सायकलविषयी सर्व काही....१

Submitted by आशुचँप on 8 May, 2013 - 11:26

गेल्यावर्षी सायकलविषयी माहीती घेण्यासाठी माबोवर पोस्ट टाकली होती. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेव्हाच खूणगाठ बांधली होती की भावी सायकलपटूंसाठी एखादी पोस्ट टाकायचीच...
आता गेले वर्षभरभर मी नित्यनेमाने सायकल चालवत आहे...सर्वात आधी घेताना हर्क्युलीसची रायडर अॅक्ट ११० घेतली...साधारण १०००किमी अंतर झाल्यावर ती भावाला दिली आणि परदेशी बनावटीची स्कॉट एक्स ७० ही सायकल घेतली. या जानेवारीपासून साधारण ८५० किमी चालवून झाले आहे. त्यात एकदा साडेपाच तासात १००किमी, सिंहगड चढाई असे काही उपक्रमही केले. त्यामुळे आंतरजालावरुन गोळा केलेली माहीती, माझा व्यक्तिगत अनुभव असे करून नवोदितांना हा सल्ला...
(असाही जन्मजात पुणेकर असल्याने सल्ला देण्यासाठी पात्रतेची अट आम्ही पाळत नाही ही गोष्ट वेगळी)

१. सल्ला क्र १ सायकल घ्यायचा विचार करताय...जरुर घ्या...
अतिशय सुखकर, हलके, स्वस्त, विना कटकटीचे, विना प्रदुषणाचे, तब्येतीला चांगले असे वाहन. विशेषत ज्यांचे शाळा, कॉलेज, ऑफीस ५-१० किमीच्या परिघात आहे त्यांनी तर आवर्जून घ्यावे. हिच वेळ आहे सायकल संस्कृती पुनरज्जीवीत करण्याची. आपल्याकडे विनाकारण सायकल म्हणजे आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातील लोकांचे वाहन म्हणून पाहीले जाते. त्यामुळे कित्येकदा शक्य असूनही केवळ प्रतिष्ठेच्या कारणासाठी अनेकजण धूर काढत जाणे पसंत करतात.
पण आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे. मी गेले वर्षभर नेमाने ऑफीसला सायकलने जातो. सुरुवातीला काही जणांनी थोडी टिंगल केली पण मी चिकाटी सोडली नाही. आता माझ्या बॉससकट आणखीही काही जण सायकल घेण्याचा गांभिर्याने विचार करत आहेत. गेले काही आठवडे सगळ्यांना सायकलचे ब्रँड, किंमती याची माहीती देण्याचे कार्य सुरु आहे. त्यातूनच खरे तर या पोस्टचा जन्म झाला.

आणि पुण्यासारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बोंबललेली आहे तिथे तर सायकल पर्यायी वाहन म्हणून असणे अगदी आवश्यक. अगदी जरी रोजच्या रोज नाही वापरली तरी आठवड्यातून २-३ वेळेस, विकांताला एखादी लांबवरची रपेट इतक्यासाठी जरी वापर झाला तरी उत्तम. मुळात घेणे आणि चालवणे हीच पहिली पायरी.

आता सायकल घ्या म्हणल्यावर अनेकजण अडचणींचा पाढा वाचतात. त्यापैकी प्रामुख्याने सांगितल्या जाणार्या अडचणींचा परामर्ष घेऊ

१. घरापासून ऑफीस लांब आहे - मुंबई उपनगरात राहणारे सोडले तर बऱ्याच शहरात ऑफीस १० ते १५ किमीच्या परिघात असते. सुरुवातीला हे अंतर नक्कीच जास्त वाटेल पण एकदा हळूहळू सुरुवात केली तर हे अंतर फार नाही याची जाणीव होईल.

२. वेळ खूप जातो - माझे ऑफीस बरोबर १० किमी अंतरावर आहे आणि ट्रॅफिकमध्ये मला बाईकने जायला अर्धा तास तरी लागतोच..तितकाच वेळ मला सायकलवरूनही लागतो. अगदी रमत गमत गेलो तरी ट्रॅफिकच्या कोंडीतून सायकल सुळकन काढता येत असल्याने काहीच अडचण येत नाही. अनेकजण बसची वाट पाहत, एक दोन बस बदलून जाताना जेवढा वेळ घालवतात त्यापेक्षा नक्कीच कमी वेळ सायकलवरून लागतो.

