'परिचय'- बर्खूरदार खलनायकाचा !....’दादासाहेब फाळके ‘पुरस्काराचे निमित्ताने !

Submitted by किंकर on 2 May, 2013 - 22:01

आज दादासाहेब फाळके पुरस्काराने एक असे व्यक्तिमत्व सन्मानित होत आहे कि ज्यामुळे सन्मानित व्यक्तिमत्व अधिक उजळून दिसणार आहे ? का त्या पुरस्काराचा सन्मान होतो आहे ? असा प्रश्न पडावा.
कारण १९६९ पासून गेली चव्वेचाळीस वर्षे दिला जाणारा हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार हा,दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माहिती आणि नभोवाणी मंत्रालयामार्फत सुरु करण्यात आला.

भारतीय सिनेमासाठी महत्वपूर्ण आणि दखल घेण्यायोग्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार, निर्मिती,दिग्दर्शन,अभिनय ,गायन, संगीत, छायाचित्रण या क्षेत्रात दिला जातो. रोख रक्कम रुपये अकरा हजार स्मृतिचिन्ह आणि शाल असा सुरु झालेला हा पुरस्कार आता रोख रक्कम रुपये दहा लाखां पर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज कपूर ,दिलीपकुमार,देवानंद यासारखे अभिनेते,तपन सिन्हा ,मृणाल सेन,सत्यजित रे, अदूर गोपालकृष्णन यासारखे दिग्दर्शक ,लता मंगेशकर,आशा भोसले,मन्ना डे यासारखे गायक कलाकार, यासह त्रेचाळीस कलावंतांना हा पुरस्कार प्रत्यक्ष वितरीत झाला आहे.

आज ३मे २०१३ रोजी, भारतीय चित्रपट सृष्टीस शंभर वर्षे पुर्ण होत असलेल्या वर्षात, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त कलावंतांची यादी अधिक सुशोभित होत आहे अशा एका नावाने,जी कलाकार व्यक्ती थोडी उशीरच सन्मानित होत आहे,आणि जी खरोखर भारतीय चित्रपट सृष्टीचा 'प्राण'आहे. आले ना लक्षात म्हणजे कोण ? तर हि कलाकार व्यक्ती म्हणजे प्राण क्रिशन सिकंद …'प्राण' पणाने ज्यांनी आपले उभे आयुष्य भारतीय चित्रपट सृष्टीसाठी वाहिले त्या पडद्यावरील खलनायकास आम्हा रसिकांचा मानाचा मुजरा !अर्थात पडद्यावरील सहस्त्रकातील सर्वात यशस्वी खलनायक आणि प्रत्यक्ष जीवनातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणजे ‘प्राण’.

बारा फेब्रुवारी १९२० रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या प्राण यांचे शालेय शिक्षण त्यांच्या वडिलांच्या फिरतीच्या कामामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. जणू काही शिक्षण घेत घेत त्यांनी बारा गावचे पाणी प्यायले होते. या शालेय शिक्षणाची सांगता रामपूर ह्या रामपुरी चाकू साठी प्रसिद्ध असलेल्या गावी झाली. आणि त्यामुळेच कि काय पण तेंव्हा जरी त्यांचा चित्रपट,अभिनय इकडे वळण्याचा मानस नसला तरी त्यांच्या वागण्यात लकबीत एक वेगळीच धार आली होती.

खरे तर प्राण यांची शिक्षणातील गती चांगली होती. त्यांचे गणितातील उपजत ज्ञान तर दैवी देणगी होती. पण असे असून देखील त्यांना उच्च शिक्षणाचे गणित काही सोडवता आले नाही. त्यामुळे म्हणा किंवा त्यांना छाया चित्रण ( फोटोग्राफी ) हा छंद जोपासावा वाटला म्हणून म्हणा त्यांनी उच्च शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि दास फोटोग्राफी स्टुडीओ या कॅनॉट प्लेस, दिल्ली स्थित दुकानात पूर्णवेळ नोकरी सुरु केली.

या दुकानाची प्रथम शाखा सिमला या थंड हवेच्या ठिकाणी सुरु झाली आणि त्याची जबाबदारी प्राण यांच्याकडे आली.तेथे त्यांनी आपले काम सांभाळत,अभिनयाच्या प्रांगणात पहिले पाऊल टाकले. त्यावेळी अभिनय क्षेत्रात कितपत 'राम' आहे याची त्यांना जाणीव नसल्यामुळे असेल, पण त्यामुळे त्यांनी पारंपारिक ' रामलीला ' ह्या लोकनाट्यात पदार्पणातच सीतेची भूमिका वठवली होती.पुढे जेंव्हा दास यांनी दुसरी शाखा लाहोर येथे सुरु केली तेंव्हा प्राण यांनी आपला बाड बिस्तारा तिकडे हलविला. आता दिवसभर दुकान सांभाळणे आणि सायंकाळी मित्रपरिवारात रमणे,हा त्या वेळच्या वयाला शोभेल असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला.

