कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ - समिधा जोगळेकर ( टोरांटो, कॅनडा) यांच्याशी गप्पा

Submitted by अजय on 26 May, 2013 - 12:42

१ समिधा ! तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात ?
कॅनडाच्या पूर्व किनार्‍यावरच्या एका गावात माझा जन्म झाला आणि पुढे अनेक वर्ष टोरांटो पासून साधारणपणे १२० किमी अंतरावर, पंच्याऐंशी हजार लोकवस्तीच्या एका छोट्या गावांत वास्तव्य

Samidha_jogalekar.JPG२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
माझे आई वडील डॉक्टर असून दोघेही गाण्याचे अतिशय शौकीन असल्यामुळे संगीतात बराच रस घेतात. त्यामुळे लहान वयातच माझ्यात संगीताची आवड निर्माण होऊन ती वाढायला वाव मिळाला.

३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
वयाच्या साधारण ८ व्या वर्षापासून मला गाण्याची आवड आहे व मला ते शिकायचे आहे अशी इच्छा मी आई वडिलांपाशी व्यक्त केली. परंतु कॅनडात जेथे राहिले त्या छोट्याशा गावात पाश्चिमात्य शास्त्रोक्त शिकण्याचीच केवळ सोय असल्यामुळे तेथेच एका क्लास मध्ये माझे नाव नोंदवले आणि तेथे माझे शिक्षण सुरु झाले. वयाच्या साधारण १० व्या वर्षी टोरांटो येथील एका मराठी समारंभात माझ्या सुदैवाने नरेंद्र काका दातारांची गाठ पडली व त्यांनी मला शास्त्रीय संगीताचे धडे देण्यास अनुमती दिली. मी त्यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली आणि लवकरच स्वर कसा लावावा ह्या शास्त्रीय संगीतातील गुरु किल्लीचा शोध घेऊन प्रगती करण्यास सुरुवात केली. महत्वाची बाब म्हणजे मला हे समजून चुकले कि आपला जो संगीतातील सांस्कृतिक ठेवा आहे तो हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताद्वारेच मी पुढे जतन करेन. पुढे मी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ऐकत व शिकत गेले जे दिवसेंदिवस मला आवडत गेले व त्यात मी प्रगती करू शकले.

४. संगीतातील तुमचे गुरु कोण ?
कॅनडातील टोरांटो येथील श्री. नरेंद्र दातार हे माझे प्राथमिक व मुख्य गुरु आहेत. परंतु भारतातील काही बुजुर्ग व नामवंत गायकांचे मार्गदर्शन मिळण्याचे मला भाग्य लाभले. नावेच घ्यायची झाली तर श्रीमती वीणा सहस्त्रबुद्धे , श्रीमती शोभा गुर्टू व सरला भिडे यांच्या शिष्य श्रीमती राजश्री पथक आणि खुद्द डॉक्टर प्रभा अत्रे .

५. तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?
१ . २०१२ मध्ये भारतामध्ये कोक स्टुडीओ इंडिया सीझन २ मधील नितीन सावनिया ने सादर केलेल्या साहिल तक या गाण्यामधून मी चमकले.
२. २००६ मध्ये Ontario Arts Council ची राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अशा दोन्ही शिष्यवृत्त्या मला मिळाल्यामुळे मी भारतात दीड वर्षे राहून माझे शास्त्रीय संगीत काही प्रमाणात शिकू शकले.
ohttp://www.sici.org/grant-recipients/details/ms-samidha-joglekar/?g_q=Sa...
३. माझ्या गायनासंबंधी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमान पत्रातून लिहून आले आहे .
४. माझे गुरु श्री. नरेंद्र दातार यांच्याबरोबर मी अनेक मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेतला असून माझे वैयक्तिक गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. जाता जाता हे नमूद करायला मला आवडेल कि माझे टोरांटो , न्यूयॉर्क , वाशिंग्टन , डॅलस , शीकॅगो , पिट्सबर्ग , फिलाडेल्फीया येथेही कार्यक्रम झाले आहेत.
५. गेली १० वर्षे वर्ल्ड फ्युजन ग्रुप ने काढलेल्या अल्बम मध्ये माझा सहभाग आहे-
Harry Manx and Friends :- Heaven and Earth, Live at Glen Gould
Harry Manx Bread and Buddha
TASA ( Indo- Jazz Ensemble ) Alchemy and Soma
Michael Moon : Deep Peace - Songs for meditation and relaxation
Let's Find a Way Project - Songs to raise money for AIDS in Africa
६. सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर आधारित व कॅनेडियन फिल्म डिरेक्टर दीपा मेहता यांच्या Midnights Children या चित्रपटात माझ्या गाण्याची आपण झलक पाहू शकता.
७. काही डॉक्यूमेंटरी फिल्म्स मध्ये माझा आवाज आहे . त्या अशा :-
India Reborn - CBC and BBC documentary series
The Market
The World Before Her - Documentary Film featured at TIFF
Ganesh Boy Wonder

६. . संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?
गाण्यासाठी पूर्ण वेळ देणं मला खरतर खूप कठीण जातं . मी व्यवसायाने क्लिनिकल ऑडीऑलॉजीस्ट आहे आणि टोरांटो हॉस्पिटल मध्ये मी काम करते. पण मी गाण्याच्या क्लासेसना मात्र अगदी न चुकता हजर असते. या सगळ्या कामाच्या व्यापातून जितका वेळ मिळेल तितका वेळ मी रियाज आणि अनेक प्रकारचे संगीत ऐकण्यासाठी वापरते .
विविध प्रकारचे संगीत ऐकून त्यावर वेगवेगळे प्रयोग करून , उपक्रम करून , तसेच शास्त्रीय संगीतात ही अनेक नवीन प्रयोग करून मी माझे संगीतातले ज्ञान अधिक वाढवण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळे करत असताना त्यातून मिळणारा आनंद , त्यातील अनुभूती याने मानसिक समाधान वाटते , माझ्या मते संगीत हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे.

