तरंगायचे दिवस! (भाग-४)
कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............
ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
भाग १ : http://www.maayboli.com/node/42452
भाग २ : http://www.maayboli.com/node/42599
भाग ३ : http://www.maayboli.com/node/42692
कल्याण ते मुंब्रा : एक धाडसी प्रयोग
पोहायला शिकलो, खाडी क्रॉस करून झाली. छान ग्रूप तयार झाला. पण पुढे काय? मग कल्याण ते डोम्बिवली आणि नंतर कल्याण ते मुंब्रा पोहत जायचं, अशी कल्पना कोणाच्या तरी डोक्यात आली.
कल्पना तर छानच होती. पण हे करायचं कस, ह्याची कोणालाही सुतराम माहिती नव्हती. बऱ्याच वर्षांपूर्वी काही जण कल्याण ते डोम्बिवली हे सात-आठ किलोमीटर अंतर पोहून गेले होते, अशी आणि तेवढीच माहिती काही जण द्यायचे, पण आम्हाला तसा त्या माहितीचा काहीही उपयोग नव्हता. परमेश्वराच्या ‘गुगल’ ह्या अवताराचे आगमन अद्याप पृथ्वीतलावर झालेले नसल्याने, तो पर्याय नव्हताच.
मग इकडे-तिकडे चौकश्या आणि त्याबरोबर अत्यंत जोरात प्रॅक्टीस सुरू झाली. नियमित पोहायला येणारे आणि चांगल्यापैकी स्टॅमिना असलेले पंधरा-सोळा जण निवडले गेले. सुदैवाने आम्ही तिघी मैत्रिणी ह्या गटात होतो. तेव्हा आम्ही अकरावीतून बारावीत गेलो होतो. पोहण्याच्या आवडत्या कार्यक्रमात व्यत्यय नको, म्हणून आम्ही कधीही सुट्टीतले क्लास लावले नाहीत. जेमतेम परीक्षा दिली, की बास. मग खाडी एके खाडी!
माझी आई तेव्हा साधारण चाळीशीची होती. तिला काही पोहायला यायचं नाही. घरातली सकाळची काम आवरली, की ती कधीकधी आमच पोहण बघायला खाडीवर यायची. ते पाहून पाहून तिला ‘आपणही पोहायला शिकावं’, अशी अनावर इच्छा झाली. सुजाताची आईसुद्धा शिकायला उत्सुक होतीच. मग ह्या आई-बाबांच्या दोन जोड्या आणखी भल्या पहाटे खाडीवर पोचू लागल्या. दोघीजणी भराभर शिकल्या. आई मग आमच्याबरोबर डोंबिवलीपर्यंत पोहत आलीही होती. त्या दोघींच्या जिद्दीच सगळ्यांनी भरपूर कौतुक केल. आमची एकच पंचाईत झाली, की आता ‘एवढ पोह्ल्यावर असल दमायला होत’, वगैरे शायनिंग मारण बंद कराव लागलं!!
ह्या आमच्या निवडक लोकांमध्ये अमाप व्हरायटी होती. कोणी शिकणारे, कोणी नोकऱ्या-व्यवसाय करणारे. स्वतःचा सध्याचा व्यवसाय नक्की सांगता येणार नाही, असेही काही लोक होते! पोहण्यात मात्र बहुतेक सगळे सिन्सियर होते. रोज पहाटेपासून दोन-दोन तास पोहायला जायचो. पण डोंबिवलीपर्यंत ८ आणि मुंब्र्यापर्यंत सतरा किलोमीटर पोहण, म्हणजे काही गंमत नव्हती. पोहण्याव्यतिरिक्त काही व्यायाम करायला हवे, हे कोणाच्या गावीही नव्हत. ती सोयही नव्हती. खेळासाठी आवश्यक विशेष आहारही कल्पनेच्या बाहेर होता. पण जिद्द आणि सरावात कमी पडायचं नाही, हे मात्र पक्क होत.
हे उपक्रम भरती-ओहोटीच्या वेळापत्रकासोबत जुळवण आवश्यक होत. कल्याणहून डोंम्बीवली/ मुंब्र्याकडे ओहोटीचा प्रवाह असायचा. ओहोटी सुरू होईल तेव्हा पोहायला सुरवात करायची, म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहाव लागत नाही, अस तंत्र होत. ही वेळ सकाळची असणही गरजेच होत.
असा सगळा मेळ जमवून आम्ही एकदा डोंबिवलीपर्यंतची मजल मारली. हे अंतर साधारण सात-आठ किलोमीटर असाव. बहुतेकांनी हे अंतर आरामात पार केल. जे करू शकले नाहीत, ते प्रवेश परीक्षा पास न झाल्याने मुंब्रा ग्रूपमधून बाहेर झाले. काही स्वयंसेवक आमच्यासाठी जेवण, पाणी, कोरडे कपडे, चपला इत्यादी सामान घेऊन डोंबिवलीला आले होते. दिवा-वसई लाईन जिथे खाडी पार करते, तिथे भेटायचं ठरल होत. त्याप्रमाणे सगळे भेटले. कपडे बदलून, मजेत जेवण करून आम्ही घरी आलो. आता पुढच्या टप्प्याची तयारी करायची होती.
