हास्यक्लबची योजना यशस्वी

Submitted by बेफ़िकीर on 23 May, 2013 - 08:43

सुलेखा ततपप कीर्तने यांच्या नव्या उपक्रमात सहभागी व्हायला नागरिकांची झुंबड उडाली. विक्रमसिंह या आपल्या पतीचे सुलेखा यांनी गेल्या पाच दोन वर्षात नवीन नामकरण केलेले होते. ततपप! नावाला जागून कर्तृत्व गाजवण्याचा प्रघात असलेल्या या महान देशात पतीचे दौर्बल्य पाहून त्याचे नाव बदलण्याचा नवा प्रघात घालून सुलेखाबाईंनी स्वतःच्या बोजड व्यक्तिमत्वाला विराटतेची वस्त्रे चढवलेली होती. त्यांची ती दैदीप्यमान कृती पाहून जवळपासच्या अनेक स्त्रिया प्रोत्साहित झाल्या होत्या व अनेकींचे पती हतोत्साहित मंडळ स्थापण्याच्या उपक्रमाचे सुतोवाच करू लागले होते. इतक्या प्रखर कर्तृत्वाच्या झळाळीने तळपणार्‍या स्त्रियांचा तेजोसमुह सर्वत्र सातत्याने वावरत असल्याने हळूहळू परिसरात मनोपालटाचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक लहानमोठी मंडळे सुलेखा कीर्तने यांच्या नवनव्या उपक्रमात स्वतःहून समाविष्ट होत होत समर्पीत होऊ लागली. 'एक पंचक्रोशी एक मंडळ' या सुलेखाबाईंच्या दुमदुमत्या घोषणेला प्रतिसाद देऊन शेवटी इतर सर्व मंडळे बरखास्त झाली व सुलेखाबाईंचा अश्वमेध यज्ञ पूर्णत्वास पोचला. आता एखादे काळे कुत्रे जरी मलूल होऊन रस्त्याकडेला पडलेले असले तरी त्याच्या पाठीशी बोर्ड लागायला लागू लागला. 'परिसरातील एक मरतुकडे कुत्रे - संकल्पना सुलेखाबाई कीर्तने'! असा! तिथून ते कुत्रे हालले व इतरत्र गेले तर त्या बोर्डचा अपमान होऊ नये म्हणून पूर्वाश्रमी आपल्या शौर्याने दिगंत कीर्ती मिळवणारा एखादा जख्खड वृद्ध तेथे बसवण्यात येऊ लागला. धरणीला 'आपल्याला दुभंगून ही बाई पोटात घ्यावी लागते की काय' अशी भीती वाटेल अशी पावले दाणदाण उचलत सुलेखाबाई रोज सकाळी व संध्याकाळी परिसरात आढावाफेरी घ्यायच्या. या आढावाफेरीत त्या सातत्याने नवनवीन घोषणा करून अनुयायांमधील उत्साह कायम राहील याची दक्षता घ्यायच्या. आज काहीच घोषणा झाली नाही असे कधीही होऊ द्यायच्या नाहीत.

आजही सायंकाळी पावणे सात वाजता मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी एक दिव्य घोषणा केली.

'परिसरातील जनतेचे चेहरे पाहून जनता मर्तिकाला जमली आहे असे वाटते. या परिस्थितीत आमुलाग्र बदल व्हावा यासाठी उद्या सकाळी सहा वाजल्यापासून मैदानावर हास्यक्लब सुरू होत आहे. तेव्हा सर्वांनी हासण्याचा योग्य तो सराव आत्तापासून सुरू करून उद्या सकाळी सहा वाजता मैदानावर उपस्थित राहावे. क्लब मोफत असून न हासणार्‍या सदस्याचे ओठ दोन्ही बाजूंनी खेचून त्याला हसायला लावण्यात येईल याची नोंद घ्यावी'

ही घोषणा करताना सुलेखाबाईंच्या डोळ्यांमधून अंगार बरसत होता. पराकोटीची संतप्त मुद्रा धारण करून या घोषणेने अवाक झालेल्या गर्दीकडे बघत त्या किंचाळात म्हणाल्या.

"हसाऽऽऽऽऽऽ??????"

