मेघना पेठेंच्या कविता
''सिग्रेट अशी धुमारत ,जळत जात होती आत..
फुफ्फुस जाळून , करडा धूर होऊन बाहेर पडत होती.
तो छोटासा लालचुटुक निखारा पुढे सरकता सरकताच
मागे जमत जाणारी राख
आणि राख सांडत,सांडत छोटी छोटी होत जाणारी सिग्रेट
तू, मी ही जगलो आहोत तिचा तीळ तीळ प्रवास
आपल्यातून झालेला.
धूर,राख ही काही अटळ अंशरुपं आहेत तिची
आणि तिचा अर्थ मात्र अंशरुपानंच का होईना
पण आपल्यात चिरंजीव झालेला आहे.''
सिग्रेट ओढणारी ही मुलगी कुठल्याकुठे घेऊन गेलीय त्या अनुभवाला.आजवर कोणी अशी सिग्रेट ओढलीच नसेल अशा स्तरावर. जीवनाचा असाच रसरसून अनुभव घेणार्या या प्रतिभावतीचं नाव आहे मेघना पेठे.
मेघनांची कविता, जी त्यांनी प्रवासाच्या सुरुवातीलाच मागे सोडली,ती त्यांच्या जगण्यातल्या सत्यान्वेषाचा पहिला टप्पा आहे.त्यांचा हा पहिलावहिला प्रातिभ आवेश मुक्तःछंदातच व्यक्त होणे जणू क्रमप्राप्त आहे.
मेघना छंदोबद्ध कधीच लिहीत नाहीत तसेच मुक्तःछंदाची त्यांची शैलीही एकरस अशी आहे.पूर्ण संग्रहातून एक संथ हेलकावणारे दीर्घ स्वगत वाहत आहे.
म्हणून ही कविता मला ग्रीक कोरस किंवा शेक्सपीअरच्या स्वगतांचा परिणाम साधणारी वाटते. धीरगंभीर,सखोल,क्वचित सूक्ष्म उपहासाचा आश्रय करणारी अशी शैली. कवितेतली नाट्यमयता जपणारी.
''मेघनाच्या कविता ''.. एक जुनी जीर्णशीर्ण पण कलात्मक वही आहे माझ्या हातात,मेघनाच्या ह्स्ताक्षरातल्या तीस कविता अन तिचं कवितेआधीचं मनोगत या वहीत सांडलंय.हा प्रकाशित संग्रह नसून ''व्यक्तिगत वितरणासाठी'' असल्यासारखा एक संग्रह आहे नेटका,देखणा,स्तिमित करणारा. मेघना पेठेंसारखाच.
या कवितांचा कालखंड १९७४-१९८५ असा आहे. माझ्याकडे हा बराच नंतर आला.आज खूप वर्षांनी हा हातात घेण्याचं कारण कविताप्रेमींना या प्रगल्भ लेखिकेच्या तुलनेने अप्रचलित राहिलेल्या कवितांचा परिचय करून देणे,इतकाच आहे.
मेघनांची कविता पारदर्शी ,रोखठोक,विद्ध करणारी आहे. सुरुवातीच्या कवितांमधल्या कवी-उच्चारांमध्ये किशोरवयीन निरागसताही जाणवते. कारण कविता कवयित्रीबरोबरच वाढतेय. हा संग्रह प्रकाशित करतानाच मेघना कवितेचा निरोप घेताहेत असे आज अधिक प्रकर्षाने जाणवतेय. त्यांना गद्य ललितलेखनाची क्षितिजे खुणावत आहेत.
''विकासाच्या एखाद्या टप्प्यावर कात टाकून ,झळाळत्या सोनेरी अंगाने पुढे सरकणारा साप. नेमकी हीच प्रतिमा कविता लिहून ठेवताना माझ्या डोळ्यासमोर आली आहे, येते.''
''खूप जवळच्या मित्राचा मृत्यू अटळ आहे हे उमजल्यावर काहीशा विचित्र हुरुपाने आपण मित्राशिवायही जगण्यास तयार होऊ लागतो.'कवितेसाठी आपला जन्म नाही ' हे स्वतःशीच मान्य करत असताना मला तसेच वाटते आहे..''