मुंब्र्यापर्यंतच्या सतरा किलोमीटर अंतरात पोहताना काही मदत लागली तर सोय असली पाहिजे म्हणून एक वल्हवायची होडी बरोबर घ्यायची, असा निर्णय झाला. ठाणे टँकवरच्या काही लोकांशी बाबांनी ओळख काढली. तिथले काही एक्स्पर्ट लोक यायला तयार झाले. कल्याणचा एक हौशी डॉक्टर आणि आमचा एक मेम्बर मित्र एवढ्यांची त्या होडीत वर्णी लागली. ह्या मित्राचा नंबर लागायचं कारण म्हणजे त्याला लांब ऐकू जातील अश्या शिट्ट्या मारता यायच्या!!! मोबाईलचा जमाना ध्यानी-मनीही नव्हता, तेव्हा ही फारच उपयोगी विद्या होती. प्यायचं पाणी आणि थोडा खाऊ बरोबर घ्यायचं ठरल. उरलेलं सामान घेऊन बाकी सपोर्ट टीम मुंब्र्याला येणार होती.
१मे चा दिवस नक्की झाला. काही दिवस आधी काही मंडळी मुंब्र्याच्या रेतीबंदराची पाहणी करून आली. तिथे ओळख काढून महिलावर्गाची कपडे बदलण्याची आणि बसून जेवायची सोय केली गेली. जेवणाची जबाबदारी मातृवर्गाने आपल्यावर घेतली. सगळे पोहणारे आणि त्यांच्या घरचे लोक ह्या कल्पनेने थरारून गेले होते. कल्याणच्या संस्कृतीत खाडीवर पोहणही वर्ज्य मानल जायचं, तिथे पंधरा ते साठ वयोगटातल्या मुल-मुली, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचा हा प्रयत्न भन्नाट वाटत होता.
सगळ्या चर्चा-सल्ले-सूचनांचा भार डोक्यावर घेऊन आम्ही लोक १ मेला पहाटे खाडीवर पोचलो. ठाण्याची मंडळीही वेळेवर पोचली. बरोबर न्यायची होडी, त्यातील सामान व माणसांसह सज्ज झाली. ठाण्याच्या लोकांनी अश्या दीर्घ अंतराच्या पोहण्यासाठी उपयुक्त अशी जेली आम्हाला अंगाला लावायला दिली. त्यामुळे पाण्याबरोबरचे घर्षण कमी होऊन वेग वाढतो. आम्हाला एकदम काहीतरी विशेष तंत्रज्ञान असाव, अस वाटत होत.
आठवले काकांनी खाडीची पूजा केली गेली. भरती संपून ओहोटी सुरू झाली, तशी पूजेची फुलं मुंब्र्याच्या दिशेने वाहू लागली. हा इशारा मिळताच आम्ही सर्वांनी पाण्यात उड्या मारल्या. संथगतीने आमचा प्रवास सुरू झाला. अश्या वेळेला प्रवाहाचा फायदा मिळावा, म्हणून पाण्याच्या मध्यातून पोहतात. पण आम्हाला ‘दमल्यासारख वाटल, तर थांबता आल पाहिजे, म्हणून कडेनेच जा’ अशी आज्ञा मिळाली होती! हा गैरसमज ठाणेकरांनी दूर केला. मग आमची सगळ्यांची गाडी नीट मार्गाला लागली.
माझ्या बाबांनी सगळ्यात मागे रहायचं, आणि कोणी फार दमल्यास त्याला सोबत करायची, असा निर्णय आधीच झाला होता. आमचा एक मेम्बर माधव करंदीकर ह्याचे वडील तेव्हा बरेच आजारी होते. त्याला प्रॅक्टीस करायला जमल नव्हत. मानसिक ताण तर असणारच. त्याला काही वेग घेता येईना. मलासुद्धा सुरवातीला फार ताण वाटत होता. मी, बाबा आणि माधव सगळ्यात मागे राहिलो होतो. पण कुठल्यातरी क्षणी मला माझी लय सापडली, आणि मी त्या दोघांच्या पुढे निघून गेले. हळूहळू पुढे जाताना आठवले काका दिसले.
काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीपर्यंत मजल मारला असल्याने हा भाग ओळखीचा वाटत होता. मुंबईकडे धावणाऱ्या लोकल गाड्या, ठाकुर्लीच पॉवर हाउस दिसत होत. डोंबिवलीच्या त्या पुलानंतर मात्र अनोळखी भाग सुरू झाला. प्रत्येकाचा वेग कमीजास्त होतोच. त्यामुळे कधी ह्या मेम्बरबरोबर तर कधी त्या मेम्बरबरोबर अस मार्गक्रमण सुरू होत.
