तेथे पाहिजे जातीचे.. भाग-४

Submitted by चिमण on 4 June, 2013 - 06:05

तेथे पाहिजे जातीचे - मागील भाग इथे वाचा.. भाग-१, भाग-२, भाग-३

'आपला क्लायंट, बिग गेट कॉर्पोरेशनबद्दलच्या एका बातमीसंबंधी ही मिटींग आहे. तसं तुम्हाला एचार व अ‍ॅडमिनच्या कृपेने नको ती माहिती नको तेव्हा समजत असतेच, तरी पण मी ही मिटिंग बोलावली आहे कारण त्याचा आपल्या पुढील कामावर मुसळधार परिणाम होणार आहे. तर ती बातमी अशी.. बिग गेट कॉर्पोरेशनला TDH Inc, म्हणजेच Tom Dick and Harry Incorporated टेकओव्हर करतेय.'.. सदाने टीम मिटिंगमधे गौप्यस्फोट केला.

'कुठे?'.. संगिता व्हॉट्सपमधून उठली आणि मिटिंगमधे खसखस पिकली.

'काय कुठे?'.. रागदारी आळवणार्‍याला आर्डी बर्मनचं 'मेरी जाँ मैने कहां' हे भसाड्या आवाजातलं गाणं म्हणायची विनंती केल्यासारखं सदाला वाटलं.

'ओव्हरटेक कुठे?'

'संगिताच्या मूलभूत गरजेत मोबाईल फार वरती आहे. ही बया तर मोबाईल घेऊन अंघोळीला पण जाईल! लग्न झाल्यावर काय होईल हिच्या नवर्‍याचं कुणास ठाऊक!'.. निखिल वैतागून म्हणाला.

'त्याची तुला काळजी नकोय! मी मोबाईल-फ्रेन्डली नवरा करेन!'.. संगिता फणकारली.

'तुकारामांच्या वेळेला पण मोबाईल होते. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' हा अभंग त्याचा पुरावा आहे.'.. अभयने एक फिरत्या मेलमधला विनोद खपवला.

'संगिता, To Let व Too Late मधे जितका फरक आहे तितका ओव्हरटेक व टेकओव्हर मधे आहे!'.. सदा कसाबसा संयम ठेवीत म्हणाला.

'त्यापेक्षा कटलेट आणि लेटकट हे जास्त चांगलं उदाहरण आहे!'.. निखिल पर्फेक्शनिस्ट होण्याची पराकाष्ठा करतो पण त्याला हे माहीत नाही की पर्फेक्शन मिळालं तरी ते न समजण्याइतका पर्फेक्शनिस्ट इम्पर्फेक्ट असतो.

'अय्या, पण मला खरंच ओव्हरटेक ऐकू आलं! तुला येत नाही का कधी चुकीचं ऐकू?'

'संगिता! निखिल! यू बोथ शटप! तुमचं भांडण ऐकायला नंतर मी जमवेन लोक.. तिकीट लावून!'.. सदा ओरडला.

'सॉरी सर!'.. दोघे एकदम म्हणाले.

'सर टेकओव्हर Tom Dick and Harry Incorporated नं केलं काय किंवा तिलोत्तमा दुर्योधन अँड हिरण्यकश्यपू इनकॉर्पोरेटेडनं केलं काय.. त्यामुळे आपल्याला काय फरक पडणारे? स्टुअर्ट तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा दम देऊन गेलाय ना? ऑलरेडी?'.. अभयनं गाडी रुळावर आणायला एक लेटकट मारला.

'सगळं सांगणारे! मधे मधे स्ट्रॅटेजिक ब्रेक घेतले नाहीत तर सगळं सांगणारे! तर TDH ला स्टुअर्टने GSCचं काम काढून घेऊन ते मद्रासच्या एका कंपनीला द्यायला सांगितलंय! GSC म्हणजे कोण बरं संगिता?'.. संगिताचा पुन्हा मोबाईलशी चाललेला चाळा पाहून सदाचा संयम उंच कड्यावर एका हाताने कसंबसं लोंबकळणार्‍या हीरो इतपत झाला.

