क.......क.......क......कलियुगाचा पण महिमा आहेच नामाचा .

Submitted by विनायक. दि.पत्की. on 28 May, 2013 - 12:17

||जय श्री राम||
||श्री राम समर्थ||
कलीयुगाचा महिमा

कलीयुग.(कनक).....|कलीयुग.(कांता).........||.कलीयुग..(कीर्ती)...........|||

'मी कर्ता नव्हे' जाणून करी कर्म । त्याला बाधेना कलीचा मार्ग ॥
दुष्ट अभिमानाला न पडावे बळी । त्याचा मालक होईल कलि ॥
कलि जेथे शिरला । त्याने राम दूर केला ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
॥कलि अत्यंत मातला।नीतिकर्तव्याचा विसर पडला॥
अनाचार होत से फार।आता नाही रामावाचून दुजा ठाव॥
चोराने घर फोड केले। मग जागृतीचे कारण नाही उरले॥
म्हणून असावी सावधान वृत्ति। अखंड राखावी भगवंताची स्मृति॥
भगवंतासी अनन्य होता। दु:खाची नाही तेथे वार्ता॥

हा आहे परमपुज्य गोन्दवलेकर महाराजांचा उपदेश आणि ते पुढे म्हणतात कि,

ज्या वेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात, त्या वेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी, भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा.राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी.जय श्री राम .जगी सर्व सुखी असा कोण आहे?विचारी मना तुच शोधून पाहे. जो ज्ञानी आहे तोच म्हणेन राम कर्ता......जय श्री राम .

साधू संतांनी सांगितलेले अध्यात्मातील मुख्य अडथळा म्हणजे क,क,आणी क.
म्हणजे १) कनक २) कांता ३) कीर्ती याचा मोह.
आणी कलीयुगात तर यांचा जोर फारच आहे याची खात्री आपल्याया नित्य नेमाने आपल्या सभोवती येतच असते साधारणतः ज्या दुर्घट्ना जगात घड्तात त्या मागे मोह हाच कारणीभुत असतो व तो हि या तिघाशीच बहुदा निगडीत असतो, तेव्हा कलियुग हा शब्द ऐकुन काहीतरी विचित्र वाटते कधी कधी भीती सुद्धा वाटते आणि याचा अनुभव सतत सभोवती येतच आहे. बहुतांश घरी हीच टूम ऐकू येते कि,
मुले ऐकत नाहीत.शारीरिक मानसिक आर्थिक तणाव वाढतच चालले आहेत.घरात एकमेकांशी (पती-पत्नी /भाऊ-भाऊ/भाऊ-बहीण/बाप-ल्योक अथवा लेक/आई-मुलगा अथवा मुलगी) पटत नाही .म्हणजे (फक्त जगाला दाखवण्यासाठी चेहरा हसता ठेवावयाचा आहे)विचारांची भिन्नता आहे.त्यामुळे मनमानी चालू आहे. मुलांचे/मुलींचे आई बापाच्या मना विरुध्द लग्न करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे .आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचे प्रमाण वाढीस लागले. आहे लहान वयातच नको ती व्यसने लागत आहेत. शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कुणी काही चांगले सांगू लागले तर त्याला नावे ठेवणे. माहित नसतानाही नको त्या गोष्टी चा किस पाडणे.या गोष्टी साठी वेळ खर्च होत आहे.

आता एक जी नवीन टूम निघाली आहे ती म्हणजे वेळ नाही. हे वाक्य लहान सहाना पासून वयोवृद्ध पर्यंत सर्व समावेशक झाले आहे कसे ते खात्री करून घ्या