आमची मदत-होडी दिसली, की जीवाला जरा गार वाटायचं! स्पर्धात्मक पोहण्यामध्ये अश्या होडीला किंवा त्यातील लोकांना हातही लावायचा नसतो. पण आम्ही ‘गाव-खाता’ वाले लोक, आम्हाला हे काही माहीत नव्हत. ठाणेकरांना त्या दिवशी चांगलेच सांस्कृतिक धक्के बसले असणार! त्या होडीतून आम्हाला प्यायचे पाणी, थोडेफार खायला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आधार मिळत होता. ठाणेकरांपैकी काही जण आम्हाला सोबत म्हणून थोडा-थोडा वेळ पोहतही होते. त्यांचा उत्तम वेग पाहून सगळ्यांना तोंडात बोटं घालावी लागत होती.
इतक मोठ अंतर पोहण, मग ते आमच्या कमी वेगाने असल तरीही अवघडच असत. हातापायात पेटके येतात. पोटात खड्डा पडतो. डोळ्यांमध्ये खारट पाणी जाऊन-जाऊन पुढच नीट दिसेनास होत होत. पोहता पोहता लांबवरच्या डोंगरावर मुंब्र्याच्या देवीचे मंदीर, तिथला ‘नूतन’ ह्या नटीचा मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना सुपरिचित असा बंगला दिसू लागला. ‘अरे वा, आलच की मुंब्रा जवळ!’ ह्या विचाराने मनाने आनंदाने एक कोलांटीउडी मारली. ठाणेकरांपैकी मकरंद अभ्यंकर, आमचा धीर वाढवण्यासाठी आमच्याबरोबर पोहायला लागला.
थोड पुढे गेल्यावर मुंब्रा खाडीचा काठ दिसू लागला. तिथून आमची सपोर्ट टीम आम्हाला हात करत होती, ते दिसल्यावर आपण खरच पोचलो, असा भरवसा वाटायला लागला! काठावर पाय टेकल्यावर, काय वाटल, ते पंचवीस वर्षे उलटून गेली, तरी आजही मनात ताज आहे. किती वेळ नीट उभही राहता येत नव्हत. पाय लटलट कापत होते. डोळ्यांची इतकी आग होत होती, की डोळे बाहेर पडतील की काय, अस वाटत होत.
हळूहळू एकएक जण येऊन पोचत होता. मुंब्र्याच्या खाडीत मध्यभागी एक वाळूच बेट (तेव्हातरी!) होत. आमचा सगळ्यात लहान मेम्बर विजय आणि त्याच्याबरोबरचे दोघे त्या बेटावर पोचले. ओहोटीचा जोराचा प्रवाह कापून पुन्हा ह्या काठावर येण, आता त्यांच्या शक्तीबाहेरच होत. त्यांना घ्यायला आमची मदत होडी गेली खरी, पण सगळे बसले म्हणून, किंवा प्रवाहामुळे असेल, पण ती होडीच उलटली. ह्या काठावर एकदम आरडाओरडा झाला. नुकतेच कपडे बदलून बसलेल्या काही जणांनी कपड्यांसह पाण्यात उड्या घेतल्या. एकमेकांच्या आधाराने सगळे काठावर आले.
माझे बाबा सगळ्यात शेवटी होते. तेही पोचले. माधव करंदीकर फार थकल्याने डोंबिवलीलाच बाहेर पडला, अशी बातमी बाबांनी आणली. आठवले काका अजून आले नव्हते. ते बहुधा माधवला सोबत म्हणून डोंबिवलीला थांबले असावेत, असा अंदाज सर्वांनी केला आणि परत जाणाऱ्या होडीला त्या दोघांना कल्याणला घेऊन जायच्या सूचना देऊन सगळे पोटपूजा करायला लागले. आवरून ट्रेन पकडून घरी पोचलो. एक मोठ धाडस सगळ्यांनी नीटपणे पार पाडल होत, त्यामुळे सगळे खुशीत होते.
दुपारी घरी आल्यावर आम्ही सगळे मस्त ताणून झोपलो होतो. झोपेत आपल्या चारी बाजूंना पाणी आहे, असा भास होत होता. आम्ही सगळे गाढ झोपेत असताना दार वाजल. बघतो, तर माधव करंदीकर बाहेर उभा! तो ठरल्याप्रमाणे परतणाऱ्या होडीत बसून आला होता. त्याच्या चपला होडीतून पाठवायला आम्ही विसरलो होतो. त्यातल्या त्यात आमच घर जवळ, म्हणून मे महिन्याच्या त्या कडकडीत उन्हात अनवाणी चालत तो आमच्याकडे आला होता.
‘आठवले काका घरी गेले का?’ असा प्रश्न विचारल्यावर तो बुचकळ्यातच पडला. ‘ते नव्हते माझ्याबरोबर, मी एकटाच तिथे थांबलो होतो’ ह्या उत्तरानं आम्ही थक्क झालो. आठवले काका त्याच्याबरोबर नव्हते, मुंब्र्यालाही पोचले नाहीत, मग गेले तरी कुठे? ह्या प्रश्नाने आणि त्यापाठोपाठ आलेल्या भीतीदायक शक्यतांनी आमचे चेहरे पांढरेफटक पडले. बाबा लगेच कपडे चढवून सुजाताकडे तिच्या वडिलांशी चर्चा करायला गेले. आठवल्यांच्या घरी हे सांगण अवघड पण आवश्यक होत.