'आँ! BSC म्हणजे? बॅचलर ऑफ सायन्स ना सर?'.. संगिता गोंधळलेल्या चेहर्‍यानं विचारलं.

'संगिता! तू तो मोबाईल माझ्याकडे दे बरं! काही जगबुडी येणार नाही लगेच! '.. सदानं संगिताचा मोबाईल घेतला आणि म्हणाला.. 'हं, आता सांग.. GSC म्हणजे कोण बरं?'

'सर GSC म्हणजे मला माहिती आहे.. आपलीच कंपनी.. गोंधळे सॉफ्टवेअर कन्सलटन्ट! मघाशी मला चुकून BSC ऐकू आलं.'

'कर्रेक्ट! आता नीट लक्ष दे मी काय सांगतोय त्याच्याकडे! तर TDH ला स्टुअर्टने GSCचं काम काढून घेऊन ते मद्रासच्या एका कंपनीला द्यायला सांगितलंय!'

'का?'.. संगिता.

'का काय? त्याचं असेल काहीतरी साटलोटं त्यांच्याशी!'

'हम्म्म! म्हणूनच तो आमच्या कामाला मुद्दाम शिव्या देत होता तर!'.. संगिताला खुनाच्या खटल्यातून निर्दोष सुटल्याचा आनंद झाला.

'त्याचा काहीही संबंध नाही! तू एका हाताने मोबाईलशी खेळत दुसर्‍या हाताने प्रोग्रॅमिंग करत राहिलीस तर या पुढेही शिव्या खाव्याच लागतील!'.. सदानं तिला जमिनीवर आणला.. इतरांनी पोटभर हसून संमती दर्शवली.

'पण मग आपल्या हातात आता काय आहे?'.. अभय.

'अरे आत्ताच तर वनडे मॅचचा खरा शेवट आलाय. शेवटच्या ५ ओव्हरीत ४७ धावा करायचं आव्हान आहे. शेवटचं प्रोजेक्ट असं करायचं की त्यांना बोटच काय नख ठेवायला पण जागा राहता कामा नये. समजलं? मग मी बघतो TDH कॉन्ट्रॅक्ट कसं कॅन्सल करतो ते!'.. सदानं फुशारकी मारली. अशावेळी सगळ्या मॅनेजरांना वनडे क्रिकेटचच उदाहरण का सुचतं देव जाणे!

'उलट मला असं वाटतंय की शेवटच्या प्रोजेक्टला आपण दुप्पट वेळ लावावा.. म्हणजे नवीन लोकांना घोळात घ्यायला जरा वेळ मिळेल आपल्याला'.. निखिलचा एक चौकटी बाहेरचा विचार.

'अरे त्यांचे कान फुंकायला स्टुअर्ट तिथंच बसलाय. आपलं कोण आहे तिकडे? काम चांगलं आणि वेळेत झालं नाही तर वर्ष घालवलंस तरी त्यांच्या साध्या झाडुवालीला पण घोळात घेता येणार नाही. ते काही नाही. हे प्रोजेक्ट आपण एक महीना आधी संपवायचंच! चार महिन्याचं तीन महिन्यात! ते सुद्धा एकदम पर्फेक्ट!'.. सदाने विझलेल्या टीमला जोशपूर्ण हवा सोडून चेतवायचा प्रयत्न केला.

'कितीही वेळ दिला तरी निखिलला कुणालाही घोळात घेता येणार नाही'.. संगितानं कुठला तरी वचपा काढला.

'काय बुरसटलेली विचारसरणी आहे यांची?'.. मनातल्या मनात निखिल पुटपुटला.. आपल्या विचारांशी इतरांचे विचार जुळले नाही तर खुशाल बुरसटलेली विचारसरणी असा शिक्का मारायला तो कमी नाही करायचा.

'सर, पण आत्ताच आम्ही रोज दहा दहा तास घालतो. अजून किती घालणार?'.. एक अतृप्त आत्मा.

'सर घरी जायला फार रात्र होईल मग!'.. एक 'सातच्या आत घरात' चा आदेश असलेली कन्यका!