खरंच हसायचे आहे की परिक्षा घेतली जात आहे या डिलेमामध्ये असल्याने प्रथम कोणाचे हासण्याचे साहस होईना!

हे सहन न झाल्यामुळे सुलेखाबाईंनी दाण्णकन आपला उजवा पाय पृथ्वी नावाच्या सूक्ष्म ग्रहावर आपटून अधिकच क्रोधीत होऊन आज्ञा केली.

"हसा... अन्यथा रडाल"

ही मात्रा लागू पडली. घशात गॅसेस व्हावेत तशी चार मलूल तोंडे खुसखुसली. तो आवाज हासण्याचा आहे की फेफरं भरल्याचा हे समजत नव्हतं. तूर्त ते हासणं आहे असा समज करून घेणं इष्ट वाटलं सर्वांना. धीर आल्याने चार आणखीन तोंडे अजिबात हासरी न होता सुलेखाबाईंकडे घाबरून बघत नुसताच 'ह ह ह ह ह ह' असा आवाज करू लागली. सुलेखाबाईंनी त्या तोंडांच्या किंचित समाधानकारक प्रगतीची नोंद घेऊन आपली हिंस्त्र मुद्रा इतर जमावाकडे वळवली. जमावातून आता 'ह ह ह ह ह ह' असे आवाज येऊ लागले. हासताना मनुष्याच्या चेहर्‍यावर तो हासत असल्याच्या ज्या इतर खुणा दिसतात, जसे गाल वर येणे, जबडे फाकणे, डोळे हासल्यासारखे दिसणे, त्यातील एकही खुण दिसू न देता भावशून्य डोळ्यांनी जमाव 'ह ह ह ह ह ह' करीत काही वेळ उभा राहिला. तो सामुदायिक आवाज रामसेच्या चित्रपटातील पार्श्वसंगीत म्हणून घेतला असता तर रामसेंना ऑस्कर मिळण्यात विशेष अडचण आली नसती. कातरवेळी रस्त्यावर असा धीरगंभीर सामुदायिक हास्याचा ध्वनी उमटल्याने कुत्री भेसूर हसू लागली. टिटव्या कर्कश्श हसू लागल्या. न दिसणार्‍या जखिणी झाडांना उलट्या लटकून कपाळ बडवून हसू लागल्या. वटवाघुळे सुलटी उभी राहिली. कॉर्पोरेशनच्या नळाचे पाणी गेल्यावर शेवटचा थेंब कसाबसा टपकावा तसा सूर्य पश्चिमेला टपकला. समस्त वातावरण प्रसन्न अश्या भीतीदायक हास्याने भारलेले पाहून सुलेखाबाईंनी आपले पाऊल घराकडे उचलले. जाताना त्या म्हणाल्या.

"हासत राहा, सकाळी सहा वाजता मैदानात या, तोवर हासण्याचा सराव चालू ठेवा."

जमाव 'ह ह ह ह ह ह' करत पांगला.

===============

सायंकाळी एक व्यक्ती खोख्खो हासत केमिस्टच्या दुकानात पोचली तेव्हा केमिस्ट पोट धरून जमीनीवर गडाबडा लोळत होता. जमीनीवर लोळतच त्याने खुणेने गिर्‍हाईकाला 'काय हवे' म्हणून विचारले त्यावर त्या व्यक्तिने 'वीष' असे गडगडाटी हासत सांगितले. केमिस्टने पडल्या पडल्या हासतच 'प्रिस्क्रिप्शनशिवाय वीष नाही देता येत' असे कसेबसे सांगितले. त्यावर ती व्यक्ती प्रचंड हासत म्हणाली. "हरामखोर, लाथ घालू का? मला आत्महत्या करायची आहे. वीष दे". ते ऐकून खदखदून हासत केमिस्टने विषाच्या दोन बाटल्या काऊंटरवर ठेवल्या व पैसे मोजून घेत ते हासत हासतच गल्ल्यात टाकले.

मुले हासत होती. प्रौढ हासत होते. तरुण हासत होते. नवजात अर्भके हासत होती. मरणासन्न वृद्ध तर हसू आवरूच शकत नव्हते.

