आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

Submitted by अभय आर्वीकर on 7 May, 2013 - 23:54

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

काल अग्नीपरीक्षा त्यांनीच घेतली
कोंबड्यासारखे मज भाजून पाहिले

पूर्ण झाले उणे मी मातीत मिसळता
हातचे मी तरी ना राखून पाहिले

सोंग केलेय त्याने ना ऐकले जणू
प्रश्न भाग्यास जेव्हा टाकून पाहिले

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
मी ’अभय’दान इतुके मागून पाहिले

                                - गंगाधर मुटे
------------------------------------------------
वृत्त : अभयकांती @
लगावली : गालगा गालगागा गागाल गालगा
------------------------------------------------
@ - अशा वृत्ताची नोंद आहे किंवा नाही, ते शोधावे लागेल.
पण हे वृत्त हरवून जाऊ नये म्हणून मी तात्पुरते अभयकांती हे नाव दिले आहे.
ही लय मला खूप आवडली. मस्त ठसकेबाज आणि ठेकेबाज गझलेची चाल तयार होतेय.
गेय गझलेसाठी फ़ारच मोहक आहे हे वृत्त.
------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गालगा गालगागा गागाल गालगा
<<<
ज्या गझलेचे उदाहरण आत्ता समोर आहे तिच्यावरून हे वृत्त गुणगुणणेबल अय मीन गझल्सूटेबल नाही वाटत (यात काही आल्हाद नाही वाटला )

क्षमस्व !!! माझे मत चुकीचेही असूच शकते

धन्यवाद वैभवजी,
दुरुस्ती केली आहे. Happy

तयार झालेले हे वृत्त नवखे असावे. काही वृत्तातील रचना एखाद्या विशिष्ट लयीतच गाता येते. याला लागलेली चाल सुद्धा नवी आहे, किमान मी तरी तशी चाल आजपर्यंत ऐकलेली नाही. गझलेला साजेशी आहे.

मी आताच माबोकर विद्यानंद हाडकेंना ती ऐकवली. अगदी मुशायर्‍यामध्ये सुद्धा तरन्नूम गझल म्हणून पेश करता येईल, अशी आहे.

ok sir तुम्ही म्हणताय तर तसेच असेल याची खात्री आहे

पण अशी नुसती वाचून मला नाहीच कळतय चाल बाकीच्यानाही समजेल की नाय कुणास ठावुक
बघा ना काही करता आले तर ...आमची सोय होईल एखादे नवीन वृत्त बाणवता येण्यास मदत होईल