'अरे तुम्ही आत्ताच धीर सोडला तर कसं होईल? आपण शनिवार रविवार काम करू. आपल्याला हा एक चान्स मिळालाय तो घ्यायचा. वुई हॅव अ रेप्युटेशन टू प्रोटेक्ट!'

'सर पण आम्हाला घरच्यांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. घरचे चिडचिड करतात. मग आमची पण होते. एचारने वर्क-लाईफ बॅलन्स ठेवू वगैरे सांगितलं.. त्याचं काय?.. त्याला काहीच कशी किंमत देत नाही तुम्ही?'

'जास्ती वेळ हवा असेल तर घड्याळं घ्या दोन तीन'.. अभयनं षटकार ठोकला.

'आयॅम जस्ट डुईंग माय जॉब!'.. कचाट्यात सापडलेल्या हॉलिवुड हीरोसारखा दात विचकत सदा म्हणाला.. 'तुम्हाला काय वाटतं? मी काय फक्त तुम्हाला कामाला लावतो? मला का घर नाही? मला का संसार नाही? मला का पोरंबाळं नाहीत?'.. सदाला अचानक साने गुरुजींनी झपाटलं.

'सर आपल्याला अजून माणसं नाही का घेता येणार?'.. संगितानं प्रथमच सेन्सिबल प्रश्न विचारला.

'हो. तो प्रयत्न चाललाय माझा! आपल्या प्रोजेक्ट मधे एक मॉड्युल आहे.. तीन महिन्याचं काम असलेलं. माझा विचार आहे.. तीन माणसं लावून ते एका महिन्यात संपवायचं!'

'जन्म देण्याचं काम ९ बायका एका महिन्यात करू शकत नाहीत.'.. निखिल मधला पर्फेक्शनिस्ट परत एकदा सरसावला.

'बाय द वे, संगिता! उद्या ३ वाजता TDH मधून डॉन ब्रॅडमन येणार आहे. तू विमानतळावर जा त्यांना आणायला. मी तुला मेल पाठवली आहे त्याबद्दल.'.. सदा निखिलला काही तरी खरमरीत बोलणार होता पण त्यानं स्वतःला आवरलं. आत्ता निखिलला दुखवणं त्याला परवडलं नसतं.
=========================================================

'कसला विचार करतोयस इतका? मला सांग. आपण दोघे मार्ग काढू!'.. जेवायच्या ऐवजी शून्यात बघणार्‍या सदाला रेवतीनं दिलासा दिला.

'अगं! तीन महिन्याचं काम तीन माणसं लावून एका महिन्यात संपवायचंय!'

'एका पोराला जन्माला घालायचं काम ९ बायका एका महिन्यात करू शकत नाहीत ते माहिती आहे नं तुला?'

'तू मार्ग काढते आहेस की डोस पाजते आहेस?'.. सदा पिसाळला.

'ओ सॉरी सॉरी! मग ते काम संपवायला प्रॉब्लेम काय आहे?'

'३ माणसं घ्यायची आहेत!'

'मग घ्यायला प्रॉब्लेम काय आहे?'

'बजेट नाहीये!'

'ओह! मग?'

'ते जाऊ दे! मी पटवेन बॉसला कसतरी! आपण दुसर्‍या विषयावर बोलू... माझ्या एका मित्राशी बोलत होतो मगाशी. त्यांच्या कंपनीला क्वालिटी सर्टिफिकेशन मिळालं ६ महिन्यांपूर्वी! तो म्हणत होता.. बुडत्या कंपनीला क्वालिटीच्या काडीचा काडीचाही आधार मिळत नाही म्हणून!'.. सदानं क्वालिटीवरचा आपला गंभीर संशय व्यक्त केला.

'लगेच कसा परिणाम दिसायला लागेल? घर एकदा स्वच्छ करून भागतं का? परत परत करत रहावं लागतं! यू गॉट टू कीप रनिंग टू स्टे इन द सेम प्लेस!'.. रेवतीनं एक क्लिशे फेकला.

'म्हणजे परत परत सर्टिफिकेशन?'.. सदाला आता 'घी देखा मगर बडगा नहीं देखा' या म्हणीची यथार्थता पटली.