वेळ नाही|वेळ नाही|| वेळ नाहीच|||
गाह्राणे ऐकतो देव वेळ न वारी
सांगायला वेळ नाही तरी तू तारी||१||
मालिका बघण्यात वेळ कळलाच नाही,
पुस्तकाचा गठ्ठा कोरा,मळलाच नाही||२||
धाब्यावर जेवण मीळेल का नाही?
कारण महाप्रसाद घ्यायची सवयच नाही.||३||
थोड्याश्या दुखाण्यालाही हवे इस्पितळ,
कारण व्यायामाच्या नावानेच सुरु होते मळमळ||४||
गप्पा मारायला हवा मोबाईल उशाला,
ओरडून थकले मायबाप कोरड पडली घशाला||५||
व्यसनी मित्र तो आमचा जिवलग,
उपदेशाला आम्हाला हवेत कशाला नातलग?||६||
पै-पै पैसा तो चैनीला,
उरलाच नाही तो देणगीला ||७||
नशीब आमचे किती हो वाकडे?
आत्मारामाला आम्ही कधी घालावे साकडे||८||
कर्कश्य वाद्याने जरी आम्ही झालो वेडे,
टाळ चिपळ्या वाचून आमचे काय अडे?||९||
शृंगाराला वेळ आता असलाच पाहिजे,
रासायनिक द्रव्याने देह नासलाच पाहिजे||१०||
जर पुढारीच आहे आमचा देव,
मग माय बापाचे आम्हाला कुठले भेव?||११||
विश्व शांतीसाठी आहे उसना आव,
गृह शांतीचा मात्र कडाडला भाव||१२||
(विश्वात शांती हवी असेल तर प्रत्येक घरातून सुरुवात व्हायला हवी)
आमच्या साठी जरी दिवसाचे तास पंचेवीस,
वेळ नाही म्हणून आम्ही पाडणारच किस||१३||
दिमतीला आमच्या जरी नित्य नव्या सोई,
वेळे अभावी त्यातही भासतात गैरसोई ||१४||
घडले काही दैन्य तरी आम्हाला मान्य,
कारण दोषी नव्हे अन्य,आम्ही नियोजनातच शून्य ||१५||
आता तरी देवा सुबुद्धी दे आम्हाला
आयुष्यात सामोरे जाणे नकोच पतनाला ||१६||

दुसरे असे कि,

नीतीमत्ता/ पवित्र नाते ह्या गोष्टी इतिहास जमा होतात कि काय असे रोज च्या वर्तमान पात्रातील बातम्या वाचून वाटते. वर्तमान पात्रात ७० ते ८० टक्के ह्याच गोष्टींचा भरणा असतो.या वरून एवढेच अनुमान लावता येऊ शकते कि हा कली चांगलाच हात पाय पसरत आहे. आणि त्याला प्रतिबंध करण्याचे उपाय शोधण्याचे साधे विचार सुद्धा आपल्या मनाला शिवत नाहीत.
थोडक्यात म्हणजे नेमके काय करायला पाहिजे हेच कळत नसल्याने सर्व अनर्थ ओढवत आहे. हे आहे प्रत्येक घरातले थोडक्यात वर्णन
असेच गल्लीतील/चाळीतील कुटुंबा- कुटुंबात कलह चालू आहेत/गल्या-बोळी चे वाद आहेत/वस्ती वस्ती चे वाद चालू आहेत/गावा गावांचे/राज्यांचे/देशांचे (आणि आता नवीन ग्रहा- ग्रहाचे सुधा वाद सुरु होतील असे दिसते) अनेक वाद सुरु असून त्यात कित्येक निष्पापांचे बळी जात आहेत/ बहुमुल्य संपत्ती विनाकारण नष्ट होत आहे आणि जे याचा विचार करून काही चांगले करत असतील तर त्याचे खच्ची करण किंवा त्यालाच नष्ट केले जात आहे. देशाच्या प्रगतीचा कणा सरकारी कार्यालये आहेत पण प्रत्येक सरकारी कार्यालयातील परस्थिती बाबत तर न बोललेलेच बरे या साठी हे वाचा

सरकारी कार्यालयातील सौजन्याची ऐशी तैशी ..........

आमचा ऑफीस टाईम अकरा
तुम्ही खुशाल मारा चकरा
असेल जरी ना पसंत हा नखरा
बनू नका आमच्या रागाचा बकरा ||१||
आता आम्ही चहा प्यायला जाणार
तेव्हा तुमच्या बापाचे काय जाणार?
फाईल तुमची आम्ही गायब करणार
साहेबांना सुध्दा परेशान करणार ||२||
साहेबांचा नंतर फोन येणार
मगच कामाला सुरवात होणार
जेवणाचा वेळ अपुरा ठरवणार
पान खाऊन भिंती रंगवणार ||३||
क्षुल्लक गोष्टींचा करणार बाऊ
होतील तेवढी भांडणे लाऊ
जरी आम्ही पैसे खाऊ
देणाय्राचेच आम्ही गोडवे गाऊ ||४||
सवलती घेऊ आम्ही हक्काने
हलवू सर्वांना आमच्या धक्क्याने
कोपरे सजवू सिगारेट च्या थोटक्याने
शांतता भांगवू मोठ्या हसण्याने ||५||
सौजन्य म्हणजे असते तरी काय?
शिकवणारा तरी कोणी आहे काय?
संस्कारालाच जर झालाय बाय बाय
मग उगाच का करता हाय हाय ?||६||

