तरंगायचे दिवस! (भाग-३)

Submitted by अनया on 26 April, 2013 - 04:00

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

भाग १ : http://www.maayboli.com/taxonomy/term/12715

भाग २ : http://www.maayboli.com/node/42599

व्यक्ती आणि वल्ली

ह्या आमच्या जमावात तऱ्हेतऱ्हेची व्यक्तीमत्व गोळा झाली होती. वैयक्तिक आयुष्यात ते खूप शिकलेले किंवा प्रचंड यश मिळवलेले होते, असही नव्हत. पण त्यांची स्वभाववैशिष्ट्ये अत्यंत गमतीदार आणि विशेष होती, हे नक्की! सगळीच व्यक्तिमत्त्व आपापल्या गुणांनी अलौकिक होती, पण उदाहरणादाखल त्यातली ही काहीच.........

राजू गुप्ते

हा आमच्या घरापासून अगदी दोन मिनिटांवर राहायचा. चांगला उंच, रंगाने अंमळ काळा आणि अंतरी नाना कळा असलेल अस हे एक वेगळच रसायन होत. खाडीवर अत्यंत आवडीने वापरल्या जाणाऱ्या मराठीला राजूने अनेक शब्दरत्ने बहाल केली होती! पोहून परत येताना उद्याला कोणकोण आहे ही चर्चा व्हायचीच. राजूने चुकुनही ‘हो, मी आहे’ अस सरळ उत्तर दिल नसेल. कायम ‘आय अॅम, आय अॅम’ नाहीतर ‘हुं छु’ अस उत्तर मिळायचं. आमच्या घराची एक खिडकी अगदी रस्त्यावर उघडायची. तिथून जाताना कायम राजू ‘चला, चार हात मारायला,’ अस ओरडायचा. मग ती सकाळ असो नाहीतर रात्र! रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याचदा बाबा आणि राजू कल्याणच्या सुप्रसिद्ध लाल चौकीपर्यंत किंवा खाडीजवळ रस्त्यांचा एक तिठा (तीन रस्ता चौक) होता, तिथपर्यंत चक्कर मारायला जायचे. त्या जागांचे मग ‘एल.सी.’ आणि ‘टी.सी.’ अस नामकरण झाल.

कल्याणची स्मशानभूमी आमच्या घरापासून जवळ होती. तेव्हा विद्युतदाहीन्या नव्हत्या. दत्त आळीजवळच्या एका वखारीतून वखारवाल्यांचा एक नोकर हातगाडीवरून लाकडे अंत्यसंस्कारांसाठी घेऊन जायचा. राजू जगमित्र असल्याने त्याची त्या नोकराशीही ओळख होतीच. त्या हातगाडीवाल्याला रस्तात अडवून राजू बिनदिक्कत ‘काय रे, कोण गेल?’ अशी चौकशी करायचा! तो हातगाडीवाला सावकाश गाडी टेकवून ‘ अरे, ते ..... वाड्यातले .......... गेले ना.’ अशी बातमी द्यायचा. दुसऱ्या मिनिटाला आम्हालाही ती बातमी पोचायची.

राजू गुप्ते म्हणजे मध्य रेल्वेच चालत-बोलत टाईमटेबल होत किंवा आजच्या भाषेत ते ‘गुगलमहाराज’ होते. रेल्वेच्या छापील टाईमटेबलमध्ये फक्त जायच्या यायच्या वेळा आणि गाड्यांचे थांबे असतात. राजूच्या माहितीत मात्र त्या गाड्यांचे गुणदोषही असायचे. ‘अमकी गाडी मुलुंडला थांबते पण माटुंग्याला नाही बर का...’ ही माहिती मध्य रेल्वे द्यायची. पण ‘ती कॅश लोकल आहे, त्याने जाऊ नको, प्रत्येक स्टेशनला कॅश घेत जात असल्याने कायम लेट होते’ ‘दीडच्या सुमारास व्ही.टी. वरून सुटणाऱ्या डबल फास्ट कर्जत ट्रेनला इंजिन लोकल म्हणतात’, इत्यादि माहिती राजूच देऊ शकायचा.