'नाही रे! परत परत सुधारणा! आणि क्वालिटी सर्टिफिकेशन मिळालं म्हणजे कामाची क्वालिटी चांगली असा अर्थ होत नाही!'.. रेवती

'आँ?'

'असं बघ! शाळेला दादोजी कोंडदेवांचं नाव दिल्याने शिवाजी निर्माण होतात का? होतील का?'

'नाही.'

'तसंच आहे हे! क्वालिटी सर्टिफिकेशन म्हणजे काय? तर तुमचं काम तुम्हीच लिहीलेल्या पद्धती प्रमाणे तुम्ही करता.. प्रत्येक काम करायची तुमची पद्धत ठरलेली आहे.. तुमच्याकडे अंदाधुंदी कारभार नाही. वगैरे! वगैरे!'

'आयला! मग मधमाशा आणि मुंग्यांना ताबडतोब मिळेल की! सर्टिफिकेशन!'

'हो, त्यांनी त्यांच्या प्रोसिजर लिहील्या आणि आयएसओकडे अर्ज केला तर...!'

'घरात झाडू मारणे किंवा गाडी धुणे असल्या घोडाछाप, यांत्रिक कामाची प्रोसिजर लिहीता येतील. पण जिथं अक्कल चालवावी लागते, म्हणजे प्रोग्रॅमिंग वगैरे, अशा कामाची काय डोंबल प्रोसिजर लिहीणार?'

'कुठल्याही कामाची प्रोसिजर लिहीता येते'

'कायच्या काय सांगतेस? समजा, मला एक कविता करायची आहे.. सांग प्रोसिजर!'

'त्यात काय विशेष आहे? एक पेन घ्या, एक कागद घ्या आणि लिहा कविता... झाली प्रोसिजर!'

'हॅ! असल्या प्रोसिजर लिहून पाळल्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो म्हणणं म्हणजे माळ घातल्यामुळे दारू सुटते म्हणण्यासारखं आहे. मला एक गोष्ट आठवली यावरून.. एक गणितज्ज्ञ असतो. त्याला विचारतात की तुला एक किटली दिली आहे. चहाची पावडर, दूध, साखर इ. इ. सगळं साहित्य दिलेलं आहे, तर तू चहा कसा करशील?'

'सर, रंभा हँग झाली.'.. फोनवर आलेल्या त्या अभद्र बातमीमुळे सदाच्या लांबलचक कथेचं बोन्साय झालं. नाईलाजाने तो ऑफिसात आला आणि थोड्याच वेळात रघू एका परदेशी बाईला घेऊन आला.

'हॅलो! यू मस्ट बी सडॅ! आयॅम डॉन ब्रॅडमन!'.. परदेशी बाईंनी ओळख करून दिली. सदाच्या चेहर्‍यावर हसू पसरलं. 'अरे वा! संगितानं यावेळेला जमवलेलं तर..' त्यानं विचार केला.

'ओ हॅलो! नाईस टू मीट यू डॉन! काय? प्रवास कसा झाला?'

'प्रवास चांगला झाला. पण तुझा माणूस काही मला भेटला नाही विमानतळावर, मग मी माझी माझीच आले.'

'आँ? भेटला नाही? म्हणजे नक्कीच काही तरी घोटाळा झालाय!'.. सदाचा घसा सहारा वाळवंटातला एक दुष्काळग्रस्त प्रदेश झाला. त्यानं मनातल्या मनात संगिताला शिव्या हासडायला आणि ती ऑफिसात घुसायला एकच गाठ पडली.

'सर! तो माणूस काही सापडला नाही मला!'.. संगिता सदाच्या केबिनमधे घुसत म्हणाली आणि त्या बाईने मागे वळून पाहीलं. तिच्याकडे बघून संगिता ओरडली.. 'ही सटवी इथे कशी घुसली? एकदम फ्रॉड आहे सर ही! विमानतळावर माझ्याजवळ येऊन म्हणते कशी.. 'मी डॉन ब्रॅडमन'. डॉन माणसाचं नाव असतं ना हो? मी काय इतकी माठ वाटले काय हिला? मी सरळ कटवलं मग! मागच्या वेळेसारखा घोटाळा नव्हता करायचा मला!'.. आणि सदा हँग झाला.