सुलेखाबाई घरी पोचल्या तेव्हा जुन्या बाजारातून प्राचीन भग्नावशेषातून एखादी भंगलेली मूर्ती आणून घरात ठेवलेली असावी तसे कोपर्‍यात उभे राहून ततपप थरथरत होते. त्यांना पाहून सुलेखाबाई कडाडल्या.

"हसाऽऽऽऽऽऽ"

ततपप फफफफ करत हसू लागला. त्याच्या हासण्यात एक खानदानी अगतिकता होती. एक दिमाखदार केविलवाणेपण होते. एक सुस्पष्ट किंकर्तव्यमूढता होती. एक सामर्थ्यशाली हतबलता होती. काळी किंवा पांढरी कुठलीच पट्टी नसलेल्या हार्मोनियमचा भाता नुसताच हालवला तर येईल तसा आवाज करत ततपप कोपर्‍यात दम लागलेल्या अ‍ॅथलीटसारखा छाती हालवत उभा राहिला. त्याला आत्ता पंचक्रोशीबाहेरच्या कोणी पाहिले असते तर 'व्हेंटिलेटरवर ठेवलेला पेशंट उभा कसा काय राहिला' याचे नवल वाटले असते.

सुलेखाबाई आता आरश्यासमोर उभे राहून स्वतः हासण्याचा सराव करू लागल्या. प्रथम त्यांना ते जमेना! माणसाला हसू का व केव्हा येते हेच माहीत नसल्यामुळे त्या भलत्याच गोंधळल्या. आपली घोषणा आपणच पाळू शकलो नाही तर आपले हसे होईल अशी त्यांना भीती वाटली. हसू येणे व हसे होणे यातील सूक्ष्म फरक त्यांना आज प्रथमच स्पष्ट झाला. त्या बाहेर आल्या व 'फफरत' असलेल्या ततपपला डोळे वटारून म्हणाल्या.

"अहोऽऽऽ... हसायचे कसे?"

आता आली का पंचाईत? या ततपपने ही क्रिया गेल्या कित्येक वर्षात केलेली नसल्याने त्याचाही सराव गेलेला होता. त्यामुळे डेमो द्यायचा म्हंटले तर बया भडकायची, नाही दिला तरी भडकायचीच. करावे काय? प्रश्नाचे उत्तर तर तातडीने द्यायला हवे. ततपप तत्परतेने उत्तरला.

"हे बघा, असे दोन्ही हात स्वतःच्या पोटावर ठेवा, कंबरेत वाका, हो हो हो हो अश्या ओरडत सरळ उभ्या राहा, पुन्हा कंबरेत वाका, पुन्हा हो हो हो हो अश्या ओरडत उभ्या राहा"

"मग तुम्ही का फफफफ करताय?"

"मी मला शोभेलसे हासतोय, आपण म्हणालात तर कसाही हसेन"

सुलेखाबाईंनी स्वतःच्या पोटावर दोन्ही हात ठेवले, पण त्यांना ततपप इतके वाकता आले नाही. जमेल तेवढे वाकत त्या 'हो हो हो हो' करत उभ्या राहिल्या. ते जे काही दृष्य होते ते पाहून ततपपची बोबडीच वळली. पण हासणे आवश्यक असल्याने तो दचकून तसाच फफफफ करत राहिला.

"हो हो हो हो असेच म्हणावे लागेल का? हा हा हा हा किंवा ही ही ही ही नाही का चालणार?"

सुलेखाबाईंनी दरडावून विचारले.

"ह च्या बाराखडीतील काहीही चालेल, हं आणि हः सोडून"

"का? हं आणि हः मध्ये काय प्रॉब्लेम आहे?"

"हं हं म्हणालात तर तुम्ही कशालातरी मान्यता देत आहात असा अर्थ निघू शकतो"

"जी मी कदापीही देणार नाही... आणि हः मध्ये काय प्रॉब्लेम आहे?"

"हः असे हासणार्‍यावरून केश्तो मुखर्जी या नटाची आठवण होऊ शकून माणसाला खरे हसू येऊ शकते"

"ज्याला मी परवानगी देऊच शकत नाही"

"त्यामुळे ह ते हौ हा बाराखडीतला विभाग वापरावात अशी नम्र विनंती .... फ फ फ फ फ फ"

"ठीक आहे... हा हा हा हा"

"फ फ फ फ"

रात्री घराघरातून बालके किंचाळत हासत झोपेतून उठू लागली. म्हातारे कोतारे हासत खोकू लागले. काही चतुर म्हातारे तर खोकत हसूही लागले.

