अमानवीय- मला पडलेले काही प्रश्न?

Submitted by चिखलु on 17 May, 2013 - 10:49

मागच्या काही दिवसात भरपुर भुतं स्वप्नात आली आणि आमच्यावर संशोधन करा, लेख पाडा असं म्हणु लागली, अर्थात तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही याचा मला विश्वास आहेच. पण जौद्या आता भुतच
मानगुटीवर बसल्यावर लेख तर लिहावाच लागणार आणि पाडायचं मी तुमच्यावर सोडुन देतो. कसं?

नक्की कुठली व्यक्ती कोणते भुत होणार हे कसं ठरवलं जातं? पिशाच्च, देवचार, भुत, हडळ, डाकीण हे वर्गीकरण नक्की कोणत्या आधारावर होते? नक्की कोणत्या बायका हडळ होतात? म्ह्ण्जे हडळ व्हायचं काय क्वालिफिकेशन असावं? कुरुप चेहरा, लांब केस, पिंजारलेले केस, लांब नखं(बाकी या ह्डळ जाम आळशी असाव्यात नखं केस कापत नाहीत म्ह्ण्जे टू मच) बरेच वर्ष डाक बंगल्यातल्या भुतीणीला डाकीण म्हणतात असं वाटायच मला. आणि डायन म्ह्ण्जे मेलेली दाक्षिणात्य भुतीण. (कारण त्यांच्यात नावाच्या शेवटी 'न' लिहितात जसं मुरुगन, कुलशेकरन) रच्याकने कुलशेकरन आणि केळशिकरण मध्ये नक्की काय साम्य असावं? आणि शिरकाण हा शब्द शिकरण शब्दावरुन आला असावा का? जसं केळ शहिद होते शिकरणात तसं युद्धात सैन्य शहिद म्हणजेच शिकरण आय मीन शिरकाण?

भुतांचे रोमँटिक आयुष्य कसे असेल? व्हॅलेंटाइन डे ला भुत हडळीला काय गिफ्ट देत असावेत? सेनेची भुते मग अशा वेळेस काय करतात? एक भुत दुसर्या भुतावर्/हडळीवर इ इ प्रेम करतात का? त्यांच्यात लग्न वगैरे होतात की डायरेक्ट लीव इन? दाखवायचे कार्यक्रम पिंपळाच्या झाडावर होतात का? म्हण्जे मुहुर्त पाहुन अमावसेला इच्छुक भुत मस्त आंघोळ, दाढी करुन (की वाढवुन) हडळीला पहायला जातोय आणि तिकडे हडळ झाडाला उलटी लटकलेली आहे असं काही असतं का? मग त्यांचा मेनु काय असतो जेवायचा? जसं माणसात सालस कन्या, तसं भुतांमध्ये सालस, सुसंस्कृत, विनयी हडळ असं काही आहे का? कसं वाटतं ऐकायला निर्व्यसनी, कर्तुत्ववान भुत? मुलीला काय काय येतं यामध्ये? माणसांना घाबरवणे, खिमा करणे, अजुन काय असावं? चांगली हडळ हे हॅपीली मॅरीड सारखंच वाटतं ऐकायला. दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत एकमेकांना. बरं ह्डळपित्याने ह्डळदान करायला यावे कसं वाटतं ऐकुन? एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर भुतांमध्ये प्रचलित आहेत का? एमॅअ करायला या भुतांना एकांत मिळतो का? भुतांमध्ये गटग होते का? आपल्या गझलात जसं मढं, प्रेत, कलेवर, प्रेम इ इ गोष्टी आहेत तसं त्यांच्या गझलांमध्ये जीवन, नरडा, घोट, खुन, इ इ असावेत का? अनुभवी लोकांनी त्यांचे अनुभव सांगावेत कृपया. चालु जीवनातील छंद मेल्यावरही राहतात का?

त्यांना मनुष्यप्राण्याची बाधा होते का? हडळीचे केस इतके लांब असतात तर ती कुठला शँपु वापरते? तिच्या डोक्यात कोंडा होत असेल ना? त्यांच्यात सध्या कुठल्या हेअरस्टायल ची फॅशन असेल? हडळ इतक्या लांब केसाच्या वेण्या घालण्यात त्यांचा बराच वेळ जात असेल. फावल्या वेळात माणसांना घाबरवणे, पिडणे, तोंडी लावण्यापुरते बदले घेणे, बाकिच्या भुतांवर लाइनी मारणे, इतर हडळीना नावे ठेवणे इ इ काम करत असतील ना? आपल्या घराची, शेतीची जशी नोंद होते तशी नोंद भुतं आणि हडळ कुणाकडे करतात का? मग त्यातही भ्रष्टाचार होतो का? मग ते कागद पत्तर कुठे ठेवतात? वारसा हक्काने पिंपळ, झपाटलेले घरं, वाडे पुढच्या पिढीतल्या भुतांकडे जातात का? इस्टेट वरुन भुतं भाडंणं करतात का?

