कतेया करू ,कतेया करू ,.......कतेया करु तेरी रू

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 April, 2013 - 05:12

काही दिवसांपूर्वी आलेल्या 'रॉकस्टार'ने तरुणाईला पुन्हा आपल्या तालावर नाचवलं. खरे तर रणबीर कपूर हा प्राणी फारसा आवडत नसल्याने मी चित्रपट पाहायचा नाही असेच ठरवले होते. पण खुप जणांकडून चित्रपटातील गाण्यांबद्दल ऐकल्यामुळे राहवले नाही आणि शेवटी एक दिवस मुहुर्त लागला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर रणबीरने अभिनय बरा केलाय. त्याबद्दल त्याला अवार्ड्सही मिळाली. पण मला खुणावलं होतं ते त्यातल्या एका गाण्याने...

"कतेया करू..कतेया करू... कतेया करु...तेरी रू !."

अतिशय सुंदर शब्दरचना आणि हर्षदीप कौरचा मधाळ आवाज, सपना अवस्थीचा नशीला सुर... !

हाय्य..., गाणं खासच रंगलं होतं. जर मी चुकत नसेन तर या गाण्याने हर्षदीपला त्या वर्षीचा 'अप्सरा फिल्म अँड टेलीव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड'चे 'सर्वोत्कृष्ट गायिकेचे' पारितोषीकही मिळाले. त्या एका गाण्यासाठी मी २०० रुपये माफ करून टाकले.

हर्षदीपच्या आवाजात....

http://youtu.be/kjjEFXSmjP8

हे गाणं इतकं आवडायचं कारण काय? तर हे गाणं ऐकताना आपोआप मन भुतकाळात रेंगाळायला लागलं होतं. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असू बहुदा तेव्हा. सी.ओ.ई.पी.चा बोट क्लब हा आमचा अड्डा असायचा. उद्धवच्या (नाव नक्की आठवत नाहीये आता त्याचं) कँटीनवर अमर्यादीत स्वरुपात चालणारी उधारी हा आमचा तेव्हाचा जगण्याचा महत्त्वाचा आधार असे. कधी त्याच कँटीनच्या आवारात तर कधी बोटक्लबच्या पायर्‍यांवर बसून अनेक गप्पांच्या मैफली रंगलेल्या. पं. भीमसेन जोशी श्रेष्ठ की वसंतखा श्रेष्ठ की कुमार गंधर्व की दीनानाथ मंगेशकर?

चल बे 'बालगंधर्वा'च्या आवाजात जो गोडवा जी ओढ होती ती कधीच, कुठेच आढळली नाही.

छोड यार, अख्तरीबाईला ऐकलेस का कधी? काय नशाय साला तिच्या आवाजात. अशा अनेक विषयांवर चर्चा रंगायच्या. वाद-विवाद झडायचे. मध्येच कोणी तरी रसिक सैगलची आठवंण काढायचा आणि मग ते सामुहिक रित्या 'जब दिलही टुट गया' म्हणायचं....., (ही दिल टुटण्याची वगैरे समस्या फार कॉमन असायची त्या काळी). मग मुकेश कसा सैगलची नक्कल करायचा यावर कोणीतरी तान छेडायचं...

चल बे मुकेशने नंतर स्वतःची अशी एक शैली तरी बनवली. पण सैगलची नक्कल करून मोठे झालेले कलावंत काही कमी नाहीत. दुराणी, आत्मा फार काय रफीची सुरुवात तरी काय वेगळी झाली होती? कुणीतरी कळवळायचा....

रफीची आठवण आली की मग मात्र सगळेच एका ट्रॅकवर यायचे. काहीही असो , त्याकाळी , तशा अवस्थेतही (म्हणजे ७ ते १० तारखेच्या दरम्यान मनीऑर्डर यायची आणि १५ तारखेला संपायची , त्यानंतर उद्धव जिंदाबाद असे..त्या दिवसांत) आमचा ७-८ जणांचा गृप एकमेकाला पक्का धरून होता. त्याला कारणीभुत होते 'संगीत' ! त्याबद्दलची अफाट ओढ..... त्याकाळी पुण्यात होणार्‍या प्रत्येक जलश्याला आमची उपस्थिती असेच असे.

