द्रौपदीचे वय

Submitted by kunitari on 21 April, 2013 - 18:14

नेहमी प्रमाणे सकाळ च्या वेब साईट वर आलो. आणि पहिलीच बातमी होती '५ वर्षाच्या मुलीवर दिल्लीत बलात्कार'. ५ वर्षे, दिल्ली, बलात्कार हे शब्द अतिशय विसंगत वाटले म्हणून परत एकदा हेड्लाईन वाचली. मला कसेतरीच वाटले. लाज वाटली. किळस वाटली. माझ्याच पुरुष असण्याची विलक्षण घृणा वाटली. मन भरून आले. अनेक नकारार्थी विचार गर्दी करू लागले. माझ्या समाजात हि हीन वृत्ती कुठून आली असावी याने आतड्याला पीळ पडला. मलाही २ मुली आहेत. एक ७ वर्षाची आणि दुसरी ३ वर्षांची आहे. त्यामुळे ५ वर्षांची मुलगी कशी असते, तिचे विश्व काय असते, तिची विचारसरणी कशी असते याचा अगदी घरचा अनुभव माझ्याकडे आहे. हि बाळे इतकी निरागस असतात कि त्यांचा निरागसतेत प्रत्यक्ष परमेश्वर वास करतो असे म्हणतात. त्यांना पहिले तरी चित्त वृत्ती प्रसन्न होतात. त्यांच्या निर्लेप हास्याने आणि मुलायम स्पर्शाने आयुष्याचा अर्थ लक्षात येत राहतो. हि फुले वेलींची शोभा असतात. जमिनीवरची नक्षत्रे असतात.

'ययाती' मध्ये यति आणि ययाति यांचा एक मोठा विलक्षण संवाद आहे. राजवाड्यात उमललेल्या फुलांसाठी. यति च्या मते 'हि फुले वेलीसाठी असतात अणि आपणास फक्त त्यांचा दुरून अनुभव घेण्याचा अधिकार आहे. त्यांचे अस्तित्व हे आपल्या आनंदासाठी नसून ते वेलींच्या आनंदासाठी आहे.' आणि या उलट ययाति चे म्हणणे असे कि 'ती फुले आपल्या आणि फक्त आपल्याच आनंदासाठी उमललेली आहेत. नाही तरी ती २-३ दिवसात वेलीवर सुकून जातील. तेव्हा त्या आधीच ती खुडून, कुस्करून, आपल्या शय्येवर पसरली पाहिजेत. त्यातच त्या फुलांच्या सुगंधाचे सार्थक आहे.' एकाच माता-पित्याच्या पोटी जन्मलेल्या २ बंधू मधला हा संवाद बरेच काही सांगून जातो. आजच्या वर्तमान पत्रातल्या निर्घृण बातम्या वाचल्या कि प्रत्येक वेळी ययातिचा विचार जिंकल्याची खात्री पटते. शरम वाटते आणि भीती सुद्धा!!

आपल्या समाजातल्या सद्गुणांचे एकाच वेळी अवमुल्यन आणि अध:पतन झाल्याचा हा दाखला नाही काय? एकाच वेळी हा समाज देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि त्याच वेळी जिवंत जाज्वल्य देवीचा अंश असणाऱ्या बालिकांवर अत्याचार करतो. एकाच वेळी मंगळ ग्रहावरती पाण्याचा अंश आणि त्यायोगे तिथली जीवसृष्टी सापडल्याचा आनंद साजरा करतो आणि त्याच वेळेस स्त्रीच्या पोटातील ७ महिन्यांचा जिवंत भ्रुण मुळापासून खुडून काढतो. का तर तो स्त्री जातीचा आहे म्हणून! केवढा जबरदस्त विरोधाभास आहे हा! केवढी मोठी विसंगती आहे हि आपल्या विचारातली! स्त्रीत्वाचा केवढा प्रगाढ अपमान आहे हा! समाजाच्या भावना शून्यतेचे हे जिवंत उदाहरण आहे. जगण्यातला सन्मान हरवत चालला आहे. बहुतेक सर्वच मानसशास्त्रज्ञ असे मानतात कि बलात्काराची प्रेरणा लैंगिक नसून त्यात श्रेष्ठत्वाचा आणि वर्चस्वाचा भाग अधिक असतो. दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आणि त्यावर अधिकार गाजवण्याचा विचार या अत्याचारांच्या केंद्र स्थानी असतो. हे कितीही जरी मान्य केले तरी
पण ५ वर्षे वयाच्या बाळावर २५ वर्षाचा माणूस,पशू म्हणू नाहीतर दैत्य म्हणू हवे तर, कसला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो आहे? ५ वर्षाच्या त्या निरागस बाळाने त्याला कसला विरोध केला असेल?

