Submitted by अमेय२८०८०७ on 20 May, 2013 - 14:07
गंध ओल्या पाकळ्यांचा वाळताना श्वास झाला
बंधनाचे क्लिष्ट धागे तोडताना त्रास झाला
जाळताना पाहिलेले मी शवांना मानवांच्या
ईश्वराला जाळण्याचा सोहळाही खास झाला
घेतल्या मोजून साऱ्या जन्मव्यापी येरझाऱ्या
सार्थकाचा संचिताशी नेमका व्यत्यास झाला
डाव माझा, दान माझे, मीच बाजी लावलेली
खेळताना 'तू' पणाला लागल्याचा भास झाला
तू दिलेल्या आठवांच्या वेदनांचे गीत केले
हुंदक्याच्या सावलीने षड्ज हा खग्रास झाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घेतल्या मोजून साऱ्या
घेतल्या मोजून साऱ्या जन्मव्यापी येरझाऱ्या
सार्थकाचा संचिताशी नेमका व्यत्यास झाला << छानच >>
...छान गझल
डाव माझा, दान माझे, मीच बाजी
डाव माझा, दान माझे, मीच बाजी लावलेली
खेळताना 'तू' पणाला लागल्याचा भास झाला >>> क्या बात !
डाव माझा, दान माझे, मीच बाजी
डाव माझा, दान माझे, मीच बाजी लावलेली
खेळताना 'तू' पणाला लागल्याचा भास झाला<<<
सुंदर शेर!
व्यत्यास हा शेर आवडला असे म्हणता येणार नाही कारण मला व्यत्यास म्हणजे काय हे माहीत नाही. पण शेरात काहीतरी खोल अर्थ आहे एवढे जाणवले. धन्यवाद.
छान गझल ! बेफि, "व्यत्यास
छान गझल !
बेफि,
"व्यत्यास म्हणजे काय हे माहीत नाही" >>>> एखादा शब्द रसिकास माहीत नसला तर शायराची अशीही पंचायत होऊ शकते. म्हणूनच अनेक थोर शायर, साधे शब्द आणि थेट आशयाचा आग्रह धरत असावेत..
तू दिलेल्या आठवांच्या वेदनांचे गीत केले
हुंदक्याच्या सावलीने षड्ज हा खग्रास झाला>>> खूप आवडला हा शेर
"डाव माझा, दान माझे, मीच बाजी
"डाव माझा, दान माझे, मीच बाजी लावलेली
खेळताना 'तू' पणाला लागल्याचा भास झाला" >>> हा शेर सर्वात छान वाटला. यातील भावार्थ सहजतेने पोहोचतो.
"ईश्वराला जाळण्याचा सोहळाही खास झाला " >>> मिसरा वाचताना प्रभावी वाटला. पण संदर्भ कळला नाही.
’येरझाऱ्या’ >>> ’येरझारा’ असा शब्द आहे. हा शब्द मुळातच अनेकवचनी आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
व्यत्यास (converse) हा शब्द तितकासा कठीण शब्द नाही.
शालेय अभ्यासक्रमात विशेषकरून भूमितीत हा शब्द अनेकदा वापरला जातो.
उदाहरण
विधान : सरळ रेषेच्या कोनाचे माप १८० अंश असते.
व्यत्यास : कोनाचे माप १८० अंश असल्यास, ती सरळ रेषा असते.
(प्रत्येक बाबतीत व्यत्यास खरा(true) च असतो असे नाही.)
“सार्थकाचा संचिताशी नेमका व्यत्यास झाला”
इथे व्यत्यास झाला म्हणजे नेमके उलटे घडले अशा अर्थाने योजल्याप्रमाणे वाटतो.
मिसर्याचा भावार्थ लक्षात आला तरीदेखील, माझ्या मते व्यत्यास हा शब्द या ठिकाणी तितकासा सूट होत नाही.
डाव माझा, दान माझे, मीच बाजी
डाव माझा, दान माझे, मीच बाजी लावलेली
खेळताना 'तू' पणाला लागल्याचा भास झाला
>> सुरेख!!
मतल्यातील पहिली ओळ अवघड वाटली.
व्यत्यास म्हणजे (माझ्या माहितीप्रमाणे) converse. भूमितीमध्ये प्रमेयाचा व्यत्यास असतो. उदा.
"वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब ती जीवा दुभागतो" या प्रमेयाचा व्यत्यास "जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचे केंद्र यांना जोडणारी रेषा जीवेला लंबरूप असते" असा होतो.
व्यत्यासचा अजून एखादा अर्थ असल्यास सांगावा. पण अशाच अर्थी काहीतरी असेल असं समजूनही हा अर्थ मलाही या शेरामध्ये लावता आला नाही. त्यांना व्यस्त प्रमाण अशा अर्थी काही म्हणायचं असावं असं वाटून गेलं.
धन्यवाद!
म्हणजे 'कोरोलरी' का? (आमच्या
म्हणजे 'कोरोलरी' का? (आमच्या सौ. विमलाबाई गरवारे शाळेचे सेमी इंग्लिश उपकार विचारत आहेत)
सुंदर रचना! खूप लयबद्ध आणि
सुंदर रचना! खूप लयबद्ध आणि तितकीच आशयघन! ... खूप आवडली.
तू दिलेल्या आठवांच्या वेदनांचे गीत केले
हुंदक्याच्या सावलीने षड्ज हा खग्रास झाला >> हे तर फार सुरेख!
कोरोलरी म्हणजे उपप्रमेय
कोरोलरी म्हणजे उपप्रमेय (बहुतेक).
उदा. Angle subtended at the centre is double of that subtended at the point on the circumference (on the same side of centre) हे प्रमेय.
Angle subtended in the semicircle is a right angled triangle ही कोरोलरी.
उदाहरणाबद्दल चुभुदेघे.
छान, काही ओळी स्वतंत्ररीत्या
छान, काही ओळी स्वतंत्ररीत्या आवडल्या.
तू पणाला लागल्याचा भास झाला ही ओळ सर्वाधिक.
चपखल आणि सोप्या शब्दांच्या वापराबद्दल सहमत.
शुभेच्छा!
'सोहळा' आणि 'भास' विशेष
'सोहळा' आणि 'भास' विशेष आवडले..
व्यत्यास चा अर्थ converse ने लावून पाहिला पण तितकासा कळला नाही...असो मस्त गझल!
'सोहळा' आणि 'भास' विशेष
'सोहळा' आणि 'भास' विशेष आवडले..
व्यत्यास चा अर्थ converse ने लावून पाहिला पण तितकासा कळला नाही...असो मस्त गझल!
वाह अमेयजी प्रत्येक शेर खास
वाह अमेयजी प्रत्येक शेर खास झाला!!
डाव माझा, दान माझे, मीच बाजी लावलेली
खेळताना 'तू' पणाला लागल्याचा भास झाला <<<< सर्वाधिक आवडला
व्यत्यास : तितकासा सूट होत नाही<< उकाका +१
)
म्हणजे 'कोरोलरी' का?<<<<< नाही "कॉन्व्हर्स" बहुतेक !!.. आमच्या पंढरपुरातील कवठेकर प्रशालेचे सेमीइंग्लिश संस्कार सांगत आहेत (
षड्ज खग्रास होणे ही कल्पना समजली नाही मला त्यातले काही समजत नसल्यामुळे !
ईश्वराला जाळण्याचा सोहळा म्हणजे काय हे ध्यानात आले नाही
असो
प्रत्येक शेर खास झाला आहे हे मात्र खरे !!
खुप खुप खुप सुंदर!!!
खुप खुप खुप सुंदर!!!
सुरेख व्यत्यास चा अर्थ मलाही
सुरेख
व्यत्यास चा अर्थ मलाही नीट लागला नाही
गझल आवडली !
गझल आवडली !
सर्वांनी दिलेल्या अत्यंत
सर्वांनी दिलेल्या अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार. गझलेतील माझ्या पहिल्या एक दोन प्रयत्नांतील ही एक आहे त्यामुळे इथे देताना थोडे घाबरतच होतो. पण आज संध्याकाळी घरी आल्यावर वरील प्रतिसाद वाचताना आनंद झालाय. वेगवेगळ्या मतांची नोंद घेऊन यापुढचे शिकणे चालू राहील. विशेषतः आशयात अधिक थेटपणा कसा आणावा आणि शब्दांत/ प्रतिमांत साधेपणा कसा जपावा याबद्दल दिलेल्या सूचना मोलाच्या आहेत.