'संगिता! D o n, डॉन! हे माणसाचं नाव असतं. D a w n, डॉन! हे 'बाई'माणसाचं नाव असतं! ते स्पेलिंग Dawn आहे गं बाई! मेल नीट वाचली असतीस तर तुला समजलं असतं.'
=========================================================

'मॅडम, मला अर्जंट ३ माणसं घ्यायचीयेत.. सी प्लस प्लस येणारे, ग्रॅज्युएट, हुशार, २ वर्षांचा अनुभव असणारे हवेत. माझ्याकडे सिव्ही पाठवा लगेच.'.. सदाने एचार मॅनेजर प्रिया आगलावेंना साकडं घातलं.

'ओह! ३ माणसं कशासाठी?'.. मॅडमच्या प्रश्नावर सदाच्या डोक्यात एक तिरसट उत्तर चमकलं.. 'मला खांदा द्यायला'

'एक ३ महिन्याचं काम आहे ते मला एका महिन्यात संपवायचंय!'

'आय सी! ते.. अं.. ९ बायकांना एका महिन्यात जन्म देता येत नाही ते माहिती असेलच ना तुला!'

'पण ९ बायका एका महिन्यात ९ बाळं जन्माला घालू शकतात ते तुम्हाला माहिती आहे ना? हा हा हा!'.. सदाच्या डोक्याच्या कुकरची शिट्टी उडाली.

'बरं, बजेट आहे का तुझ्याकडे?'.. त्यावर सदानं अशा काही नजरेनं पाहीलं की मॅडमना लगेचच आपण चुकीचा प्रश्न विचारल्याचं लक्षात आलं... 'रिलॅक्स! रिलॅक्स! मी गंमत करत होते. खरं सांगायचं तर माझ्याकडे माणूसच नाहीये मोकळा! तू असं कर! माझ्याकडे जवळपास पाचेकशे सिव्ही आहेत, पडलेले. त्यातून निवड ना!'

'मीच चाळू होय? ठीक आहे! गरज मला आहे शेवटी!'

'बाय द वे सदा! मला तुझी मदत हवी होती. आम्हाला एक स्किल मेट्रिक्स करायचाय, त्यासाठी तुझं इनपुट महत्वाचं आहे.'

'स्किल मेट्रिक्स?'

'म्हणजे आपल्याला लागणार्‍या स्किल्सची यादी करायची.. जसं सी प्लस प्लस, जावा, डेटाबेस इ. इ. आणि प्रत्येक माणसासाठी एक तक्ता करायचा. त्यात तो प्रत्येक स्किल मधे किती पारंगत आहे ती लेव्हल लिहायची. तसा एकदा बनवला आणि त्यात सगळे बसवले की लोकांनाही कळेल कोण कुणाच्या वर किंवा खाली आहे ते. मग दरवर्षीची काँपेन्सेशनच्या वेळची नाराजी कमी होईल. आणि मार्केटिंगलाही त्याचा उपयोग होईल.'

'ओ मॅडम ते तितकं सोप्पं नाहीये. नुसतं सी प्लस प्लस उत्तम येतं, की चांगलं येतं, की बरं येतं, की येतच नाही, अशी विभागणी करून भागत नाही. उदा. असं बघा. स्वयंपाक चांगला येतो म्हणून भागतं का? व्हेज येतं की नॉन-व्हेज पण येतं? कुठल्या प्रकारचा? पंजाबी की कोल्हापूरी की इटालियन? मासे करता येतात की नाही? असे हजार प्रश्न क्लायंट विचारतात.. कारण त्यांना कोकणी मसाला वापरून हैद्राबादी चिकन घातलेला इटालियन पास्ता करणारा माणूस हवा असतो.'

