दशग्रंथी ब्राह्मण कोणास म्हणावे?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 27 April, 2013 - 02:27

दशग्रंथी ब्राह्मण हे मुख्यत्वेकरून ऋग्वेदसंहितेशी जोडले गेले आहे आणि जे ऋग्वेदसंहितेच्या सर्व अंगात पारंगत असत त्याना ही अतिशय मानाची पदवी पूर्वी काशीला अथवा पैठणला जाउन अभ्यास करून आणि परीक्षा देऊन मिळत असे. आता ते दशग्रंथ आणि दशांगे कुठली ती बघू यात . रावण हा दशग्रंथी होता.

१] ऋग्वेदसंहिता: त्यामध्ये ऋग्वेदसंहिता मंडल १ ते १० ज्यामध्ये ९८५३ ऋचा येतात,ही सगळी संहिता मुखोद्गत असावी लागते.

२] ब्राह्मणसंहिता: प्रत्येक वेदाबरोबर "ब्राह्मण " संहिता असतात, ब्राह्मण संहिता ह्या त्या त्या वेदाबद्दल भाष्य करते आणि यज्ञ करताना काय काळजी घ्यावयाची ही माहिती देते. हे पुस्तकाचे नाव आहे आणि ज्याचा ब्राह्मण जातीशी काहीही संबंध नाही.
ऋग्वेदाबरोबर दोन ब्राह्मण संहिता आहेत "ऐतेरीय " [५० अध्याय]आणि 'सांख्यायन "[४० अध्याय] ब्राह्मण संहिता.
या पैकी ऐतेरीय ब्राह्मणसंहिता ही सोमरस, त्याची आहुती आणि उपयोग ही माहिती देते.

३] आरण्यक : प्रत्येक ब्राह्मणाबरोबर आरण्यक [अरण्यात जाउन गाण्याचे ] पुस्तक असते. ऋग्वेदाबरोबर जे आरण्यक आहे त्याचे नाव एतेरीयारण्यक आहे .त्यात अरण्यात जाऊन करण्याची काही "महाव्रते " दिली आहेत .यातच एतेरीय उपनिषद आहे जे काही तत्त्वज्ञान चर्चेत आणते .
दुसरे ऋग्वेदी आरण्यक आहे कौशितकी आरण्यक .यातील १५ अध्यायात कौशितकी उपनिषद आहे ,तसेच काही थोडे तत्त्वज्ञान ,अग्निहोत्र अशी माहिती आहे .

४] शिक्षा: वेदाबरोबर सहा वेदांगे आहेत त्यापैकी एक शिक्षा आहे. वेदांत उच्चार आणि उच्चारशास्त्र फार महत्वाचे आहे .कारण मंत्रांची शक्ती ही त्यांच्या योग्य उच्चारावर अवलंबून असते हा समज होता.प्रत्येक वेदाला अनुसरून त्याच्या उच्चाराचे पुस्तक मौखिक स्वरुपात आहे त्याला शिक्षा असे म्हणतात. त्यापैकी दशग्रंथी ब्राह्मणाला शिक्षेची ऋग्वेद शाखा ज्याचे नाव “ऋग्वेद प्रतीशाख्य” आहे हे पाठ असावे लागते.

५] कल्प : हे सुध्दा ६ वेदांगापैकी एक आहे. यज्ञामध्ये आहुती आणि बळी देण्याची जी पध्दत होती त्यामुळे त्यासाठी अनुरूप ऋचा यात दिल्या आहेत .
कल्पसुत्रे ही दोन प्रकारची आहेत
१] वेदासाठी: ज्याला श्रुतीसुत्रे म्हणतात.
२] स्मृतीवर आधारलेल्या समारंभासाठी : ज्याना स्मार्तसूत्रे म्हणतात. स्मार्तसूत्रात पुन्हा दोन उप प्रकार आहेत अ] गृह्यसुत्रे : ज्यात घरगुती समारंभ जसे जन्म,नामकरण,लाग इ.वेळेस लागणारे मंत्र ब] धर्मसूत्रे ; ज्यात सामाजिक व्यवहार ,वाळीत टाकणे,सामाजिक जबाबदाऱ्या इ. गोष्टींची सूत्रे आहेत.प्राचीन भारतातील बहुतेक कायदे या सूत्रातून आले.
याशिवाय यजुर्वेदात यज्ञाचा मंडप,वेदी इ. गोष्टींच्या बांधकामाचे गणिती नियम आणि सूत्रे आहते ज्याचे नाव शुल्ब सूत्रे आहे.

दशग्रंथी ब्राह्मणाला ऋग्वेदाशी सलग्न अशी श्रुतसूत्रे पाठ करणे अनिवार्य असे ,जसे आश्वलायन आणि सांख्यायानाची सूत्रे

६] व्याकरण : ऋग्वेद हा मौखिक असल्याने त्याचे उच्चार ,ऱ्हस्व -दीर्घ ,शब्द कसे झाले . त्याचा व्याकरणदृष्ट्या विचार इ. शास्त्राला व्याकरण म्हणतात. यात रूढीला फार महत्व आहे.दुर्दैवाने ऋग्वेदकालचे बहुतेक सर्व ग्रंथ नष्ट झाले आहेत. ऋग्वेदाचे व्याकरण [ज्याला पदपथ अर्थात पायवाट हा मोठा गोड शब्द आहे] ते आहे साकल्यमुनींचे ऋग्वेद पदपथ .
याशिवा संपूर्ण पाणिनी पाठ असणे जरुरी होते.

७]निघंटु: हा जगातला कदाचित पहिला शब्दकोश [dictionary and thesaurus ] आहे . ज्यामध्ये शब्दाचे अर्थ जे रूढ कार्य ,धर्मासाठी लागतात ते विस्ताराने दिले आहेत याचे ५ भाग आहेत . अर्थात याला शब्दकोश म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही शब्दाच्या अर्थाबरोबर त्याची रूपे, धातू,संधी इ. सर्व दिले आहे. उदाहरण द्यावयाचे तर उदक या शब्दाची १०० रूपे दिली आहेत . अर्थात हे सगळे मौखिक असल्याने पुन्हा पदरुपात आहे. चौथ्या भागात एका शब्दाला समानार्थी शब्द दिले आहेत . या पुस्तकातील पद संख्या १७७० आहे.