यावरून मला असे म्हणायचे आहे कि केवळ संस्कार करणारे दुर्मिळ झाल्याने तर हि परस्थिती ओढवली नाही कि संस्कार करणारे भरपूर असून आम्ही त्यांना तुच्छ लेखले म्हणून तर हा कली फोफावत चालला नाही ? सर्वात कहर म्हणजे या सर्व गोंधळात परमेश्वर नावाचे कल्पवृक्ष आहे याचा मनाला विचार सुद्धा शिवत नाही.ज्याने हे जग आपल्या साठी निर्माण करून आपल्या सोईसाठी अनेक मौल्यवान गोष्टी आपल्या दिमतीला दिल्या विचार करण्याची सुबुद्धी दिली त्याच बुद्धी च्या आधाराने त्यानेच दिलेल्या बुद्धी च्या आधाराने त्याचेच अस्तित्व नाकारन्या पर्यंत आपली मजल घरोघरी जात आहे.मग कली ला कोण थोपवू शकेल ? तोही मग शांत राहून निसर्गाला कोप करण्यास आदेश देत आहे परिणामी त्सुनामी/अव्रष्टी/नवे नवे गोंडस नावाचे आजार/अस्थिर पण/महागाई/ दहशतवाद या घटना वेगाने वाढत आहेत.आणि आता पाहू कोणाचे अस्तित्व राहतेय असा विचार परमेश्वराला करायला आपणच नाही का भाग पाडत?मग शान्ती कशी अनुभवता येइल्,

जगाचे सोडा आपण घरा पासुन सुरवात केल्यास पहा घराची शांती कशात आहे ? तर घराच्या चार भिंतीत. पण ह्या चार भिंती कोणत्या? तर (१) घर मे हो माया (२) निरोगी हो काया (३) नारी हो सुलक्षणी (४) पुत्र हो आज्ञाधारी .(अशाच भिन्ती असलेल्या घराचे छप्पर हे परमेश्वरी कृपेचे असते) पण मी हे साधावे कसे?
किंवा तुम्ही म्हणाल ठीक आहे मी एकट्याने केल्याने काय होणार आहे?
पण इथूनच सर्व सुरु होत आहे.
अहो अनुकरण हि परमेश्वराने दिलेली मोठी कलाच आपण विसरत आहोत.
तुमचे बाल पण आठवा तुम्ही अनुकरण केल्या शिवाय मोठे झाला नाहीत याचे तुम्हाला अनेक पुरावे सापडतील.
पटले ना ?
मग करा सुरुवात स्वत:पासून आज आत्ता लगेचच विना विलंब. ( म्हणजे तुमचे कुटुंब तुमचे अनुकरण करेल)
पण नेमके काय करायचे ?
स्वतःचेच शुद्धीकरण.
म्हणजे?
प्रथम मनाचे शुद्धीकरण त्या अनुशंघाने देहाचे शुद्धीकरण.
रामदास स्वामिनी कोणाला उपदेश केला? तर स्वताचा मनालाच कारण तेथूनच सर्व समस्या, सुख,दुखः इ सुरु होते तेव्हा जर ते सशक्त केले तर आपल्या पुढे कुठलीही समस्या टिकणार नाही. तर परमपूज्य ब्रम्हचैतन्य गोन्दवले कर महाराजांनी सांगितले कि मनाला शुद्ध करायचे असेल तर एकदम सोपे आहे जसे कि पात्र स्वछ धुण्याकरता त्यात पाणी घालून आपण त्याला हलवून शेवटी उलटे करून सर्व पाणी फेकून देतो तसे मना च्या उलटे केले कि नाम येते तर परमेश्वराचे नाम हेच मनाच्या शुद्धीकर्णाचे अत्यंत स्वस्त व प्रभावी साधन आहे.
मग कोणते नाम घ्यावे?
आपल्याला आवडेल ते परमेश्वराचे नाम सतत घ्यावे.
(महाराज म्हणतात ...........नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. . नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्यलक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही.)