आम्ही त्या काळात कधीही टाईमटेबल हातात घेतल नाही. राजूला कुठे आणि कधी पोचायचय एवढ सांगीतल, की तो सुयोग्य अशी ट्रेन सुचवायचा. ट्रेकसाठी कर्जतला गेलो, की तो आम्हाला दिवाडकरचे बटाटेवडे खाऊ द्यायचा नाही. पळत जाऊन स्टेशनच्या बाहेरून कुठूनतरी गरम आणि चविष्ट वडे आणायचा. आता तो खोपोलीला नोकरी करतो. कोयना एक्सप्रेसने कर्जतहून कल्याणला परत जातो. त्या ट्रेनने जाणार असलो, की अजूनही आम्ही त्याला आधी फोन करतो. किती माणसे आहेत हे सांगीतल, की कर्जतला तेच वडे मिळतात. ते तेवढे तिखट नसूनही डोळ्यात पाणी का येत कोण जाणे?....

मी अकरावी-बारावी ठाण्यात बांदोडकर कॉलेजमधून केल. प्रॅक्टीकलसाठी मी सकाळी लवकरची ट्रेन पकडून जायचे. त्या दरम्यान एकदा मध्यरात्री दिवा-मुंब्रा स्टेशन दरम्यान ट्रेनचा अपघात होऊन मध्य रेल्वेच्या चारही लाईन बंद झाल्या होत्या. राजूला पहाटे कोणाकडून तरी ही बातमी कळल्याबरोबर तो त्याच पावली आमच्या घरी आला. मी कुठेतरी अडकू नये, म्हणून दार वाजवून ‘आज जाऊ नको ग, गाड्या वाजल्या आहेत’ हा निरोप देऊन मग तो घरी गेला. आता वाटत, काय इतक अडल होत त्याच? पण आपल्याकडून ज्याला जी मदत होईल, ती करायचा त्याचा स्वभावच होता. कल्याण सोडून आता खूप वर्षे झाली. अजूनही ट्रेन-टाइमटेबल हातात घेतल, की राजूची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुंबईची जीवनरेखा असलेल्या ट्रेनने प्रवास तर कल्याणकरांना चुकला नाही. त्या तंत्राचे प्राथमिक धडे राजुकडे गिरवल्यामुळे आम्हाला त्या प्रवासाशी जुळवून घ्यायला कधीच अडचण आली नाही!!

बापू विद्वांस

हे ग्रूपमधल्या अगदी जुन्या मेम्बरपैकी होते. मध्यम उंची, चित्पावनी आडनावाला साजेसा वर्ण आणि डोळे. कल्याणला दुधनाक्याजवळ राहायचे. तरूण वयात पोहताना कानात पाणी जाऊन की कशाने तरी त्यांना ऐकू कमी यायचं. कुठल्याश्या सरकारी खात्यात चाकरी करायचे.

एवढ्या वर्णनावरून हा माणूस आपला नाकासमोर पाहून चालणारा, नोकरी लागल्या दिवसापासून ते निवृत्तीपर्यंत दहा ते पाच नोकरी करणारा असणार, अस वाटेल. तसे ते होतेही. पण अनपेक्षित असा एक वेगळाच रंग त्यांच्या व्यक्तीमत्वात होता.

त्यांना उत्तमपैकी शिवणकाम करता यायचं. त्यांची मुलगी माझ्याच वयाची होती. ती कॉलेजला जाईपर्यंत तिचे सुंदर सुंदर कपडे ते स्वतःच शिवायचे. त्या कपड्यांच्या फॅशन आणि शिवण्यातली सफाई दोन्ही अप्रतीम असायचं. ह्यांना गड-किल्ले चढायचं वेड होत. ते आणि त्यांचे भाऊ दोघेच किल्ले चढायला जायचे. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ते दोघे पन्नास किलोमीटर चालून आले होते. त्यासाठी लागणाऱ्या सॅक, पाण्याच्या बाटल्या ठेवायला वेगळी पिशवी, हे सगळ ते आपल डोक चालवून आपणच शिवायचे. त्या पाण्याच्या पिशवीची एखादी विशिष्ट टीप उसवली, की त्यात दोन तीन बाटल्या मावू शकतील, अशी जादूही केलेली असायची. ट्रेकिंगमध्ये कुठले प्रश्न पडू शकतात, ह्याचा विचार करून त्यांनी ते आधीच सोपे केलेले असायचे.

बापूंनीच आमच्या ग्रुपला ट्रेकिंगच वेड लावल. तेव्हा बहुतेक सगळ्यांकडे पैशांची चणचण होती. पण फार पैसे खर्च न करता ट्रेकमध्ये खूप मजा करता येते, हे ज्ञान आम्हाला त्यांच्यामुळे मिळाल, आणि केवढातरी आनंदाचा खजिना उपलब्ध झाला. किल्लावर पोचल्यावर मुक्कामाची जागा ठरवणे वगैरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्हायचं. आसपास दिसणाऱ्या किल्ल्यांची माहिती हेच द्यायचे. किल्ल्यावर चहा, खिचडी इतपत स्वैपाक करण्यासाठी लागणारी भांडी-कुंडी, चुलीसाठी लागणारे केरोसीन इत्यादी जय्यत तयारी बापू करायचे.