धीर एकवटून हे दोघ त्यांच्या घरी गेले. त्यांच्या वयामुळे त्यांच्या घरून असले वेडे धाडसी प्रयोग करायला स्वाभाविक विरोध होता. त्यामुळे आजही ते ‘ज्येष्ठ नागरिक संघाच्या ट्रीपला जातोय’ अस सांगून बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांच्या सौ.ना किती तरी वेळ ते पोहायला आले होते, हे खरच वाटेना. कळल्यानंतर मात्र त्या हबकून गेल्या. त्यांचा मुलगा लगोलग पोलीस चौकीत जाऊन हरवल्याची तक्रार देऊन आला. जशी आमच्या ग्रूपमध्ये ही बातमी पसरली तस कोणालाच घरी स्वस्थ बसवेना आणि काय करायचं ते उमजेना. सकाळी आनंदाने फुललेले चेहरे आता केविलवाणे झाले होते. काही तासांपूर्वीच आपण जग जिंकल्याच्या आनंदात होतो, हे खरही वाटेना. विनाकारणच सगळे एकमेकांच्या घरी जाऊन बसत होते. रात्र झाली, तरी काही प्रगती नव्हती. कसेबसे चार घास खाऊन आम्ही झोपलो.
आठवल्यांचा एक मुलगा नोकरीनिमित्ताने बाहेरगावी होता. तो कल्याणला पोचला. आपले वडील असे पाहता पाहता नाहीसे झाले, ह्या कल्पनेने आठवले कुटुंबीय खूप काळजीतही होते, ह्यांनी आपल्या वडिलांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल असेल ह्या कल्पनेने त्यांना आमच्या ग्रुपचा रागही येत होता आणि आता कराव काय हेही सुचत नव्हत.
अश्या घटनाक्रमात सगळ्यांची डोकी जागेवर राहिली, तरच नवल होत. कल्याणसारख्या लहान गावात क्षुल्लक गोष्टींची घटना व्हायची आणि ती कितीतरी दिवस चघळली जायची. इथे तर काय एक जिवंत माणूस हवेत विरघळून जावा, तसा नाहीसा झाला होता. मोठी घटनाच होती ती. आधीच अस्वस्थ असलेल्या डोक्यात आग भडकवून देणारे लोक आसपास असतातच. आठवले कुटुंबीयांच्या डोक्यातली संतापाची आणि संशयाची आग चांगली धडधडून पेटली आणि मग सुरू झाला दमदाटी आणि वादावादीचा अध्याय!
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नीट जागे व्हायच्या आतच त्यांचे दोघे मुलगे आणि इतर आठ-दहा लोक घरी आले. ‘नक्की तुम्हाला काहीतरी माहीत असेल, ते सांगून टाका. त्यांना शेवटच कोणी आणि कुठे पाहिलं, सांगा’ वगैरे प्रश्नांची सरबत्ती जरा चढ्या आवाजातच सुरू झाली. पण दुर्दैवाने आम्हाला खरच काही माहिती नव्हती. आता प्रकरण हातघाईवर येणार की काय, अशी भीती वाटायला लागली. कोणीतरी मग मध्यस्ती केली, आणि सामोपचाराने चर्चा सुरू झाली.
चोवीस तास उलटून गेले, तरी काही तपास न लागल्यामुळे आता काही आठवलेकाका जिवंत परत येणार नाहीत, ह्याची जवळपास सर्वाना खात्रीच झाली होती. सगळे प्रयत्न त्यांचा मृतदेहचा शोध घ्यायचा, ह्याच दिशेने चालू होते. कल्याण ते मुंब्रा ह्या टप्प्यात वल्हवायच्या होडीतून जाऊन शोध घ्यायचा, अशी एक कल्पना आली. कोणाला काहीच सुचत नसल्याने, सगळे काहीही करायला तयार होते. काही मेम्बर त्या होडीतून रवाना झाले. काही उलट दिशेने म्हणजे गांधारीच्या दिशेने गेले.
आदल्याच दिवशी आम्ही तिघे पोहून थकलो होतो आणि आई बाकीची हमाली करून थकली होती. पण आराम तर बाजूला राहिला, पण जेवण्याची सुद्धा पंचाईत झाली इतकी चौकशीला येणाऱ्यांची रीघ लागली होती. सगळ्यांना तीच तीच माहिती अगदी गळून गेलो होतो. दुपारपर्यंत दोन दिशांना गेलेल्या दोन्ही टीम हात हलवत परत आल्या. काहीही तपास लागला नाही. ती रात्रही भयानक अस्वस्थतेत गेली. आता हे सगळ संपणार कधी आणि कस? हेच समजत नव्हत. इतक्या भयानक अश्या मानसिक ताणाशी आमचा पहिलाच मुकाबला होता, आणि आम्ही सगळे चारीमुंड्या चीत झालो होतो.
तीन मेची सकाळ उजाडली. पुन्हा कालचीच तऱ्हा आज. लोकांचे तेचतेच प्रश्न, आमचे तेच निरुत्तर चेहरे, तीच काळजी आणि तीच हतबलता. बाबा आणि बाकीचे लोक ठिकठिकाणी चौकश्या करत हिंडत होते.