कविता या मुख्यत्वे भाष्य म्हणून सुचतात असे म्हणणार्या मेघनांनी प्रस्तावनेत लिहिलेली ही काही वाक्ये त्यांचा कविताविषयक दृष्टिकोन दर्शवतात. कविता ही जणू जीवनानुभवाची 'टाकलेली कात' आहे, सोनेरी ,झळाळती, पण चेतनाहीन.भूतकाळाचा अवशेष अशी. कवितेतून वर्तमान मांडत असतानाच तो वर्तमान भूतकाळात जमा होतो.कवितेच्या अवकाशात एक भाष्य होऊन शिल्लक रहातो.कविता ही एका अशा खूप जवळच्या मित्रासारखी आहे, ज्याचा मृत्यू अटळ आहे.या वियोगाची मानसिक तयारी कवयित्रीने चालवली आहे.
कवितेबद्दलचा हा पवित्रा मेघनांना कवितेपासून दूर नेतो अन आपण वाचकही एका समृद्ध काव्यानुभवाला सामोरे जाताजाताच त्याच्या अकालवियोगाची खूणगाठ मनाशी बांधून घेतो.
हा काव्यानुभव एका विकसित स्त्रीमनाचा हुंकार आहे. ही स्त्रीत्वाची जोखीम निभावणे सोपे नाही. कवयित्रीने काळाच्या पुढे राहून ती ओळखली आहे,बंडखोरीने व्यक्त केली आहे.या बंडखोरीच्या आड,आत, ती फक्त एक उत्कट व्यक्ती आहे.बंडखोरीची किंमत मोजताना एकटी पडलेली.हे एकटेपण व्यक्त होऊ शकते एखाद्या जिवाभावाच्या मित्राकडे. मित्राच्या प्रतिमेत वडील अन प्रियकर या दोन आग्रही भूमिका सरमिसळून सौम्य होतात.
''मित्रा,
आज तुझी आठवण आली आहे.
एका अपार व्यर्थतेचं फुलपाखरू होऊन आली आहे.
त्याचीच आहे सगळी बाग
ते कधी इथे भिरभिरते,कधी तिथे स्थिरावते आहे
माझ्या अंतिम हिताच्या दृष्टीने सारे मध वाळू देत आहे.
..................................................................................
मित्रा,
नंतरही मी एकटीच आहे: आधीसारखीच.
आणि तशीच भर दुपारी
ताडाच्या झाडाखाली दूध पीत आहे.
फक्तः
आज तुझी आठवण आली आहे
आणि मग खूप आठवणी येत आहेत..''
हे ताडाच्या झाडाखाली दूध पिणं, म्हणजे संकेतांना धक्का देण्यासाठी बंडखोरी करणं. पुनः ती करताना स्वत्वाची शुद्धता जपणं. हा पवित्रा मेघनाच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे.
सतत पुढे ,पुढे ,पुढच्या,उद्याच्या विचारात गुरफटलेल्या,कवितेतही गुंतून न पडणार्या या महानगरीय अस्वस्थ कवयित्रीचे लग्न लागले आहे ते 'उद्या'शीच.
''या उद्याशी लग्न लागले आहे
अन रोजच लागते.
रोज अपरिहार्यतेचे चुडे भरून
आणि नाइलाजाची हळद लावून
बोहल्यावर उभे राहायचे अन उद्याचे व्हायचे.
अनिर्बंधाच्या माहेरीचा पारिजात मला हसतो..''
पण ''अनिर्बंधाचे माहेर'' आता 'कवितेसारखेच दुरावू लागले आहे.तशी वादळे गोळा होऊ लागलीत वाढत्या वयाच्या क्षितिजावर. 'वडील' ही प्रतिमा या वयात एका मनस्वी स्त्रीसाठी खूप महत्त्वाची आहे.कारण तोपर्यंतच्या आयुष्यातले ते सर्वात उत्कट प्रेम आहे,त्या प्रेमाचा तिच्यावर प्रभाव आहे.वडिलांनी आपल्या कल्पनेप्रमाणे लाडक्या लेकीवर संस्कार केलेत,आपल्याला भावलेले अर्थ तिला दिलेत. वडिलांची प्रतिमा मेघनाच्या कवितांमध्ये जागजागी येणे अपरिहार्य आहे.एकदा ही प्रतिमा वादळांच्या संदर्भात येते-
हे वादळांनो,
असे अधीर होऊ नका वडिलांसारखे
मी वाढण्याची वाट बघताना;
वेळखाऊ असते हे जमीन शोषत जाणे..''