आणि जर मनोमन पटलेच असेल तर मात्र परमपूज्य गुरुनी दिलेले नाम घ्यावे
मग गुरु कोठे भेटतील?
त्यासाठी हे वाचा -------------------

खोपोलीचे स्वामी जाती भक्ताच्या घरी

परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज एकदा राजापूर तालुक्यातील एका गावी मंदिराच्या उदघाटन कार्यक्रमा निमित्त गेले होते मंदिराचा उदघाटन सोहळा समाप्त झाल्यावर महाराज आपल्या सेवका समवेत एका भक्ताच्या घरी गेले.पलंगावर भक्ताच्या बाजूस जाऊन बसले आणि भक्तास म्हणाले “विठोबा मी आलोय” त्या भक्ताचे नाव विठोबा होते .विठोबाने विचारले ,”आपण कोण?”महाराज म्हणाले मी ,”विठोबा मी गगनगिरी,तुला दर्शन द्यायला आलो आहे “ गगनगिरी हे नांव ऐकताच विठोबाने महाराजांचे चरण धरले.श्रद्धेने व भक्तीने विठोबाने नाथांचे पूजन केले आणि विठोबाच्या मस्तकावर कृपा हस्त ठेऊन महाराज पुनश्य:त्या मंदिरात आले.
विठोबाने महाराजांना या पूर्वी कधीही पहिले नव्हते.मात्र विठोबा कडून महाराजांच्या “श्रीगुरुसप्तशती” या ग्रंथाचे सहस्त्र वेळा पारायणे झाली होती.या ग्रंथामध्ये आशिर्वादाप्रतमहाराजांनी म्हटले आहे कि ,”जो भक्त या ग्रंथाचे सहस्त्र पारायणे करील त्यास मी प्रत्यक्ष दर्शन देईल.” आणि हीच वचन पुरती करण्यासाठी महाराजांनी विठोबास त्याच्या घरी जाऊन दर्शन दिले.विठोबाने केलेली सहस्त्र पारायण महाराजांच्या ह्र्दया पर्यंत जाऊन पोहचली होती.
आता विठोबाने केलेली हजार पारायणे आणि परमपूज्य महाराजांनी त्यास घरी जाऊन दिलेले साक्षात दर्शन हि गोष्ट सर्व गांव भर पसरली.गावकऱ्यांना याचे आश्चर्य वाटले.कारण विठोबाला लिहता वाचता येत नव्हते,मग हा पोथीची सहस्त्र पारायणे कशी करणार ? गांवकरी मंडळींनी ह्या गोष्टीची चौकशी विठोबाकडे केली .विठोबा सांगू लागला ,”एका भक्ताने मला ‘श्री गुरुसप्तशती’ ग्रंथ दिला मी शाळेत जाणाऱ्या विदयार्थ्याकडून संपूर्ण ग्रंथ वाचून घेतला.त्यातील महाराजांच्या लीला श्रवण करून मला फार प्रसन्नता वाटली .महाराजांबद्दल माझा मनात श्रद्धायुक्त भक्ती निर्माण झालो.
||असता सांगाती स्वामी|| भक्तासी काय कमी ||
||करिता सेवा आश्रमी||मेवा तयांसी मिळतसे||
मग मी दररोज गावातील एखाद्या मुलास गाठून ,त्यास चार आणे,आठ आणे देऊन त्याच्या कडून वाचन करून घेत असे आणि अशा प्रकारे नित्यदिनी मी ग्रंथाचे श्रवण करीत असे. मग किती पारायणे झाली ती मला कळलीच नाहीत.माझ्या हजार पारायणा ची नोंद मात्र श्री गगनगिरी नाथांच्या ह्रदयात झाली आणि त्यांनी प्रत्यक्षात येऊन मला दर्शन दिले .” विठोबाचे वक्तव्य ऐकून गावकऱ्यांना त्याचे कौतुक वाटले.भगवंताच्या हृदयात भक्ताच्या भक्तीची कशी नोंद असते,याचा प्रत्यय विठोबाला आला.
असेच एकदा महाराज दत्त मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी या गावी गेले.भूमिपूजनाचा कार्यक्रम संपल्यावर स्वामींनी श्री ज्ञानोबा दरेकर नामक भक्ताच्या घरी जाऊन त्यास दर्शन दिले .महाराजांनी आपल्या गळ्यातील पुष्पहार काढून श्री ज्ञानोबा च्या गळ्यात घातला व त्यास आशीर्वाद दिला. ज्ञानोबाने “श्री गुरुसप्तशती’ या ग्रंथाची एक हजार पारायणे केली होती.स्वामींनी त्यास प्रत्यक्षात दर्शन दिले.
|| करील भक्त जो सहस्त्र पारायण ||
त्यासी प्रत्यक्ष देईल मी दर्शन ||
ऐसे स्वये गगनगिरी भगवान ||वचन बोलते जाहले||