या जगातील कोणतेही कारण ५ वर्षाच्या मुलीवर अधिकार गाजविण्यास पुरेसे आहे असे मला वाटत नाही. तर्काच्या आणि बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे हे कृत्य आहे आणि त्यामुळे त्याला खात्रीने विकृती असेच म्हणावे लागेल. हा झाला प्रश्नाचा एक भाग.

दुसरा भाग राहतो तो अनास्थेचा. मुलगी हरवली आहे याची माहिती मिळाल्यावर तिचा कसून शोध घेणे हे वास्तविक पोलिसांचे कर्तव्य आहे. परंतु स्त्रीविषयी समाजाच्या इतर घटका प्रमाणे पोलिसात देखील एक सार्वत्रिक अनास्था आहे. यांना स्त्री विषयीचे गुन्हे दखल पात्र देखील वाटत नाहीत. आधी शोध घेण्यात केलेली कुचराई नंतर गुन्हा न नोंदवता दडपून टाकण्याला वृत्तीला देखील विकृतीच म्हणावे लागेल. आणि हि विकृती प्रत्यक्ष गुन्हेगाराच्या विकृती इतकीच ओंगळ आहे. दाद मागायला गेलेल्या मुलीला यांना थप्पड मारता येते. म्हणजे यांना थप्पड मारता येत नाही असे नाही. पण मग गुन्हेगारांना थप्पड देताना यांचे हात म्यान का होतात? दाद मागणारी मुलगी आततायी होती. त्याचा यांना राग येतो. पण मग गरीबाची हरवलेली पोर शोधताना यांना गुन्हेगाराचा राग का येत नाही? यातला सगळ्यात किळसवाणा प्रकार तर पोलिसांनी मुलगी सापडल्यावर केला आहे. मुलगी सापडल्यावर मुलीच्या आई-वडिलांनाच लाच द्यायची का तर त्यांनी गुन्हा नोंदवू नये म्हणून? हे पोलिस सुद्धा या गुन्ह्यात समान भागीदार आहेत. आणि त्यांच्यावर देखील गुन्हेगारासारखीच कारवाई व्हायला हवी.

आपले माननीय राष्ट्रपती म्हणले कि यावर तीव्र उपाय केले पहिजेत. त्यांचे उद्दिष्ट चांगले आहे. एका मुलीचा पालक आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणुन माझा त्यांना प्रश्न आहे कि केवळ कायदा करून स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळेल का? आजच्या गुन्हेगारांना फासावर लटकावून उद्याचा बळी टळणार आहे का? शिक्षेची अंमलबजावणी कडक करून आणि लवकरात लवकर शिक्षा देऊन स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळणार आहे का? पोटातला गर्भापासून ते मृत्युच्या शय्येपर्यन्त स्त्रीत्वाची चाललेली अखंड अवहेलना थांबणार आहे का? कायदे करून समाजातील मूल्ये सुधारतील का? मला असे प्रामाणिक पणे वाटते कि स्त्री ला तिचा सन्मान तिला परत मिळवुन दिला पाहिजे. तोकड्या कपड्यांमुळे किंवा रात्री -अपरात्री बाहेर फिरण्यामुळे बलात्कार वाढले आहेत असे म्हणणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे. त्या ५ वर्ष्याच्या बाळाने कसले कपडे घातले होते? ते बाळ कुठे रात्री-अपरात्री फिरायला गेले होते? मुळात स्त्री वरील अत्याचाराचा दोष स्त्रीला देणे हेच सामाजिक विकृतीचे लक्षण आहे. स्त्रीने कसे वागावे हे स्त्रीचे स्वातंत्र्य ठरवेल. तिने कसे वागावे याचा अधिकार समाजातील ठग पुरुषांना कसा देत येईल? द्रौपदीने तोकडे कपडे घातले म्हणुन तिचा मानभंग झाला नव्हता. किंवा ती रात्री-अपरात्री एकटी फिरत होती म्हणुन तिचा तेजोभंग झाला नव्हता. तिच्या बलात्काराला देखील तिचे पुरुष (?) जबाबदार होते. पोटातील स्त्री गर्भ काढून टाका असे कुठली स्त्री म्हणत असेल? तो गुन्हा देखील पुरुषाचाच असतो. वास्तविक एका भ्रूण हत्येत दोन स्त्री हत्या होतात. एक पोटातील स्त्री भ्रूणाची आणि दुसरी तो भ्रूण धारण करणाऱ्या स्त्रीच्या मनाची. हा देखील एक मानसिक बलात्कार नव्हे काय? कायदे करून यावर उत्तर मिळणार आहे का?