एका संवेदनशील युवतीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संक्रमण,तिने वयात येणं,निसर्गसिद्ध आकर्षणांना प्रतिसाद देताना अनिर्बंधाच्या माहेरी पारिजातासारख्या फुललेल्या निरागस प्रेरणांना विसरून जाणं,दुय्यम ठरवणं अन नवीनच कुणाच्या तरी वेगळ्या अपेक्षांच्या चौकटीत स्वतःला बांधून घेणं.
या संक्रमणात सगळ्यात आधी दुखावले जातात ते वडील.. त्यांनी घडवलेलं लेकीचं व्यक्तिमत्व बदलत असतं म्हणून नाही , तर ते व्यक्तिमत्व सोप्या सुखाच्या वाटा तुडवण्यासाठी स्वतःला बदलण्याचे अधिकार दुसर्याला बहाल करतं म्हणून..मेघना हे सर्व जगून त्यापलिकडे जातात.एका त्रयस्थाच्या भूमिकेतून ही प्रक्रिया नोंदवतात.
समुद्रावरच्या एका अप्रतिम कवितेत वडील समुद्राच्या प्रतिमेत मिसळून जातात..
''संध्याकाळपर्यंत
किंग लिअरसारखा
आक्रस्ताळ्या अनावर प्रक्षोभाचं मुक्त प्रदर्शन मांडणारा होता समुद्र.
विश्वासघात झाल्यासारखा.
नंतर कधीतरी खोल डोळ्यांसारखा आत गेला,
अथांग होत होत..
तू हातात हात देऊन तुझ्या सख्याच्या
पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात समुद्राच्या मर्यादा तुडवीत चालली होतीस
कधी प्रश्नच न पडल्यासारखी.
एखाद्या पाळीव पोमेरियनसारखी.मुकाट,तुरुतुरू,स्वच्छ,स्मार्ट.
आणि त्याने पाहिले तू सुखाला बळी जाताना.
म्हातार्या बापासारखा समुद्र चटकन घायाळ होतो हल्ली.
त्याच्या रुसव्याची पर्वा असण्याचे तुझे वय नाही.''
इथे समुद्राला वडिलांची प्रकट उपमा आहे.दुसर्याही एका कवितेत (कवितांना अनुक्रमणेपुरतीच शीर्षके आहेत ) अधिक गहिरा समुद्र अप्रकटपणे वडिलांचीच भूमिका निभावतो आहे..
''अस्मि अस्मि म्हणत हा समुद्र आपल्याला वेढत जातो आहे.
आणि उदास हसून म्हणतो आहे : तुझी तू;
म्हणून तू म्हणशील तसेच !''
हे स्वत;ला सतत जोखत रहाणं समंजसपणा वाढवणारं आहे.. तेच संबंधांबाबतही.प्रेम,विरह या सगळ्याच अनुभवांना प्रश्न विचारत त्यातलं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करताना त्यातलं मिथक हळुहळू विरून जातं..
''हे असं अवाढव्य दालन-
लक्षवेधी असं एकच थोरलं झुंबर-छताच्या मधोमध
ते खळदिशी फुटून काचांचे सर्वदिश पसरलेले तुकडे
त्यावर नाचणारी व्याकूळ मीनाकुमारी
धनुष्य ताणून- भूतकाळ पणाला लावलेली
शुभ्र गादीवर झिरपत जाणारे रक्ताळलेले पाउलठसे
आणि डोळे: प्रश्न आणि उत्तर झालेले
कितीतरी विश्रब्ध प्रेमांना
असं संस्मरणीय पेश होता येणार नाही: घुंगराशिवायचं नाचताना.
..........................................................................................................
कधी काळी व्याकूळ हेलावलेले थरथरते झोपाळे
कुरकुरत शांत होत आहेत.
जांभयाच जांभया येत आहेत आपल्याला
कुठल्यातरी निवलेल्या,कोमट आठवणींनी.
आपण झपाझप चालू लागलो तर
त्या कधीकालीन उकळत्या रसायनांची स्फटीके
खडखडखडखड वाजतील आपल्यातच.
काळाचे हे क्रूर विभ्रम
किती बिनशर्त मान्य आहेत आपल्याला.
एखाद्या थिएटरमधून बाहेर पडावे
तसे आपणच बाहेर पडलो आहोत तरः आपल्यातून.''
