चांदणे गेले कुठे?

Submitted by निशिकांत on 20 May, 2013 - 10:36

प्रेम सरले, भाव ह्रदयी दाटणे गेले कुठे?
शिंपिले जे जीवनी तू चांदणे गेले कुठे?

रोमरोमातून फुलतो लागता चाहुल तुझी
जीवघेणे पैंजणांचे वाजणे गेले कुठे?

भेटता तू खास कांही हरवल्यागत वाटते
वाट बघण्याच्या सुखाचे नांदणे गेले कुठे?

बाग का ओसाड झाली? ना कळ्या ना पाकळ्या
गंधवेडे शोधती गंधाळणे गेले कुठे?

बंधने लाखो मुलींवर शोडषी ओलांडता
कालचे निष्पाप हसणे, खेळणे गेले कुठे?

लोप झाला संस्कृतीचा आवडे का पश्चिमा ?
गोड अंगाई जुनी अन् पाळणे गेले कुठए ?

जाहिराती आणि जिंगल्स पाठ पोरांना किती !
श्लोक गीतेचे अताशा घोकणे गेले कुठे ?

व्यर्थ का "निशिकांत" लिहिशी पोटतिडकीने असा?
आवडे लोकास टीव्ही वाचणे गेले कुठे ?

दु:ख का "निशिकांत" इतके भळभळाया लागले?
संयमी काव्यात आता रंगणे गेले कुठे ?

निशिकाट देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच शेर उत्तम काका

आवडे लोकास टीव्ही ..वाचणे गेले कुठे ? <<< ही ओळ जरा जमली नाही असे वाटले (माझा आगाऊपणा जास्त झाल्यास क्षमस्व काका :))

उत्तम....खुप आवडली. सगळे शेर उत्तम जमलेत. फक्त जिंगल्सचा शेर वाचताना थोडी गडबड वाटते आहे. जाणकारांनी त्यावर बोलावे (अन मी बोलू नये) एवढेच.

निर्मिणे कवितेस आता राहिले मागे जरी
वाहत्या गझलांतूनी ओसंडणे गेले कुठे??

-----------टोकू Happy

खूप आवडली,

बंधने लाखो मुलींवर शोडषी ओलांडता
कालचे निष्पाप हसणे, खेळणे गेले कुठे?

लोप झाला संस्कृतीचा आवडे का पश्चिमा ?
गोड अंगाई जुनी अन् पाळणे गेले कुठए ? >>>>> जास्त आवडले

रोमरोमातून फुलतो लागता चाहुल तुझी
जीवघेणे पैंजणांचे वाजणे गेले कुठे?

भेटता तू खास कांही हरवल्यागत वाटते
वाट बघण्याच्या सुखाचे नांदणे गेले कुठे?<<<

मस्त!

भेटता तू खास काही हरवल्यागत वाटते - ही ओळ फार आवडली.

कैलासरावांच्या 'श्वास झाला मोकळा की कोंडल्यागत वाटते'चीही आठवण आली.

गझलही छान!

(एक खूप जुना मुद्दा चर्चेत आला होता तोही आठवला - गझलेत संमिश्र शेर घेऊन काहीवेळा रसभंग होऊ शकत असेल का असा तो मुद्दा होता.)

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

संमिश्र शेर <<<< म्हणजे काय बेफीजी ? सविस्तर सांगा ना !
ही चर्चा कुठे वाचायला मिळत असेल तर लिंकही द्या