८] निरुक्त: अर्थ: व्याख्या, व्युत्पत्तिसंबंधी व्याख्या)शब्दांची व्युत्पत्ती [Etomology ] हे एक नवीन शास्त्र आपल्या लोकांनी तयार केले होते .
निरुक्त पाच प्रकारचे असते १]वर्णागम (अक्षर वाढविणे ) २] वर्णविपर्यय (शब्दातील अक्षरे मागेपुढे करणे ), ३]वर्णाधिकार (अक्षरे बदलणे ), ४] नाश (अक्षर गाळणे ) ५] धातुच्या अनेक अर्थापैकी एक अर्थ सिद्ध करणे. निरुक्तावर यास्क या मुनीनी फार काम केले आणि त्यामुळे त्याना निरुक्तकार म्हणतात. यास्कांच्या पुस्तकात अर्थ काढण्यासाठी छोटी छोटी सूत्रे पद रुपात दिली आहेत कारण हे सगळे मौखिक असल्याने लक्षात ठेवणे पदरुपात सोपे जाते. याशिवाय कठीण शब्दांचे अर्थ आणि वैदिक शब्दांचे अर्थ संदर्भासहित दिले आहेत.

९] छन्द: आपले हे सगळे ज्ञान हे पदरुपात मौखिक मोठ्याने घोकायचे असल्याने ज्ञान संपन्न ब्राह्मणाला कवितेचे नीरनिराळे प्रकार,ते ओळखणे ,तालासुरात म्हणणे आणि तशी पदे रचणे हे सगळे माहित असणे आवश्यक आहे .एकट्या ऋग्वेदात जगती,त्रिष्टुभ,गायत्री ,विराज आणि अनुष्टुभ हे छन्द आहेत .त्यामुळे हे सगळे शास्त्र हे छन्द या नावाखाली येते. छन्दामध्ये अक्षरसंख्या, मात्रा ,गती ,यति [pause ] ह्या कसौट्या असतात आणि त्यामुळे हे खूप कठीण शास्त्र आहे. ऋग्वेदात याची चर्चा आहे. दशग्रंथी ब्राह्मण हे पदे रचण्यात वाकबगार असत.

१०] ज्योतिषशास्त्र : हेही वेदान्गापैकी एक आहे आणि याला शास्त्र हे त्याच्या खालील उपविभागामुळे म्हणतात पण आपल्याकडे अज्ञ धार्मिक फक्त फलज्योतिष हेच ज्योतिष समजतात . ज्योतिषशास्त्रचे प्रकार आहेत
अ] खगोलशास्त्र [ astronomy ]
ब] सिद्धान्तज्योतिष अथवा 'गणित ज्योतिष' (Theoretical astronomy)[कधी ग्रहण होईल हे ठरविणे ]
क] फलितज्योतिष (Astrology)
ड] अंकज्योतिष (numerology)

आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल की दशग्रंथी ब्राम्हण होणे हे का महाकठीण काम आहे ,कारण हे सगळे समजून घेणे आवश्यक होते त्याशिवाय ही सगळी अफाट पदसंख्या पाठ करणे आणि धर्मपीठापुढे त्याची परीक्षा देणे आवश्यक असे. इतके काही करून हे सगळे ज्ञान मौखिक स्वरूपात आपल्या पूर्वजांनी जतन केले म्हणजे ते काय तैल बुद्धीचे असतील याचा विचार तर करा.....

<<आधारित - https://www.facebook.com/groups/kbvsdb/- >>

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! अफलातून माहिती, धन्यवाद Happy
मला वाटते की पूर्वीही कोणीतरी मायबोलीवर अशाच अर्थाची/स्वरुपाची माहिती दिली आहे. Happy
मी सेव्ह देखिल करुन ठेवली होती, सापडते का लिन्क ते बघायला हवे.

छान माहिती Happy
पण यात काही शब्द लिहायला चुकले आहेत का? उदा: ऐतरेय, सूत्र, etymology, असं पाहिजे ना?

शिवाय पदपथ नसून ते पदपाठ आहे ना? वेदाच्या मुखस्थ करायच्या दहा पद्धतींपैकी एक? उदा: पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ, घनपाठ, इ.? या अशा दहा पद्धतींमुळेच तर वेदांचं काहीही अपभ्रंश न होता जतन झालं. जगातलं एकमेव उदाहरण Happy

माहीती चांगली आहे परंतु त्रुटी दिसत आहेत (की मलाच केवळ वाटत आहे? )
जाणकार अधिक चांगल्या पध्दतीने माहीती देतील त्याबद्दल

>>रावण हा दशग्रंथी होता.<<
हो ना ऐकून आहे पण तो तर राक्षस होता ना मग राक्षस ब्राह्मण असू शकतो काय? असा प्रश्न मला पडतोच.

मी कुठेतरी वाचले होते..दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे ज्याला चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराण सुलट आणी उलट त्यांच्या अर्थासकट मुखोद्गत आहेत.

ब्राह्मण लायब्ररित कामाला असेल आणि तिथे हजार ग्रंथ असतील ,तर त्याला हजारग्रंथी ब्राह्मण म्हणावे काय? Proud

राक्षस ब्राह्मण असू शकतो काय? >>>> रावणाचे वडील ब्राम्हण आणि आई राक्षसीण होती, केकसी कि काय नाव होत. अस वाचलेल आठवतय.

राक्षस ही जाती वाचक संज्ञा नसावी ती वृत्ती वाचक असावी. राक्षसी महत्वाकांक्षा असा शब्द प्रयोग प्रचलीत आहे तो याच अर्थाचा असावा. मुळ मुद्यावर चर्चा सुरु रहावी.

बरोबर नितिनचंद्र, तसे नसते तर बारा राशींमध्ये नक्षत्रागणीक देवगण, मनुष्यगण राक्षसगण अशी विभागणी शास्त्रकारान्नी केली नसती.
सध्याची शिव मालिका कोणि बघत असेल, तर त्यात रावण हा कुबेराचा भाऊ होता असे दर्शविले आहे.

तर त्यात रावण हा कुबेराचा भाऊ होता असे दर्शविले आहे.
>>>> सावत्र भाऊ आहे ना. पुष्पक विमान रावणाने कुबेराकडूनच बळजबरीने घेतले होते.

चांगली माहिती.

ब्रह्मदेवाच्या १० पुत्रांपैकी एक महर्षी पुलस्त्य, पुलस्त्यंचा पुत्र महर्षी विश्रवा, विश्रवांचा पुत्र रावण. रावणाची आई कैकसी (ही शुंभ राक्षसाच्या दुर्गम नावाच्या पुत्राची कन्या होती. कैकसीचा एक अर्थ 'तुलना'). इतर पुत्रांप्रमाणेच रावणालाही विश्रवांकडून वेदांचे शिक्षण मिळाले होते परंतु कर्मस्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्याने तो कैकसीच्या कुळाला फॉलो करु लागला.
-----
वेदाच्या मुखस्थ करायच्या दहा पद्धतींपैकी एक? उदा: पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ, घनपाठ, इ.? या अशा दहा पद्धतींमुळेच तर वेदांचं काहीही अपभ्रंश न होता जतन झालं. जगातलं एकमेव उदाहरण स्मित >>>> वरदा, याबद्दल अधिक लिहिशील का?

