स्वप्नांच्या पलिकडले २
गोपाळ शर्माला ओळखता का? " पाठकजींनी विचारलं.
" . गोपाळ शर्मा….. " .म्हणजे ...तो सोहनलाल कॉलेज मध्ये लेक्चरर होता तोच ना? " मी विचारले.
"अगदी बरोबर ओळखलं तुम्ही !" .....पाठकजी
" पण ....त्याचं तर म्हणे डोकं फिरलं होतं !" मी उद्गारलो
" हो, पण का फिरलं ते ठाऊक आहे का तुम्हाला ?" पाठकजी बोलले.
" नक्की नाही सांगता येणार, पण उडत उडत ऐकलं होतं कि त्याची वाग्दत्त वधू त्याच्या डोळ्यासमोर मरणाच्या दाढेत गेली आणि तो तिला वाचवू शकला नाही , हे त्याला सहन झालं नाही. अतिविचाराने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता.”खरं आहे कां हो ते ? " माझी जिज्ञासा जागृत झाली,
" पण नंतर म्हणे तो नोकरी सोडून कुठेतरी नाहीसाच झाला ! त्याबद्दल तुम्हाला काही ठाउक आहे का ?” मी विचारले
“त्याबद्दल फक्त मलाच ठाऊक आहे. ती एक मोठीच कहाणी आहे ! अतर्क्य, अविश्वसनीय , अशक्य कोटीतली वाटणारी , पण तितकीच खरी ! “ पाठकजी.
"म्हणजे काय ?" न राहवून मी विचारले.
"आणि त्याच्या कहाणीचा तुमच्या इथे येउन लपून रहाण्याशी आणि स्वतः ची ओळख बदलण्याशी काय संबंध ?"
"निव्वळ योगायोगाने मी त्या चमत्कारिक कहाणीचा एक भाग झालो ! आणि हे असं जगण्याची माझ्यावर वेळ आली आहे. पण मला त्याचे वाईट मुळीच वाटत नाही. कुणाचे तरी भले करण्याचे समाधान मला मिळत आहे. माझे जीवन सफल झाल्यासारखे वाटते आहे." पाठकजी म्हणाले,
माझी उत्सुकता शिगेला पोहोचली.
" पाठकजी, असे कोड्यात आणि अर्धवट बोलू नका. सारे काही स्पष्ट सांगा बरं !" मी म्हणालो.
" सांगतो. सर्व काही सांगतो . मलाही मनावरचे ओझे कमी करायचेच आहे. पण तत्पूर्वी मला एक वचन तुम्ही दिले पाहिजे. मी तुम्हाला आता जे सांगेन ते फक्त आपल्या दोघातच राहिले पाहिजे. “ पाठकजी.
" त्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा ! " मी त्यांना भरवसा दिला.
" तुम्हाला आठवतंय का, आपण राजकोट ला शेजारी रहात होतो त्या वेळची ही गोष्ट आहे, वर्तमानपत्रात 'रूप कुन्डा ' बद्दलच्या बातम्या गाजत होत्या. देश विदेशातले अनेक अभ्यासक, संशोधक त्या जागेला भेट देऊन आले होते.”
आणि हजारो मानवी हाडांचे सापळे सापडल्याच्या बातमी मुळे ' रूप कुंड ' ही एकदम प्रसिद्ध झाले होते.
" हो ! चांगलंच आठवतंय की ! त्या ‘रूपकुन्डात’ जे हजारोंनी मानवी हाडांचे सापळे सापडले होते, त्या संदर्भात जितकी माणसे तितक्या कल्पना ! कोणी म्हणे, मुहम्मद तुघलकाने तिबेटवर स्वारी करण्यासाठी सैन्य पाठवलं होतं पण ते म्हणे कुठेतरी नाहीसेच झाले. हे सापळे त्या सैनिकांचेच ! दुसऱ्या एकाच्या म्हणण्यानुसार काश्मीरच्या जोरावर सिंग याची सेना नाहीशी झाली होती , त्या सेनेचीच ती हाडे असणार! आणखी कुणाच्या कल्पनेनुसार यात्रेकरूंची टोळी घसरून पडली असणार !
एकूण काय ,तर नक्की कुणाची हाडे हे कुणालाच सांगता आले नसले तरी त्याबद्दलची मते मात्र
प्रत्येकजण मांडत होता आणि आपलेच खरे असल्याचा दावा करत होता.