एके दिवशी महाराज असेच एका भक्ताच्या घरी गेले.महाराजा समवेत इतर भक्त मंडळी देखील होती.महाराजांनी त्या भक्तास गाईचे दुध काढून आपल्या बरोबर आलेल्या भक्तास एक एक ग्लास दुध देण्यास सांगितले.त्यावर तो भक्त म्हणाला “बाबा हि गाय दुध देत नाही”स्वामींनी भक्तास बादली भरून पाणी घेण्यास सांगितले.स्वामींच्या आदेशानुसार त्याने पाण्याने भरलेली बादली पुढे केली.महाराजांनी बादलीतील पाण्यास स्पर्श केला व ते पाणी गायीस पाजण्यास सांगितले.भक्ताने ते पाणी गायीस पाजले.गाय पाणी पिताच गायीला पान्हा फुटला .भक्ताने गायीचे दुध काढले आणि गरम करून सर्वांना पिण्यास दिले.

||दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा||

(गगनगिरी महात्म, प्रकरण -७९ मधून )
आता तुम्ही म्हणाल कि एवढे कसे शक्य आहे?
त्यासाठी हे वाचा

गुरु सेवा हि देतात व सामर्थ हि देतात

एकदा जनार्दन स्वामी एकनाथांना झोपेतून उठवीत म्हणाले “उठ बाळा ,आज गुरुवार आहे आजचा दिवस सदगुरु स्मरणात व्यतीत कर.आज मी तुला शूल भंजन पर्वतावर घेऊन जाणार आहे माझ्या गुरुदेवांची इच्छा झाली तर आज तुला हि त्यांचे दर्शन होईल “
नाथांना सोबत घेऊन जाताना जनार्दन स्वामी म्हणाले “बाळ,तुझ्या साठी एक सेवा शोधून ठेवली आहे.भागवत ग्रंथ जन सामान्य पर्यंत पोहचवण्यासाठी या महान ग्रंथाचे मराठीत भाषांतर करावयाचे आहे “
शिष्य एकनाथ म्हणाले “मी तर अजून लहान आहे आणि पूर्णत्वास हि प्राप्त झालो नाही मग मी हे कसे बरे करू शकतो?”
“आता लगेच करावयाचे नाही जशी ज्ञानेश्वर महाराजांनी तपश्चर्या केली तशीच तपश्चर्या करून हे काम तुलाच करावयाचे आहे. या साठी तुला जी शक्ती पाहिजे ती माझे गुरुदेव देतील म्हणूनच तर मी तुला त्यांचेकडे पर्वतावर घेऊन जात आहे”
“गुरुदेव,मला त्यांचे दर्शन होईल?”
जनार्दन स्वामी म्हणाले-“ते तर कोणत्याही रुपात प्रगट होऊ शकतात जर तू त्यांना ओळखले तर ते तुला आपल्या मूळ रुपात दर्शन देतील”
थोड्याच वेळात ते त्या उंबराच्या झाडाखाली पोहचले ते जनार्दन स्वामींचे साधना स्थळ होते .जनार्दन स्वामी पद्मासन लावून ध्यानात बसले ,एकनाथ हि आपल्या सदगुरु च्या श्री चरणी बसून त्यांच्या कडे प्रेमाने एकटक पहात होते.एवढ्यात स्वामींचे संपूर्ण शरीर हलु लागले ,श्वासोछ्वासाची गती वाढली आणि त्यांच्या मुखातून ‘गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त,असे शब्द निघू लागले.
एवढ्यात बाजूच्या झाडा झुडपातून कोणाच्या तरी पावलांचा आणि चिमट्याचा आवाज ऐकू येऊ लागला असे वाटले कि जणू कोणीतरी वर येत आहे .त्याच दिशेकडून राळेचा पवित्र सुगंध वातावरणात पसरू लागला .नाथ त्याच दिशेला पाहू लागले .डोक्यावर मळकट वस्त्र ,अंगावर ठिकठिकाणी फाटलेली कफनी ,पायावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत,त्याच्यावर फाटक्या चिंध्या बांधल्या आहेत .अनवाणी पाय,एका हाती चिमटा,दुसऱ्या हाती वाडगे घेऊन एक वृद्ध फकीर येत आहेट.त्यांच्या मागे तीन कुत्री सुद्धा होती .फकीर जनार्दन स्वामींच्या समोर येऊन उभे राहिले .एकनाथाकडे एक दृष्टीक्षेप टाकत फकीर जनार्दन स्वामीना म्हणाले,
