''काही सुटे शेर''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 8 May, 2013 - 01:14

काही सुटे शेर...

वास मारतो अविरत तिन्हीत्रिकाल आहे
आयुष्याची झोपडपट्टी बकाल आहे

===========================

मलाही खूप धडधडते,कुठे निर्धास्त आहे मी?
उरी उदयातली आशा,जरी सूर्यास्त आहे मी

स्थिती पाहुन बदलतो मी,अमीबासारखा हल्ली
कुणाला भासतो थोडा,कुणाला जास्त आहे मी

============================

मित्र ज्याला मानले तो मित्रही मित्रात नाही
माणसामध्येच आहे देव देव्हा-यात नाही

ठरविल्या जातात जाती येथल्या जन्मावरूनी
जन्म कोठे घ्यायचा हे आपल्या हातात नाही

============================

भागलेली भूक आहे
बोलणारा मूक आहे

फार धडधडणार होती
गोठली बंदूक आहे

============================

तुला पाहिले,गडबड झाली,अजून काही नाही
छातीमध्ये धडधड झाली,अजून काही नाही.

युगायुगाची वेठबिगारी,मुस्कटदाबी
मूकपणाची ओरड झाली ,अजून काही नाही

===========================

जीवन ज्याचे सारे,पेल्यात जमा आहे
जिवंत असुनी ही तो,मेल्यात जमा आहे.

===========================

विचार डोक्यामधील नव्हते भरकटलेले
केस जरासे विखूरलेले,विस्कटलेले.

===========================

आभाळातुन येणारा तर लांबत जाई
डोळ्यामधला पाऊस हल्ली थांबत नाही.

===========================

विकार वेगवेगळे,विचार वेगवेगळे
तुझ्यात माणसा किती,प्रकार वेगवेगळे?

===========================

अंतरात्म्या तुझे फावले कैकदा
कोरडे नेत्र पाणावले कैकदा

सोबती पाहिजे मर्तिकाला म्हणुन
मी स्वत:लाच बोलावले कैकदा

===========================

बंधने धुडकावण्याची खोड आहे लागली
घातली अपुल्या प्रियेसाठी हजारो कुंपणे

===========================

मी तुला विसरायचे अन तू मला विसरायचे
विसरुनी गेलो तुला हे सारखेच स्मरायचे

===========================

वेदनेला का नसावा?जीवनाला अंत आहे.
सौख्यवेड्या मानवाची ,हीच मोठी खंत आहे

===========================

--डॉ. कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्थिती पाहुन बदलतो मी,अमीबासारखा हल्ली
कुणाला भासतो थोडा,कुणाला जास्त आहे मी

वेदनेला का नसावा?जीवनाला अंत आहे.
सौख्यवेड्या मानवाची ,हीच मोठी खंत आहे

<<<हे दोन सर्वाधिक आवडले

ठरविल्या जातात जाती येथल्या जन्मावरूनी
जन्म कोठे घ्यायचा हे आपल्या हातात नाही

विचार डोक्यामधील नव्हते भरकटलेले
केस जरासे विखुरलेले,विस्कटलेले.

मस्त शेर आहेत. Happy

फार धडधडणार होती
गोठली बंदूक आहे

जीवन ज्याचे सारे,पेल्यात जमा आहे
जिवंत असुनी ही तो,मेल्यात जमा आहे.

विचार डोक्यामधील नव्हते भरकटलेले
केस जरासे विखूरलेले,विस्कटलेले. (वृत्तासाठी) (चित्त यांही एक गझलही आठवली)

आभाळातुन येणारा तर लांबत जाई
डोळ्यामधला पाऊस हल्ली थांबत नाही.

सोबती पाहिजे मर्तिकाला म्हणुन
मी स्वत:लाच बोलावले कैकदा

वेदनेला का नसावा?जीवनाला अंत आहे.
सौख्यवेड्या मानवाची ,हीच मोठी खंत आहे<<<

हे सर्व शेर अधिक आवडले. एक दोन ठिकाणी लय किंवा वृत्त यात अडखळलो. (योगायोगाने आजच सकाळी मनात आले होते की माझा 'काही ओळी' हा धागा जरा वर आणावा, तो आता आणतो).

उत्तम अशआर मालिका आपल्याकडून झडो या शुभेच्छांसह...

-'बेफिकीर'!

ठरविल्या जातात जाती येथल्या जन्मावरूनी
जन्म कोठे घ्यायचा हे आपल्या हातात नाही

युगायुगाची वेठबिगारी,मुस्कटदाबी
मूकपणाची ओरड झाली ,अजून काही नाही

जीवन ज्याचे सारे,पेल्यात जमा आहे
जिवंत असुनी ही तो,मेल्यात जमा आहे.

आभाळातुन येणारा तर लांबत जाई
डोळ्यामधला पाऊस हल्ली थांबत नाही.

वेदनेला का नसावा?जीवनाला अंत आहे.
सौख्यवेड्या मानवाची ,हीच मोठी खंत आहे

हे शेर सर्वात आवडले.

वा.. अनेक शेर आवडले.

सोबती पाहिजे मर्तिकाला म्हणुन
मी स्वत:लाच बोलावले कैकदा

सुरेख !

वास मारतो अविरत तिन्हीत्रिकाल आहे
आयुष्याची झोपडपट्टी बकाल आहे

'झोपडपट्टी' असल्याने वरच्या ओळीत 'वास मारते' असे पाहिजे ना?
की मी काहीतरी चुकीचा अर्थ लावतो आहे?

वास मारत रहातो= वास येत रहातो = वास मारतो

ज्या ठिकाणी वास येतो,त्या आयुष्याची झोपडपट्टी अशा अर्थाने लिहीले आहे,म्हणून मारतो असे आहे.

धन्यवाद ज्ञानेश ..