“त्यातल्या कुणाचीही कल्पना खरी असो,आपण त्या जागेला भेट द्यावी असे मलाही मनापासून वाटले होते.
आता ते शक्य झाले नाही ही गोष्ट वेगळी !" मी म्हणालो .
"गोपाळ मात्र जाउन आला तिथे. तिथे जायला निघालेल्या लोकांत मेजर खन्ना हेही होते. आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर ते जाणार होते. पुराण वस्तू संशोधन विभागाचे जे
राजकोट चे लोक त्या ग्रुप मध्ये होते त्यापैकी दोघेजण गोपाल चे मित्र होते. त्यांच्या ओळखीने गोपालने स्वतःची व आपल्या प्रेयसीची म्हणजे उषाची वर्णी त्या ग्रुपमध्ये लावून घेतली होती.
गोपाल आणि उषा पुराण वस्तू संशोधनात उपयोगी पडणारे नसले तरी सायन्सचे विध्यार्थी होते ! कदाचित त्यांची काही मदत होऊ शकेल अशा विचाराने त्या दोघाना परवानगी मिळाली होती. सारेजण ‘जोशी मठ’ पर्यंत विनासायास पोहोचले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथल्या कुणालाच 'रूप कुंडा' विषयी काहीच माहिती नव्हती . शेकडो मानवी हाडाच्या सापळ्याचा उल्लेख केल्यावर त्यांचा समज काही वेगळाच झाला. बद्रीनारायणाच्या पुढे दोन दिवसांच्या अंतरावर 'शंकर मोहिनी ' नावाचे सरोवर आहे.
तिथे काही मानवी सांगाडे सापडल्याचे सांगून त्या ठिकाणाचा मार्गस्थानिक लोकांनी सांगितला.
“" हे शंकर मोहिनी कुठे आहे ? मी तर कधीच ऐकलं नाही त्याबद्दल !" मी म्हणालो.
“बरोबरच आहे तुमचं ! बद्रीनारायणाच्या पुढे ' माना ' नावाचं गाव आहे. मानवी वस्ती असलेलं भारताच्या सीमेवरच शेवटचं गाव आहे ते. असे म्हणतात कि पांडवांनी इथूनच स्वर्गारोहण केलं होतं .त्याच्या पुढे कुणीच गेलेलं नाही. तिथून दोन दिवसांच्या अंतरावर ' ‘शंकर मोहिनी’ नावाच सरोवर आहे, आणि ते शापित असल्याची वदंता इथल्या लोकांमध्ये असल्याने तिकडे कोणीच फिरकत नाही.
तर अशा या ' शंकर मोहिनी 'सरोवराच्या च्या दिशेने हे सारे लोक रवाना झाले, सरोवराच्या जवळच त्यांनी आपापले तंबू ठोकले. हे सरोवर म्हणजे दक्षिणोत्तर पसरलेलं लांबट आकाराचे तळेच आहे.
पूर्व आणि पश्चिमेला बर्फाच्छादित पर्वत ! मुळात या तळ्याची लांबी सात आठ किलोमीटर होती , पण भूस्खलनामुळे ते दोन तुकड्यात विभागलं गेलं होतं .पूर्व पश्चिम दोन्ही बाजूनी तळ्यात दगड माती पडून पडून पूल वजा जमीन तयार झालेली होती. जिथे सर्व लोकांनी आपापले तंबू ठोकले होते ती तळ्याची दक्षिण बाजू होती,आणि तिथे पाणी फारसं खोल नव्हतं . त्यात डोकावून पाहिलं असता तुरळक मानवी सांगाडे आणि काही हाडे दिसत होती.
टोळीचा पहिला दिवस स्थिर स्थावर होण्यात गेला. दुसऱ्या दिवशी टोळीचे दोन भाग करून प्राथमिक संशोधन करण्याच्या विचाराने एक विभाग पूर्वेकडे आणि दुसरा विभाग पश्चिमेकडे रवाना झाले, ते सर्वजण तळ्याची पायी प्रदक्षिणा पूर्ण करून संध्याकाळपर्यंत परतणार होते. ते लोक आपापल्या कामाला रवाना झाल्यावर गोपाल आणि उषा फेरफटका मारायला निघाले,. निघतानाच मेजर खन्ना यांनी त्या दोघाना फार दूर जाण्याचा धोका न पत्करण्याचा सल्ला दिला होता. पण अनुपम सृष्टीसौन्दर्य , भावी पतिपत्नी ला मिळालेला एकांत आणि मोहिमेचा उत्साह या सर्वांमुळे त्यांनी ते फारसं मनावर घेतलं नाही.