एकदा राजमाचीला जाताना तयारीत हिरव्या मिरच्या घ्यायला सगळेच विसरले. कर्जत स्टेशनबाहेर वडापावाचा नाश्ता करताना त्यांनी सगळ्यांना हिरव्या मिरच्या द्यायला दुकानदाराला सांगितल्या. प्लेट समोर आल्यावर शांतपणे सगळ्यांच्या मिरच्या काढून घेऊन आपल्या सॅकमध्ये टाकल्या... संपला प्रश्न. आहे काय आणि नाही काय?

आनंदाचे डोही आनंद-तरंग

खाडीवर पोहायला बराच मोठा जमाव जमू लागला. काही लोक खरच पोहायला यायचे, तर काही टाईमपास करायला. मुलीसुद्धा बऱ्यापैकी येऊ लागल्या होत्या. पण दुर्दैवाने फार दिवस यायच्या नाहीत. घरचे नाही म्हणतात म्हणून, चेहरा काळा पडतो म्हणून किंवा जिद्द फार नव्हती म्हणूनही बऱ्याच मुलीचं पोहण थांबायचं तरी, किंवा लहानश्या मर्यादेतच रहायचं. बाकीच्यांचीही कथा काहीशी अशीच असायची. काठावर कंबरभर पाण्यात उभे राहणारे बरेच लोक असायचे. एक काका तर सगळा वेळ असे उभे राहायचे आणि घरी परत जाताना ‘पोह्ण्याने व्यायाम उत्तम होतो, भूक किती लागते.’ अश्या गप्पा मारायचे! आमच्यातले काही टारगट लोक त्यांना ‘भूक काका’ म्हणायला लागले.

केव्हातरी आमच्यातले तीन मेम्बर ‘चंद्रखणी पास’ ह्या यूथ होस्टेलच्या ट्रेकला जाऊन आले. तिथल वर्णन ऐकून आणि फोटो बघून सगळ्यांना ती हौस वाटू लागली. आमच्यातले बापू विद्वांस उर्फ गुरु हे गडकिल्ल्याचे माहीतगार. मग कर्नाळा, राजमाची, भीमाशंकर, चंदेरी, लोहगड अश्या जवळपासच्या ठिकाणावर स्वाऱ्या होऊ लागल्या. एका कोजागिरीला राजमाची किल्ल्यावरून पाहिलेल्या पूर्ण चंद्र आणि टिपूर चांदण्याच्या सौंदर्याची भुरळ अजूनही मनावर आहे.

आमच्या घरी त्याकाळात जे नातेवाईक राहायला म्हणून यायचे, त्यांनाही शक्यतो पाण्यात उतरून आणि ते अगदीच शक्य नसेल, तर काठावर बसून खाडीचा अनुभव घ्यावाच लागायचा! माझ्या दोघी मामेबहीणी त्यादरम्यान कल्याणला आल्या होत्या. त्यांनाही पोहायला शिकवायच बाबांनी ठरवल. मोठी मवाळ होती, ती गुमान शिकली. आमच्या सुप्रसिद्ध ‘जठार पॉइंट’ पासून पोह्ण्यापर्यंत तिने प्रगती केली. पुढे पुष्कळ वर्षानंतर तिच्या लग्नाच्या ठरवाठरवी दरम्यान माझ्या बाबांनी हा मुद्दा ठासून सांगून तिच्या सासरच्या मंडळींना चांगलच इम्प्रेस केल होत! एवढ अंतर पोहताना ती थकली, की आपोआपच जोरजोरात श्वास घेतल्या आणि सोडल्याचे आवाज येऊ लागत. तेव्हा अतुल, माझा भाऊ, तिला ‘हे बघ, तू हात-पाय मारायचं तेवढ बघ. आवाज काढायचं काम मी करतो तुझ्या वाट्याच....’ अस म्हणून पूर्ण वेळ चिडवत राहायचा!