ऋग्वेद या विषयावरची ही मराठी विश्वकोशातली नोंद.

ऋग्वेदाच्या पाठांतर पद्धती आणि संबंधित माहिती थोड्या वेळाने/ उद्यापरवा लिहिते

एक बारीक शंका : अशा अवघड कुळातल्या प्रत्येकालाच वेद विद मुखोद्गत करावे लागतात का ते फक्त पहील्या मेंबरालाच लागु आहे? कारण असे दशग्रंथी मठ्ठाड पाहीले आहेत.

चांगली माहिती दिली आहे. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे त्रुटी असतील तर दूर कराव्यात ही विनंती.

सर्व मंडळींस आदरणीय प्रणाम,
स्वामि ! छान लिहीता ! त्रुट्या आहेत पण त्यांमुळे तत्व बदल झालेला नाही, म्हणुन ह्या त्रुट्यांना महत्व नाही.

चुका नाही केल्या, तर मनुष्य कसचा ? असो . . . . आता हा रावण एकच दशग्रंथी नव्हता, तर
सत्ययुगात ( म्हणजेच कृत युगात ), त्रेता युगात ( ह्या युगात रावण होता ), द्वापर युगात जवळ जवळ सगळेच दशग्रंथी होते. हे न्ञान त्या काळी अगदी सामान्य होते, आणी वेदांचे अध्ययन - अध्यापन करणारे व राज्यकर्ते ह्या सर्वांना हे अवगत होते, कारण हे न्ञान त्यांना गुरुकुलातच मिळायचे.
उदाहरणार्थ : श्रीरामाला अथवा श्रीकृष्णाला हे वरील न्ञान नव्हते असे शक्य नाही.
ब्राम्हण हा दशग्रंथी आहे कि नाही ही प्रथा कलियुग सुरु झाल्यानंतर जवळ-जवळ १६०० वर्षां नंतर तथाकथित धार्मिक पंडितांनी स्वार्थासाठी प्रचलीत केली.
जसेजसे न्ञाना वर संकर धरु लागला तसे तसे स्वतःच ह्या न्ञानाच्या त्यांनी पातळ्या ( जाणकार, अभ्यासु, ज्येष्ठ, निष्णात, पंडीत, पारंगत इ० ) नेमिल्या, द्रव्यअर्जन सुरु केले.

दशग्रंथी होते रावण, कुंभकर्ण, मेघनाद हे सर्वच. आणी त्यात काही एव्हढी आश्चर्याचीही गोष्ट नाही.
कारण रावण्-कुंभकर्ण हे त्यांच्या मागच्या जन्मी हिरण्याक्ष आणी हिरण्यकश्यिपु होते आणी नंतरच्या जन्मी शिशुपाल आणी दंतवक्र होते.
सत्य तर हे आहे कि हे दोघेही सर्वप्रथम भगवान विष्णुच्या वैकुंठ धामातील भगवंताचे दोन पार्षद आहेत . . . . जय आणी विजय , जसे नंद आणी सुनंद आणी आणखीन कैक असे.
त्यामुळे रावण दशग्रंथी होता तर त्यात काहिच नवल नाही. हा एक अत्यंत उच्चकोटीचा शिव भक्त होता आणी महान्ञानी होता.
हे दोघे भगवंताचे पार्षद, अभिमान झाल्यामुळे चार ब्राम्हण कुमारांच्या शापाने, वैकुंठातुन अधःपतन होउन, तीन जन्म अत्यंत अभिमानी प्रवृत्ति धारण करुन जन्म-मृत्यु पावले ते असे . . . .
१). सत्ययुगात - हिरण्याक्ष- हिरण्यकश्यिपु ( दोन्ही भावांत खूप प्रेम होते आणी हे दोघेही ह्या जन्मात ब्राम्हण पुत्र होते ) - ह्यांना भगवंताने वराह अवतार आणी नृसिंह अवतार घेउन मारले.
२). दोघेही त्रेतायुगात - रावण - कुंभकर्ण पुन्हा ब्राम्हण पुत्र जन्मले - ह्या दोघांना भगवान विष्णु ने श्रीराम रुपाने मारले.
३). तिसरा जन्म दोघांचा द्वापर युगात, शिशुपाल - दंतवक्र ( दोघेही ह्या जन्मात क्षत्रिय होते ),म्हणुन झाला ज्यांचा भगवंताने श्रीकृष्ण रुपाने वध केला.
आणखीन एक महत्वाची गोष्ट ईथे आवर्जुन सांगतो . . . . भगवान विष्णु चे हे सर्व अवतार कारण मुख्यतः ह्या दोन्ही पार्षदांचा उद्धार हाच आहे, पृथ्वीवरचा भार उतरवणे वगैरे सर्व निमीत्त मात्र आहेत हे लक्ष्यात राहु देवुन मगच बाकिचे पडताळे घेत रहावे.

इती . . . .

फार चांगली माहिती . धन्यवाद स्वामीजी .परब्रह्मजी ,लिंबूभाऊ आणि इतर मंडळींची चर्चा /प्रतिसाद ही उद्बोधक आहेत . अशा विषयांवर चर्चा माबोवर वारंवार व्हाव्यात ज्यायोगे प्राचीन अध्यात्म आणि ज्ञान याबद्दल सत्य नवीन पिढीला ज्ञात होईल...!

मंदार ,
अचुक बोललात, नव्या पिढीला, तर आता ह्या सर्वांची जाणीव होणे आवश्यक आहे.
हाच आहे तो धर्मसंकर ज्याची मी वर नोंद केली.

धन्यवाद आणि आभार सर्व प्रतिक्रिया बद्दल ...

परब्रह्म ,लिंबूटिंबू आणि इतर चिकित्सक मंडळी

>>>>> आमचा प्रतिसाद प्रश्नात्मक म्हणुन लग्गेच गैरलागु का? <<<<<

बहुधा तुमच्या पुढे उद्धृत केलेल्या त्या पोस्टमधल्या दशग्रंथी मठ्ठाड या शब्दांमुळे पब्लिकने इग्नोर मारले असावे! Wink
मी तरी त्याचमुळे उत्तर दिले नव्हते. Happy आता दशग्रन्थीन्ना "मठ्ठाड" म्हणणे म्हणजे मग बोलणेच खुन्टते ना?

