शहर नकोसे झाले!

Submitted by आनंदयात्री on 2 May, 2013 - 00:37

बंध स्वत:शी जुळता कोणी जवळ नकोसे झाले
इतके आवडले की शेवट शहर नकोसे झाले!

रस्तोरस्ती फुलली होती गर्दी चिरकाळाची
तरी चांगली ओळख होती रस्त्याशी रस्त्याची!
भटकत होतो गर्दीमध्ये एकटाच आनंदे
तर्‍हा वेगळी होती माझी इवल्याशा जगण्याची
जगण्यावरच्या प्रेमापायी मरण नकोसे झाले १

निसटुन जाती थेंब टपोरे अलगद टिपता टिपता
वार्‍यासंगे उडून जाती सुगंध बघता बघता
एक दिलासा हवाहवासा अवचित कुठून आला?
भास वाटला खरा, ओंजळीमध्ये जपता जपता
मोहक, मोघम वाक्यांमधले वचन नकोसे झाले २

वेळ उपाशी अखेर दारी याचक बनुनी आली
भासांमधले हिशेब सारे चुकते करून गेली
खर्चातुनही जमेस उरली निव्वळ काळिजमाया
जगण्यासाठी पुन्हा एकदा कारण देऊन गेली
पाउल निघता थांबवणारे प्रहर नकोसे झाले ३

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/05/blog-post.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच. शिर्षक ` ..... नकोसे झाले' असे हवे होते का? आशय महत्वाचा. मस्त जमली आहे कविता ..

चांगली कविता.

पहिल्या द्विपदीतली शेवट ही तडजोड मात्र आवडली नाही. म्हणायचे 'शेवटी' आहे असे दिसते.

'अखेर' हा शब्दही योग्य वाटावा. सहज सुचवलाय, गै.न.

इतके आवडले की शेवट शहर नकोसे झाले!<<< अत्तिशय आवडली ही ओळ!

रस्तोरस्ती फुलली होती गर्दी चिरकाळाची
तरी चांगली ओळख होती रस्त्याशी रस्त्याची!<<< या दोन ओळी व त्यांचे कवितेतील स्थान मला नीट समजले नाही. एक दोनदा विचार करून पाहिला मग म्हंटले तुम्हालाच विचारलेले बरे!

याशिवाय, संपूर्ण कविता एक उत्कट मनस्थितीचे प्रतिबिंब म्हणून अतिशय आवडली.

धन्यवाद.

>>वेळ उपाशी अखेर दारी याचक बनुनी आली
भासांमधले हिशेब सारे चुकते करून गेली
क्या बात!
रस्त्याशी रस्त्याची ओळख.... खूप आवडले.

सर्वांना धन्यवाद! Happy

एका शहराशी जुळलेल्या नात्यावरची ही कविता आहे. पूर्ण कविताभर शहराचेच आणि शहराशीच संबंधित वर्णन आहे...

नचिकेत,

कविता आवडलीच!! मस्त आहे!!

>>>>>पहिल्या द्विपदीतली शेवट ही तडजोड मात्र आवडली नाही. म्हणायचे 'शेवटी' आहे असे दिसते.

'अखेर' हा शब्दही योग्य वाटावा. सहज सुचवलाय, गै.न>>>>>

शेवट हा शब्द मलासुद्धा खटकला. पण 'अखेर' मध्ये लय तुटते. 'आता' किंवा 'नंतर' हे शब्द कसे वाटतात?

>वेळ उपाशी अखेर दारी याचक बनुनी आली
भासांमधले हिशेब सारे चुकते करून गेली

छान जमलय.