फिरत फिरत दोघेही तळ्याला विभागणाऱ्या नैसर्गिक पुलापाशी आले. पुलावर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले कि पुढे जायला रस्ता असा नव्हता. मध्ये मध्ये मोठ मोठे दगड पडलेले होते, आणि त्यांच्यावरूनच पुढे जावे लागणार होते. त्यामुळे एका वेळी एकजणच जाऊ शकणार होता . गोपाल पुढे झाला आणि उषा त्याच्या मागोमाग निघाली. काही अंतर कापल्यावर त्यांच्यातलं अंतर वाढलं . एकाएकी गोपाळला उषाची किंकाळी ऐकू आली. गोपाल गरकन वळला आणि पाहू लागला पण त्याला उषा दिसली नाही. काहीतरी पाण्यात पडल्याचा आवाज मात्र ऐकू आला.
आवाजाच्या दिशेने तो तळ्याच्या काठा काठाने धावला पण पाण्यात चाललेल्या धडपडीमुळे पाणी ढवळल जाउन गढूळ झाल्याने नीटसं दिसत नव्हतं . अंधुक अंधुक जे दिसत होतं त्यावरून लक्षात आलं की कोणतातरी प्राणी उषाला पाण्यात खेचत होता. उषा सुटकेसाठी धडपडत होती. गोपाळला पोहोता येत नसल्याने तो पाण्यात उडी मारू शकत नव्हता. तो हतबल होऊन पहात असतानाच धडपड थांबली आणि तो प्राणी उषाला पाण्याखाली ओढत घेऊन गेला.
गोपाल हतबुद्ध होऊन पहातच राहिला. घडलेल्या घटनेचे त्याच्या मेंदूला नीट आकलन व्हायला थोडा वेळ लागला. जेव्हा का घडलेल्या घटनेची त्याला नीट जाणीव झाली तेव्हा मात्र तो आपाद मस्तक हादरून गेला. फिरायला जाताना त्याच्या बरोबर उषा होती आणि परत येताना ती नाही याचे कोणते स्पष्टीकरण आपण देणार आहोत हे त्याला कळेनासे झाले. जे घडले ते नक्की काय आणि कसे घडले ते त्याचे त्यालाच नीट समजले नव्हते तर तो इतराना कसे काय सांगणार होता आणि लोक त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील ? आपल्यावर तिच्या हत्येचा आरोप तर नाही ना ठेवणार ?
आधीच उषा ला वाचवता न आल्यामुळे अपराधाची भावना त्याच्या मनात भरून राहिली होती, त्यात या खुनाच्या आरोपाची भीती त्याच्या मनात दाटून आली. तिथल्या इतर लोकाना माहिती नसलेले एक सत्य त्याला डाचत होते. उषा गर्भवती होती. अशा विचारांच्या गुंत्यात अडकल्यामुळे भीतीने थर थर कापत तो तंबूवर परतला.
संध्याकाळी मेजर आणि इतर लोक परतले तेव्हा त्याने सारी हकीगत सांगितली. त्या घटनेवर साऱ्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अपघाताच्या जागेला भेट देण्याचे ठरले.
ठरल्याप्रमाणे दुसरया दिवशी सारेजण अपघाताच्या जागी गेले .ज्या ठिकाणी ती उभी असताना पाण्यात ओढली गेली त्या ठिकाणाची पहाणी करता सर्वाना तिथे झटापट झाल्या सारख्या खुणा दिसल्या. चिखलात एखाद्या माणसाला ओढत , फरफटत नेल्यासारख्या खुणा होत्या. मेजर खन्ना यांनी गोपालला तातडीने परत जायला, माना गावातील पोलिस ठाण्यात रिपोर्ट लिहावयाला आणि तिथे पोलिस ठाणे नसल्यास बदरीनारायणाच्या पोलिस ठाण्यावर रिपोर्ट करायला सांगितले, याशिवाय राजकोट येथून आलेल्या दोघा सहकाऱ्यांना पण परत पाठवून दिले.
