"अहो" ऐकलंत का ??

Submitted by अनुराधा म्हापणकर on 22 April, 2013 - 01:20

कुणी कुणाला कसं बोलवावं ही खरतर कुणीही कोणावर लादू नये अशी गोष्ट असायला हवी.. आपल्या भारतीय संस्कृतीत ह्याला अनन्य साधारण महत्व आहे मात्र.. ह्या बाबतीत इंग्रजीवाले मस्त डिप्लोमॅट निघाले.. "तू" ला सुद्धा "यु" आणि "तुम्ही"लासुद्धा "यु" च.. "या" आणि "ये" दोन्हीला "कम" म्हटलं की काम भागलं.. मग तुम्ही हवा तो सोयीस्कर अर्थ काढा.. कारण खरतर या सारख्या छोट्या छोट्या गोष्टींचे "इश्यू" करायला त्यांच्याकडे वेळच नाही.

उत्तर भारताततरी सर्वांचाच उल्लेख "आप" असा करतात. आपल्या मराठीत मात्र सगळ्यांसाठी वेगवेगळे नियम.. म्हणजे बघा हं.. आईला "अग" आणि वडिलाना "अहो".. बायकोला "अग" आणि नव-याला ’'अहो" ..आजीला "तू"..आणि आजोबांना "तुम्ही".. म्हणजेब-याचदा पुरुषी नात्याना "अहो" म्हणायचे, म्हणजे थोडा जास्त मान !.. आणि बायकांना "अगं" म्हणत गळ्यात पडायचं! त्यातल्या त्यात "सासू" नावाच्या व्यक्तिरेखेला "अहो" चा मान आहे - गळ्यात पडायचे नाही म्हणून असेल ना कदाचित..!!

माझी मुलं आजोबांना "ए आजोबा.." म्हणायची ते खूप आवडायचं मला.. मनावरचे संस्कार जरी त्यांना दुरुस्त करायला भरीस पाडायचे..तरी.. कधी मी तसं केलं नाही.. कारण त्यांच्या चिमण्या बोबड्या आवाजात त्यांनी मारलेली ती एकेरी हाक मला त्या दोघांचं नातं अधिक घट्ट करतेय असं भासवायची.. "ए आजोबा" म्हणत त्यांचं आजोबांच्या गळ्यात पडणं मला खूप लोभस आणि निरागस वाटायचं! वाटलं, कुणाला "ए" म्हणायचे आणि कुणाला "अहो"हे त्यांचं त्यांनाच ठरवू द्यावं..

माझ्या मनावरच्या घट्ट संस्कारांनी परवानगी दिली असती तर कदाचित मी माझ्या सासुबाईंनाही.. "ए आई"च म्हटलं असतं .. !! जमलं नाही.. पण ती बंधने तोडून हट्टाने नव-याचा उल्लेख मात्र मी एकेरीच केला, कारण नवरा मला माझा "सखा" असायला हवा होता. ... आणि "सखा" नेहमी "तो" च असतो ना..!! ..आणि तुम्ही म्हणता तस्सं असेल जरी "पती परमेश्वर" तरी देवाचा उल्लेखही "एकेरी"च ना असतो सदैव..?

अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..

छान लिहीलंय.
संबोधनात अभिव्यक्तीपेक्षां त्यामागची भावनाच महत्वाची. कांहीं ठीकाणीं वडिलाना ' आमचा डोकर्‍या' म्हणायची पद्धत आहे [ठाणे जिल्ह्यात किनारपट्टीच्या भागात]. मला प्रथम जाम खटकायचं हें. पण मग त्यातलं प्रेम, आदर व गोडवा लक्षांत आल्यावर हें खटकणं गायब झालं.
गोव्यात तर वडिलांशीं एकेरीनेच बोलतात; गोड वाटतं तें.
माझी बायको बहुतेक वेळां मला 'अहो'च करते. पण भांडण झालं कीं ' अरे, तुरे'वर येतेच येते ; मजा येते मग बरोबरीच्या नात्याने भांडायला ! Wink

त्यातल्या त्यात "सासू" नावाच्या व्यक्तिरेखेला "अहो" चा मान आहे - गळ्यात पडायचे नाही म्हणून असेल ना कदाचित..!! Proud