रेक्षकांना आवडतं, त्यांना ते हवं असतं, आणि म्हणून आपण तसं करावं?

मुळात मला प्रेक्षकानुनय मान्य नाही. माझ्या सिनेमाला प्रेक्षक लाभणार आहेत, हे मला ठाऊक आहे. प्रेक्षकांना हवी असणारी सर्कस करणारे खूप लोक आहेत ना! मीसुद्धा कशाला त्यांच्यात सामील होऊ? मी सिनेमा माझ्यासाठी करतोय. माझ्यासाठीही नाही, मी सिनेमा या माध्यमासाठीच सिनेमा करतोय. मी केलेला चित्रपट लोक पाहत आहेत ना? त्यांना तो आवडतोय. तू माझे चित्रपट पाहिले आहेस, आणि ते आवडल्याचं तू मला सांगितलं आहेस. मग मी तुझी निराशा का करू? जे तुझ्यासारखे प्रेक्षक आहेत, ज्यांना असा सिनेमा आवडतो, त्यांना मी नाराज करून काय मिळवू? बाकीच्या लोकांचा विचार मी करणार नाही. मला चित्रपटातून काय मांडायचं आहे, हे सगळ्यांत महत्त्वाचं. खूप संघर्ष केला आहे मी त्यासाठी. त्यामुळे मला जे सांगायचं आहे चित्रपटातून तेच मी सांगेन, मग प्रेक्षकांनी ते नाकारलं तरी माझी हरकत नाही.

तुम्ही दिग्दर्शन केलेले बरेच चित्रपट तुम्ही स्वत: लिहिले आहेत. स्वत: लिहिलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणं आणि इतरांच्या पटकथांचं दिग्दर्शन करणं, यांत तुम्हांला फरक जाणवतो का?

नाही, असा फरक मला जाणवत नाही. कारण माझ्या मते, जगातला कुठलाच दिग्दर्शक असा नाही की जो लिहीत नाही. त्याच्या दृष्टीनं त्याचा चित्रपट भलेही कागदावर लिहिलेला नसेल, पण डोक्यात तरी तो लिहिला जातोच. दिग्दर्शन आणि लेखन यांना फार वेगळं करता येत नाही. त्यामुळे जर कुणाची चांगली कथा माझ्याकडे आलीच आणि ती जर माझ्या विचारांशी, तंत्राशी सुसंगत असेल, तर ती मी नक्की दिग्दर्शित करेन.

तुमच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून तुम्ही वेगवेगळे प्रयोग सतत करत आहात. तुमच्यासारखं सातत्यानं चांगलं काम करणारे दिग्दर्शक अनेक वर्षं फार कमी होते. पण गेल्या काही वर्षांत तरुण दिग्दर्शकांनी नवे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. वेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. तर पुढच्या काही वर्षांत मराठी चित्रपतसृष्टीची वाटचाल कशी असेल, असं तुम्हांला वाटतं?

मी आधीही काही ठिकाणी हे सांगितलं आहे, की मला सरळसरळ असं दिसतंय की यापुढे सिनेम्याला भाषाच असणार नाही. एकतर सिनेमा आज ’काळ’ या संकल्पनेच्या कचाट्यातून सुटला आहे. आजच्या तरुण पिढीकडे लॅपटॉप आहे, ब्रॊडबॆंड इंटरनेट कनेक्शन आहे. त्यामुळे त्याला हवा तो सिनेमा उपलब्ध आहे. त्यांना १९४७ सालचा, १९५५ सालचा किंवा अगदी काल प्रदर्शित झालेला असा कुठलाही, जगातल्या कुठल्याही देशात, भाषेत तयार झालेला चित्रपट उपलब्ध आहे. त्यामुळे ’यावर्षी आलेला सिनेमा’ असं काही आता राहिलेलं नाही. दुसरं म्हणजे आजच्या प्रेक्षकाला कोरिअन, जपानी, इराणी, सर्बिअन, मराठी, बंगाली असा कुठलाही चित्रपट पाहता येतो. निवडीला वाव इतका प्रचंड आहे की, ’चला, खूप दिवसांत सिनेमा पाहिला नाही, आज सिनेमा पाहू’ असं म्हटल्यावर मराठी चित्रपटच बघितला जाईल, असं आज घडणं अशक्य आहे. त्यामुळे माझी स्पर्धा आता उमेश कुलकर्णीशी, किंवा सुमित्रा भावे-सुनील सुकथनकरांशी नाही. आमची स्पर्धा आता जगातल्या कुठल्याही दिग्दर्शकाशी आहे. त्यामुळे इथून पुढे चित्रपट या माध्यमाचाच विचार करून पुढे जावं लागणार आहे.

तुम्ही चित्रपटाच्या जागतिक भाषेबद्दल बोललात. याचा अर्थ असा का, की मराठी चित्रपटांमधलं ’मराठीपण’ नाहीसं होऊ शकेल?

नाही, नाही, असं काही नाही. मराठी चित्रपटांचा मराठी मातीशी असलेला संबंध कसा संपेल? आता इतकी वर्षं बाहेरचे प्रभाव होतेच. प्रत्येक दशकातच असे प्रभाव आलेले आहेत. पण मराठी संस्कृती म्हणून जे काही आहे, ते टिकून राहिलं आहेच. हां, आता या संस्कृतीच्या रूपात बदल झाले असतील. गाणी, साहित्य यांत बदल झाले, पण त्यांतला मराठी मातीचा वास टिकून राहिला. ही प्रादेशिकता चित्रपटामध्ये आलीच पाहिजे. उदाहरणार्थ, ’चिल्ड्रन ऑफ हेवन’ हा इराणी चित्रपट जेव्हा आपण बघतो, तेव्हा त्यातली अस्सल इराणी संस्कृती दिसली, तरी तो जगातल्या कुठल्याही देशातल्या प्रेक्षकाला भावेल, हे आपल्याला कळतं. किंवा फार पूर्वी आलेला ’बायसिकल थीफ’ही असाच जागतिक भाषा असलेला चित्रपट आहे. असे चित्रपट मराठीत तयार व्हावेत, हे माझं म्हणणं आहे. आपली संस्कृती सोडा, असं मी म्हणत नाहीये. आपल्या चित्रपटांत आपली संस्कृती दिसलीच पाहिजे. पण हा चित्रपट अशा ताकदीचा हवा, की जगातल्या कुठल्याही कोपर्‍यात तो प्रेक्षकाशी नातं जोडू शकेल.

तुमचे आगामी प्रकल्प कुठले?

आत्ता ’पोस्टकार्ड’ हा चित्रपट पूर्ण केला आहे. मराठीतले चार दिग्दर्शक एकत्र येऊन चार लघुकथांवर आधारित ’बायोस्कोप’ हा चित्रपट तयार करत आहेत. त्यांतली एक कथा माझी आहे. चित्रीकरण झालं आहे तिचं. शिवाय अजून दोनतीन चित्रपटांच्या कथा डोक्यात आहेत.

anumati3.jpg

***

श्री. गजेंद्र अहिरे यांचं छायाचित्र - श्री. विनय शाक्य.

***

टंकलेखन व शब्दांकनसाहाय्य - नंदिनी

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. मस्त आहे मुलाखत.
गजेंद्र अहिरेंचे चित्रपट बघणे हा एक वेगळाच अनुभव असतो. शुभेच्छा!

मुलाखत छानच आहे. चित्रपट बघायलाच हवा.
खानोलकर विजयाबाईंना " अखेरचा सवाल" नाटकाबद्दल तसे बोलले होते. ते कानेटकरांनी लिहिलेले असले तरी ऐतिहासिक नव्हते.