धाकटी जरा नाठाळ होती. किनाऱ्यापर्यंत यायची. पण पाण्यात जायची वेळ आली, की मात्र पळत सुटायची. बाबांनी थोडे दिवस वाट बघितली-बघितली, आणि एक दिवस उचलून पाण्यात घेवूनच गेले. मग काय विचारता....’आई-बाबा-आत्या-काका-आजोबा’ सगळ्यांचा धावा करून झाला. पण कोणीही लक्ष दिल नाही. काही दिवसातच आरडाओरडा करायची स्टेज संपवून ती थोडेफार हात-पाय मारायला शिकली, आणि मग मात्र तिला ते व्यसनच लागल. सकाळी वेळेआधी उठून बाबांना ‘ काका, उठा ना, काका, उठा ना’ असे म्हणून त्रास द्यायला लागली. पोहायची वेळ संपली, की बाबांना घरी यायची घाई असायची. नवीन शिकलेल्या शिष्यांना ते स्वतःच्या आधी पाण्यातून बाहेर काढायचे. पण ही बयाबाई काही पटकन बाहेर यायची नाही. ‘ काका, फक्त पाचच मिनिट, एकच राउंड..’ अस म्हणत त्यांना लटकवायची! घरी आल्यावर त्यांच्या आधी अंघोळीला नंबर लावून, आत्याला गूळ लावून सगळ्यांच्या आधी नाश्ता करून चक्क झोपून जायची.

ही आमची बहीण अगदी लख्ख गोरी. तिला लहान वयात त्याचा फार अभिमानही होता. आमचा खाडी-मित्र राजू एकदम काळा. तो तिला सारखा ‘मीच तुझ्यापेक्षा गोरा आहे, बघ’ अस चिडवायचा. ती वाईट भडकायची. त्याला मारायला धावायची. तो असेल तेव्हा पंचविशीतला. ती पाच-सहा वर्षांची. तो पुढे धावतोय आणि ही पांढऱ्या पेटीकोटमधली छोटी त्याच्या त्याला मारायला त्याच्या मागे धावतेय, हे दृश्य आठवून आत्ताही हसायला येतय!

साधारणपणे उन्हाळा जाणवायला लागला, की सगळ्यांना खाडीची स्वप्न पडायला लागायची. नोकऱ्या करणारे मोठे लोक तर फेब्रुवारी संपता-संपता ‘चार हात’ मारायला सुरवात करायचे. आम्ही शिकत असल्याने परीक्षा झाल्याशिवाय पोहायला परवानगी नसायची. त्यामुळे कधी एकदा परीक्षा होतेय, आणि पाण्यात उडी घेतोय अस व्हायचं. माझ्या आठवणीतल्या कितीतरी सुट्ट्यांची सुरवात मी सुजाताबरोबर पोह्ण्याने केली आहे. मग उन्हाळाभर तोच एक-कलमी कार्यक्रम! जूनच्या सुरवातीला ‘नभ मेघांनी आक्रमिले’ की उदास वाटायचं. पोहण बंद आणि शाळा सुरू. आमचे सगळ्यांचे चेहरे खाडीच खारट पाणी आणि भरपूर ऊन्हाने अक्षरशः रापलेले असायचे. ‘सनस्क्रीन’ असा काही पदार्थ आस्तित्वात असतो, ह्याची सुतरामही कल्पना आम्हाला तेव्हा नव्हती. शाळेतल्या मैत्रिणी आमचे रंगीबेरंगी चेहरे, भयानक केस पाहून थक्क व्हायच्या. पण आम्हाला उन्हाळ्यात इतकी मजा यायची, की चेहऱ्याचा रंग, केसांचा पोत वगैरे गोष्टी कःपदार्थ वाटायच्या.

ह्याच दरम्यान कल्याणजवळ ड्रेझर ह्या वाळू उपसणाऱ्या महाकाय यंत्राचा वापर सुरू झाला होता. आमच्या काठाच्या डावीकडे कल्याणच रेतीबंदर होत. तिथल्या काही होड्या एखाद्या लॉंचला जोडून वाळू घेण्यासाठी त्या ड्रेझरकडे जायच्या. परतताना ओहोटीच्या प्रवाहाबरोबर वाहत यायच्या. कोणाच्या तरी सुपीक डोक्यात एक दिवस एक भन्नाट कल्पना आली. पुलापलीकडून होड्यांची माळ येताना दिसली, की आमची सगळी गँग वेगात पोहत त्या होड्यांच्या दिशेने जायची. लॉंच सोडून मागच्या रांगेतल्या साध्या होड्यांच्या सुकाणूला उसळी मारून पकडायच. जो पहिला पकडेल, त्याने हात लांबवून बाकीच्यांना मदत करायची. त्या होड्या पकडून लांबवर जायचं. येताना प्रवाहाच्या मदतीने लांब-लांब अंतर पोहत यायचं.