हडळ भुत तत्सम प्राणी पांढर्या रंगांचेच कापडं का घालतात? रंगीत कपड्यांचा माल त्यांच्या मार्केट मध्ये आला नाही का अजुन? चायनीज भुते इकडे लक्ष देतील काय? त्यांचे कपडे इतके स्वच्छ असतात, मला नेहमी प्रश्न पडतो की हे कुठुल्या लाँड्रीत कपडे धुवुन आणत असतील? बराच खर्च येत असेल कपडे स्वच्छ ठेवायचा. इतक्या घाण पडीक जागेत रहायचे आणि इतके स्वच्छ कपडे घालायचे , हे असं काय डेडली कॉम्बिनेशन आहे देवास सॉरी भुतास ठावुक. बाकी दिवसभर सगळ्या हडळी कपडे धुवायच्या मोहिमेवर जात असाव्यात. दिवसा कपडे आणि रात्री माणसं धुवायचे असं काही त्यांचा दिनक्रम असावा, मग फावल्या वेळेत पत्ते कुटत बसत असतील नाही तर हाडं कवट्या कुटत बसत असतील.

भुतांमध्ये अध्यात्म असते का? त्यांच्यामध्ये धर्म आहेत काय? मग त्यांच्यात धर्मावरुन दंगली होतात काय? हडळीवरुन होत असतील तर होउ देत. भुतांना चष्मे असतात का? भुतं फावल्या वेळात पत्ते कुटतात का? जसं शहरात माणसांची गर्दी असते तसं निर्जन ठिकाणी भुतांची गर्दी असते का? भुतांच्या माणसांकडुन काय अपेक्षा असतात? ते मनुष्य गणाला का दर्शन देतात? भुतं साक्षर असतात का? हा लेख भुतं वाचायचे चान्सेस किती? भुतं चहा पितात का?

भुतांना कवट्या का आवडत असाव्या? की कवट्या हे त्यांच्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे का? बहुतेक भुत त्यांचे घर सजवायला कवट्या वापरत असावेत. आता भुतं जाणार स्मशानात फिरायला मग आणत असतील एक दोन कवट्या आणि हाडं तेवढीच त्यांच्या पोरा बाळांना करमणुक. आपण आपले उगाचच घाबरतो. स्मशानात अजुन दुसरं तरी काय मिळणार म्हणा. हॉरर ची काय कॉन्सेप्ट असावी भुतांमध्ये? हॉरर मुव्ही म्हणुन भुतं काय पाहत असतील?

चकवा प्रकाराची उत्पत्ती कशी होत असावी? बहुतेक हे चकवा लोक मुम्बईतले पुर्वाश्रमीची माणसं असावीत जे नुक्कड्वर बसुन पत्ते(चुकीचे) सांगत असावीत, जसं आगेके चौकसे डावे बाजु वळनेका. आणि हीच सवय चकवा(भुत) बनल्यावर सुद्धा कायम असावी, त्यामुळे लोकांना चकवणे आणि मजा बघणे हा यांचा टायमपास असावा, ही भुते फक्त रस्ता चुकवतात इतर त्रास ऐकिवात नाही. शाळेत असताना या चकव्यांनी मला फार छळलय, मी शाळेत जायला घरातुन निघायचो आणि थोड्याच वेळात स्वत:ला थियेटर मध्ये असलेला पहायचो. पण घरी आणि शाळेत मास्तर भुताने मला थियेटरला आणले यावर विश्वास ठेवायचे नाही म्हणुन फार मार खावा लागायचा. पण त्या चकव्याने माझा पिच्छा सोडला नाही आणि भरपुर पिक्चर पहायला लावले. पण लोक भुतावर विश्वास ठेवत नाहीत आणि चिखल्यावर तर नाहीच नाही. Happy

सोलापुरला कुठल्यातरी किल्ल्यात अंगाईगीत गाणारे भुत आहे म्हणतात, काय तर रात्री ते भुत अंगाई गाते रोज. ती पण एकच, यावरुन खालील निष्कर्ष काढता येतो:
१. त्या हडळेला एकच गाणे येते
२. भुतांमध्ये एकच अंगाईगीत आहे
३. त्या हडळेची कॅसेट अडकली आहे.
४. हडळ कुठल्यातरी स्पर्धेसाठी अंगाईगीताची प्रॅक्टीस करत आहे.
किती ती निरुपद्रवी हडळ, लोक उगीच बदनाम करतात हडळींना. बिचारी गाणे गाते, लोकांना अंगाईगीत गावुन झोपवते आणि तुम्ही लोक उगाच तिचा तर्रास करुन घेता. आता ती बिचारी इतकी गाढ झोपी घालते की लोक डायरेक्ट दुसर्याच जगात जागे होतात यात बिचारीची काय चुक.