आमच्या घराच्या रस्त्याकडेला असणाऱ्या खिडकीजवळ बसून मी उगीच बाहेर पाहत होते. डोक्यात काळजी आणि विचारांचं भिरभीर सुरूच होत. समोर एक रिक्षा थांबली, आणि त्यातून आठवले काका स्वतःच्या पायांनी खाली उतरले! माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी जोरजोरात आईला हाका मारल्या. आई पळतच बाहेर गेली. चिखलाने बरबटलेले, अनवाणी, अंगावर फक्त पोहण्याचे कपडे असलेल्या काकांना आम्ही हाताला धरून घरात आणल. त्यांच्याकडे अर्थातच एकही पैसा नव्हता. रिक्षावाले आत येऊन ‘बाकीचे रिक्षावाले ‘वेडा दिसतोय’ म्हणून आणत नव्हते. म्हातारा माणूस दिसला, दया आली, म्हणून मी घेऊन आलो.’ अस म्हणाले. त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावे, हे कळत नव्हत. खरतर आनंदातिरेकाने घश्यातून शब्दच फुटत नव्हते. रिक्षाकाकांचे पैसे देऊन त्यांचे पुन्हापुन्हा आभार मानले.
आमच्या ग्रूपमधल्या एकाला जाऊन ही आनंदवार्ता सांगितली, तो पळतच बाकीच्यांकडे गेला. बाबा आणि इतर मोठे लोक गांधारी नदी पर्यंत जाऊन परत खाडीवर पोचले होते. त्याही दिवशी काहीच शोध लागला नसल्याने अगदी निराश होऊन ते खाडीवर बसले होते. तेवढ्यात त्यांना ही आनंदवार्ता कळली. ते सगळे जण घाईघाईने घरी आले. कोणीतरी जाऊन आमच्या नेहमीच्या डॉक्टरांना बोलावून आणल. आठवले काकांना डीहायड्रेशन झालं होत. डॉक्टरांनी घरीच सलाईन लावल.
प्रफुल्लीत चेहऱ्याने सगळा ग्रूप जमला. आठवले काकांच्या घरची मंडळी आली. काका जास्त काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतेच. कोणी फार काही चौकश्या केल्याही नाहीत. ते सुखरूप घरी आले, ह्यातच सगळ भरून पावल होत. अशक्तपणा कमी झाल्यावर ते त्यांच्या घरी गेले. आधीची महिनोन्महिने केलेली प्रॅक्टीस , मुंब्र्यापार्यान्तच पोहण आणि नंतरचे हे तीन भयंकर दिवस, ह्या सगळ्या अनुभवांनी आम्ही अगदी गळून गेलो होतो. एखाद्या खूप मोठ्या आजारातून उठल्यासारखी अवस्था झाली होती. किती तरी अस्वस्थ रात्रीनंतर आम्ही निर्घोर झोपू शकलो.
दुसऱ्या दिवशीपासून चर्चेच गुऱ्हाळ जोरात सुरू झालं. त्यातून माहिती अशी मिळाली की, डोंबिवलीनंतर पोहत असताना आठवले काका एकटे पडले. खूप थकवा आल्यामुळे मधल्या एका बेटावर थांबले. थकव्याने त्यांना तिथेच झोप लागली. जागे झाले, तोवर दुपार टळून गेली होती. सगळे जण आपली वाट पाहत असतील, काळजी करत असतील म्हणून त्यांनी पोहायला सुरवात केली खरी, पण ते फार लांब जाऊच शकले नाहीत. पुन्हा अश्याच एका बेटावर थांबले. रात्र झाली. अंगावर कपडे नाहीत, पायात चपला नाहीत, जवळ दातावर मारायला फुटका पैसाही नाही अश्या अवस्थेत त्या वृद्ध माणसाने अन्नपाण्याविनाच ती रात्र ढकलली. दूरवर मुंब्र्याच्या देवीच्या देवळातला उजेड तेवढा सोबतीला होता. दुसऱ्यादिवशीही असच काहीस झालं. आलमगड किंवा अश्याच काहीतरी नावाच्या गावात ते गेले, पण तिथे काही थारा मिळाला नाही. तीन तारखेला कसेबसे ते ट्रेन स्टेशनवर पोचले. ट्रेनने कल्याणला आणि रिक्षाने घरी आले.
अश्या रीतीने आमच्या ह्या मुंब्र्याच्या गोष्टीचा शेवट गोड झाला खरा, पण त्या घटनेचा एक चटका ग्रुपच्या जमून आलेल्या नात्याला लागला. एखाद्या सुरेख दिसणाऱ्या विणकामाचा एक धागा ओढल्यावर सगळी वीण विस्कटून जावी, तस काहीस झालं. कोणाची कोणाशी भांडणं, गैरसमज झाले नाहीत. पण आधी ज्या ओढीने सगळे खाडीवर यायचे, ती ओढ काहीशी कमी झालेली जाणवू लागली.
