सूर्य म्हणतो पावसाचा शाप बघ आला फ़ळाला

Submitted by प्राजु on 21 May, 2013 - 05:12

बहरला मोहोर माझा, का असा पुरता जळाला
सूर्य म्हणतो पावसाचा शाप बघ आला फ़ळाला

बोलण्याचे कायदे होते जरी मी पाळलेले
नेमका कोठे कशाने तोल अर्थाचा ढळाला?

मी कशी अन काय भुलले रे तुझ्या शब्दांस पुन्हा
मानले मी प्रीत बघ फ़सव्या तुझ्या त्या मृगजळाला

हे शिखर नुसते! , नका अंदाज बांधू वेदनेचा
खूप काही साचले आहे जुने माझ्या तळाला

दाटले आकाश डोळा अंतरंगी वीज तांडव
पण तरी आव्हान देते शीड माझे वादळाला

कासवे रडली हजारो, आसवांचा पूर आला
लाडका मासा कदाचित लागला कोण्या गळाला!!

हे सुखासिन दु:ख माझे, खास दुनियेने दिलेले
वाढते त्याची नशा की, मागुनी घेते छळाला

दाखवू काही नको तू सौख्य अथवा दु:ख 'प्राजू'
सांगना सांडू नको तू पापण्यातील ओघळाला

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहरला मोहोर माझा, का असा पुरता जळाला
सूर्य म्हणतो पावसाचा शाप बघ आला फ़ळाला<<< उत्तम

बोलण्याचे कायदे होते जरी मी पाळलेले
नेमका कोठे कशाने तोल अर्थाचा ढळाला?<<< छान

हे शिखर नुसते! , नका अंदाज बांधू वेदनेचा
खूप काही साचले आहे जुने माझ्या तळाला <<< सुंदर

(पुन्हा - पुन्न्हा - वगैरे वगैरे) Happy

दाटले आकाश डोळा अंतरंगी वीज तांडव
पण तरी आव्हान देते शीड माझे वादळाला

कासवे रडली हजारो, आसवांचा पूर आला
लाडका मासा कदाचित लागला कोण्या गळाला!!>>
सुरेख!

हे सुखासिन दु:ख माझे, खास दुनियेने दिलेले
वाढते त्याची नशा की, मागुनी घेते छळाला>>
यावरून एक शेर आठवला माझा..
सोबती नाही जगी या थोर दुःखासारखा
सुख दिसाया लागले की विकत मी घेतो कळा..

कासवाचा शेर खूप नाविन्यपूर्ण झालाय मस्तच

मतला व ढळाला छान झालेत

तळाला व ओघळाला या दोन शेरांशी मिळते जुळते भाव असलेले माझे २ शेर आजच होवू घातलेत
एकवीन वेळ आलयावर ..... Happy

"बोलण्याचे कायदे होते जरी मी पाळलेले
नेमका कोठे कशाने तोल अर्थाचा ढळाला?"

"दाटले आकाश डोळा अंतरंगी वीज तांडव
पण तरी आव्हान देते शीड माझे वादळाला" >>> हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.
----------------------------------------------------------------------------------------------------

"नेमका कोठे कशाने तोल अर्थाचा ढळाला?" >>> यातील ’ढळला’ ऐवजी वापरलेला ’ढळाला’ हा शब्द काहीसा खटकला.
"मी कशी अन काय भुलले रे तुझ्या शब्दांस पुन्हा" >>> यातील ’पुन्हा’ तितकासा ठीक वाटला नाही.
वैम. कृगैन.