असो, जगलो वाचलो तर पुढचा भाग लिहिल, पिंपळावर बसुन कंटाळा आलाय मला. आज बर्याच लोकांना मला थियेटर्मध्ये पोचवायचं आहे. चला येतो मी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सार्या प्रश्नांची उत्तरे.... कवटीचाफा.... या आयडी कडे आधीपासूनच आहे....त्यांच्या कडून मिळवावीत

शिरवळकरांचे लटकंती वाचले आहे का ?>>> +१
तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतिल त्या पुस्तकात.

सुशिंच्या आवडलेल्या पुस्तकांच्या यादित दुनियदारी नंतर लटकंती दुसर्‍या स्थानावर Happy

चिखलोजी, चित्रपटात जे दाखविले तेच आपल्या मनावर ठासुन बसले आहे. (यापेक्षा दिग्दर्शक अजुन कोणत्या प्रकारे हडळ वा भूत दाखवू शकले असते पण लोक फार घाबरले नसते ना) रामायण पाहूनही कित्येकानी सीता अशी होती का? किंवा युध्द असे होत होते काय? असे अनेक प्रश्न विचारले होते.
अवांतर लिखाना सारेच प्रश्न मस्त !

चिखल्या, Lol

अमेरिकेतली भुते कशी आहेत? तिथेही पडक्या वाडयात, पिंपळावरच, विहिरीत रहातात का? तिथल्या कब्रस्तानात गटारी अमावस्येला कोजागिरी साजरी होते का?

जशी आजकाल माणसांमध्ये कोजागिरी पौर्णिमेला गटारी साजरी केली जाते काही काही ठिकाणी..

इत्यादी इत्यादी मला पडलेले प्रश्न Proud

चिखल्या यु आर ग्रेट , चिखल्या, यू रॉक !
>>> व्वा
उत्तरे मिळाली तर, इथेच मिळतील स्मित
>>> लेट्स सी
शिरवळकरांचे लटकंती वाचले आहे का ? स्मित
>>> नाही, पण नक्कीच वाचेल
चिखलोजी, चित्रपटात जे दाखविले तेच आपल्या मनावर ठासुन बसले आहे
>> हे सगळं एक गम्मत म्हणुन लिहिलय, रच्याकने मी यांच्या जगात अजुन नवीन आहे Happy
हॉरर मुव्ही म्हणुन भुतं काय पाहत असतील? >>> बडजात्यांचे शिणूमे??? का करण जोहर?
>> Lol
चिखल्या तुझ्या मैत्रिणीला कोणत्या कॅटेगरीत म्हणावी मग आता डोळा मारा
>>>तुला फारच काळजी माझ्या मैत्रिणेची. Wink
अमेरिकेतली भुते कशी आहेत? तिथेही पडक्या वाडयात, पिंपळावरच, विहिरीत रहातात का? तिथल्या कब्रस्तानात गटारी अमावस्येला कोजागिरी साजरी होते का?
>>इथे एलियन लोकांनी पिंपळांवर अतिक्रमण केलय, मी सध्या बाटलीत राहतोय
इथे आम्ही रोजच गटारी करतो, सणासुदीला आणि अमावस्या पौर्णिमेला उपवास असतो आमचा

मस्तच लेख.
हा लेख वाचून मला "तीन तेरा पिंपळ पान " ही मराठी सीरीयल आठवली. त्याची थीम पण अशीच होती. भूतांचीच कॉलनी दाखवली होती. छान सीरीयल होती.

बापरे चिखल्या काय सुटलायस? भूतंही घाबरतिल अस्ली प्रश्नांची फैर. त्यातही हडळींवरचे फारच प्रश्नं.. किती कित्ती तो इंटरेस्ट हडळींमधे नै?
(मजा आली वाचताना)

>>>>> आज बर्याच लोकांना मला थियेटर्मध्ये पोचवायचं आहे. <<<<<
बर पण मग या कामाकरता चित्रपटनिर्माता/थेटरमालक तुमच्या नावाने काहि काढून ठेवतो की नाही?
बघा बोवा, फुकट काम करुन घ्यायचे अन तुमचा घास बुडवायचे Proud

हो ना!! एकदम झक्कास लेख! कल्पनाशक्ती कितीही ताणता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Lol

चांगली हडळ हे हॅपीली मॅरीड सारखंच वाटतं ऐकायला. दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत एकमेकांना. >> अगदी अगदी Lol