मेघनांच्या कवितेतून त्यांनी प्रथमपुरुषी एकवचनासाठी केलेला 'आपण' चा लिंगनिरपेक्ष वापर लक्षणीय आहे हेही येथे सहजपणे जाणवतेय..
- अन तरीही, प्रेमाचा, विरहाचा, संबंधांचा अनुभव घेणारी ही सजग व्यक्ती आपले स्त्रीत्व, त्यातले तणाव टाळू शकत नाही. पुनः समुद्राबद्दलच (आता इथे समुद्र म्हणजे जणू पुरुषप्रधान व्यवस्थेचं प्रतीक झालाय !) बोलताना आपल्या एकेकालीन सख्याला ती सांगते,
''समुद्राने वेढलेल्या एका कोरीव शिसवी कातळावर
साध्या पापणीने समुद्र खेळवीत मी ताठ उभी असेन.
एक प्रमत्त स्त्री : जिचा निरंकुश पदर पश्चिम वार्यावर झुळझुळत आहे
आणि आपल्या प्रत्येक गात्रावर मात्र जिने अंकुश टेकला आहे
जी जाणते मीलनांची मर्यादित सुखं
आणि विरहांची अमर्याद हास्यास्पदता !
अर्थघन असे हे सुंदर शब्द लिहिताना आताही माझ्या अंगावर शहारा आला आहे.या सर्वांपलिकडे उभ्या असलेल्या मृत्यूचे सातत्याने भान राखणारी कवयित्री जीवनाचा शोध घेताना दमून जाते..
''आपण काय शोधत आहोत आणि आपण काय शोधायचे आहे
याचाही शोध लागेना युगानुयुगे
पण मृत्यूंवर मृत्यू साहूनही
श्वास उच्छ्वासातून काहीतरी ठेचकाळत राहिले आहे.
एखाद्या पूर्ण परदेश्याने आपल्याकडे पाहून ओळखीचे हसावे तसे.
आणि इच्छांच्या आठवणींनी डोळे भरून येत आहेत.''
मेघनांची कविता ही अशी आहे. जाणवत्या जाणिवेची प्रगल्भ कविता. जीवनावर प्रेम,मृत्यूबद्दल विस्मययुक्त आस्था.पण स्व-भावानुसारच ही कविता नेणिवेपर्यंत उतरत नाही. कदाचित म्हणूनच नेणिवेतून प्रकटणारे पद्याचे कमनीय आकृतीबंध तिला परके आहेत आणि कदाचित म्हणूनच एकूणच कवितेपेक्षा या प्रतिभावतीला ललितलेखनाचे आकर्षण जास्त वाटले असावे..
ते काहीही असो.मोहात पाडणारी ही कविता प्रत्येकाला/प्रत्येकीला आपली वाटावी अशी निखळ नितळ आहे.
''सकाळभर घोटाळते पायापायात कुठेकुठे मांजर
मग कुणीतरी कानाकोपर्यात आपल्यासाठी काढलेला दहीभात
लप् लप् लप् लप् गिळते.
डोळे मिटूनही मधूनच कणाभर शहारते.
तरीही लप् लप् लप् लप्...
..........................................................................................
... कधी अशाच वेळी
आठवत असेल का मांजराला : लहानपण,
आणि त्या सर्वच तारखा, जेव्हा पहिल्यांदा दुखवले होते,
पहिल्यांदा दुखावलो होतो..
पहिल्यांदा छाटले होते स्वत:ला -नंतर पालवण्याकरिता..
आणि रेषेरेषेने बदलत गेलेले चेहरे : हळुहळू बोलेनासे झालेले.
आणि मग मनात घट्ट हेतू धरून वर्षानुवर्षे साचलेल्या शांतता.''
- स्वतःच्या निबरत जाणार्या जाणिवांचेही प्रामाणिक चित्रण मांजराच्या प्रतिमेतून करणार्या या कवितेपाशी मी लेखनसीमा करते ,कवयित्रीला एक नि:शब्द सलाम करूनच.
