मला वाटते परत फिरावे

Submitted by निशिकांत on 27 May, 2013 - 03:10

हिरवळ गंधित ओली माती
कसे बालपण मी विसरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

एक सदनिका विकत घेतली
तेच वाटते अमाप वैभव
वाडा, अंगण कसे कळावे?
खुराड्यातले ज्यांचे शैशव
अंगणातल्या प्राजक्ताच्या
गंधाला श्वासात भरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

खिडक्या दारांना पडदे अन्
आडपडदेही मनात नव्हते
सार्‍यांसाठी गर्द सावली
कुठलेही घर उन्हात नव्हाते
टीव्हीवरच्या मालिकांतले
मुळीच नव्हते कधी दुरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

लुगडे घेता वहिनीसाठी
नणंद त्याची घडी मोडते
चापुन चोपुन नेसुन होता
सर्वांच्या ती पाया पडते
विभक्त इथल्या कुटुंबात हे
दृष्य कधी अन् कसे दिसावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

लेक सासरी जाण्या निघता
रंक असो वा रावाची ती
आईबाबांची नावापुरती
लेक खरे तर गावाची ती
आभाळमाया इथे पाहिली
प्रेम किती अन् कसे करावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

खेड्यामधल्या तरुणाईला
भुरळ घालती शहरी वारे
नसे संस्कृती, विकृतीच ही
लुभावणारे मृगजळ सारे
थांबव देवा श्वास अता तू
काय करणे जगी उरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

वयस्क लोकांना आठवेल की जुन्या काळी घरात एखाद्या स्त्रीला लुगडे (साडी) घेतली तर कुटुंबातली दुसरी स्त्री ती साडी प्रथम नेसायची. नंतर धुवून ती साडी जिच्यासाठी आणली अहे ती स्त्री नेसायची. या पध्दतीला घडी मोडणे असे म्हणत असत.

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लुगडे घेता वहिनीसाठी
नणंद त्याची घडी मोडते
चापुन चोपुन नेसुन होता
सर्वांच्या ती पाया पडते
विभक्त इथल्या कुटुंबात हे
दृष्य कधी अन् कसे दिसावे?<<़<< तोड्लंत काका

खूप सुंदर कविता खूप आवडली

वाह...... Happy

खिडक्या दारांना पडदे अन्
आडपडदेही मनात नव्हते
सार्‍यांसाठी गर्द सावली
कुठलेही घर उन्हात नव्हाते

हे तर मस्तच.

वाह, एखादे जुने गाव, तेथील खानदानी घर, माणसे सगळे सगळे अगदी डोळ्यासमोर उभे केलेत की काका ....