हळूहळू हे गणित सगळ्यांना जमायला लागल. होड्यावाले लोक आमच्या सोयीसाठी दोर सोडून ठेवायला लागले. काही लॉंचवाले आम्ही दिसलो, की थोडा वेग कमी करायला लागले. काय मजा यायची, हे सगळ करायला... एरवी वेगात पोहायचा प्रयत्न केला, तर कोणीतरी ओरडणार हे नक्की असायचं. पण पुलापलीकडून होड्या येताना दिसल्या, की चैतन्याची लाटच उसळायची! सगळे काका, दादा, ताया आपापला सर्वोत्तम वेग अजून जरा वाढवायचा प्रयत्न करत पोहायला लागायचे. एकदा का त्या होड्यांना हात लागला, की सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद व्हायचा!

जितक लांब जाऊ तितक दोन्ही काठांवरील दृश्य बदलत जायचं. तोपर्यंत कल्याणचा विस्तार तसा मर्यादेत होता. त्यामुळे लवकरच इमारती दिसेनाश्या व्हायच्या. सगळीकडून दिसणारा चित्रातल्या डोंगरासारखा त्रिकोणी डोंगर जवळ दिसायला लागायचा. खाडीवरचा पाईपलाईनचा पूल जवळ दिसायला लागायचा. पाण्यातली लव्हाळी, काठावरची हिरवीगार झाड बघितली की, आपण घरापासून फार लांब आलोय ह्या कल्पनेने पोटात हळूच खड्डा पडायचा! तो लपवण्यासाठी मग सोबतच्या लोकांशी गप्पा-टप्पा करण भागच असायचं!

ठराविक अंतर गेल्यावर कोणीतरी ‘चला, मारा उड्या’ अशी आज्ञा द्यायचं. कोळीदादांचे आभार मानून आम्ही पंधरा-वीस जण होड्यांवरून दणादण उड्या मारायचो. आमची ही ‘छोटीसी कश्ती’ वेगाने लांब जाताना दिसायची. आम्ही पोहायला सुरवात करायचो. पुढे पुढे खाडीच पात्र खूप रुंद आहे. तीच खाडी असली, तरी अनोळखी वाटायची. आपला परिचयाचा काठ, तिथे पोहणारी माणस दिसली की जीवात जीव यायचा. तिथेपर्यंत पोचायला प्रवाहाची मदत असली, तरी हात-पाय मारावेच लागायचे. पुन्हा काठाला लागेपर्यंत पूर्ण गळून जायचो.

पाण्यातून बाहेर पडल्यावर एक दहा-वीस फुटांचा चढ चढायचंसुद्धा जीवावर यायचं. कोरडे कपडे घालून कसेतरी पाय ओढत घरी पोचायचो. आमच्या सुट्टीमुळे दिवसभर तस काही काम नसायच. पण बरेच जण नोकऱ्यावाले होते. ते लोक कशी दिवसभर काम करत असतील कोण जाणे? ज्यांना लोकलमध्ये बसायला मिळायचं, ते तिथे झोपेची वसुली करायचे. ह्या होड्यांच्या नादाने तेव्हा आम्ही पाच-सहा किलोमीटर सहज पोहून जात असू.

भाग ४ : http://www.maayboli.com/node/42712

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खूपच मस्त, तपशीलवार, प्रत्ययकारी वर्णन,
हे वाचल्यानंतर खाडीवर पोहोणार्‍या मंडळींमधे आम्ही पण सामील होतो म्हणून कोणीपण सांगू शकेल ....:)

कल्याण खाडीचे हुबेहुब चित्रिकरण केले तुम्ही तुमच्या ओघवत्या वर्णनातुन. मी तसा नविनच कल्याणचा रहिवासी, ही खाडी १ आवडते ठिकाण.

.

त्याला मारायला धावायची. तो असेल तेव्हा पंचविशीतला. ती पाच-सहा वर्षांची. तो पुढे धावतोय आणि ही पांढऱ्या पेटीकोटमधली छोटी त्याच्या त्याला मारायला त्याच्या मागे धावतेय, हे दृश्य आठवून आत्ताही हसायला येतय!>>> रम्य ते बालपण
एकदा का त्या होड्यांना हात लागला, की सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद व्हायचा! >>> निर्भेळ आनंद यालाच म्हणत असावेत Happy
पण आपल्याकडून ज्याला जी मदत होईल, ती करायचा त्याचा स्वभावच होता. >>>म्हणून कदाचित तो जगन्मित्र आहे. व्यक्तीचित्रणे अतिशय सुरेख...