'हो अगदी १००% मॅच नाही मिळणार! थोडं ट्रेनिंग देऊन.. थोडे सिव्ही टेलर करून.. जमवता येईल की नाही?'
=========================================================

'काय सदा? प्रोजेक्ट कसं चाल्लंय?'.. सीईओ, राकेश पांडे मासिक उलटतपासणी करत होता.

'जोरात चाल्लंय! काल तर एक काम फटकन उडवलं. चार महिन्याचं प्रोजेक्ट तीन महिन्यात गुंडाळायचं आहे ना?'.. सदाने एक आशावादी चित्रं निर्माण केलं. कुठलाही प्रोजेक्ट मॅनेजर कधीही प्रोजेक्ट चांगलंच चाल्लंय असं म्हणतो. नाहीतर आपल्या कुवतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं त्यांना वाटतं.

'गुड! गुड! किती लवकर?'

'१० दिवसांचं काम ९ दिवसात!'

'हम्म! मागच्या मिटिंगला तू म्हणत होतास त्या प्रॉब्लेमचं काय झालं?'

'ओ ते! क्लायंटला काही बदल हवे होते. 'दिलेल्या वेळात ते होणार नाही' म्हणून ठणकावलं त्यांना!'

'का? असा किती वेळ जास्त लागणार होता?'

'एक महीना जास्त लागणार होता!'

'पण तू घेतली आहेस ना ३ माणसं जास्त?'

'हो घेऊन एक महीना झाला!'

'मग त्यांनी संपवलं असेल ना ते ३ महिन्यांच काम आत्तापर्यंत?'

'नाही अजून! प्रोजेक्ट मधे थोडी चॅलेंजेस निर्माण झाली आहेत. कुठल्या प्रोजेक्टमधे नसतात?'.. प्रोजेक्ट मधील सर्व भानगडींना चॅलेंजेस म्हणायची पद्धत आहे.

'नाही? मग कधी संपवणार ते?'

'ते तीनही जण फार स्लो आहेत.. सगळ्याच बाबतीत!'

'म्हणजे?'

'त्यांना काही येत नाही! तीन तीन दिवस दिले तरी साधा ४ ओळींचा कोड पाडता येत नाही त्यांना!'

'आँ! इंटरव्ह्यू मधे लक्षात नाही आलं? कुणी घेतले?'

'आम्हीच घेतले. फोनवर! तिघांना इंटरव्ह्यूतले सगळे प्रश्न व्यवस्थित आले.'

'मग?'

'मला आता वाटतंय तिघांचे इंटरव्ह्यू एकाच माणसानं दिले असावेत. कारण तिघांचा आवाज फोनवर सेम येत होता. पण त्यावेळेला घाई होती म्हणून दुर्लक्ष केलं. आणि एचार म्हणालं की आपण आधी त्यांना अपॉइंटमेंट लेटर देऊ. जॉईन झाले की मग हळूहळू बॅकग्राउंड चेक करू.'

'मग?'

'आता बॅकग्राउंड चेक केल्यावर बर्‍याच गोष्टी लक्षात येताहेत.. कुणाचेही मागच्या एम्प्लॉयरचे दिलेले फोन नंबर बरोबर नाहीत. एक लखनौ मधल्या वाण्याच्या दुकानाचा आहे, एक अस्तित्वात नाही, एक लखनौच्या फायर ब्रिगेडला जातो. असे बरेच घोळ आहेत.'

'याला तू थोडे चॅलेंजेस म्हणतोस? ९ बायकांना एका महिन्यात जन्म देता येत नाही हे मी तुला सुरुवातीलाच सांगितलं होतं ना तरी?'

-- भाग -४ समाप्त --

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol , मस्तय !
'आता बॅकग्राउंड चेक केल्यावर बर्‍याच गोष्टी लक्षात येताहेत.. कुणाचेही मागच्या एम्प्लॉयरचे दिलेले फोन नंबर बरोबर नाहीत. एक लखनौ मधल्या वाण्याच्या दुकानाचा आहे, एक अस्तित्वात नाही, एक लखनौच्या फायर ब्रिगेडला जातो. असे बरेच घोळ आहेत.'>>> Lol कोडग्यां बरोबर काम केल्याचा परिणाम