>>>> एक बारीक शंका : अशा अवघड कुळातल्या प्रत्येकालाच वेद विद मुखोद्गत करावे लागतात का ते फक्त पहील्या मेंबरालाच लागु आहे? कारण असे दशग्रंथी मठ्ठाड पाहीले आहेत. <<<<<

एक किरकोळ दुरुस्ती: वरती श्री परब्रह्म यांनी ज्ञ साठी न्ञ हे जोडाक्षर वापरले आहे तो टंकनदोष असेल तर दुरुस्त करता येईल. पण तशी समजूत असेल तर ती चुकीची आहे. न आणि ञ्(दोन्ही पाय मोडके) ही अनुनासिके आहेत . त्यांच्या संधीतून ज्ञ अक्षर बनलेले नाही, तर ते ज् +ञ या दोन वर्णांचे मिळून बनलेले आहे. ज्ञ टंकण्यासाठी मायबोलीवर jn असे टंकावे लागते.

@ लिंबुराव...मी सरसकटीकरण केलेलं नाही. प्रश्न नीट वाचला तर कळेल. "असे दशग्रंथी " अस म्हणजे असे हुशार असलेल्या कुळातले / उपजातीतले काय जे असेल ते लोकं असा अर्थ होतो. आता एवढे हुशार लोकं आहेत म्हंटल्यावर फोड करुन सांगायची गरज वाटणार नाही असं वाटलं होतं. चालायचंच.

हीरा,

गुरुदक्षिणा काय घेणार ? हा टंकन दोष दाखवून बरोबर दूर ही करण्यासाठी.

आता मला ज्ञात झाले. ठीक आहेना ?

आभारी आहे.

>>>> आता एवढे हुशार लोकं आहेत म्हंटल्यावर फोड करुन सांगायची गरज वाटणार नाही असं वाटलं होतं. चालायचंच <<<< चालायचच कसे? त्या फोड करुन सान्गायची गरज भासणार्‍यान्ना देखिल मठ्ठाड म्हणू आपण, कसं? Proud

>>>>> "असे दशग्रंथी " अस म्हणजे असे हुशार असलेल्या कुळातले / उपजातीतले काय जे असेल ते लोकं असा अर्थ होतो. <<<<< हा अर्थ घेतलाय तोच चूकीचा आहे. अजुनतरी ये देशी, शैक्षणीकदृष्ट्या एखाद्या व्यक्तिला एखादी पदवी मिळते ती प्रत्यक्ष शिक्षण घेऊन परिक्षा दिली असेल, उत्तीर्ण झाली असेल तरच. फार क्वचित वेळेस, व क्वचित क्षेत्रातच, लौकिक शिक्षण नसतानाही केलेल्या अफाट कार्यास अनुसरुन काही एक पदवी/प्रतिष्ठा देण्याचाही प्रघात आहे. जसे की पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संस्थापक/संवर्धक दिनकर केळकरांना ते केवळ मॅट्रिक असूनही, पुणे विद्यापिठाने "डॉक्टरेट" दिली तसेच भारत सरकारने पद्मपुरस्कारानेही गौरविले.
[आता यावर पद्मपुरस्कार अन डॉक्टरेट यान्ची तुम्ही काय "दशग्रंथीबरोबर" तुलना करताय की काय असे नाकाने कान्दे सोलले जाऊ शकतात Proud याची मला जाणिव आहे, पण ही तुलना नसून, केवळ, कोणतीही शैक्षणीक पदवी ही शिक्षणाधारीतच असते, व अपवाद असलेच तर काय असतात याचे उदाहरण म्हणून दिले आहे]
मात्र "दशग्रंथी" या विशेषण/पदवीबाबत हे अपवादही लागू पडत नाही. प्रत्यक्ष शिक्षण झालेले असणे हा नियम "दशग्रंथी"बाबत वगैरे तर चोख पणे पाळला जातो. वरील मूळ लेखातील या मजकुरात तो उल्लेख देखिल आला आहेच. >>>>>>> कारण हे सगळे समजून घेणे आवश्यक होते त्याशिवाय ही सगळी अफाट पदसंख्या पाठ करणे आणि धर्मपीठापुढे त्याची परीक्षा देणे आवश्यक असे. इतके काही करून हे सगळे ज्ञान मौखिक स्वरूपात आपल्या पूर्वजांनी जतन केले म्हणजे ते काय तैल बुद्धीचे असतील याचा विचार तर करा.....<<<<<<

अन तरी "दशग्रंथी घराणे/कूळातील" उपजलेली व्यक्ती म्हणजे "दशग्रंथी ब्राह्मण" अन दुर्दैवाने कर्मवशात तो जर मजसारखा कुठे कारकुन्डा असेल, तर त्यासच दशग्रन्थी मठ्ठाड म्हणावे का अशासारखे तर्कट एखादी ब्रिगेडि/नक्षलि/परधर्मिय व्यक्ति लावत असेल तर मला नवल वाटणार नाही, किंबहूना त्यान्चा तो उद्देशच आहे/असू शकतो.
मात्र, तुमच्याकडून असले काही अपेक्षित नसल्याने, फोड करुन विचारले इतकेच! Happy

अवांतरः
बायदिवे, माझे घराणे केवळ दशग्रंथी ब्राह्मणाचेच नाही, तर माझ्या घराण्यात पणजोबांपर्यंत आधीच्या सलग दहा पिढ्या दशग्रंथी ब्राह्मण घडविणारी वेदविद्येची पाठशाळा होती. कालौघात ती बंद पडली. परंतू आजोबा दशग्रंथी येवढे शिकलेले होते, तर वडील कौमुदी पर्यंत शिकलेले होते. पण तरीही, मला वा वडिलान्ना "दशग्रंथी" म्हणुन संबोधले जाऊ शकत नाही, संबोधले जात नाही. मात्र दहा - बारा पिढ्यान्च्या शैक्षणीक पूर्वतपाचे काही आनुवंशिक गुण मात्र नक्की उतरले असतील, अन माझ्यात दृगोच्चर झाले नाहीत तरी पुढील कोणत्या ना कोणत्या पिढ्यात कोणत्या ना कोणत्या शैक्षणीक वा अन्य रूपात नक्कीच दिसू शकतील असा विश्वास आहे, असे माझे मत आहे.

<<प्रत्यक्ष शिक्षण झालेले असणे हा नियम "दशग्रंथी"बाबत वगैरे तर चोख पणे पाळला जातो.