“क्या जुबान बख्शी है परवरदिगार ने तुझको | मुंह मत बंद करो और जुबान चलावो |”
जनार्दन स्वामिनी त्यांच्या श्रीचरणी मस्तक नमविले गुढ हास्य करीत फकीर म्हणाले ,
“खाने से भूख बढी | पिने से प्यास बढी | दरसन से आस बढी |सोते सोते जागो | अपने आपसे भागो | आओ साई |छुटकारे कि खीर मेरे साथ खावो ||”
जनार्दन स्वामी म्हणाले मी माझ्या पासूनच कसा पळून जाऊ ? दुधाविना खीर कशी बर खाऊ ?”
फकीर म्हणाले “कुत्रीचे दुध आणि भिक्षेत मिळालेली पोळी.नवसाची साखर वरून टाक.वरचाही खुश,खाणाराही खुश”
फकीरा जवळ उभ्या असलेल्या कुत्रीचे दुध काढून जनार्दन स्वामिनी वाडगे भरले ,फकिराने आपल्या फाटलेल्या झोळीतून शिळी पोळी काढून वाडग्यातील दुधात भिजवली.दोघे हि आनंदाने दुध –पोळी खाऊ लागले. खाल्ल्यावर जनार्दन स्वामिनी एकनाथांना इशारा करून वाडगे धुवून आणायला सांगितले.
सदगुरूंची प्रत्येक क्रिया निराळी (रहस्यमय) समजणारे ,महापुरुषांच्या लीलेत मानवी मती न वापरता श्रद्धेच्या नेत्रांनी पाहणाऱ्या एकनाथांनी त्या वाडग्यात झऱ्याचे थोडे पाणी टाकले आणि परमपवित्र,देवदुर्लभ,असा सदगुरूंचा उच्छिष्ट प्रसाद अहोभावाने सदगदित होत ग्रहण केला.
त्या नंतर नाथांना समाधी लागली .फकीर एकनाथांना उठवीत म्हणाले ,”उठ बाळा,उठ कुठून आलास?कुठे जायचे आहे?”एकनाथ समाधीतच राहिले.
फकीर पुन्हा म्हणाले ,”बोल साई बोल,जुबान चालावो फकीर | जुबान चलावो |”
नाथ समाधी अवस्थेतच राहिले.फकिराने त्याच्या डोक्याला आपला चिमटा हळूच लावला आणि आपले भजन गाऊ लागले . जुबान चालावो फकीर | जुबान चलावो | नाथांच्या अंतरात ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला .फकिराच्या चरणी लोटांगण घालत ते म्हणाले, “ओळखले|आदिनाथ ओळखले || अनुसया मातेचे लाल,त्रिगुणरूप आपणच आहात .हे देवेश्वर | आता कृपा करा.आपल्या मूळ स्वरुपात दर्शन देऊन या बालकाला कृतार्थ करा”
फकीर अदृश्य झाले आणि तेथे तीन डोके ,सहा हात,पायी खडावा घातलेले लांगोटधारी दत्तात्रय भगवान प्रगट झाले .त्यांनी नाथांना उठवून त्यांच्या डोक्यावर आपला वरद हस्त ठेवला आणि जनार्दन स्वामींना म्हणाले ,”जनार्दन | तुझा हा शिष्य अवतारी पुरुष आहे हा स्वत: तर मुक्ती मिळवेलच आणि इतरांनाही भक्तीचा मार्ग दाखवेल,जीवांचा उद्धार करेल”
किती महान असतात सदगुरु ,जे सेवा देऊन आपले कल्याण तर करतातच ,परंतु जी सेवा देतात ती करण्याची शक्ती सुद्धा देतात.
(ऋषी प्रसाद १ सप्टेंबर २०११ मधून )