३. सायकलवर जाताना सामान घेऊन जाता येत नाही - रोज घरी येताना किराणा माल, भाजी किंवा तत्सम सामान घेऊन येणार्या गृहीणी सोडल्यातर आपण असे सामान रोज काय आणतो. ऑफीसचे सामान म्हणले तर एका छोटेखानी सॅकमध्ये डबा, पाण्याची बाटली, मोबाईल, पाकिट, रुमाल, ऑफीसची कागदपत्रे असे सगळे काही छानपैकी बसते. माझ्या सॅकमध्ये तर कॅमेरा, लॅपटॉप, एक स्पेअर टीशर्ट, टर्किश नॅपकिन असेही असते.

४. कपडे खराब होतात - अनेकांना फॉर्मल कपडे घालून सायकलवर जाणे फारच चमत्कारीक वाटते. पण आजकाल अनेक आयटी कंपन्या आणि अन्य ऑफीसमध्ये शॉवरची सोय असते. त्यामुळे साध्या कपड्यात ऑफीसला जाऊन तिथे कपडे बदलणे शक्य असते. एका कपड्याचा जोड व्यवस्थित ठेवला तर इस्त्री न बिघडता नेणे अगदी सोपे आहे. शॉवरची सोय नसली तर पँट व्यवस्थित दुमडून किंवा त्याला क्लिप लाऊन आणि वरती टीशर्ट घालून जाता येते. ऑफीसच्या बाथरूममध्ये जाऊन टीशर्ट बदलून शर्ट घालता येतो.

५. सायकल चोरीला गेली तर, पंक्चर झाली तर - सायकल व्यवस्थित पार्क करून वेगळ्या लॉकने बांधून ठेवली तर काही अडचण येत नाही. शक्य असल्यास सिक्युरीटी गार्डच्या नजरेत राहील अशा ठिकाणी सायकल ठेवावी. पंक्चर झाली तर बाईक पंक्चर झाल्यावर करता तेच. उलट बाईक ढकलण्यापेक्षा सायकल ढकलणे कधीही सोपे.

या व्यतिरिक्तही काही शंका असतील तर जरुर विचारा मी माझ्या परीने शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या पाहण्यात सायकल चालवणार्या महिला नसल्याने त्यांच्या अडचणींचे निराकरण त्या कशा करतात हे सांगू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल क्षमस्व.

पुढच्या भागात सायकल घेण्यापूर्वी...
कुठली सायकल घ्यावी, सायकलचे प्रकार, सायकलींचे ब्रँड, किंमती इ.इ.
http://www.maayboli.com/node/42919

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना
लाजो - हे सगळं भारतात होण्याची नितांत आवश्यकता आहे. बॉस सहीये तुमचा...
हो आणि ते मेंडीग कीट, हवा भरायचा पंप सगळं आहे. सुदैवाने अजून गरज भासली नाहीये.

डेझी - अभिनंदन तुमचे आणि तुमच्या अहोंचेही..इतकी छान गिफ्ट दिल्याबद्दल...मस्त वाटत असेल ना अशा ट्रेलवर सायकल चालवायला...एखाद्या सायकल ट्रीपचा सचित्र वृत्तांत येऊ द्या...आवडेल वाचायला...

माधव - जर वेळच्या वेळी थोडेफार घरच्या घरी सर्विसिंग केले तर कुणाकडे देण्याची गरज पडत नाही. अगदी वर्षातून एकदा चांगल्या सायकल सर्विस सेंटरमध्ये देऊन ब्रेक्स, चेन आणि अन्य पार्ट्स तपासून घ्यायचे. घरच्या घरी सर्विसिंग, मेंटेनन्सची माहीती आगामी भागात तपशीलवार देतो आहे. शक्यतो रस्त्यावरच्या रिपेंरिगवाल्याकडे महागड्या सायकली देऊच नये.
हवा भरण्याचा मुद्दा बरोबर आहे...यासाठी खास हवा भरायचे पंप मिळतात. साधारण ८००-९०० पर्यंत..त्याला प्रेशर कितीने भरले हे दाखवणारा इंडिकेटरपण असतो. त्यामुळे आवश्यक तितकीच हवा भरली जाते. एखादा असा पंप घरात हवाच.

अश्विनी - नक्कीच जमेल...सुरुवात तर करून पहा...

साधना - जर असा एखादा ग्रुप तुमच्या ऑफिसच्या वेळेत जात असेल तर त्यांच्याबरोबरच जाणे कधीही सुरक्षित. हे ट्रकवाले अनेकदा बेदरकारपणे चालवत असतात. सायकलचे एक छोटेखानी रिपेरिंग किट मिळते. ते घेतल्यावर किरकोळ कामांसाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.