हेच मलाही सांगायचं होतं की असे शिक्षण न झालेले दशग्रंथीसुद्धा आहेत..म्हणजे मी पाहीलेत. याचाच अर्थ आजच्या काळात सगळेच हे मुखोद्गत करत नाही जे "दशग्रंथी" म्हणवण्यासाठी गरजेचं आहे (असा हा लेख वाचुन माझा समज झाला.)

आणि दशग्रंथी हुशार असतात असा सरकसकटपणा केलाय त्याला उद्देशुन मी "मठ्ठाड " हा शब्द वापरला कारण मी पाहीलेले लोकं मठ्ठ म्हणावे असेच होते. कामाचा अन बुद्धीचा वगैरे काहीच संबंध नाही (तुम्ही दिलेलं उदा. घेतलं)
हुशार माणसाला पोटापाण्यासाठी शिपायाची नोकरीसुद्धा करावी लागते तिथे कारकुनांचं काय घेउन बसलात.

शिल्पा,
तुमच्या दशग्रंथी मठ्ठाड, म्हणण्याचा मतितार्थ मी असा घेतला कि, एव्हढे ज्ञान आत्मसात करुनही काही लोकं त्याचा रोजच्या जीवनात न काहि उपयोग करतात अथवा नाही करु शकतात . . . . ते ज्ञान फक्त आत्मसात करुन घेण्यापर्यंतच राहाते . . . . ठीक आहेना ?

लिंबूटिंबू,
अगदी बरोबर आहे, प्रत्येक काळात, परिक्षा देउन उत्तीर्ण झाल्यावरच पदव्या दिल्या गेल्या आणी जाणार आहेत.
आणी काही अपवाद सुद्धा आहेत, मला एक अपवाद ईथे आठवतो, असा कि, रविंद्र नाथ ठाकुर ( रविंद्रनाथ टॅगोर ) हे १०वी नापास असुनही केव्हढे ज्ञानी होते, आणी कहर म्हणजे ह्यांनिच गांधिजींना महात्मा ही पदवी बहाल केली होती.
केव्हढं ज्ञान आणी प्रगल्भता होती ह्या व्यक्तित ! ह्यांचं न शिकता आधीच असलेल्या ज्ञानाच्या पातळी ह्यांच्या वेगवेगळ्या साहित्यीक रचना वाचल्या कि उमजुन येतं.
आणी तुम्ही जे उदा: केळकरांचं दिलंत तेही बरोबर.

मतितार्थ : मनुष्य प्राण्याची जी बुद्धीची पातळी आहे, ती कधीही बदलेले नाहीये, बदलेली आहे त्याची समज, आणी ह्या बदलात तो विसरुन गेला आहे कि त्याच्या जन्माचा उद्देश्य काय आहे, आजकाल हा उद्देश्य सुद्धा पुष्कळ बदलला आहे. Happy
जन्म घेतला रे घेतला, कि ह्याची चक्रि फिरु लागते . . . . बाळपणापासुन ते म्हातारपणा, पुढे मृत्यू पर्यंत, ओळखा रे, शिका रे, परिक्षा देत चलारे, दूरदृष्टी ठेवुन पुढचे पाउल ठेवा रे, काल परिस्थिती नुसार पैसे कमावण्यासाठी ( कारण आजच्या काळात ह्यालाच जास्ती महत्व दिलं जातं ) हातपाय मारा रे . . . . लहानपणापासुन पुढे सर्व आयुष्य - मित्र्-मैत्रिणि, आधि-भौतिक शिक्षण, लग्नं, संसार, मुलं-बाळं, नातेवाईक, मग आपल्या मुलांची लग्ने, प्रौढ्-पण, म्हातार पण ह्यातंच निघून जातं . . . . आणी हा विसरलेला असतो कि ह्याचा जन्म का झाला ?
दशग्रंथी शिक्षण हासुद्धा असाच एक भाग होता ( आहे ) अध्यात्मिक शिक्षणाचा . . . . हे विशीष्ट ज्ञान आवश्यक असतं जेव्हां आपण यज्ञ यागाची गोष्ट करतो. हा तसा पाहिला तर यजुर्वेदाचा भाग आहे जो ऋग्वेदाशी जुळलेला आहे.
हे आणी असे पुष्कळ प्रकारचे ज्ञान आणी पाच वेद ( नेहेमिचे चार आणी पाचवा आयुर्वेद ) ह्या सर्व ज्ञानाचा उद्देश्य वा मूळ हा नेहेमी एकच होता व राहील . . . . स्वतःला ओळखुन परब्रह्माची प्राप्ति करुन घेणे.
ह्यासाठी हे सर्व निर निराळे मार्ग योजिलेले आहेत.
मनुष्य प्राण्याने स्वतःच कालांतरात प्रगतिच्या नांवाखाली संपूर्ण पृथ्वीचे रूप जरी आत्तापर्यंत पूर्ण बदललेलं असलं तरीही, मूळ नियम बदललेले नाहित.... भगवान विष्णुच्या नाभिकमलापासुन ब्रह्मा उत्पन्न झाला आणी जेव्हां त्याला पुढे प्रजोत्पत्ति करण्यासाठी सांगितले तेव्हां त्यानेही हाच नियम सर्वांना पुढे लागु केला . . . . आजहि अपत्य जन्मले कि त्याची नाळ कापली जाते, पुर्वीच्या तिन्ही युगांमध्ये जन्मला कि अध्यात्मिक शिक्षणाला सुरुवात होत असे, आता कलियुगात जन्मला कि मी वर लिहील्याप्रमाणे हालत होते माणसाची, ह्यालाही मनुष्यच जबाबदार आहे . . . . अहो आपणच इतिहास घडवायचा आणी पुढे तोच शाळेत शिकवायचा ! !
आजच्या काळात अध्यात्म कुठे आणी त्याच्या निरनिरळ्या शाखा ज्यात दशग्रंथ सुद्धा येतो, त्या कुठे ?
ह्या सर्व घडामोडिंत अध्यात्म, वेद, ग्रंथ, दशग्रंथ, ज्ञान हे सर्व मागे ठेवलं गेलं ( जसे तुमच्या पूर्वजांनी त्या अत्यंत गौरवशाली परंपरेचे पालन करुन तुमच्या आजोबां पर्यंत ती कायम ठेवली, पण अर्थात कालावश्यकते नुसार आता मार्ग बदलले )

आधि मनुष्य ह्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करुन परब्रह्माची प्राप्ति करुन घेत असे, उदरनिर्वाहाचे मार्गहि वेगळे होते, आता त्या परब्रह्माला विसरुन ( चक्क बाजुला ठेवुन आणी वेळ मिळाला कि तेव्हढ्यापुरतं करु असं म्हणत ) मनुष्य फक्त पैसा, धन, जास्तित जास्त कसं मिळवु शकु ह्यातच बांधला गेला आहे,
पैसा म्हणजेच आता उदरासकट सर्व निर्वाहांचे साधन झाले आहे.