========================

अत्यंत दहशतीच्या हास्योत्पादक वातावरणात पंचक्रोशीवर सूर्याचा पहिला किरण पडला आणि राष्ट्रीय नेत्याला श्रद्धांजली वाहायला जमलेल्या जमावासारखा जमाव 'ह ह ह ह' असे आवाज करू लागला. पाखरे बावचळून इमारतींच्या अँटेनाजवर चढून बसली. कुत्री धावत सुटली. आकाशत घारी व गिधाडे दिसू लागली. कावळे एल बी टी लागल्यासारखे बंद पडले. जो हसू शकत नव्हता त्याला आजूबाजूचे ओठ ताणून धरून हासवण्यास भाग पाडू लागले. काहीजण धुण्याच्या चिमट्यांनी ओठ ताणून उभे राहिलेले होते. मनमुराद हासण्याचा एक भीषण ध्वनी सर्वत्र भरून राहिलेला होता.

मात्र सुलेखाबाईंना इतक्याजणांनी एकदम हासणे पटेना! लोक हासतात म्हणजे काय? असे कसे हासतात? अगदी आपणच हुकुम सोडलेला असला तरीसुद्धा हसू येतेच कसे यांना? हे धाडस?

त्यामुळे त्यांचा चेहरा अधिकच हिंस्त्र झाला. पण टाकले पाऊल मागे घेणे अपमानास्पद होते. त्यामुळे हासण्याची पोज घेत पोटावर हात ठेवत त्या जमेल तितके वाकल्या. वर होता होता 'हा हा हा हा' असे ओरडत हसू लागल्या. त्यांचा तो भीषण आविष्कार पाहून हडबडलेली माणसे त्यांचे अनुकरण करू लागली. सुलेखाबाईंच्या बाजूलाच 'एक कसाबसा हासणारा' म्हणून उभा केलेला ततपपही तशीच अ‍ॅक्शन घेऊन हसू लागला. आता येत असलेला सामुदायिक ध्वनी भयानक होता. काळही थिजेल असा तो भीषण नाद होता.

जेमतेम तीन साडे तीन मिनिटे प्रत्येकजण हासला असेल, तोच वाकून सरळ उभे राहण्याच्या नादात सुलेखाबाईंचा मागे तोल गेला. त्यांना तोल सावरता आला नाही आणि त्या भुईसपाट झाल्या. तो हादरा प्रत्येकाला जाणवला. अचानक हासणे थांबले. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. अन्यथा हुकुम असताना हासणे थांबवण्याची कोणाची हिम्मतच झाली नसती. पण सगळे अचानक घडल्यामुळे सगळे घाबरून भुईसपाट झालेल्या सुलेखाबाईंना पाहात राहिले. काय करावे हे कोणालाच कळेना!

घाबरत घाबरत ततपप सुलेखाबाईंना हात देऊन उठवू लागला. सुलेखाबाई ओरडत होत्या. जमाव जागचा हालतही नव्हता, हासतही नव्हता आणि मदतही करू धजत नव्हता.

शेवटी ततपपने सुलेखाबाईंच्या वतीने घोषणा केली.

"सुलेखा ततपप कीर्तने हास्यक्लब, उर्फ 'सुतकी' हास्य क्लबची वेळ संपलेली आहे, सर्वांनी कृपया हासणे थांबवावे"

सुतकी हास्य क्लब! हे नांव ऐकून एक पेन्शनर म्हातारा धाडस करून खुदकन हासला. त्याच्या हासण्यावर कोणतीही अ‍ॅक्शन घेण्यात आलेली नाही हे कळताच आणखीन दोन म्हातारे हासले. मग कुत्री नेहमीप्रमाणे भुंकली. कावळे जिवंत झाले. जमाव खुसखुसू लागला. थोड्याच वेळात सर्वत्र खरेखुरे हास्याचे ध्वनी उमटले.

अश्या रीतीने सुतकी हास्य क्लब ही योजना यशस्वी ठरली.

