आरोह अवरोह तुझ्या श्वासांचे

Submitted by रसप on 22 April, 2013 - 02:20

तू मुग्ध मदमस्त कळी स्पर्शोत्सुक
मी धुंद बेफाम भ्रमर प्रणयोत्सुक
प्राशून मकरंद मधुर लपलेला
मी रोज असतोच पुन्हा मिलनोत्सुक

स्पर्शून रेशीम शहारा यावा
हृदयातला ताल दुहेरी व्हावा
मग भान कुठलेच नसावे दोघां
अन् खेळ जोमात खुला खेळावा

आरोह अवरोह तुझ्या श्वासांचे
ओठांत अव्यक्त बहर शब्दांचे
ऐकायचे राग मला अनवट ते
देतात जे भास नव्या स्वर्गांचे

चाखून सौंदर्य तुझे अमृतसम
बहरून गंधात तुझ्या अद्भुततम
मी स्वर्ग भोगून असे इहलोकी
मी एक आहे इथला पुरुषोत्तम

....रसप....
२१ एप्रिल २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/04/blog-post_22.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता.... रोमँटिक असूनही संयत.
"आरोह अवरोह तुझ्या श्वासांचे
ओठांत अव्यक्त बहर शब्दांचे" >>> या ओळी विशेष.
----------------------------------------------------------------------------------------------
"अन् खेळ जोमात खुला खेळावा " ही ओळ मात्र
कवितेतील इतर ओळींच्या/शब्दांच्या तुलनेत तितकीशी ठीक वाटली नाही. वै.म.

वा रे जितू
लय म्हण्नायला जरा अवघड वाट्ते आहे पण् नेहमीची लगावलीवर आधारलेली लय नसावी ही गायनाची लय असावी..हो ना ?

याला संगीतबद्ध कर फार मस्त होईल बघ

ओके जितू आता समजले

मधुप>>>>>> एक्झ्याक्टली !!!! मधुप फार उत्तम व चपखल !!! मधुप म्हणजे भुंगा..... मध पीतो तो मधुप !!!