व्यत्यास हा भूमितीत ज्या अर्थाने वापरतात तोच अर्थ अभिप्रेत आहे म्हणजे शेवटच्या हिशेबावेळी लक्षात आले की सार्थक - अर्थात आयुष्यात कर्म करून केलेली कमाई - आणि ज्याला संचित समजत होतो त्या दोहोंची गणती सारखीच भरली. सगळा हिशेब इथेच पूर्ण होतो असे सांगायचे होते.
ईश्वराला जाळण्याचा..मध्ये महत्त्व अथवा खरी ओळख कळली नाही तर देवाच्या (किंवा देवतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या) नशिबीही सर्वसामान्य माणसासारखे भोग येतात हा विचार आहे. षड्ज..मध्ये वेदनांचे गीत करून सुसह्य करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी हुंदक्यामुळे स्वर झाकोळून गेला असा विचार होता.
पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे.
वा अमेयजी आता खुलाश्यांमुळे
वा अमेयजी
आता खुलाश्यांमुळे ते ते शेर अधिक समजून घ्यायला मदत झाली
व्यत्यास चे काहीतेरी कराच राव नाही म्हणजे नाहीच सूट होत तो शब्द तुमच्या अभिप्रेत अर्थाला -वैयक्तिक मत !! गैरसमज नसावा
एखादा बदल आवश्यक वाटतो आहे देवपूरकर सराना गाठा
पहिलाच प्रयत्न छान आहे अमेय,
पहिलाच प्रयत्न छान आहे अमेय, अभिव्यक्तीला कवितागत शैलीच्या सवयी असणारच, गझलच्या अंगाने त्यावर प्रयोग करत रहावे!
घेतल्या मोजून साऱ्या जन्मव्यापी येरझाऱ्या
सार्थकाचा संचिताशी नेमका व्यत्यास झाला
माझा प्रयास- व्यत्यास-कॉन्वर्स - ''सॉक्रेटिस माणूस आहे'' म्हणून ''माणूस सॉक्रेटिस आहे'' असे होत नाही (as converse is not always true in logic) या चालीवर गेल्यास -
-'सार्थक संचित आहे'' (श्रेय कर्मगत आहे) हे 'संचित सार्थक आहे' (कर्मफळ हेच श्रेय म्हणून मिळाले आहे'' ) हा व्यत्यास जुळतो आहे असे कवी म्हणतोय म्हणजे जन्मव्यापी येरझार्यांमध्ये कर्म काय अन परिणाम काय दोन्ही वर्तुळाच्या परिघावरल्या सुरुवातीच्या अन शेवटाच्या बिंदूंप्रमाणे सरमिसळलेले आहे असा क्लिष्ट वाटणारा पण अत्यंत वेगळा विचार जाणवला.
'ईश्वराला जाळण्याचा..' थोडं खटकलं, ईश्वर ही संकल्पना जास्त अमूर्ततेकडे झुकते,देव किंवा देवतुल्य माणसं यात समूर्ततेची मात्रा अधिक आहे, जरा वेगळा शब्द त्याच अर्थासाठी हवा होता असे वाटले.
पु.ले.शु.!
कर्म अन् फल वर्तुळाच्या
कर्म अन् फल वर्तुळाच्या परिघावरल्या सुरुवातीच्या अन शेवटाच्या बिंदूंप्रमाणे सरमिसळलेले आहे असा अर्थ मला तरी लागला नाही आहे / काढला गेलेला पटत नाही आहे
सार्थक हेच संचित आहे किंवा संचित हेच सार्थक असाही अर्थ काढताना अड्चणी जाणवल्या ...
सार्थकाचा संचिताशी व्यत्यास होणे ही कविकल्पना येथे माडली आहे व्यत्यास चा अर्थ उलटे / विरुद्ध असा काहीसा होतो
दोन्ही एकच आहेत असे अमेय यांच्या स्पष्टीकरणात जे म्हटले गेले आहे त्याच्याशी व्यत्यास हा शब्द अर्थाअर्थी जुळत नाही
आधीच्या ओळीत हिशेब केला गेला असा उल्लेख मात्र आहे त्यावरून व्यत्यास हा भौमितिक शब्द काढून एखादा व्यावहारिक शब्द योजायला हवा होता असे वाटते