भरपूर सायकल चालवा, निरोगी रहा, पेट्रोल वाचवा आणि आनंदी रहा >>> आरोग्यदायी लेखा बद्द्ल धन्यवाद आशु Happy १० वी ते १२ वी तीन वर्ष सायकल बरीच चालवली गोरेगावच्या आरे कॉलनीत सायकल चालवणे हा सुंदर अनुभव असायचा.
आता पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही.
पण सायकल चालविणार्‍या व्यक्तीचे वजन (८० ते ९० कि.) आणि उंची (५.९ ) असेल तर साधारण कोणती सायकल घ्यावी.

इनमीनतीन - सर्वसाधारणपणे सायकली फ्रेमनुसार गणल्या जातात. तुमच्यासाठी मिडीयम साईझची फ्रेम योग्य ठरेल असा अंदाज आहे. कुठली घ्यायची हे तुमचे बजेट, वापर आणि हौस यावर अवलंबून आहे. विपूत तपशील देऊ शकलात तर मी स्पेसिफिक माहीती देऊ शकेन.

घरच्या घरी सर्विसिंग, मेंटेनन्सची माहीती आगामी भागात तपशीलवार देतो आहे

खुप गरज आहे Happy

८५० किमी चार-पाच महिन्यात......

ग्रेट्ट्ट्ट्ट्ट... Happy
वाचतोय.

छान लेख.

पेट्रोल भरणे परवडेनासे झाल्यावर गेल्या दोन महिन्यापासून मी ऑफिसला सायकलने जातोयेतो. फक्त साडेतिन किमीवर् ऑफिस असल्याने शाळेत जायचो तेव्हाची आठवण होते. पण तब्येत टुणटुणीत रहात्ये.
सुरवातीला थोडा त्रास झाला कारण तब्बल एकवीस बावीस वर्षांनंतर सायकल चालविणार होतो.
वातामुळे पायात क्रॅम्प्स यायचे ते थाम्बलेत.
मध्यंतरी पुणे युनिव्हर्सिटी ते निगडी असे १८ किमी अंतर एका दमात ५५ मिनिटात कापले. तसेच आळंदी अलिकडे डुडुळगावलाही जाऊन आलो (जाऊनयेऊन ३१ किमि). हळू हळू सराव वाढवित नेणार म्हणजे मग पुढील वीस वर्षाकरता तब्येतीची बेगमी होईल.

मायबोलीवरील तुझ्या अन केदार व अन्य आदर्श समोर ठेवले आहेत. ते करतात/करु शकतात तर मी का करू नको ही इर्ष्याही मनात जागवतोय. अन हे आत्ताच याच वयात करणे आवश्यक आहे, तरच पुढील वीस वर्षे, महागड्या न परवडणार्‍या वैद्यकीय उपचाराशिवाय जगता येईल हे मनाला बजावतोय.

माझ वजन ८८ किलो असुन उन्चि ५ फुट ८ इन्च आहे आणि बजेट ८०००. मला प्लिज सायकल सुचवा.
ओफिस ११ किमी दुर आहे (पुणेकरान्साठी सन्दर्भः फुरसुन्गी --> उन्ड्री --> पिसोळी --> कोन्ढवा = रा़ज्यमहामार्ग???)

खरेतर २ वर्शान्पुरविच घ्यायची होती...आता जमेल बहुतेक.

माझं ऑफिस ६.५ किमी आहे घरापासून, आणि तसाही माजिवड्यात शेयर सायकल चा स्टॅन्ड बनलाय आज ना उद्या तो चालू होईल, त्यामुळे बरेच लोक सायकल वापरतील, तर घरच्यांना पटवायला अवघड नाही होणार सायकल साठी. तुम्ही सांगितलंय कि महिलांच्या अडचणींच निराकरण करू शकत नाही, पण तरीही पंजाबी ड्रेस घालून सायकल चालवता येईल का? तशी मी १०वीत असताना शेवटची सायकल चालयवलीय पण ते खेळ म्हणून, आत्ता जर ऑफिस ला घेऊन यायची तर ते जमेल कि नाही हा पहिला मोठा प्रश्न आहे. स्कूटर ला आपण सिग्नल देऊ शकतो पण सायकल ला डावा-उजवा सिग्नल हातानेच देता का? असे खूप प्रश्न आहेत, सायकल घ्यायची हे पक्क केलाय पण आधी सगळी माहिती गोळा करतेय त्यात हा धागा म्हणजे खूप मदतगार झालाय.
इत्तर कोणी स्त्रिया सायकल वापरात असतील तर त्यांनी मदत करा.

