चारोळ्या .... !

Submitted by Unique Poet on 25 May, 2013 - 06:06

१) कधीकाळचे दाटून येते
डोळा पाणी....
आठवणींची हळवी ओली
स्मरता गाणी....

२) माणूस नामक गर्दी मजला
वेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....

३) अवघडलेपण येते मजला
अशाच वेळी....
सांगायाचे जेंव्हा तुजला
सारे काही....

४) मला कळाले आज अताशा
कविते विषयी....
उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
नेहमी हृदयी....

- समीर पु.नाईक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीरजी,

प्रथम आपल्या काव्य निर्मीतीकरता शुभेच्छा !

आपल्याला ना उमेद करण्याचा हेतु अजिबात नाही. मला चारोळी आवडते आणि मग नकळत श्री रामदास फुटाणे यांच्या चारोळी शी त्याची तुलना करण्याचा मोह होतो . दोन प्रकाराने ही तुलना मी करतो. तांत्रीक आणि इतर मुल्य.

उदा. एक खास गाजलेली मा. फुटाणे यांची चारोळी जी मला अनेक वर्ष स्मरणात राहिली आहे.

संदर्भ - सध्याचे रिपब्लीकन नेते श्री रामदास आठवले यांचा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात समावेश.

आम्हालाही आठवले
आमचे नाव रामदास आहे
मागास वर्गीय नसल्यामुळे
आमच्या नशीबी वनवास आहे.

मी आपल्या चारोळीची चिकित्सा करत नाही. अगदी नव्याने लिहीत असाल तर नकोच नको.

यमकाचे गमक तेव्हडे समजाऊन घ्या इतकीच विनंती.

या चारोळीने मलाच नाही तर बहुदा शरद पवार साहेबांना सुध्दा हलवले असावे.

पुढे रामदास फुटाणे जेव्हा विधान परीषदेचे आमदार झाले तेव्हा मी माझ्या डायरीत लिहले

आम्हालाही उमगले
फुटाणे आमदार कसे झाले
चारोळी लिहता लिहता
हळुच शरदाचे चांदणे प्याले

राजकीय चारोळी हा माझ्या खास आवडीचा प्रांत आहे.

नितीनचंद्र जी
आपणास किंवा यु.पो. ना नाउमेद करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही

१) फुटणे लिहीतात त्या चार ओळीच्या कविता असल्या तरी चारोळ्यांपेक्षा वेगळा प्रकार आहे त्यास वात्रटिका म्हणतात= वात्रट टिका करणे

२)यमकाचे गमक यु पो ना समजले असल्याचे माझ्यातरी लक्षात आले आहे

३)मुळात चार ओळी कशाही लिहिल्या की चारोळ्या झाल्या हा गैर समज झालेला दिसत आहे
योपो लिहीत आहेत ते मुळात शेर आहेत जे त्यांनी ४ ओळीत करून मांडले आहे
अनावश्यक जागी वाटेल तिथे ओळी तोडायच्या नसतात ! गफलत इथेच झाली आहे व तयार झालेल्या ओळीना ४ओळ्या म्हणताय तुम्ही (युपोंच्या)

___________________________________________________

हे पहा असे शेर आहेत हे ..................

कधीकाळचे दाटुन येते डोळा पाणी....
आठवणींची हळवी ओली स्मरता गाणी....

माणुस नामक गर्दी मजला वेढुन राही....
एकाकीपण तरिही माझ संपत नाही....

अवघडलेपण येते मजला अशाच वेळी....
सांगायाचे जेंव्हा तुजला सारे काही....

मला कळाले आज अताशा कविते विषयी....
उत्स्फूर्ताचे गीत नेहमी भिडते हृदयी....

(बदल वॄत्तासाठी केलेत )

___________________________________________________

नितीन जी तुमची वात्रटिका मस्त आहे खूपच छान !!
या काव्यप्रकारात सूर्यकांत डोळसे हल्ली आघाडीवर आहेत त्यांचे लेखन वाचतजा खूप छान लिहितात तेही

असो

दोघाना शुभेच्छा
~वैवकु Happy