जरासा

Submitted by मयुरेश साने on 1 June, 2013 - 12:46

कोणत्या बागेतुनी येशी सुवासा
टाकला कुठल्या फुलांनी हा उसासा

रान होते लाख चकव्यांचे तरीही
पाय वाटेचा मला होता दिलासा

दाटते ह्रदयात जे ते ओघळू दे
भार झाला हा अबोल्याने खुलासा

शेवटी हातात उरते एकटेपण
अठवांना पाहिजे तितके तपासा

साद असते ती मला तू घातलेली
दाद घेतो मैफली मधला तुझा सा

काय घडते सांगना ठरल्या प्रमाणे
हाय दैवाचा कसा उलटाच फासा

बरस तू किंवा कधी बरसू नको पण
भाकरीचा देत जा तुकडा जरासा

मी कसा आहे मला ठाऊक नाही
मी जसा आहे तसा दिसतो जरासा

***************** मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे शेर आवडले.

गझलेची तबियत सांभाळणारी गझल असे म्हणावेसे वाटते. काही किरकोळ सुटी मात्र खटकल्या, पण नेव्हर माईंड!

शुभेच्छा!

छान

आवडली गझल
खूप छान वाटते ही वाचल्यावर
पण मला सर्वाधिक "तुझा सा " आवडलाय ज्जाम म्हणजे ज्जामच आवडलाय राव Happy
_____________________________________
अठवणींना<<< आठवांना असे करता येईल बहुधा
रान होते लाख चकव्यांचे जरी<<< २ मात्रा मलातरी कमी वाटल्या चुकत असल्यास क्षमस्व

मतला, दिलासा, तपासा, भाकरी आणि जरासा हे शेर फार आवडले. सुंदर गझल. चकव्यांच्या ओळीत २ मात्रा कमी झाल्या आहेत.

गझल आवडली. धन्यवाद.

साद असते ती मला तू घातलेली
दाद घेतो मैफली मधला तुझा सा

बरस तू किंवा कधी बरसू नको पण
भाकरीचा देत जा तुकडा जरासा

मी कसा आहे मला ठाऊक नाही
मी जसा आहे तसा दिसतो जरासा

>> खतरनाक आहेत तिन्ही !!

वैवकुने सुचवलेलंच सुचवणार होतो......

-------------------------------

बादवे, वेलकम बॅक !!