प्रगति कि दुर्गति ? हा एक लेख मी लिहीणार आहे, त्यात ह्या सर्व गोष्टींचा समावेश असेल.
अजुनही वाटतं कि, अध्यात्मिक ज्ञानाची द्वारे, काही शिक्षण संस्थांनी प्रयत्न करुन पुन्हा उघडली तर ह्या सारखे दुसरे काही नाही.
कुठे गेले ते सर्व ? तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण, कांचिपुरम . . . .

भु. चु. साठी क्षमस्व.

भारतात असताना संस्कृत शिकताना मी असे ऐकले की वेदांमधील कित्येक उच्चार हे र्‍हस्व दीर्घ नि आणखी एक वेगळ्या प्रकारचे असतात. तसे उच्चार आता लुप्त झाले आहेत. त्यावरून शब्दांचे अर्थ बदलतात.
हे उच्चाराचे शास्त्र वेगळेच आपल्या भाषेतले अनेक उच्चार इतर भाषिकांना जमत नाहीत, नि इतर भाषांमधले उच्चार आपल्याला करायची सवय नाही.

दशग्रंथी व्हायला अर्थ कळावा लागतो की नाही हे माहित नाही.
कारण अर्थ कळल्याशिवाय नि त्याचा पुढे अभ्यास केल्याशिवाय उगाचच त्याबद्दल प्रौढी मारून काही उपयोग नाही.

माहितीपूर्ण लेख.

आरण्यकांबद्दल (का अरण्यक?) काही शंका. आरण्यके ही बहुतांशी उपनिषद म्हणूनच गणली जातात. उदा. बृहद् आरण्यक. आणि उपनिशद ही बहुतांशी गद्य आहेत, वेदांच्या इतर भागांइतकी गेय नाहीत.

तसेच आरण्यके, उपनिषद यात अध्यात्मिक तत्वज्ञानाची चर्चा आहे असे म्हटले जाते त्यात व्रते, जी कर्मकांडाची भाग आहेत, पण येतात का?

मला वेदपठनाच्या दहा पद्धतींविषयी लिहायचं आहे पण आत्ता हाताशी संदर्भ साहित्य नाही. मिळालं की लिहेन, पण तोवर मला माहित असलेल्या दहांपैकी काही पद्धती:

ॐ अग्निमीळे पुरोहितम्
यज्ञस्य देव ऋत्विजम्.... या ओळी उदाहरणादाखल घेऊयात

सगळ्यात आधी पदपाठ - म्हणजे संधी सोडवून प्रत्येक शब्द वेगळा करून क्रमवारीने म्हणायचा (१-२-३)
ॐ अग्निम् ईळे पुरोहितम्

क्रमपाठ - (१२-२३-३४)
ॐ अग्निम् - अग्निम् ईळे - ईळे पुरोहितम्

जटापाठ - (१२-२१-१२-२३-३२-२३)
ॐ अग्निम् ईळे - ईळे अग्निम् - अग्निम् ईळे - ईळे पुरोहितम् - पुरोहितम् ईळे - ईळे पुरोहितम् - पुरोहितम् यज्ञस्य.........

सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात क्लिष्ट मानला जातो तो
घनपाठ - (१२,२१, १२३, ३२१, १२३, २३, ३२, २३४)
ॐ अग्निम् ईळे - ईळे अग्निम् - अग्निम् ईळे पुरोहितम् - पुरोहितम् ईळे अग्निम् - अग्निम् ईळे पुरोहितम् - ईळे पुरोहितम् - पुरोहितम् ईळे - ईळे पुरोहितम् यज्ञस्य - यज्ञस्य पुरोहितम् ईळे........

वेदांच्या एकेक पद्धतीने वेद पाठ करत शेवटी घनपाठपद्धतीने वेद मुखस्थ करत असत. (आणि अशा सर्व पद्धतींत पारंगत व्यक्तीला घनपाठी म्हणत असत्/म्हणतात)

या अशा दहा विविध क्लिष्ट पद्धतींनी पाठपठन केल्यामुळेच वेदांमधील कुठल्याही शब्दाचा अपभ्रंश झालेला नाही किंवा अधलेमधले शब्द विसरलेले नाहीत. गेली तीनसव्वातीन हजार वर्षं! जगातील मौखिक साहित्य अशा पद्धतीने जतन झालंय असं हे एकमेव उदाहरण आहे. एका अतिशय नामवंत वैदिक विद्वानाने याला टेप रेकॉर्डिंग्ज म्हटलं आहे

<<कारण अर्थ कळल्याशिवाय नि त्याचा पुढे अभ्यास केल्याशिवाय उगाचच त्याबद्दल प्रौढी मारून काही उपयोग नाही.>> हे अगदी कितीही खरं असलं तरीसुद्धा मध्यंतरी किमान काही शतके तरी अर्थ कळो/न कळो असं असलं तरी ज्या अनेको पिढ्यांनी या पाठांतर पद्धती शिकण्यात आयुष्यं वेचली आणि पुढच्या पाठांतरी पिढ्या तयार केल्या त्यांच्यामुळेच हा अमूल्य ठेवा आजच्या अभ्यासकांपर्यंत, समाजापर्यंत पोचला आहे त्याचे श्रेय मान्य करायलाच हवे. हे कधीही न फिटणारं ॠण आहे - किमान अभ्यासक/संशोधकांवर तरी!! कारण पाश्चात्य जगाला वैदिक साहित्याचा शोध लागल्यानंतर आधुनिक विद्याशाखांतील धर्म, मिथकं, प्राचीन साहित्य अशा संबंधित संशोधनाचे/ अभ्यासाचे पॅरॅमीटर्स पूर्णपणे नव्याने आखले गेले. ज्याला खर्‍या अर्थाने पॅराडाईम शिफ्ट म्हणता येईल (नाहीतर हा शब्द फारच घिसापिटा केलाय लोकांनी...)!

अभिमान मानायचा स्वतःच्या संस्कृतीचा तर या अशा गोष्टींसाठी मानायचा असतो. उगाच वेदात/आमच्या जुन्या साहित्यात्/संस्कृतीत सगळंसगळं आहे अशी पोकळ शेखी मारून काही उपयोग नाही.