या दिनक्रमाचा भाग म्हणून,संध्याकाळी जेवणानंतर पान खाण्याचा, त्यांच्या मित्र परिवाराचा रिवाज होता.एके दिवशी एक गृहस्थ प्राण यांच्या समोर येवून,त्यांना नखशिखांत न्याहाळत म्हणाले " काय रे नाव तुझे ?" त्यावर प्राण त्यांना उत्तरले," पण तुम्ही हे मला का विचारत आहात ? " तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख वाली महमंद वाली अशी करून देत,ते श्री. पांचोली यांच्याकरिता पटकथा लेखक म्हणून काम करतात याची माहिती दिली.

त्यापुढे,वाली यांनी मी सध्या जी पटकथा लिहित आहे त्यातील एक प्रमुख भूमिका करणार का ? असा प्रश्न प्राण यांना केला. व उद्या स्टुडीओत येवून भेटण्यास सांगितले. तेंव्हा त्या संधी मधील गांभीर्य न समजल्याने, प्राण त्यांना हो म्हणाले, पण प्रत्यक्षात तिकडे फिरकलेच नाहीत.

पुढील आठवड्यात प्लाझा सिनेमा येथे चित्रपट पाहण्यास गेले असताना, वाली यांची पुन्हा प्राण यांच्या बरोबर भेट झाली. तेंव्हा वाली यांनी अस्सल पंजाबीत, प्राण यांची खरडपट्टी काढत," मी तुझ्या वतीने शब्द दिला आणि तू फिरकलाच नाहीस" असे म्हणत पुन्हा एकदा प्राण यांची भेट नक्की करत,यावेळी ते स्वतः च त्यांना घेवून गेले. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे 'यमला जाट ' या पंजाबी चित्रपटा द्वारे प्राण यांचे या मायानगरीत पदार्पण झाले.

हे सर्व सुरु असताना भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ऐन बहरात आलेली होती. भारताचे स्वातंत्र्य जवळजवळ निश्चित होत असताना दुर्दैवाने फाळणी च्या पर्यायाने वातावरण गंभीर बनून गेले होते. जातीय रक्तपात अनेक संसार अक्षरशः धुळीस मिळवत होते. त्याच वेळी प्राण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी, त्यांच्या मुलाच्या वाढदिवसा करिता इंदूर येथे येण्याचा निर्णय घेतला.दिनांक १० ऑगस्ट १९४७ रोजी इंदूर मुक्कामी आल्यानंतर संपूर्ण लाहोर रक्तरंजित दंगलीने वेढले गेले. आणि अखेर फाळणीवर शिक्कामोर्तब होत दिनांक १४ ऑगस्ट पासून सरहद्द बंद झाली .याचा थेट परिणाम म्हणजे ‘यमला जाट’ ने सुरु झालेला चित्रपट क्षेत्रातील प्राण यांचा प्रवास एका वेगळ्याच वळणावर ठप्प झाला.

या परिस्थितीत बावीस चित्रपटातील कामाचा अनुभव गाठीशी आहे, या उमेदीवर त्यांनी आपले बिऱ्हाड मुंबईस हलवले. त्यावेळी प्रथम त्यांनी आपला मुक्काम हॉटेल ताज येथे ठेवला आणि नव्याने काम शोधण्यास सुरवात केली. पण त्यांचा प्रथमचा अनुभव हा कटूच होता. दहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना पहिले यश मिळाले. देवानंद यांच्या 'जिद्दी' या चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली. आणि इथेच त्यांची जिद्द कारणी लागली कारण या चित्रपटातील यशाने त्यांच्या समोर चित्रपटात काम करण्याची विनंती करणाऱ्यांची रांगच लागली.