माझे असे मत आहे कि या सामाजिक विकृतीवर दुधारी उपाय व्हायला हवेत. हा राष्ट्रीय चारित्र्याचा प्रश्न ठरू पहात आहे. कायदा करून आणि त्यांची अंमलबजावणी करून गुन्हेगारांवर आणि त्याहून महत्वाचे म्हणजे पोलिसांवर वचक बसविला पाहिजे. पोलिसांना आज कायद्याचे संरक्षण मिळते आहे. वास्तविक ज्या कायद्याच्या रक्षणासाठी त्यांची नेमणुक झाली आहे त्याच कायद्याच्या आड लपून पोलिस कायद्याचे लचके तोडत आहेत. या उपायांमुळे नजीकच्या काळात होणारी पडझड थांबवता येऊ शकेल. पण दूरगामी दृष्टीकोनातून सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशनावर भर द्यावाच लागेल. शाळांमधून तसेच शिक्षणाच्या आणि संवादाच्या इतर माध्यमातून स्त्री विषयीचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रत्येक बलात्कारी हा कधीतरी लहान मुलगा होता. तो देखील कुणाचा कुल-दीपक होता. मग जगण्याच्या प्रक्रियेत त्या निष्पाप बाळाचा निर्ढावलेला गुन्हेगार कधी झाला? समाजाच्या कोणत्या घटकांनी त्याला गुन्हेगारी वृत्ती दिली? कोणत्या घटकांनी त्याच्यात स्त्री हि फक्त एक वस्तू असल्याची भावना निर्माण केली? आयुष्याच्या कुठल्या वळणावर त्या माणसाचा पशु झाला? कोणत्या प्रसंगांनी त्याच्या मधली सहिष्णूता नष्ट झाली? त्याच्या मधली भावना शून्यता कशाने निर्माण झाली? या प्रश्नांचा आपल्याला विचार करावाच लागेल. आज जे गुन्हेगार आहेत, त्यांच्या बाबत कसलाही दयाभाव न दाखवता त्यांचे बेमुर्वत पारिपत्य करावेच लगेल. पण ते करत असताना नवे गुन्हेगार निर्माण कसे होणार नाहीत याचाही प्रकर्षाने विचार केला पाहिजे. तसे केले नाहीतर येणाऱ्या काळात तुरुंगातली गर्दी वाढत राहील आणि समाजाची भावना शून्यता सुद्धा!!

समाज मान्य व्यक्तींनी याविषयी जागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. आणि याचे मुख्य उद्दिष्ट स्त्री ला तिचा आत्मसन्मान मिळवुन देणे हे असले पाहिजे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, अमीर खान, ए पी जे अब्दुल कलाम, रामदेव बाबा, अण्णा हजारे या सारख्या लोकांचा आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे. शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत, बिहारी, मराठी, हिंदू, मुस्लिम या सारख्या सर्व भेदा-भेदांवर या लोकांचा सारखाच प्रभाव आहे. मला असे वाटते कि त्यांनी त्यांचा प्रभाव या एक मोठ्या क्लिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नासाठी खर्च केला पाहिजे. या लोकांनी त्यांची सार्वमान्यता समाजातील स्त्री ला प्रतिष्ठा मिळवुन देण्यासाठी वापरली पाहिजे. अमिताभ बच्चन च्या पोलिओ अभियानातून खूप मोठी जन-जागृती झाली. त्याचे उत्कृष्ठ परिणाम आपण पाहिले आहेत. समाजातील रूढी-परंपरा, चाली-रिती ज्यांचा म्हणून स्त्रीच्या प्रतिष्ठेला धोका आहे त्या सर्व गोष्टी या लोकांच्या प्रभावातून मोडून काढल्या पाहीजेत. या लोकांनी एकत्र येउन मनोरंजनाचे असे कार्यक्रम हाती घ्यायला हवेत ज्यातून मनोरंजनासोबत समाज प्रबोधन देखील होत राहिल.

एका बाजूला चंद्रावर माणूस पाठविण्याची आपण तयारी करत आहोत. कदाचित आपण चंद्रावरती पाउल टाकण्यात यशस्वी होऊ देखील! पण पृथ्वीवर जबाबदार पाउल टाकणारा पुरुष तयार करणे हि त्याहूनही महत्वाची गरज आहे. नाहीतर द्रौपदीचे वय उत्तरोत्तर कमी कमीच होत जाइल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी तळमळून लिहिलेल्या या भावनेचा लेखातील आक्रोश सर्वांच्या वतीने आहे.
थरकाप केवळ थरकाप पण त्यापलिकडे जाऊन समाज उभा राहिला आहे हे चांगले आहे,हा लोकक्षोभ वार्‍यावर विरून जाऊ नये,मतपेटीत उमटावा,न्यायप्रक्रियेतील विलंब दूर करण्यास सक्रिय रहावा.त्याची दहशत दहशती कृत्ये करणार्‍यांना वाटावी..
>>आजच्या गुन्हेगारांना फासावर लटकावून उद्याचा बळी टळणार आहे का>>>>
होय. काही अंशी तरी. दुर्दैवाने वाटलीच भीती तर ती संभाव्य मृत्यूचीच वाटेल अशा नराधमांना.