गंमत म्हणजे यातला मुकेश किंवा रफीसाहेब सोडले तर बाकी सगळे गायक आमच्यासाठी "आमच्या काळी असं नव्हतं बरं का" म्हणणार्‍यांच्या जमान्यातीलच होते. पण त्या सुरांची मोहिनीच इतकी जालीम होती की आपण या गायकांसाठी खुप नवे, नवखे आहोत ही कल्पनाही मनाला स्पर्शत नसे. मला आता नक्की नाव आठवत नाही पण लक्ष्मीरोडवर कुठेतरी मधल्या एका बोळात एक पानटपरी होती. बहुदा 'लक्ष्मी पान शॉप' की असेच काहीतरी नाव होते. तिथे कायम वसंतरावांची गाणी वाजत असायची. ती ऐकण्यासाठी म्हणून आम्ही सायकली हाणत तिकडे जायचो. तर कधी विद्यापीठ रोडवर असलेल्या 'रेकॉर्ड्स सोसायटी'चे कार्यक्रम ऐकायला धडपडायचो. त्यांच्याकडे तीन तीन मिनीटांच्या खुप तबकड्या होत्या. टेप रेकॉर्डवरची गाणी ऐकण्यापेक्षा त्या तबकड्यांवरचे सुर उपभोगण्यात जास्त गंमत होती.

असो, पाल्हाळ खुप झाले. तर एके दिवशी असेच संध्याकाळच्या वेळी पाताळेश्वराच्या आवारात आमची मैफल रंगली होती. वेगवेगळ्या गायकांच्या आवाजाबद्दल चर्चा सुरू होती. भीमसेनजी आवाज पहाडी असला तरी गरज असली की तो लाजाळुच्या झाडासारखा मखमली, मुलायम कसा होतो, वसंतरावांच्या मारव्यातली फिरत कशी असते, तलतच्या आवाजातला कंप त्याची ताकद कसा काय आहे? ....एक ना दोन अनेक गोष्टींवर चर्चा सुरू होती. त्यात एकाने लताबाईंचा विषय काढला. लताबाईंचा मधाळ आवाज, सुरांवरची हुकूमत यावर गाडी सरकली.

"काही म्हणा राव पण आवाजात जर मधाळपणा नसेल ना, तर त्याची गोडी फिकी पडते यार. भीमसेनजी कितीही ताकदीचे गायक असले तरी तलतला ऐकताना जी मजा येते ती भीमसेनना ऐकताना नाही येत. " कुणीतरी पिल्लु सोडलं आणि मिन्या भडकला.

'मिनानाथ जगताप' या विचित्र नावाचं हे महा उपद्व्यापी कार्टं म्हणजे आमच्या गृपचा जिव की प्राण होतं. स्वतः खुप सुरेल गायचा मिन्या, त्याचं नरडंही भलतंच गोड होतं राव. पण या माणसाला आवडायचे ते नुरजहा, अख्तरीबेगम, सरदारी बेगम, शमशाद बेगम असे जरा वेगळे आवाज. त्यातही नुरजहाच्या आवाजात विलक्षण गोडवा. पण बाकीच्या सगल्या आवाजात एक प्रकारचा पुरुषी स्वभाव डोकावयाचा..., पण तरीही हे सुर जिवघेणे. वेड लावणारे होते. अख्तरी बेगमच्या आवाजाचं वेड मला मिन्यानेच लावलं.....

"भोसडीच्यांनो कोण म्हणतो आवाज मधाळ नसेल तर मज्जा येत नाही? चला एक कातिल आवाज ऐकवतो...."

आम्ही सगळे थेट 'लक्ष्मी पान शॉप' वर.