ते ही दोघे इतके घाबरले होते कि यापुढे काम करण्याची त्यांची हिम्मत राहिली नाही.
गोपाल राजकोट ला परतला खरा पण तिथे त्याला उजळ माथ्याने वावरणे कठीण वाटू लागले. आमचे आणि त्याचे घनिष्ठ संबंध होते. भाभीजी उषाची नात्याने लांबची मावशी लागत होत्या. त्यामुळे आमच्याकडे तिचे सारखे जाणे येणे असे. आमच्या घरीच गोपाल ची आणि तिची पहिली भेट झाली होती आणि पुढे प्रेम देखील जमले होते.”
पाठकजी आणि मी दोघे मराठीच आणि त्यातून शेजारी रहाणारे. त्यामुळे गोपाल संबंधी सर्व हकीगत ते मला सविस्तर सांगायचे. गोपालने अतिशय धीराने हा घाव सोसला होता आणि काही काळानंतर पाठक जी यांच्या सांगण्यावरून लग्नाचा विचार करू लागला होता. लग्न झाले कि तो पूर्वीचे सारे विसरेल अशी पाठकजीची खात्री होती.
“" मी देखील गोपाल साठी एक चांगली मुलगी सुचवली होती. " मी एकदम आठवून म्हणालो." तो संबंध जुळून येईल असे वाटतही होते. अचानक गोपालने नकार दिला. काय कारण म्हणून विचारले तर गोपाल तर उडवा उडवी करत होताच पण तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला तर तुम्ही देखील काही समाधानकारक उत्तर दिलं नव्हत ! " मी मनातली नाराजी न लपवता म्हणालो.
" अरे काय सांगायचं , गोपालच्या नकारामुळे आम्ही देखील चिडलो होतो. पण जेव्हा त्याने खरं कारण सांगितलं तेव्हा आम्ही तर चक्रावूनच गेलो. त्याचे चुकते आहे असे म्हणता येईना आणि तुम्हाला कारण सांगता येईना अशी आमची अवस्था झाली !" भाभीजी मध्येच म्हणाल्या.
"म्हणजे ? असं कोणतं कारण होतं की जे तुम्ही सांगू शकत नव्हता ?" मी न राहवून मधेच विचारलं .
" म्हणजे त्याचं असं झालं की-----" पाठकजी घोटाळले .
" काय , काय झालं ? सांगा ना लवकर !" मी उतावीळपणे म्हणालो .
" मी सांगते ," भाभीजी म्हणाल्या.
मी उत्सुकतेने भाभिजिच्या तोंडाकडे पाहू लागलो.
" आदल्याच दिवशी गोपालने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे आम्ही दोघेही त्याच्यावर नाराज होतो. आमच्या समजावण्याचा काहीच उपयोग झाला नाही असे आम्हाला वाटले होते.
जेव्हा तो आमच्या घरी आला तेव्हा दोघांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. इतकी चांगली मुलगी नाकारण्याचे कारण विचारले. तो त्यावर काहीच बोलला नाही. फक्त एक पत्र पुढे केले.
आम्ही उत्सुकतेने पत्र हातात घेतले आणि वाचायला सुरुवात केली आणि आम्हाला घेरीच आली!"
“का बरं ? कोणाचे पत्र होते ते ? " मी विचारले
" पत्र गोपालला आलेलं होतं , त्यामुळे ते वाचावं की नाही असा विचार मनात आला. सहज म्हणून शेवटची सही पाहिली . सही पाहिली आणि मी उडालेच ! पत्र उषाचं होतं !"
क्रमशह
मस्तं! इंटरेस्टिंग वाटत आहे
मस्तं!
इंटरेस्टिंग वाटत आहे गोष्टं!
भाषाही छान प्रवाही आहे.
पुढिल भागांच्या प्रतिक्षेत.
सुरेख. पटापट टायपा.
सुरेख.
पटापट टायपा. पु,ले,शु...
अरे व्वा!!! मस्त झालाय हा पण
अरे व्वा!!!
मस्त झालाय हा पण भाग. हावरटपणाबद्दल क्षमस्व, पण भाग जरा आणखिन मोठे टाका ना!
मस्त मस्त्...सुन्दर झालेत
मस्त मस्त्...सुन्दर झालेत दोन्हि भाग...