त्या सुमारासच कल्याणजवळ काही रासायनिक कारखाने सुरू झाले. त्यांनी बेदरकारपणे खाडीत सोडलेल्या पाण्याने खाडीच पाणी खूप प्रदुषित झालं. खाडीतले मासे मरून गेले. पोहणाऱ्या काही जणांना त्या पाण्यामुळे त्वचेचा, डोळ्याचा त्रास होऊ लागला. त्याच दरम्यान ग्रूपमधल्या काही जणांचे विवाह झाले, काही जण शिक्षण संपवून रोजीरोटीच्या मागे धावू लागले. आमची बारावी संपवून आम्ही पुढच्या थोडे दिवस सुट्ट्या देणाऱ्या कॉलेजला जावू लागलो. एकूण काय ‘खाडीकाठी कल्याण आणि खाडीवर पोहणे आता पहिले उरले नाही’, ह्याची चरचरून जाणीव झाली. बाबांच्या खाडीवर पोह्ण्याने सुरू झालेला तो सोनेरी अध्याय माझं बालपण सोबत घेऊन संपून गेला..........
समारोप
ह्या पोहण्यात आम्ही कुठलेही विश्वविक्रम केले नाहीत. जग बदलून जाईल इतक महत्त्वाचही काही घडल नाही. एका शहरवजा गावातल्या लोकांनी त्यांच्या मजेसाठी केलेला हा उपक्रम, अस त्याच वस्तुनिष्ठ वर्णन होऊ शकेल. मग त्यात काय विशेष होत? म्हटल तर काही नाही आणि म्हटल तर खूप काही.
तेव्हा आमचं कुटुंब काय किंवा आमची मित्रमंडळी काय सगळे खाऊन-पिऊन सुखी ह्या गटात मोडत होतो. अगदी फी भरायला पैसे नाहीत किंवा उपाशी राहायला लागतंय अशी काही परिस्थिती नव्हती. पण वायफळ खर्चांना थारा नव्हता. पण ‘आपली मुलं कश्यात मागे पडू नयेत,’ अशी काहीशी जिद्दही होती. तेव्हा शक्य होत त्या असंख्य चांगल्या, आनंद देणाऱ्या छंदांची तोंडओळख आम्हाला आमच्या पालकांनी करून दिली.
लांब जाऊन पोहायला शिकता येत नाही का? खाडी आहे ना, तिथे शिका. सगळ्या कुटुंबाची तिकीटे काढून गायनाच्या कार्यक्रमांना जाण शक्य नाही का? सुभेदार वाड्याच्या गणपतीत उत्तमोत्तम कार्यक्रम होत असत, तिथे लहान असल्यापासून आवर्जून घेऊन जायचे. वातानुकुलीत रेल्वेच्या डब्यातले किंवा विमानाचे प्रवास तेव्हा स्वप्नातही नव्हते, पण ट्रेकिंग? त्याला तर काही अडचण नव्हती, मग त्याला सक्रीय उत्तेजन मिळायचं. हे सगळ त्यांनी ठरवून, विचारपूर्वकच केल असेल, अशी नाही. पण झालं मात्र अस की ‘आनंद मिळवण्यासाठी खिशात खूप पैसे असावेच लागतात, अस नाही,’ हा धडा आम्ही लहान वयातच गिरवला. पैसा हे महत्त्वाचे साधन नक्कीच आहे, पण ते एकमेव साध्य होऊ शकत नाही, हे काहीश्या अमूर्त स्वरुपात मनावर बिंबल गेल.
ह्या आमच्या ग्रूपमध्ये मुलामुलींची संख्या विषम होती. मुली अगदी कमी आणि तरूण मुलांची संख्या भरपूर. मला सांगायला अभिमान वाटतोय की इतक्या दिवसात, कधीही कोणीही गैरवर्तन केल नाही. एकमेकांना ‘भाऊ-बहीण’ मानणे, इत्यादि फिल्मी प्रकार न करताही, ती मैत्री तेवढीच स्वच्छ, निर्मळ होती. एकमेकांची चेष्टा-मस्करी, चिडवा-चिडवी खूप चालायची, पण त्या मस्करीची कुस्करी होऊ नयेत, मर्यादा ओलांडली जाऊ नये, ही काळजी सगळ्यांकडून घेतली गेली. हा सगळा पोहण्याचा उपक्रम माझ्या आडनेड्या वयात झाला. तेव्हाच ही निर्मळ अशी मैत्री अनुभवायला मिळाल्यामुळे, पुढे सदैव जगात चांगली माणसच खूप असतात असा विश्वास निर्माण झाला. आपण सावध राहायला पाहिजे, हे तर नक्कीच. पण माणसातल्या चांगुलपणावरही भरवसा ठेवायला पाहिजे, अस ठामपणे वाटत राहील. आजच्या युगात महत्त्वाच्या ठरलेल्या ‘टीम बिल्डिंग’ चे धडेही ह्यात गिरवले गेले. कमी ताकदीच्या माणसाला प्रोत्साहन देऊन उत्तम कामगिरी करून घेणे, हे तिथे रोजच चालायच.