बापरे! किती कठीण आहे हे! "ॐ अग्निमीळे पुरोहितम् यज्ञस्य देव ऋत्विजम्.... " ह्या ओळीच्या पाठांतरावरुनच कळतंय. ऐर्‍यागैर्‍याचं काम नाही हे. दशग्रंथ सोडाच, एक ग्रंथ जरी ह्या पद्धतींनी पाठभेद, अपभ्रंश वगैरे न करता पाठ करायचा झाला तरी फेफे उडेल. पुर्ण डेडिकेशन नसेल आणि फक्त कवायत म्हणून काही बाही अर्धवट करण्यात अर्थच नाही.

अतिशय मोलाची माहिती मिळत्येय . धन्यवाद.
<< ज्या अनेको पिढ्यांनी या पाठांतर पद्धती शिकण्यात आयुष्यं वेचली आणि पुढच्या पाठांतरी पिढ्या तयार केल्या ....... श्रेय मान्य करायलाच हवे. >> पण लिहीण्याची कला अवगत असूनही हा अमूल्य ठेवा केवळ पाठांतराच्याच भरंवशावर पिढ्यानपिढ्या ठेवणं, हें विसंगत नाही वाटत?

लिहिण्याची कला वेदनिर्मितीनंतर काही शतकांनी अस्तित्वात्/प्रचारात आली. वेदसंहितेचं संकलन जरी १५००/१३०० इसपू पासून झालेलं असलं तरी त्याआधी बहुदा काही शतकं/पिढ्या या ऋचा मौखिक परंपरेतून विविध गटांनी जपल्या होत्या, त्यांच्यापर्यंत पोचल्या होत्या. जेव्हा संकलन करण्यात आलं तेव्हा या प्राचीन ज्ञानजतन करणार्‍या मौखिक परंपरेला साहजिकच पावित्र्य आलं (जुनं ते सोनं) आणि एकुणातच वैदिक समाजाने लेखनकलेचा प्रसार होण्याआधीपासूनच्या मौखिक परंपरेचा प्रवाहही जपून ठेवला/चालू ठेवला. हे सग्ळं ज्ञान म्हणूनच श्रौत परंपरा म्हणून गणलं गेलं. ही मौखिक परंपरा निर्दोष रहावी म्हणूनच इसपू ६च्या शतकाच्याही आधी छंद, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, प्रातिशाख्य अशा ग्रंथांचीही (मौखिक) निर्मिती झाली.

वेदाची सगळ्यात जुनी लिखित संहिता साधारणपणे इ.स.च्या दहाव्या-अकराव्या शतकातली आहे. त्याआधीही असतील पण आपल्यापर्यंत पोचलेल्या नाहीत.

लेखनकला - सिंधू संस्कृतीत लेखनकला अवगत असली तरी ती जवळजवळ पूर्णपणे व्यापार-प्रशासकीय कामांसाठी वापरली जात असावी असं पुरावा दर्शवतो. नागरीकरणाच्या र्‍हासाबरोबर लिपीही लयाला गेली. मग आपल्याला एकदम मौर्य सम्राट अशोक (तिसरं शतक इ.स.पू.) याच्या काळात पहिला ऐतिहासिक लिखित पुरावा मिळतो

त.टी. सिंधूसंस्कृती हीच वैदिकांची होती वगैरे कुणाला वाद घालायचे असतील तर घाला, मला रस नाही. माझ्यासाठी जोपर्यंत निर्णायक पुरावे प्रकाशित होत नाहीत तोपर्यंत या दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक अस्तित्व असलेल्या गोष्टी आहेत.

वरदा, संस्कृतमध्ये ळ हा वर्ण नाहीये ना? मग ऋग्वेदाच्या पहिल्या श्लोकातच ळ कसा? का वेदकालीन संस्कृतमध्ये ळ होता?

वरदा, उत्तम माहिती.

या ग्रंथातील संस्कृत भाषा आणि व्यवहारातील भाषा यांमधे साधारण कधी फरक पडू लागला?

वैदिक (आर्ष) संस्कृतमधे ळ हा वर्ण आहे

मुदलात पूर्ववैदिक काळानंतर व्यवहारात संस्कृत भाषा कधी होती की नाही हा प्रश्नच आहे. संस्कृत ही धर्माची, साहित्याची भाषा होती. ती सग्ळ्यांना यावी हा उद्देशही नव्हता. सगळ्या साहित्यांमधे पाहिल तरी जनगण प्राकृतातच बोलत हे लक्षात येतं.. संस्कृत जर रोजची सगळ्यांच्या वापरातली भाषा असती तर त्याच्या व्युत्पत्तीशास्त्रावर, फोनेटिक्स, फोनॉलॉजीवर, व्याकरणावर इतके ग्रंथ रचायची आवश्यकताही पडली नसती असं नाही का वाटत?

संस्कृत ही धर्माची, साहित्याची भाषा होती >> अगदी अगदी. खरं तर ती मुख्यत्वे धार्मिक, अध्यात्मिक साहित्याची भाषा असावी. संस्कृतमधील इतर साहित्य हे फुटकळ (दर्जानुसार नव्हे तर फक्त संख्येनुसार) म्हणावे असेच आहे.

व्युत्पत्तीशास्त्रावर, फोनेटिक्स, फोनॉलॉजीवर, व्याकरणावर इतके ग्रंथ रचायची आवश्यकताही पडली नसती >> हे तितकेसे नाही पटले. ती एक प्राचीन भाषा असल्यामुळे तिच्या व्युत्पत्तीत रस असणे सहाजीकच आहे. आर्य हा शब्द ज्या भाषांच्या समुहाकरता प्रथम वापरला त्या भाषांवर संस्कृतचा प्रभाव आहे. संस्कृतमध्ये एक-दोन अक्षरीय धातू, प्रत्यय यांच्यापासून मोठमोठे शब्द बनवायची जी पद्धत आहे ती विलक्षण आहे. इतर भाषांमध्ये शब्दांचे इतके शिस्तबद्ध सिंथेसिस अभावानेच आढळते. याकरता तिचे फोनेटिक्स आणि व्याकरण महत्वाचे ठरते.

<<<<अभिमान मानायचा स्वतःच्या संस्कृतीचा तर या अशा गोष्टींसाठी मानायचा असतो. उगाच वेदात/आमच्या जुन्या साहित्यात्/संस्कृतीत सगळंसगळं आहे अशी पोकळ शेखी मारून काही उपयोग नाही.
>>>>>

अश्या गोष्टी माहीती असतील तरच अभिमान मानतील !!