खलनायक म्हणून काम करताना प्राण यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करण्याची पद्धत प्रथम पासूनच ठेवली होती. चित्रीकरण म्हणजे सर्वस्व मानणे हे त्यांच्या रक्तातच होते. त्यामुळे चित्रीकरणास ते नेहमीच वेळेवर हजर राहात आणि स्वतः चे काम संपले तरी अखेर पर्यंत थांबून संपूर्ण कथानक समजावून घेत असत.भूमिकेची रंगभूषा,वेशभूषा याचा ते स्वतः अभ्यास करत.त्यामुळे त्यांना माणूस वाचण्याची सवय लागून गेली होती.त्यासाठी त्यांनी वर्तमान पत्रातील वैशिष्ट्य पूर्ण छायाचित्रे जमवून त्यांचा वापर स्वतःची रंगभूषा अचूक करण्यासाठी केला.

स्वतः ची खलनायकी अभिनयाची लकब नेहमीच वेगळेपणाने उठून दिसावी म्हणून,त्यांनी विविध लकबी जाणीवपूर्वक वापरल्या. आणि त्यामुळेच प्राण म्हणजे सैतान अशी जरब त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच 'जिस देश में गंगा बहती हैं । ' मधील 'राका' असो किंवा 'राम और श्याम' मधील 'गजेंद्र' असो लोकांच्या मनात 'प्राण' इतक्याच त्या भूमिका देखील ठसल्या.

या त्यांच्या खलनायकी भूमिकांचा जनमानसावर झालेला परिणाम विशद करताना ते नेहमी म्हणत असत कि, प्राण या नावाचा धसका असा आहे कि एकोणीसशे पन्नास नंतर प्राण हे नाव वापरातून हद्दपार झाले. रावण हे नाव कधी कोणी ठेवते का ? असा त्यांचा प्रश्न असे.

त्यांनी जेंव्हा त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्याचे ठरवले तेंव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी विविध वर्तमानपत्रात निवेदन देत आम्ही 'प्राण' च्या शोधात आहोत असे सांगत सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अश्या प्राण नावाच्या व्यक्तीने हा विशेष समारंभ सन्माननीय अथिति म्हणून सहभागी होत सुशोभित करावा असे जाहीर आवाहन केले होते. आणि बहुदा त्यांना एकोणीसशे पन्नास नंतर जन्मलेला,दुसरा प्राण काही मिळाला नाही.यातच त्यांच्या खलनायकी यशाचे गमक दिसून येते.

कामाच्या ठिकाणी वेळेवर हजर राहणे याबाबत ते कटाक्षाने शिस्त पाळत, पण ती इतरांनी पाळली नाही तर ते त्यांना बिलकुल सहन होत नसे. त्यांच्या ऐन बहाराच्या काळातील आघाडीचा अभिनेता राजेश खन्ना हे वेळ पाळण्याचे बाबत अत्यंत आळशी असल्याने, त्यांच्या बरोबर काम न करण्याचा, एकदा घेतलेला निर्णय त्यांनी चित्रपट सृष्टीतून निवृत्त होई पर्यंत पाळला.

असा हा खलनायकी प्रवास त्यांना यश प्रसिद्धी आणि पैसा भरभरून देत होता. राजेश खन्ना नंतर सर्वाधिक मानधन घेणारा असा प्राण यांचा उल्लेख होत राहिला .असे असून देखील त्यांनी खलनायक नाही नायक आहे, नव्हे कोणतही भूमिका करण्यास मी समर्थ आहे,असा संदेश देत खलनायकत्वाकडे पाठ फिरवली. आणि त्यामुळेच आपल्याला एक 'मंगल चाचा' भेटला. हे त्यांचे जणू काही चित्रपट सृष्टीवर 'उपकार' आहेत.

‘उपकार’पासून सुरु झालेली त्यांची पडद्यावरील सकारात्मक किंवा चरित्र अभिनेता म्हणून असलेली वाटचाल देखील, खलनायकत्वा इतकीच प्रभावी ठरली .एक निष्ठुर नाही तर शिस्तप्रिय करारी आजोबा ,अशी त्यांची ओळख 'परिचय' मधून झाली. मित्रत्वातील मैत्र जपणारी 'जंजीर' मधील 'शेरखान' ही भुमिका देखीलप्रभावी ठरली.अर्थात किती म्हणून भूमिकांचा उल्लेख करायचा?कारण त्यांच्या प्रत्येक भूमिकेत 'प्राण' आहे.

हिंदी चित्रपटचा आणखी एक अभिवाज्य घटक म्हणजे त्यातील गाणी. त्यामुळे जास्तीत जास्त गाणी नेहमीच आपल्यावर चित्रित व्हावीत असे कोणास वाटणार नाही. पण याही बाबतीत प्राण साहब हे प्रथम पासून थोडे हटकेच होते.’खानदान' या नुरजहा या नायिकेबरोबर पदार्पणात प्रमुख भूमिकेत नायकाची जबाबदारी पार पडल्यानंतर पुढील चित्रपट नायक म्हणून त्यांनी स्वीकारला नाही. आणि त्या मागचे त्यांचे कारण होते कि,झाडामागे पळत गाणी म्हणणे जमणार नाही.