काळ कोणासाठीही थांबत नाही आणि काळाने कोणासाठी थांबूही नाही! उत्तमपणे चाललेला आमचा हा पोहण्याचा कार्यक्रम हळूहळू बंद पडला. कारणे काहीही असोत, त्याबद्दल विचार करण्यात काहीही अर्थ नाही. कोणताही उपक्रम, तो कितीही चांगला असला, तरी अविरत तर चालू शकत नाही. तशी अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल, पण तो उपक्रम कश्या पद्धतीने संपतो, ती पद्धत त्या उपक्रमाच्या मनात राहणाऱ्या आठवणी कडू की गोड हे ठरवते. चार डोकी एकत्र येणार आणि लांब जाणार, हा जगाचा नियमच आहे.
मग निदान दूर जाताना भांडण- गैरसमज-दुरावे नकोत. पुन्हा कधीतरी एकत्र येण्यासाठी, जुन्या आठवणींची उजळणी करण्यासाठी एकमेकांच्या मनात जागा असायला हवी. ह्या आमच्या खाडीच्या ग्रूपमध्ये सुदैवाने असच झालं! सगळ्यांच्या मनात गोड आठवणी राहिल्या. अजूनही अधूनमधून आम्ही सगळे कुटुंबियांसह भेटतो, हसतो, चिडवा-चिडवी करतो. जड पावलांनी पण प्रफुल्लीत मनाने आपापल्या उद्योगांना लागतो. पुढचे बरेच दिवस ह्या उर्जेने भरलेले असतात. एखादा उपक्रम सुरू कसा करावा, त्यात होता होईल तेवढी प्रगती कशी करावी आणि तो कसा चांगलेपणाने संपवावा, ह्या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्यात शिकलो.
वयाने वाढल्यावर सरावाच्या काठाची साथ सुटली. कधी संथ तर कधी खवळलेल्या पाण्यात उड्या घ्याव्या लागल्या. प्रत्येक वेळेला वेगात पुढे जाऊन पहिला क्रमांक मिळालाच, अस झालं नाही. कधी प्रवाहाबरोबर गेलो आणि कधी प्रवाहाविरुद्ध. कधी पाण्यातल्या न दिसणाऱ्या भोवऱ्यात अडकायला झालं, तर कधी नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटायला झालं. पण खाडीच्या पाण्यात मिळवलेल्या तरंगायच्या अनुभवाच्या शिदोरीवर निदान आपलं डोक पाण्याच्या वर ठेवून पलीकडचा काठ गाठता आला. कधी हा प्रवास आरामात झाला, तर कधी पार थकवणारा. पण पलीकडच्या काठावर नजर पक्की असली, की मग प्रवास कधीतरी नीटपणे संपतोच, हे शहाणपण खाडीत तरंगतानाच मिळाल.
असे हे आम्हाला जगरहाटीच्या अनोळखी पाण्यात पोहायला शिकवणारे, अविस्मरणीय असे आमचे ‘तरंगायचे दिवस’!!
.
.
वाह! काय सुंदर लेखमाला! एक
वाह! काय सुंदर लेखमाला! एक 'फील गुड' फीलिंग आलं हे वाचल्यानंतर. धन्यवाद या अनुभव कथनाबद्दल.
फारच सुंदर लिहिलंय. आठवले
फारच सुंदर लिहिलंय.
आठवले काका सुखरुप घरी आले हे वाचून माझाच जीव जणु भांड्यात पडला.
पण खाडीच्या पाण्यात मिळवलेल्या तरंगायच्या अनुभवाच्या शिदोरीवर निदान आपलं डोक पाण्याच्या वर ठेवून पलीकडचा काठ गाठता आला. कधी हा प्रवास आरामात झाला, तर कधी पार थकवणारा. पण पलीकडच्या काठावर नजर पक्की असली, की मग प्रवास कधीतरी नीटपणे संपतोच, हे शहाणपण खाडीत तरंगतानाच मिळाल. >>>> हा परिच्छेद तर सुपर्ब .....
असेच लिहित रहाणे. लेखनशैली अगदी अकृत्रिम, गप्पा मारल्या सारखी - मस्त जमून गेलीये..
अप्रतिम लिहिलय.. __/\__
अप्रतिम लिहिलय.. __/\__
फारच सुंदर लिहिलंय. आठवले
फारच सुंदर लिहिलंय.
आठवले काका ग्रेट माणूस, ते ‘ज्येष्ठ नागरिक संघाच्या ट्रीपला जातोय’ अस सांगून बाहेर पडले होते. कोटी कोटी दंडवत.... म्हातारपणी मलाही असा काही करणारा व्हायला आवडेल...:)
ते सुखरुप घरी आले हे वाचून माझा टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला.....जणू नाही खराखूरा...
"पण झालं मात्र अस की ‘आनंद मिळवण्यासाठी खिशात खूप पैसे असावेच लागतात, अस नाही,’ हा धडा आम्ही लहान वयातच गिरवला. पैसा हे महत्त्वाचे साधन नक्कीच आहे, पण ते एकमेव साध्य होऊ शकत नाही, हे काहीश्या अमूर्त स्वरुपात मनावर बिंबल गेल."
"आपण सावध राहायला पाहिजे, हे तर नक्कीच. पण माणसातल्या चांगुलपणावरही भरवसा ठेवायला पाहिजे, अस ठामपणे वाटत राहील."