' ए भाऊ, ती 'कतेया करु' लाव रे जरा ! या भोसडीच्यांना कळु दे जरा 'शमशादच्या आवाजात कसली मज्जा होती ते' ! त्या पानवाल्याने ते गाणं लावलं...

ढोल-ढोलकीच्या पार्श्वभुमीवर शमशाद गायला लागली आणि आमच्यापैकी एकेक जण शहीद व्हायला सुरूवात झाली.....

6627_shamshad_1.jpg

'हंसराज बहल'चं संगीत आहे, बहुदा. कुठल्यातरी पंजाबी चित्रपटातलं हे गीत. पंजाबी लोकसंगीताचा ठेका, तशीच ठेका धरायला लावणारी धुन आणि शमशादचा नशिला आवाज ! आधीच्या हिरोने आपलं विधान बिनशर्त मागे घेतलं आणि मग आम्ही 'जनमत' घेतलं. (जनमत म्हणजे त्यावेळी एखाद्याला खड्डयात घालायचं असेल, पार्टी उकळायची असेल तर एकमताने कुठे जायचं? काय खायचं , खायचंच कारण प्यायचं वेड नव्हतं तेव्हा. सुरांची नशाच पुरून उरायची. इतर कुठल्या व्यसनांची गरजच भासली नाही कधी.) गंमत म्हणजे त्या काळी समाधानमध्ये सगळ्यांना पाव सँपल खाऊ घालण्याइतके पैसेही नव्हते त्याच्याजवळ. (हे ही नेहमीचेच) मग नेहमीप्रमाणे काँट्री काढून आमची दणक्यात पार्टी झाली, अर्थात पुढच्या मनी ऑर्डरला त्याच्याकडून पार्टीचा पक्का वायदा घेतल्यानंतरच.....

'रॉकस्टार' मधलं ते 'कतेया करू' ऐकताना ते जुने दिवस आठवत होते. हर्षदीपचा आवाज ऐकताना मन नकळत कुठेतरी आतल्या आत शमशादच्या 'कतेया करू' शी त्याची तुलना करायला लागले होते. अर्थात दोघींचाही आवाज खुप वेगळा आहे, त्यात तुलना होवुच शकत नाही. दोघी आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. पण आम्ही शमशादचे पंखे असल्याने आमचा ओढा शमशादकडेच असणे साहजिक होते.

शमशादच्या आवाजात...

http://youtu.be/6t_YGFdoRdk

काल ९४ व्या वर्षी 'शमशाद बेगम' गेल्याची बातमी कळाली आणि झटकन मनात विचार आला...

"एवढ्या लवकर?"

मी शमशादला कधीही प्रत्यक्ष ऐकलेले नाहीये. तिचा फोटो सुद्धा आता आंतरजालाशी संबंध आल्यावर पाहायला मिळाला. त्या आधी कधीतरी वर्तमानपत्रातुन एखाद वेळेस पाहीला असेल तर्च. कारण तसेही आम्ही ऐकायला लागलो तेव्हा शमशादची सद्दी संपली होती. लताबाईंचा, आशाबाईंचा जमाना सुरू झाला होता.

पण निदान माझ्यासाठी तरी 'शमशाद बेगम' कालपर्यंत ते "कतेया करु" गाणारी शमशाद बेगमच (त्यावेळी देखील ती जवळपास ४४ वर्षाची होती वरं का, १९६३ साली गायलेलं आहे हे गाणं तिने) होती , माझ्यासाठी ती चिरतरूणच होती आणि राहील....

"शमशाद बेगम, हमे पता है अब आप अल्ला तालाके दरबारमें अपनी कला पेश करेगी, लेकीन दिलसे..... हम आपको भुला नहीं पायेंगे, कभी भुला नही पायेंगे.....!"

विशाल....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख. परवा शमशाद बेगम गेल्याची बातमी ऐकल्यावर देखील डोळ्यासमोर "मेरे पिया गये रंगून" वाजायला लागलं होतं.