भारती बिर्जे डिग्गीकर
हा लेख मी त्यातल्या
हा लेख मी त्यातल्या कवितांसाठी, लेख प्रकाशित झाल्यापासुनच पुन्हा पुन्हा वाचला, प्रतिसाद मात्र आजच देतोय. दर वेळेस खूप काही वाचुनही बरेच काही तरी राहुन गेले आहे, काहीतरी उमजत नाहीये अशी फिलींग यायची, आजही पुन्हा तशीच फिलींग आहेच. असो, मेघना पेठेंची ओळख करुन दिल्याबद्दल आभार
भारतीताई आभार, एका प्रगल्भ
भारतीताई आभार, एका प्रगल्भ कवयित्रीची ओळख करून दिल्याबद्दल!!
मुक्तछंदातही अनोख्या पद्धतीने व्यक्त होण्याची मेघनाजींची पद्धत विशेष आवडली.
आपला लेख अभ्यासपूर्ण अन् त्यातील कविता चिंतनप्रवण करणार्या...
-------------------------------------------
माझं हे मध्यंतरी वाचायचं राहुनच गेलं होतं..सुंदर!
धन्स चिखल्या,
धन्स चिखल्या, सुशांत..
चिखल्या,मेघनांची कविता तशी आकलनीय आहे,माझे रसग्रहणही तसेच , असे मला वाटले
कदाचित कविता वाचायची एक सवय इथे गृहित धरली आहे, ती प्रत्येकाची वेगळी असू शकते.मेघनाच्या कवितेत नाटकाच्या दीर्घ स्वगताचा इफेक्ट मला नेहमीच जाणवतो, तसे वाचून पहा, ती उलगडत जाईल..
>>मुक्तछंदातही अनोख्या पद्धतीने व्यक्त होण्याची मेघनाजींची पद्धत विशेष आवडली >>
सुशांत,होय, मेघनांचा मुक्त्;छंद काव्यतत्त्वाने ओतप्रोत भरलेला आहे, त्यांच्या बंधनांशी बंडखोरी करणार्या विचारांना हाच परिवेश शोभतोही. एरवी मलाही व्यक्तिशः कवीने छंदोबद्ध कधीतरी लिहावेच असेच वाटते..
भारतीताई , लेख छान लिहिला
भारतीताई , लेख छान लिहिला आहे. हा लेख माझ्याकडून वाचायचा राहूनच गेला होता .
मेघना पेठेंचं 'नातिचरामि ' वाचलं आहे आणि मला ते आवडलंही पण त्यांच्या कविता कधीच वाचल्या नव्हत्या.
मला या कविता वरून खूप बंडखोरपणा दाखवणा-या, नीती नियम झुगारणा-या पण आतून तितक्याच संवेदनशील, प्रगल्भ ,हळव्या वाटल्या .
या अप्रकाशित कविता तुम्ही त्यांची परवानगी घेऊन इथे दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि कौतुक .
माशा >> मला या कविता वरून खूप
माशा
>> मला या कविता वरून खूप बंडखोरपणा दाखवणा-या, नीती नियम झुगारणा-या पण आतून तितक्याच संवेदनशील, प्रगल्भ ,हळव्या वाटल्या . >>
एक अचूक अन प्रगल्भ विधान ! असंच असतं ग.
मेघनाचेच शब्द,
''अकस्मात शिकार झालेली असतात माणसे, अगदी अकस्मात
पूर्ण विंधतही नाही बाण
पूर्ण परकाही होत नाही
आणि छातीत बाण घेऊन आकाशाला वळसा घालतात माणसे !''
''आपण काय शोधत आहोत आणि आपण
''आपण काय शोधत आहोत आणि आपण काय शोधायचे आहे
याचाही शोध लागेना युगानुयुगे
पण मृत्यूंवर मृत्यू साहूनही
श्वास उच्छ्वासातून काहीतरी ठेचकाळत राहिले आहे.
एखाद्या पूर्ण परदेश्याने आपल्याकडे पाहून ओळखीचे हसावे तसे.
आणि इच्छांच्या आठवणींनी डोळे भरून येत आहेत.'' >>>>>> क्या बात है.....
बाकीच्या कविता जास्त रिलेट करु शकलो नाही पण भारतीताईंचे काव्यप्रेम अफाट आहे, कविता उलगडून दाखवण्याची जी एक अप्रतिम कला त्यांना साधलीये त्याकरता हा लेख पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतोय...
कवि/ कवयित्रीच्या अंतरंगात उतरुन ते सुंदररित्या शब्दबद्ध करणे हे भारतीताईंना लीलया जमलेलं आहे ....
Pages