"एखादा उपक्रम सुरू कसा करावा, त्यात होता होईल तेवढी प्रगती कशी करावी आणि तो कसा चांगलेपणाने संपवावा, ह्या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्यात शिकलो."
हसत खेळत गिरवलेले खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच महत्वाचे धडे ....आम्हालाही घरबसल्या शिकायला मिळाले... अनेकानेक धन्यवाद...
अप्रतिम लेखमाला.
अप्रतिम लेखमाला.
छान शेवट..अगदी आवड्लं
छान शेवट..अगदी आवड्लं
किती सुरेख लिहिलं आहे, फार
किती सुरेख लिहिलं आहे, फार सुंदर! चारही लेख खूप म्हणजे खूपच आवडले.
अप्रतिम लि़खाण. १ मे जवळ
अप्रतिम लि़खाण. १ मे जवळ येतोय. तुमच्या धाडसी पराक्रमाचा. शेवट फारच आत्मचिंतन करायला लावणारा आहे.
सगळेच भाग मस्त जमले आहेत.
सगळेच भाग मस्त जमले आहेत. कल्याण ते मुंब्रा म्हणजे एकदम भारी की.
चारही लेख मस्त लिहिलेत.
चारही लेख मस्त लिहिलेत. वाचताना मजा आली. हा चौथा तर एकदम खास.
अमेझिंग अनुभव सुंदर कथन!
अमेझिंग अनुभव सुंदर कथन!
अतिशय सुंदर लिहीलं आहे. खूप
अतिशय सुंदर लिहीलं आहे. खूप आवडलं. तुम्ही खरंच भाग्यवान. आयुष्याच्या जडण घडणीच्या महत्वाच्या वयात संपूर्ण आयुष्य समृद्ध करणारी माणसं, अनुभव तुमच्या वाट्याला आले. संपन्न जीवन म्हणजे तरी दुसरं काय?
खूप सुंदर लेखमाला... समारोप
खूप सुंदर लेखमाला... समारोप तर सगळ्या लेखांचा कळस आहे.
बाकी वरच्या सगळ्यांनाच अनुमोदन.
आवड्ली लेखमाला.
आवड्ली लेखमाला.
सुंदर लेखमाला, आणि तितकाच
सुंदर लेखमाला, आणि तितकाच सुंदर उपक्रम!
ऑसम ! . पण झालं मात्र अस की
ऑसम !
. पण झालं मात्र अस की ‘आनंद मिळवण्यासाठी खिशात खूप पैसे असावेच लागतात, अस नाही,’ हा धडा आम्ही लहान वयातच गिरवला. पैसा हे महत्त्वाचे साधन नक्कीच आहे, पण ते एकमेव साध्य होऊ शकत नाही, हे काहीश्या अमूर्त स्वरुपात मनावर बिंबल गेल >>.
ग्रेट ! मस्त लिहिले आहे तुम्ही.
फार फार सुरेख अशीच लिहित रहा
फार फार सुरेख
अशीच लिहित रहा अनया. तुझे कैलास-मानसचे लेख पण खूप आवडले होते.
अत्यंत सुंदर लेखमाला
अत्यंत सुंदर लेखमाला कुठल्याही चांगल्या गोष्टीला अंत हा असतोच असं तुम्ही स्वतः म्हटलंय... पण तुम्ही याबद्दल लिहितंच रहावं असंच वाटत होतं. आठवले काकांचं परत येणं खूप बरं वाटलं धन्यवाद
फार सुरेख लिहीलं आहे
फार सुरेख लिहीलं आहे तुम्ही.
समारोपाचं लिखाण खूप आवडलं व पोचलं
खुपच छान लिहिलयं, ग्रेट आहात
खुपच छान लिहिलयं,
ग्रेट आहात तुम्ही सगळे !
फार सुरेख झाली ही लेखमाला.
फार सुरेख झाली ही लेखमाला. शेवटचा लेख तर एकदम सह्ही!
अतिशय सुरेख, साधे, प्रभावी
अतिशय सुरेख, साधे, प्रभावी लेखन. फार आवडली लेखमाला आणि त्याहुन जास्त तुमचा दृष्टीकोन भावला. लिहित रहा अनया.
फारच छान लिहिता तुम्ही .
फारच छान लिहिता तुम्ही . लिहीत रहा.
मस्त लेखमाला ! रैना +१
मस्त लेखमाला ! रैना +१
मस्तच छान लिहीलय अगदी सहजपणे
मस्तच
छान लिहीलय
अगदी सहजपणे लिहीलय अस फील देणारं लेखन
साधं सरळ पण मनाला थेट
साधं सरळ पण मनाला थेट भिडणारं लेखन. आणि विषय माझ्या अगदी जिव्हाळ्याचा!
मस्त लिहिलय. भाग ३ आणि ४
मस्त लिहिलय. भाग ३ आणि ४ विशेष आवडले.
छान मालिका. मला हा भाग खूप
छान मालिका. मला हा भाग खूप आवडला.
अंजली , पौर्णिमा +१ आवडली ही
अंजली , पौर्णिमा +१
आवडली ही मालिका.
Pages