अर्थात त्यात गाणी म्हणणे जमणार नाही या मागे कोणतीही भीती नव्हती,पण तो त्यांचा स्वभाव नव्हता. पण भूमिकेशी समरस होणारे गाणे असेल तर जिवंत करावे तर त्यांनीच. आणि त्यामुळेच कि काय पण साठच्या दशकात जेव्हा सर्वाधिक लांबीचे गाणे त्यांच्यावर चित्रित करण्याचे ठरले,तेंव्हा त्या गीताचे संगीतकार कल्याणजी यांनी दिग्दर्शकास तुम्ही माझ्या गाण्याचा सत्यानाश करायचा ठरवले आहे असा निषेध नोंदवला होता. पण चित्रिकरणा नंतर जेंव्हा त्यांनी - कस्मे वादे प्यार वफा सब बाते हैं, बतोंका क्या? हे गीत पाहिले तेंव्हा सर्वात प्रथम फोन करून प्राण यांचे अभिनंदन करताना त्यांना सांगितले कि, तुम्ही हे गाणे पडद्यावर चित्रित करताना ,ओठातून नाही तर हृदयातून गायला आहात.आणि त्यांच्या भूमिकेत समरस होण्याच्या वृत्तीमुळेच, त्यांच्या वाट्याला आलेली, ‘यारी हैं इमान मेरा,यार मेरी जिंदगी’,’इशारों को अगर समझो राज को राज रहेने दो’ , पासून ते ‘दारू कि बोतल में काहे पानी भरता हैं’ यासारखी गाणी अजरामर ठरली आहेत.

प्राण म्हटले कि 'खलनायक' हि त्यांची वरवरची ओळख आहे असेच मला वाटते. कारण चित्रपट कलाकारांचे आयुष्य खरोखरच पडद्यावर आणि पडद्यामागे असे विभागलेले असते. त्यामुळे पडद्यामागील कलाकार हाच खरा माणूस असतो. त्या भूमिकेतील प्राण हे एक क्रीडाप्रेमी म्हणून सर्वज्ञात आहेत.त्यांनी एक फुटबॉल संघ पुरस्कृत केला होताच,पण ज्या काळात क्रिकेट मध्ये खेळाडूंचा घोडेबाजार आला नव्हता,पैसा कमी आणि प्रसिद्धी जास्त होती, तेंव्हा भारताचा नवोदित उभरता खेळाडू कपिलदेव त्याच्या गूढघ्याच्या शस्त्रक्रियेच्या तयारीत होता, तेंव्हा गरज असल्यास, त्याचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी, प्राण यांनी स्वतः व्यक्त केली होती. याची आठवण कपिलदेव आजही स्वतः सांगतात.

अशा पडद्यामागील माणुसकी जपणाऱ्या कलाकारास, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाणारे, सर्वश्री दादासाहेब फाळके यांच्या जन्म शताब्दी वर्षात सुरु झालेला आणि त्यांच्याच नावे दिला जाणारा हा पुरस्कार, भारतीय चित्रपट सृष्टीस शताब्दी पूर्ण होताना, घोषित झाला याचा खरोखर अभिमान वाटतो. याठिकाणी प्राण आणि दादासाहेब फाळके यांच्यातील एका दुव्याचा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करावा वाटतो. ऑक्टोबर ९३ मध्ये लातूर येथील भूकंप पीडितांच्या मदतीसाठी सहयोग फौंडेशन आयोजित कार्यक्रमात प्राण यांनी स्वतः भाग घेत त्याकाळी साडेतीन लाख रुपये पदयात्रेतून जमा केले.

