गेला कुठेतरी तो साधासुधा जमाना

Submitted by बेफ़िकीर on 2 June, 2013 - 02:20

बरोब्बर चार वर्षापूर्वी रचलेली ही कविता सापडली. मायबोलीकर मित्रांसाठी येथे देत आहे. इतरत्र प्रकाशित केली होती. जुनी आहे, सांभाळून घ्यावेत.

-'बेफिकीर'!
====================

ती पावसात शाळा, तो रेनकोट काळा
पायात बूट ओले, अवतार तो गबाळा
तो वास पुस्तकांचा, ती दप्तरे नवीशी
कंपासही नवासा, शाळा हवीहवीशी
यत्तेत मागच्या जे शेजार व्हायचे ते
वर्गात तेच याही अपुले असायचे ते
पोळी डब्यात साधी, भाजी डब्यात साधी
मित्रांसहीत खाता लागायची समाधी
दंगा, अनेक गप्पा, पैजा,विनोद, थट्टा
प्रेमात शिक्षकांचा साधाच एक रट्टा
रडणे, नवे अबोले, करणे नवीन कट्टी
निरुपाय जाहला की होणे फिरून गट्टी
सोडून जात बाबा, घेण्यास येत आई
हातास चिंच चिकटे, शर्टास नील शाई
अश्रू अता लगडती आतून पापण्यांना
गेला कुठेतरी तो साधासुधा जमाना

साधेच हट्ट सारे, वर्षात एक डोसा
पैसा अपार आता पण वाटतो नकोसा
कपडे नवीन घेण्या उगवायची दिवाळी
साधेसुधे फटाके, पण यायची नव्हाळी
वर्षात एकदा बस सारा फराळ तेव्हा
पण कोण कौतुकाचा बेभान काळ तेव्हा
भाऊ बहीण सारे वर्षात भेटणारे
प्रेमातली उधारी प्रेमात फेडणारे
ती दूर दूर गेली भावंडं आज सारी
फिटते कुठे अताशा त्या काळची उधारी?
काही जबाबदारी ना काळजी कशाची
निर्व्याज, स्वच्छ सारी ती वागणी मनाची
येते कधी उभारी त्या सर्व आठवांना
गेला कुठेतरी तो साधासुधा जमाना

ऐकून वर्गणी मी बोले घरी न काही
सहलीस जायची तर इच्छा भरून वाही
कळता गुपीत, बाबा भलते उदार होणे
ऐकून, दुःख माझे सारे पसार होणे
आल्यावरी घरी मी किस्से कितीक सांगे
दोघे रमून जाती झटक्यात काळ पांगे
पण रद्द जाहलेली ऑफीसबॅग असते
हे सत्य बालपणच्या ध्यानीमनीच नसते
बाबा बजेट सारे सहलीमुळे बदलती
पुढचा पगार पाहे ऑफीसबॅग विरती
स्मरतात काळ सारे फसवून आसवांना
गेला कुठेतरी तो साधासुधा जमाना

छोटीच सायकल पण हप्त्यात घेतलेली
चोवीस एक महिने राबून फेडलेली
विकली जरी मधे ती, नुकसान फार झाले
ते कष्ट, आठवे ती, सारे पसार झाले
कॉलेजच्या युगांची तर आगळी कहाणी
लुनावरून जाणे मैत्रीत गात गाणी
मी वेग घेत होतो, उड्डाण घेत होतो
अन विस्मृतीत सारे वेगात नेत होतो
ते वृद्ध आइ बाबा काही म्हणायचेही
वेगास माझिया त्या बघता खुलायचेही
बोलायचोच नाही मी फारसे अताशा
रोखायचे न मजला तेही तसे अताशा
पण एकदा चुकीने संवाद ऐकला मी
ते वाक्य ऐकले अन चटकाच घेतला मी
कोणी घरात माझ्या होते नवीन आले
भिंतीस थांबलो मी, संवाद आत झाले
"भलतेच थोर तुम्ही" ती माणसे म्हणाली
"परक्यास आप्त करणे ही तर कमाल झाली"
"तुमच्यापरी न कोणी संस्थेस भेटले या"
"भलत्या मुलास तुम्ही तुमच्यात ठेवले या"
"कोणीच घेइना हे पाहून त्या मुलाला"
"जपलेत खूप जैसे, जपती खऱ्या मुलाला"
"आलोत आज आम्ही बक्षीस द्यायला हे"
" काही नको तरीही त्याला कळायला हे"

आधार घेतला मी, पण कंप पावलांना
हातास घाम आला अन धार लोचनांना

झाली बरीच वर्षे, आता कुणीच नाही
पण आठवण जुनी ती गेली कधीच नाही

श्रीमंत आज आहे, पण एकटाच आहे
फोटोत आइ बाबा, मी पोरकाच आहे

पण लाट येत राही या दुःखसागरांना
गेला कुठेतरी तो साधासुधा जमाना

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मराठी कविता समूहाच्या मेळाव्यात सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंत आणि आता तुमच्या सगळ्या वाचायच्या राहून गेलेल्या रचना आता अगदी भारावून वाचतोय. मस्त.

नतमस्तक भुषण राव...अप्रतिम ! एसी क्लास रुम आणि डीजीटल जमान्यातल्या आजच्या मुला॑ना "तो साधासुधा जमाना" खरच कळणार नाही !! Sad

Pages