७. तुमचे आवडते गायक / गायिका कोणते ? तुमचे आवडते एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुम्हाला जास्त आवडते ?
माझ्या आवडत्या गायक / गायिका - आशा भोसले ,श्रीमती किशोरी आमोणकर ,अश्विनी भिडे देशपांडे ,पं . भीमसेन जोशी
आवडते गाणे सांगणे कठीण आहे कारण अशी खूप गाणी आहेत जी मला आवडतात .
संगीतकारांबद्दल पण सांगायचे झाले तर मला अनेक संगीतकारांची गाणी आवडतात पण त्यातल्या त्यात हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत खूप भावते.

८. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?
अनेक गुरुकडून शिकल्यानंतर आणि माझ्या अनुभवावरून मला असे वाटते कि आपले सादरीकरण उत्तम करण्यासाठी सातत्याचा रियाज करणे हेच महत्वाचे. मी काही उपजत कलाकार नाही त्यामुळे मला stage fear आहे. त्यामुळे stage वर माझे सादरीकरण उत्तमोत्तम करण्यासाठी मी नक्कीच जास्त प्रयत्न करेन.
मी तर एका खोलीत बसून एकटीच मनसोक्त गात बसणे पसंत करेन पण आपले संगीत जसा आपल्याला आनंद देते तो आनंद आपण दुसर्‍याला दिला तर द्विगुणीत होईल याची ही मला जाणीव आहे. आणि म्हणूनच कार्यक्रम करायला आवडते . Happy

९. संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?
मला माझे ऑडीओ लोजीस्ट चे काम खूप आवडते आणि मला त्यात अत्यंत आनंद आणि समाधान आहे .
तसेच मला निसर्ग खूप आवडतो. त्यामुळे nature trails ला जाणे मी पसंत करते. विविध प्रकारच्या गाण्याच्या कार्यक्रमांना जाणे , कथा कादंबरर्‍या वाचणे, सिनेमा पाहणे मला आवडते.
वेगवेगळ्या प्रकारचे फूड पण आवडते .

१०. आपल्या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
या स्पर्धेसाठी मी kareoke tracks वर प्रचंड सराव केला. तसेच बरेच वेळा माझे मित्र रवि , अनुजा यांच्या बरोबर आणि नरेंद्र काकांबरोबर खूप रियाज केला.

खालील लिंक्स वर तुम्ही मी गायलेली काही गाणी ऐकू शकाल .
साहिल तक - http://www.youtube.com/watch?v=1H9SEZ-DozM
इंडिया मुझिक नेट वर्क - http://www.youtube.com/watch?v=skYHc0O7Pyk
Midnight Children मधील गाणे - http://www.youtube.com/watch?v=v6v8lnThf8g

कृपया इथे जाऊन मला मत द्या - http://www.bmm2013.org/culturalprograms/saregama.html

शब्दांकन - सुरेश डिके , सरिता देशपांडे (मायबोलीकर: रंगीतसंगीत). फोटो: राहुल जोशी (मायबोलीकर : वाटसरु)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट Happy
>>>> मी व्यवसायाने क्लिनिकल ऑडीऑलॉजीस्ट आहे <<<< व्यवसाय साम्भाळूनही स्पर्धेत उतरण्यायेवढा एखाद्या कलेचा छन्द जोपासणे हे अवघड असतेच असते. मनस्वीपणे आपण ते करता आहात.
>>>>मी काही उपजत कलाकार नाही त्यामुळे मला stage fear आहे. त्यामुळे stage वर माझे सादरीकरण उत्तमोत्तम करण्यासाठी मी नक्कीच जास्त प्रयत्न करेन.<<<<<
स्टेजची भिती बाळगू नका. समोरिल प्रक्षकान्ची तर अजिबात नको. एकतर आचार्य अत्रेंप्रमाणे स्टेजवर जा किन्वा स्टेजसमोरील प्रेक्षकच तेवढे मायबाप अन सर्वज्ञानी आहेत असे समजुन जा.
पण कोणत्याही परिस्थितीत मला काय येतय की नाही या द्विधा मनःस्थितीत जाऊ नका, जे येतय, ते परीपूर्णपणे सादर करा.

>>>>> मी तर एका खोलीत बसून एकटीच मनसोक्त गात बसणे पसंत करेन पण आपले संगीत जसा आपल्याला आनंद देते तो आनंद आपण दुसर्‍याला दिला तर द्विगुणीत होईल याची ही मला जाणीव आहे. <<<< ही भावना अतिशय महत्वाची आहे, प्रामाणिकपणे, परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याला काहीही देणे अपरिमित आनंद देऊन जाते, जीवनातील त्या त्या क्षणाचे सार्थक करते. बाकी कोणतेही विचार मनात येऊ न देता तितक्याच निर्विकारपणे हे करु शकलात, तर स्टेजची/प्रेक्षकान्ची/टीकाकारान्ची भिती वगैरे बाबी रहात नाहीतच, पण वैयक्तिक कौशल्य पराकोटीच्या उच्चस्तरावरुन प्रगट होते.

आपणास शुभेच्छा! Happy