(महाराज म्हणतात ..............शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामद्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकीं काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, सडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वरमहाराज, एकनाथमहराज, तुकाराममहाराज, आणि समर्थ रामदासस्वामी, यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही. वेदांना जो परमत्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्‌रूपाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयामाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले.
. कलियुगात अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे.जय श्री राम

गंगेच्याकाठी किती तरी लोक येतात, स्नान करातात, पूजा अर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे ?' असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणला, 'याचे प्रत्यंतर समोर च दाखवितो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा माणूस पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल.' असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला ! म्हणजे एवढे नेमनिष्ठ, विद्वान, गंगामाईचे रोज स्नान करणारे, तरी आपले अंतःकरण शुद्ध झाले आहे असे त्या कुणालाच वाटले नाही ! तेवढ्यात वर्‍हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला; आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग बरा झाला ! असे हे जे गोरगरीब, भोळे भाळे लोक, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते, ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंध श्रद्धा ठेवतो. घरुन कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधीकधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरी पण आपण भरवसा ठेवतोच ! व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो, तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी भगवंत आपल्याला समाधान देईल.)

जर आता मनोमन तयारी झाली असेल तर वर उल्लेखलेला श्री सप्त शती गुरु चरित्र सार हा ग्रंथ शक्यतो सर्व धार्मिक ग्रन्थाच्या दुकानात मिळ्तो नसेल तर पुण्याच्या नेर्लेकर पुस्तक भांडारात मिळतो. किंवागुरुचरीत्र सप्तशती सार क्लिक करा. ( ज्यांना हवा असेल त्यांनी मागणी vinayakpatki08 @gmail.com वर पाठवावी मेल वर मी हा ग्रंथ पाठवीन ) आणि तुम्ही स्वत: संकल्प करा कि माझ्या कुटुंबातून १००० पारायणे करावयाची जबाबदारी मी यथा शक्ती यथा मती यथा ज्ञानेन यथावकाश घेत आहे.आणि तुम्ही हे करा व कुटुंबा कडून करवून घ्याच.हा ग्रंथ सुचीर्भूत पणे स्त्रीया सह सर्वांनाच वाचता येतो. याचा अनुभव हा आहे कि घरात सर्वांचे एक विचार होतील एकोपा वाढेल आपसी प्रेम वाढेल घरात शांतता(लक्ष्मी नांदेल )नांदेल.मन शांत होऊन आरोग्य लाभेल आणि जीवनातील सर्व समस्यावर प्रभावी उपचार करण्याचे तंत्र सापडेल म्हणजेच गुरु दर्शन होईल. आणि गुरु दर्शन देऊन म्हणतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
आणि तुमचा वरील मोठा प्रश्न..... मी एकट्याने केल्याने काय होणार आहे?
हा तुम्हीच शोधा कि कुठे विरून गेला (अहं ब्रम्हास्मी )
तुमच्यातच दडलेला सत्पुरुष प्रगट होईल.असे प्रत्येक घरात घडले तर गल्ली/चाल सुधारेल.मग गाव,मग तालुका मग जिल्हा,राज्य,देश, व नंतर जग सुधारून शांती चा अनुभव येईल, अर्थात पूर्ण श्रद्धेने केले तरच
म्हणून म्हणतो कि मी केले,व शान्तता प्रेमी म्हणुन सांगावेसे वाटले,कि तुम्हाला पटत असेल तर लगेच सुरु करा .तुम्हाला होणारे गुरु दर्शन हाच माझाही परमानंद आहे आणि मला हि गुरु दर्शन आहे. आपण सर्व मिळून या कली चा सामाचार घेण्यास सिध्द होऊ या कारण कलियुगाचे चालक,मालक,पालक,सर्वेसर्वा श्री गुरु आहेत त्यांना शरण जाऊन त्यांच्या आदेशाचे पालन करणाराच कलीयुगात निश्चिंत पणे तरेल.खात्री बाळगा.

दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

सद् गुरुनाथ श्री दत्त महाराज कि जय

||जय श्री राम||

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सद् गुरुनाथ श्री दत्त महाराज कि जय
||जय श्री राम||

Mandar Katre,limbutimbu ,विश्वयशश्री-----जय श्री राम्,अवदुत चिन्तन श्री गुरुदेव दत्त.

दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सद् गुरुनाथ श्री दत्त महाराज कि जय
||जय श्री राम||