मोजले का तू कधी ?

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 October, 2008 - 09:52

सोबती सारे किती, मोजले का तू कधी ?
मोसमी वारे किती, मोजले का तू कधी ?
भांडणे रुसणे तुझे अन मनवणे ते तिचे
रे, अरे, कारे किती, मोजले का तू कधी ?
पाहता तव यातना, आसवे ढाळी कुणी
त्यातले खारे किती, मोजले का तू कधी ?
भाषणे ऐकावया लाख जमले लोक ही
आपले नारे किती, मोजले का तू कधी ?
चालता रस्त्यावरी, एकटाच लक्तरी
ओळ्खी दारे किती, मोजले का तू कधी ?
नाव गाळे नेहमी, सोयरे यादीतले
हे असे झारे किती, मोजले का तू कधी ?
मागण्या येती नव्या अन अपेक्षा वाढती
वाहशी भारे किती, मोजले का तू कधी ?
बघ, पसारा मांडला अंबराने हा पुन्हा
ओंजळी तारे किती, मोजले का तू कधी ?

गुलमोहर: 

आशयासहित सुंदर जमलीय.