==================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुमाल. Happy

Lol Lol Lol Lol Lol
__________/\_____________

ग्रेट

भायानक हसतो अहे मी डोळ्यातून पाणी आले अक्षरशः

भन्नाट कल्पनाशक्ती
प्रचंड ताकदीचा समारोप
वाक्य न् वाक्य लाजवाब ...बेमिसाल कोणते कोट करावे कोणते नको समजेना

धन्यवाद या लेखनासाठी बेफीजी

Lol Lol Lol Lol Lol
Lol Lol Lol Lol Lol

सुलेखाबाई सेरीज काढा आता !!

किंवा २४ मैत्रिणी सारखी २४ जाखिणी काढा !!!!!

यात आवडण्यासारखे आणि त्याहूनही हसण्यासारखे काय आहे हे मला तरी उमगले नाही...:(
वैभवराव तुमचा प्रतिसाद हा उपहासात्मक तर नव्हे ना???

नाही नाही नाही उपहासात्मक नाही

प्रश्न वाचकांच्या अभिरूचीचा व सद्य मनोवस्थेचा अधिक असतो

मला सर्व प्रकारच्या विषयावरील लेखन वाचायला आवडते वाचताना मी त्या लेखनात असलेल्या मूडशी चांगला एकरूप होवू शकतो मग माझी मनोवस्था काहीही असेना का

हास्य रस उत्पन्न करण्याच्या वेगवेगळ्या शैली असतात .त्यात बेफीजींकडे स्वत;ची खास शैली आहे जी त्यांनी मेहनतीने डेव्ह्लप केली आहे या लेखात बिभत्स व रौद्र रसाना वाचकांच्या पोटातून ओठापर्यंत हसू आणायला भाग पाडले आहे

कल्पकता व त्यातली सखोलता बेफीजींकडे देवाने भरपूर दिलीये ज्याचा इथेही त्यांनी अफाट वापर केलाय

टीपःकोणास हसू येणे न येणे यामागे वैय्यक्तिक प्रेम,उमाळे ,,,,तंटे-बखेडे हेही कारण असू शकते प्रतिसाद देण्यापूर्वी मी मला व्यक्तिगत व्हायचे असेल तरच अशा बाबींना स्थान देत असतो
या लेखावरील प्रतिक्रयांन्मध्ये मला तसे काहीच करायची गरज वाटलेली नसल्याने मी प्रामाणिक व प्रांजळ तेच लिहिले आहे

धन्यवाद !!!

चू भू दे घे

~वैवकु Happy

किसन शिंदे यांनी वरच्या वैवकूंच्या प्रतिसादास उद्देशून लिहिले आहे असे मला वाटते Wink
शेवटी एच एम व्ही आहे Wink

अतिशय सुमार आणि टाकाऊ. काहीतरी लिहिण्याच्या नादात जमलेली लिखाणाची केविलवाणी भट्टी.

>> क्लब मोफत असून न हासणार्‍या सदस्याचे ओठ दोन्ही बाजूंनी खेचून त्याला हसायला लावण्यात येईल याची नोंद घ्यावी'>> हे पहिल्याच ओळीत लिहायचं राहून गेलेलं दिसतंय.

अ‍ॅक्चुअली जसा मनात होता तसा लिहिता नाही आला. फसला हे समजले आहे, पण आता रद्द करता येत नाही. बराच वेगळ्या प्रकारे लिहायचा होता. मला वाईट वाटले नाही आहे की लेख अनेकांना नाही आवडला, किंवा लोकांनी तसे स्पष्ट सांगितले, वाईट याचे वाटले आहे की जसा डोक्यात होता तसा स्ट्रक्चरच करता आला नाही Happy

तरीही, सर्वांचा आभारी आहे Happy

असे वाटू लागले आहे की काही जणाना हसू न येण्याचे कारण विभत्स वा विक्षिप्त पंचेस म्हणा त्याचे ओव्हरडोसिंग असू शकते जे त्या जणाना झेपले नसावे

बेफिकीर,

मलापण वाटंत होतं की अभिव्यक्ती यथोचित नाहीये. कदाचित गंभीर लेख लिहिला असता तर अधिक समर्पक ठरला असता.

आ.न.,
-गा.पै.