ज्यांना ह्या गोष्टी माहीती आहेत त्यांनी तरी ईतरांना ह्या गोष्टी सांगून लोकांना शहाणे करुन सोडावे.

वरदा! खूप छान माहिती.
माझ्याकडून चिमूटभर -
वेदांचे संरक्षण चांगल्या प्रकार व्हावे व तसेच वेदातील स्वराक्षरांत तसुभरही फरक पडू नये म्हणून प्राचीन ऋषींनी वेदांच्या विकृती तयार केल्या. त्या आठ असून त्यांनी नावे अशी -
जटा माला शिखा रेखा ध्वजो दण्डो रथो घनः ।
अष्टौ विकृतयः प्रोक्ता क्रमपूर्वा महर्षिभिः ॥

कोणी कोणी या विकृती तयार केल्या त्यासंदभार्ताल श्लोक असा -
भगवान् संहिता प्राह पदपाठं तु रावणः ।
बाभ्रव्यर्षिः क्रमं प्राह जटां व्याडीरवोचत् ॥
मालापाठं वसिष्ठश्च शिखापाठं भृगुर्व्यधात् ।
अष्टावक्रोऽकरोद् रेखां विश्वामित्रोऽपठद् ध्वजम् ॥
दण्डं पराशरोऽवोचत् कश्यपो रथमब्रवीत् ।
घनमत्रिमुनिः प्राह विकृतीनामयं क्रमः ॥

वरदा, मी नुसती कल्पना केली गं घनपाठी आणि दशग्रंथी हे काँबिनेशन कुणाकडे असेल तर काय बुद्धीमत्ता असेल. बाकी मला यात काहीच माहित नाहिये. मी आपली वाचतेय काही डोक्यात शिरतंय का ह्या आशेवर Happy मी घनपाठी आणि दशग्रंथी हे फक्त शब्द ऐकले होते.

तू, परब्रह्म, लिंबूटिंबू, हिरा ह्यांच्या पोस्ट्स नक्की वाचणार... काही कळलं नाही कळलं तरी Happy

पाश्चात्य जगाला वैदिक साहित्याचा शोध लागल्यानंतर आधुनिक विद्याशाखांतील धर्म, मिथकं, प्राचीन साहित्य अशा संबंधित संशोधनाचे/ अभ्यासाचे पॅरॅमीटर्स पूर्णपणे नव्याने आखले गेले. ज्याला खर्‍या अर्थाने पॅराडाईम शिफ्ट म्हणता येईल >>> काही उदाहरणाच्या मदतीने हा मुद्दा समजावशील काय?

अभिमान मानायचा स्वतःच्या संस्कृतीचा तर या अशा गोष्टींसाठी मानायचा असतो. उगाच वेदात/आमच्या जुन्या साहित्यात्/संस्कृतीत सगळंसगळं आहे अशी पोकळ शेखी मारून काही उपयोग नाही.
अगदी बरोब्बर.
मतितार्थ : मनुष्य प्राण्याची जी बुद्धीची पातळी आहे, ती कधीही बदलेले नाहीये, बदलेली आहे त्याची समज, आणी ह्या बदलात तो विसरुन गेला आहे कि त्याच्या जन्माचा उद्देश्य काय आहे, आजकाल हा उद्देश्य सुद्धा पुष्कळ बदलला आहे.
हे सुद्धा बरोब्बर.

मग आता काय करायचे?
माझ्या मते शास्त्रज्ञ, संशोधक इ. लोकांना केवळ ज्ञान मिळवणे यातच आनंद असतो. त्याचा उपयोग काय हे प्रश्न त्यांना पडत नाही. कारण पैसा, शारिरीक सुखे यापेक्षा ज्ञानसाधना करून त्यांना त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले असे वाटते.

या उलट काही लोक केवळ सुखासीन आयुष्य, पैसा यांच्या मागे असतात. त्यांची बुद्धिसुद्धा ज्ञानसाधकांएव्हढीच उत्तम असू शकते. फक्त या ज्ञानाचा किंवा बुद्धीचा उपयोग ते सुखासीन आयुष्य, पैसा याकडे वळवतात. त्यामुळे ज्या ज्ञानाचा त्यांना उपयोग करता येत नाही, तिकडे ते लक्ष देत नाहीत. मग ते विचारत बसतात, करायचे काय वेद वाचून?

या दोन विचारप्रवृत्तींचा मेळ कसा घालावा? घालणे जरूरी आहे का?

एक गंमत - आजच मी वाचले की जगातले शास्त्रज्ञ, गणिती नि तत्वज्ञानी लोक यांच्या मते सुखासीन आयुष्य, पैसा यासाठी लोक तंत्रज्ञानाचा असाच विकास करत राहिले तर पुढल्या शतकात संपूर्ण मानवजात नष्ट होईल. अगदी अण्वस्त्रे, भूकंप, ज्वालामुखी यातूनहि मानवजात शिल्लक आहे, पण पुढे जे काय होणार त्यातून वाचू शकत नाही.
आपल्या पूर्वजांना हे पूर्वीच उमगले असेल का? म्हणूनच रामायणात, महाभारतात सांगितलेली भयानक शस्त्रात्रे इ. तंत्रज्ञानाचा विकास मागे पडून केवळ वेद, उपनिषदे वाचा नि ते ज्ञान प्राप्त झाले की तुमचे आयुष्य जास्त सुखाचे होईल असे लोकांना वाटू लागले?

आजहि तंत्रज्ञानात, जगात भरपूर प्रगति करून नि आजच्या आयुष्यात यशस्वी होऊन कित्येक म्हातारे करून सवरून भागले नि परमार्थाला लागले असे करतात. ते का? काय मिळते त्यांना सगळे सोडून देवाची भक्ति करून?

काय मिळते त्यांना सगळे सोडून देवाची भक्ति करून?
<<

झक्की काका,
तुम्हीदेखिल देवपूजेला लागलात की काय? अहो तुम्हीच सांगा काय मिळते ते. अनुभव तुमच्या गाठीशी आहे. आम्ही सुपातून पाहातो आहोत तुमच्याकडे Proud

रच्याकने.
या धाग्यावर अशी छान चर्चा होईल असे वाटले नव्हते Happy

चर्चा फारच उत्तम रित्या सुरू आहे. अनेक विद्वान आपले अमूल्य ज्ञान इथे प्रकट करून सर्वांच्याच ज्ञानात भर घालत आहेत, त्यामुळे हा धागा सुरू केळ्याचे सार्थक झाल्याचे वाटते .

सर्वांचे आभार अन धन्यवाद

... इत्यलम

Pages