झाड

Submitted by मी मुक्ता.. on 27 May, 2013 - 10:45

एक होतं अरण्य. त्या अरण्यात एक झाड होतं.. खरंतर फुलझाड... इतरांपेक्षा सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलं येणारं.. ऋतूचक्राच्या अखंड चाललेल्या प्रवासात टप्याटप्याला फुलांनी मोहरणारं.. बहराच्या ऋतूची वाट बघणारं.. बहराची कारणं शोधणारं.. आसुसून बहरणारं..
दरवर्षी पाऊस पडायचा.. मग शरदाचं चांदणं न्हाऊ घालायचं.. शिशिर यायचा पानगळ घेऊन.. आणि वसंताच्या चाहुलीबरोबरच झाड भरुन जायचं फुलांनी.. त्याच्या खास सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलांनी.. हळू हळू गळून जायची सगळी पानं.. उरायची ती फक्त फुलंच.. अशा वेळी झाडाचा रुबाब बघण्यासारखा असायचा.. समाधानाने अजूनच फुलून यायचं झाडाचं मन अशा वेळी..
मग एकदा काय झालं, पानं नावालाही न उरलेलं आणि फुलांनी ओसंडून वाहणार्‍या त्या रुपाचं प्रतिबिंब त्या झाडाला पहायला मिळालं.. झाड थक्क... ते सुंदर होतं याची त्यालाही कल्पना होतीच, आजूबाजूच्या झाडांच्या डोळ्यात दिसायचं ते, पण त्याच्या नजरेला पडलेलं ते रुप कल्पनातीत होतं.. झालं.. खुळावलं.. वेडावलं ते झाड आपल्या रुपाला.. प्रेमात पडलं स्वतःच्याच त्या प्रतिबिंबाच्या.. बस्स.. त्याने ठरवून टाकलं की आता यातलं एकही फूल गळू द्यायचं नाही..झडू द्यायचं नाही.. बाकीच्या झाडांनी त्याला परोपरीने समजाऊन पाहिलं.. "बाबा रे.. असं नसतं करायचं.. ऋतूचक्रानुसार सुरुच राहणार, बहर पानगळ.. नुसत्या ऋतूंचं नाही तर जीवनाचं चक्र आहे हे.. मोडायचा प्रयत्न करु नकोस.. चालत रहा ठरलेल्या वाटेवरुन.. नाहीतर पस्तावशील.." पण नाही.. झाडाला कुठून पटायला हे तत्वज्ञान.. स्वतःच्या बहराच्या प्रेमात होतं ना ते!
फुलं जगवण्याच्या नादात मग नवी पालवी फुटूच दिली नाही त्याने. पानांअभावी जीवनरस बनायचा थांबला..तरी त्याला तमा नव्हती.. आपल्यात शिल्लक असलेल्या जीवनरसाच्या अखेरच्या थेंबापर्यंत फुलांना जपत राहिलं.. जगवत राहिलं.. आणि शेवटी एके दिवशी मरुन गेलं..

तरी मी कायम म्हणत असते, कितीही सुंदर दिसला तरी दु:खाचा हा असा जीवघेणा सोस बरा नव्हे...

http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

विनायक परांजपे,
धन्यवाद..

सुसुकु,
ह्म्म... Happy आभार...

सुरेख