त्यावेळच्या समारंभात दोन मंत्री व प्राण मंचावर असताना त्यांनी मंत्र्यांच्या कडे एका घराच्या बांधणीस किती रक्कम लागेल असे विचारले जेंव्हा त्यांना एका घराचा खर्च रुपये पन्नास हजारां पर्यंत येईल असे सांगितले तेंव्हा त्यांनी त्याच कार्यक्रमात रुपये एक लाख देणगी म्हणून दिले.आणि एकच विनंती केली, त्यांची विनंती होती दिलेल्या देणगीतून बांधली जाणारी दोन घरे अनुक्रमे सर्वस्वी व्ही . शांताराम आणि दादासाहेब फाळके यांच्या नावाने जपली जावीत. कारण भारतीय चित्रपट सृष्टी करिता या दोघांचे योगदान हे कधीही न विसरण्याजोगे आहे. .याप्रकारे ज्या चित्रपट सृष्टीने आपणास घडवले, त्या चित्रपट सृष्टीसाठी ज्यांनी आपले जीवन वाहिले त्यांचा आदर करण्याची प्राण यांची वृत्ती वंदनीय आहे. आणि ज्या दादासाहेब फाळके यांचा सन्मान त्यांच्या आठवणीतून प्राण यांनी जपला ,त्यांना आज हा पुरस्कार प्राप्त होत आहे.

आज भारताची राजधानी दिल्ली येथील पुरस्कार वितरणाच्या समारंभास,जरी आपण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण प्रत्यक्ष जाऊ शकला नसलात , तरी अभिनयाची दिल्ली आपण या पूर्वीच काबीज केलेली आहे आणि म्हणूनच आज एका उत्तुंग उंचीच्या खलनायकातील नायकास वंदन करीत व आम्हा रसिकांच्या शुभेच्छा देत हा लेख पुरा करतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख !
<< ‘उपकार’पासून सुरु झालेली त्यांची पडद्यावरील सकारात्मक किंवा चरित्र अभिनेता म्हणून ..>> राज कपूरच्या खूप जुन्या 'आह' या चित्रपटातील प्राण यांची डॉक्टरची भूमिका पाहिल्यावर एका रुबाबदार, उमद्या नायकाला एका 'खलनायका'ने चूकीच्या मार्गाला लावलं असंच वाटल्याशिवाय रहात नाही !

प्राण यांना सलाम! Happy

अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता!

सर्वच भुमिकांत डावी उजवी करणे कठिण असे काम केले..

विनायक परांजपे ,रायबागान ,अंड्या ,भाऊ नमसकर ,दक्षिणा ,कृष्णा - धन्यवाद.
डॉ. कैलास गायकवाड - छाया चित्रांकारिता खास आभार!

अतिशय सुंदर लेख. प्राण यांच्या जीवनातील विविध पैलू समजले.

प्राण हे सर्व भूमिका खरोखरच प्राण ओतून करत असत.

पुरंदरे शशांक , भारती बिर्जे डिग्गीकर ,नंदिनी - अभिप्रायासाठी आभार !
दिनेशदा - प्राण यांच्या विविध भूमिकांबाबत -अर्थात किती म्हणून भूमिकांचा उल्लेख करायचा?कारण त्यांच्या प्रत्येक भूमिकेत 'प्राण' आहे. असे जे म्हटले आहे तेच मला गाण्यांच्या बाबत वाटले. तरीही आपण म्हणता तसे अजून काही गाण्यांचा उल्लेख खरेच हवा होतो हेच खरे.

मला आवडलेले प्राणसाहेबांचे सिनेमे
१. व्हिक्टोरिया २०३: अशोक कुमारबरोबर विनोदी भूमिका
२. गद्दार : फार प्रसिद्ध नाही. पण एक वेगळा खलनायक.
३. हाफ टिकट: किशोर कुमारच्या बरोबरीने आचरटपणा

पण सगळ्यात आवडलेला अर्थातच परिचयमधला रायसाहब. साऊंड ऑफ म्युझिकचे इतके सुंदर भारतीय सादरीकरण आणि त्यातला सगळ्यात उत्कृष्ट अभिनेता! हॅटस ऑफ!

गाण्यांमधे कसौटी, जंगल मे मंगल, नन्हा फरिश्ता मधल्या गाण्यांचा उल्लेख हवा होता.>>>अजून हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है.. ते वालं गाणं पण तुफान आहे.

आवडला लेख !
खरचं आश्चर्याची गोष्ट आहे की एकही प्राण नावाची व्यक्ती सापडु नये. खरोखरच प्राण यांच्या खलनायकीचा अजुनही दरारा आहे त्या नावावर .

जाई, shendenaxatra,श्री ,प्रज्ञा१२३ - प्रतिक्रियेसाठी आभार.
नंदिनी - आपण उल्लेख केलेले गाणे कसौटी मधीलच आहे.

किंकर, धन्यवाद. त्या सिनेमाचे नाव मला माहित नव्हते, सिनेमादेखील पाहिलेला नाही. प्राणचे हे गाणे मात्र कित्येकवेळा पाहिलंय.