मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल

Submitted by अभय आर्वीकर on 30 April, 2013 - 06:19

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
ओळख मलाच माझी पटणे कठीण झाले

एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले

दिसतात "अभय" येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले

                                           - गंगाधर मुटे
------------------------------------------------------
अवांतर :

याहो पवारदादा, इकडे अभय जरासे
चिक्कार घाम जाता ---णे कठीण झाले
------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोंगे निभावताना चेहरा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

एक मात्रा जास्त झाली.

विचार मस्त आहे.

पाटील साहेब,
क्षमस्व. तिथे मुखडा असे होते. ऐनवेळेवर मुखडाच्या मु वरून पवार आठवले. अवांतर शेर करण्याच्या नादात टायपो झाला. पवार घुसलेत पण मुखड्याचा चेहरा झाला.

करू जाता काय, उलटे झाले पाय...!

मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल
------------------------------------------------------
Chandrapur
------------------------------------------------------
Chandrapur
------------------------------------------------------

अभिनंदन सर
काही शेर आवडले
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले<< म्हणजे काय ते समजले नाही प्लीज सांगाल का ?

@वैवकु,

पंचांग म्हणजे पंचांग, गावराणी म्हणजे गावरानी आणि पिकणे कठीण झाले म्हणजे पिकणे कठीण झाले

यात समजावून सांगण्यासारखे काय आहे राव? Happy

गझल वेग्रे ठीक,

पण तुमची सगळ्या संस्थालांवर स्वताचेच कौतुक करून घेत का असता ?
इतरांच्या लेखांवर कधी फिरकत नाहीत तुम्ही, एकही प्रतिक्रिया नसते
आपल्याला लोकांची वाहवा मिळावी असे प्रत्येकालाच वाटते , नाही का ?

पंचांग म्हणजे काय ? मला सोलापुरचे दाते पंचांग तेवढे ठावूक आहे आणि ते शेतात पिकत नाही हेही म्हणून विचारले सर
तुमच्याकडील बोलीभाषीक शब्द आहे का हा ? त्याला काही वेगळा अर्थ आहे का सर ?

@वैवकु,
शेतीत पंचांग पिकत नाही पण शेती पिकण्याचे, शेतीच्या उदिमाचे पंचांग (निसर्गशास्त्रीय वेळापत्रक) नक्कीच असते.

गावराणी पंचांगाप्रमाणे शेती पिकणे कठीण झाले, असा अर्थ घेऊन पुढे गेल्यास अर्थ उलगडत जातील. Happy

@प्रिय श्री बन्याबापू,
रामराम, विनंती विशेष

आपले पत्र मिळाले. पत्र वाचून मजकूर कळला. आपण "तुम्ही तुमच्या सगळ्या संस्थळांवर स्वत:चेच कौतुक का करून घेत असता ?" असा प्रश्न विचारला आहे.

बन्याबापू, तुम्ही म्हणता ते खरे आहे पण असे करणे म्हणजे माझ्यातला दुर्गुण किंवा माझा स्वभावदोष नक्कीच नाही. मी लिहितो ते माझ्या स्वतःच्या कौतुकासाठी लिहितच नाही. मला स्वत:ची महतीसुद्धा वाढवून घ्यायची अजिबात हौस नाही. तसे असते तर लोकांना रुचेल आणि आवडेल असे लिहिण्याकडे माझ्या लेखणीचा कल असता. अनेकदा माझ्या लेखनीमुळे मला अनेकांची, वाचकांची आणि साक्षात सत्ताधार्‍यांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. माझ्या लेखनीमुळे मी मित्रपरिवारात अप्रिय झालो आहे, हेही लक्षात घ्यावे.

मी लिहितो ते केवळ मला काहीतरी म्हणायचे आहे म्हणून. पिढ्यान्-पिढ्या शेतकर्‍यापर्यंत जो-जो आला तो-तो शेतकर्‍याला सल्ला द्यायला किंवा अक्कल शिकवायलाच आला. एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करणार्‍याला शुद्र व बेअक्कल गाढव समजून त्याला कोणी बोलुच दिले नाही, त्याचे ऐकण्याची तर गोष्टच दूर...! सर्व मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे शेतीच्या शोषणाची समर्थकच असल्याने त्याला प्रसारमाध्यमात स्थान मिळाले, तेही नगण्यच. पण आता इंटरनेट शेतकर्‍यांचा मदतीला आलंय. या माध्यामाने सर्वांना एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय आणि नेमका ह्याच सुविधेचा फ़ायदा उचलून मी शेतकर्‍यांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतीच्या शोषणाच्या व्यवस्थेला झुगारणारा एक विचार रेटतो आहे. स्वाभाविकच हा विचार जास्तीतजास्त वाचकांपर्यत पोचावा, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करतो आहे आणि असे करणे गैर आहे, असे मला अजिबात वाटत नाही.

मात्र इतरांच्या लेखांवर/कवितांवर/गझलांवर मी वाचून प्रतिक्रिया देऊ शकत नाही, त्याची खंत मलाही आहे. मात्र सर्वच गोष्टी कधीच मनाजोग्या घडत नाहीत. त्याला अनेकदा नाईलाज असतो. मात्र मला जसजशी संधी मिळेल तसतसा यथावकाश नक्कीच इतरांचे लेखन वाचेन व प्रतिक्रियाही नोंदवेन.

"मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव" या धर्तीवर स्वत:च्या लेखनावर इतरांच्या प्रतिक्रिया मिळाव्या एवढ्याच एका कारणासाठी इतरांच्या लेखनावर प्रतिसाद नोंदवणे सध्यातरी मला शक्य नाही आणि तशी हौस तर नाहीच नाही.

असो. पुढे कधीतरी अधिक विस्ताराने बोलुयात.
कळावे, लोभ असावा, ही विनंती.

आपला नम्र
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------