हर्षदीपच्या आवाजाला मी तरी मधाळ म्हणणार नाही. इन फॅक्ट तिचा आवाज रेश्मा, शमशाद बेगम सारखा थोडा "पुरूषी"च म्हणायला हरकत नाही.. तिच्या आवाजामधे पंजाबी अथवा राजस्थानी लोकसंगीत ऐकणं खरंच खूप ग्रेट वाटतं!!!

वाह!!! लेख छान झालाय Happy ऑफीसात आहे, त्यामुळे लिंका नाही पाहता येणार, (ब्लॉक असतात ना... ), त्या घरी जाऊन पाहिन...

अवांतर : तुम्ही सीओईपीअन आहात? Happy

धन्यवाद मंडळी...
अमेयदा, अतिशय वाईट्ट व्यसने आहेत हो ही, सोडता सुटणार नाहीत Happy

छान लिहिलंय. तो फोटो किती गोड आहे! Happy
शमशादच्या आवाजात ऐकलं नव्हतं - आता ऐकते. लिंकसाठी धन्यवाद.
मला शमशाद बेगम भेटली ती मोस्टली नय्यरमुळेच.

तुम्हाला या बेगमा आवडतात तर आता आबिदा ऐकत असालच. Happy

विकु, ___/\___ काय सुंदर लिहिलंयस.. अप्रतिम

आणी वो लिंक जबरदस्त आहे रे!!!!! फ्लॅट व्हायला झालं शमशाद बेगमच्या आवाजावर वर..पुन्हा!!!

(दारासिंग, शमशाद बेगम.. तक आपली आवड जुळतीये Wink ..अण रणबीर कपूर तुला आवडत नाही ?? Uhoh )

खुप सुंदर लिहिलंय विशाल Happy
आवडला लेख Happy

काल ९४ व्या वर्षी 'शमशाद बेगम' गेल्याची बातमी कळाली आणि झटकन मनात विचार आला...
"एवढ्या लवकर?">>>>>>अगदी अगदी.

"शमशाद बेगम, हमे पता है अब आप अल्ला तालाके दरबारमें अपनी कला पेश करेगी, लेकीन दिलसे..... हम आपको भुला नहीं पायेंगे, कभी भुला नही पायेंगे.....!">>>>>+१०००००

विशाल, लई भारी लिव्हलय !
"शमशाद बेगम, हमे पता है अब आप अल्ला तालाके दरबारमें अपनी कला पेश करेगी, लेकीन दिलसे..... हम आपको भुला नहीं पायेंगे, कभी भुला नही पायेंगे.....!">>>>> +१

विशाल, छान लेख... अगदी तहेदिलसे आलेलं... त्यामुळे त्यातल्या सगळ्या सुरांसहं, अन व्यंजनांसहं माझ्या आरपार Happy
शमशाद बेगमची काही गिनी-चुनीच गाणी ऐकलीत.
मला सगळ्यात आवडतं ते.. लता अन बेगमसाहिबांची जुगलबंदी - मुघल-ए-आझम - तेरी मेहफिल मे किस्मत हम भी...
हे गाणं डोळे बंद करून ऐकायचय (कारण मधुबाला... बया नीट ऐकूपण देत नाही). भल्ता अ‍ॅटिट्यूड आहे बेगमसाहिबांच्या आवाजात... http://www.youtube.com/watch?v=TC7LyI1GVYw

फोटो गोड निवडलास, रे. म्हणत असतिल... किसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हम भी देखेंगे.. तमाशा हम भी देखेंगे Happy

मनःपूर्वक आभार मंडळी !

स्वातीताई, अगदी हीच प्रतिक्रिया होती माझी त्प फोटो पाहिल्यावर म्हणुनच उचलला लगेच. (साभार) एखाद्या निरागस बाळाला हवी ती वस्तु मिळाल्यावर आनंदाने त्याचा चेहरा जसा फुलतो तसे...

दाद , धन्यवाद ! तुझी, स्वातीताईची दाद म्हणजे लेखनात काहीतरी चांगलं असल्याची पावती आहे Happy

Pages