ठाण्यात ऑफिसला ये जा करण्यासाठी सायकल वापरणार असाल तर माझा अनुभवाचा सल्ला.

आधी रस्ता नीट बघून घ्या. ऑफिसच्या वेळेलाच सर्वात जास्त वाहने रस्त्यावर असतात. खूप ट्रॅफिक नको कारण धूरामुळे घशात खवखवायला लागतं. धुर नाकातोंडात जाऊन घशात काळे डिपॉझिट्स तयार होतात. लेने के देने पडू नये. ठाण्यात असतांना माझ्यासोबत असं झालं, मी दोन महिने सायकल ऑफिसला नेली पण प्रदूषणामुळे हालत खराब झाली. त्यात मास्क वगैरे लावून सायकलींग करत ऑफिसला जाणे जरा टू मच होतं. माजिवाडा फ्लाय ओवर झाल्यापासून कशी परिस्थिती आहे ते माहित नाही. पण थोडं ट्रायल करुन बघा.

ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावरुन येता येत असेल तर उत्तम होईल. दुसरे असे की चढ उतार किती आहेत, दम लागेल का, जाता येता घाम फुटून अवस्था खराब होते की कसे ते बघा.

सगळ्यात महत्त्वाचे. गिअरवाली महागडी सायकल ऑफिसमध्ये तुमच्या डोळ्यासमोर सतत राहू शकत नसेल तर अजिबात त्या फंदात पडू नका. आपल्याकडे जिज्ञासू पब्लिक खिशाला चुना लावायला फार उत्सुक असते.

सायकल घ्यायची हे पक्क केलाय << कोणाची मिळत असेल तर लगेच चालवायला सुरुवात करा.
सायकल ला डावा-उजवा सिग्नल हातानेच देता का? << रस्त्यावरील रहदारी , गाड्यांचा वेग, आपला वेग या गोष्टी विचारात घेउन हाताने सिग्नल द्यावेत. आपल्या सुरक्षेसाठी तरी.
६.५ किमी असेल तर एकदम आरामात जाता येईल.

नानाकळा आणि ससा धन्स
मी सध्या दुचाकी वापरते आणि कोलशेत रोड ने आल्यामुळे तिथे ट्रॅफिक नसते अर्धा किमी फक्त जास्त वाहनं असतात त्यामुळे मला झेपलं तर नेऊ शकते सायकल आणि पार्किंग चा पण प्रश्न नाही. पण आधी ट्रायल घ्यावी लागेल.

पंजाबी ड्रेस घालून सायकल चालवता येईल का?

हो अगदीच येईल की. फक्त ओढणी किंवा ड्रेसचा फरफरता भाग चाकात, चेनमध्ये येणार नाही अशा पद्धतीने घट्ट घेतला की झाले. पायघोळ सलवार वगैरे असेल तर चेनचे ग्रीज लागून खराब होईल आणि त्याचे डाग लवकर निघत नाहीत. मला जिन्सला तरी हा अनुभव आलाय, तेव्हा ती खबरदारी घ्यायला हवी.

खूप ट्रॅफिक नको कारण धूरामुळे घशात खवखवायला लागतं. धुर नाकातोंडात जाऊन घशात काळे डिपॉझिट्स तयार होतात. लेने के देने पडू नये.

बापरे ठाण्याला इतके भयाण ट्रॅफिक आहे...डेंजरस आहे

गिअरवाली महागडी सायकल ऑफिसमध्ये तुमच्या डोळ्यासमोर सतत राहू शकत नसेल तर अजिबात त्या फंदात पडू नका.

या मुद्द्याला सहमती, उत्साही लोक गियर बदलून पाहतात, काय वाट्टेल ते उद्योग करतात, पण सिक्युरीटीला सांगितले तर ते लोक ठेवतात लक्ष. वेगळे लॉक घेऊन खांबाला किंवा अजून कशाला बांधून ठेवले तर चोरीला जायची भिती नाही. मी टिळक रोडला तर एकदा चक्क स्कूटरला बांधून ठेवलेली, आणि मी येईपर्यंत तो मालक बिच्चारा ताटकळत बसला होता.

सायकल ला डावा-उजवा सिग्नल हातानेच देता का?

हो, मी त्याबद्दलही लिहणार आहे, ट्रॅफिकमध्ये सायकल चालवताना काय काय दक्षता घ्यायची ते.

इत्तर कोणी स्त्रिया सायकल वापरात असतील तर त्यांनी मदत करा.

आहेत काही मायबोलीवरती. आमच्या पहिल्या सायकल गटगला सई, सहेली, प्राजक्ता अशा काही जणी होत्या. त्यांनी चालवणे अद्याप कायम ठेवले आहे का माहीती नाही.

https://www.maayboli.com/node/47515?page=6

इथे आमच्या पहिल्या सायकल गटगचा वृत्तांत आहे

बापरे ठाण्याला इतके भयाण ट्रॅफिक आहे...डेंजरस आहे

>> आशु, मी जिथे राहत होतो त्या वाघबीळ पासून माजिवाडा अंदाजे साडेचार किमी आहे. पण मेन हायवे आहे घोडबंदर रोड. त्यामुळे गुजरातवरुन येणारे-जाणारे मालवाहू ट्रक्स, रेतीबंदरवरुन येणारे ट्रक्स, बांधकाम धडाक्यात असल्याने त्यांचे ट्रक्स, असे ट्रक्सचे ट्रॅफिक खूप असे. मला साधारण पंधरा मिनिटे लागत पण ह्या पंधरा मिनिटाच्या प्रवासात दोन मोठे उतार चढाव असत. तिथे दमछाक होत असे. आणि तिथेच मग अधिक धूर आत जात असे, कारण ट्रक्स पण ती चढण चढायला जास्त जोर लावतात व धूर ओकतात. भयाण होतं राव ते. असो.

मी काही इतरांना नाउमेद करत नाहीये. ठाण्यात खूप लोक सायकल वापरुन ऑफिसात जातात, नथिंग बीग फस..... फक्त आपलं काळजी घेण्याचं सूचित केलं तेवढं.

आशुचॅम्प वाचते तो गटग वृत्तांत, आत्ता थोडं चालायला सुरुवात केली, पाय मोकळॆ करते मग कोणाची तरी सायकल बघून चालवेन जमतंय असं वाटलं तरी सायकल घेईनच. इथले सायकलिस्ट बघितले तरी १०० कि च्या राईड करणारे, मग मला एवढं तरी नक्की जमेल.

सायकल ला डावा-उजवा सिग्नल हातानेच देता का? >> ऑनलाईन दुकाने जसे ऍमेझॉन, फ्लिपकार्ट येथे थोडी शोधाशोध केली कि सायकलसाठी बॅटरी ऑपेराटेड इंडिकेटर मिळतील. काही इंडिकेटर सोबत फ्लॅश लाईट (टॉर्च) सुद्धा येते. हैद्राबाद येथील एका नवीन कंपनीने LED असलेला टी शर्ट बनविला आहे, मध्यंतरी त्याचा विडिओ व्हाट्सअँपला व्हायरल झाला होता.

सायकलिंग सुरू केले आहे. एका दिशेने पाच किमी च्या वर प्रगती होत नाही. मांडीत गोळे येतात. यासाठी काय करू ?
( हा प्रश्न विचारण्यासाठी भरपूर सर्च दिला. त्यानंतर या धाग्यावर विचारावा असे वाटले. तरी अस्थानी असेल तर कळवा. काढून टाकीन).

सवय लागे पर्यंत त्रास होईल नंतर पाय दुखणे बंद होईल.
शक्यतो कमी वेगाने सायकल चालवा.
तीव्र चढ असेल तर सायकल वरून खाली उतरा

गिअर सायकल असेल आणि तरी पण गोळे येत असतील तर रुट चेक करा. गुगल मॅप मध्ये त्या रुटवर चढ किती आहे ते समजते. हलका चढ जरी असला तरी पायात गोळे येतात.

गिअर सायकल असेल आणि तरी पण गोळे येत असतील तर रुट चेक करा. गुगल मॅप मध्ये त्या रुटवर चढ किती आहे ते समजते. हलका चढ जरी असला तरी पायात गोळे येतात. >> धन्यवाद. चढ आहे हे खरेय.

सवय हेच मुख्य
पायात पुरेशी ताकद नाहीये असं आता तरी वाटत आहे पण
जर रनिंग ट्रेकिंग करत असाल नी तेव्हा त्रास न होता फक्त सायकलिंग करताना होत असेल तर सीट ची उंची बरोबर आहे का बघा, कमी असेल तर ती वाढवून बघा, फरक जाणवेल

पुरेसा वोर्म अप पण आवश्यक आहे

सीट ची उंची बरोबर आहे का बघा, कमी असेल तर ती वाढवून बघा, फरक जाणवेल >>> पाय टेकले नाहीत तर भिती वाटते सायकल चालवायची.

पुरेसा वोर्म अप पण आवश्यक आहे > ओके. धन्यवाद.

Pages