अगदी तळमळून लिहिलेल्या या भावनेचा लेखातील आक्रोश सर्वांच्या वतीने आहे.
>>>>> भारती +१

एकामागून एक घडत असलेल्या अशा घटनांना पायबंद घालण्याकरता तितकीच कठोर शिक्षा केली गेली पाहिजे. तरच गुन्हेगारांना दहशत बसेल, अन्यथा नाही. फाशी ही खूपच साधी शिक्षा ठरेल.

एखाद्या खुनाकरता फाशी ठीक आहे. पण कोवळ्या जीवाला (किंबहुना कोणत्याही स्त्रीला) जीवनातून उठवण्याचे घृणास्पद कृत्य करणार्‍या पाशवी वृत्तीला आळा घालायचा असेल तर सार्वजनिकरित्या हालहाल करूनच मारलं पाहिजे. त्यांनाही कळूद्यात वेदना काय असतात त्या! Angry

एखाद्या खुनाकरता फाशी ठीक आहे. पण कोवळ्या जीवाला (किंबहुना कोणत्याही स्त्रीला) जीवनातून उठवण्याचे घृणास्पद कृत्य करणार्‍या पाशवी वृत्तीला आळा घालायचा असेल तर सार्वजनिकरित्या हालहाल करूनच मारलं पाहिजे. त्यांनाही कळूद्यात वेदना काय असतात त्या! >> + १
मामींना अनुमोदन.
पण विकृत लोकांना कितीही क्रुर शिक्षा दिली तरी त्या लहानग्या चिमुकल्या जीवाला कुठलाही दोष नसताना या मरणयातना सोसाव्या लागल्या त्याचे काय ? तो निरागस जीव ज्याला अजून जीवन म्हणजे काय हेच माहीत नाही ,तो जीव दुस-या कुणाच्या तरी विकृतीमुळे आज मरणाच्या दारात आहे याचे राहून राहून वाईट वाट्ते.
एवढ्या वर्षांची आपल्या देशाची परंपरा, केवढे समाजसुधारक्,संत होऊन गेले. पण स्त्री कडे माणूस म्हणून बघायचे आपण शिकवू शकलो नाही हे केवढे अपयश आहे. अगदी लहानपणापासूनच स्त्रिया/लहान मुले,मुली यांच्याशी वागण्याचे नियम/शिक्षण प्रत्येक नागरिकाला सक्तीचे करावे. आणि अश्या विकृत आरोपींसाठी अशा जबरदस्त शिक्षा कराव्यात की पुढच्याला असे काही करण्याचा विचारही मनात येणार नाही. असल्यांचे आरोपपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये.

डोकंच भिन्न होते अशा विषयाने
परंतु असेही (माफ करा हे प्रकरण नसेलही) काही लोक आहेत जे दामिनी प्रकरणा नंतर ज्याचा जो काही फायदा झाला असेल तो या प्रकारातुन आपल्यालाही मिळेल म्हणुन असे प्रकार करतील ही गोष्ट नाकारता येत नाही.

स्त्रीला किंमत नसते हे आईच मुलांना शिकवते...वागण्यातुन, बोलण्यातुन संस्कार करत असते. आपल्याला मुलगा आहे हा एक मोठ्ठा विजय असल्यासारखं वागुन," त्याने काहीही केलं तरी चालतंय कारण तो मुलगा आहे" हे असले बोलणार्‍या बाया पाहील्या की आधी यांनाच हालहाल करुन मारावं असा विचार येतो.

कंडीशनींगचाही महत्वाचा वाटा आहेच...त्यातुनही बरं वाईट का ते आपलं आपण समजुन वागणारे मोठ्या प्रमाणावर नाहीत. स्त्रीला वाटेल तसं वागवलं तरी आपल्याला काहीही होणार नाही याची त्यांना खात्री असते कारण समाज षंढासारखा बघत राहतो... ती स्त्री परकी असो नाहीतर घरातली.

अन बायका सुद्धा एकमेकींच्या मदतीला नसतात हेसुद्धा तितकंच सत्य आहे. पाश्चिमात्य वेषभुषा, केशभुषा अन शिव्या यापलीकडे कशाचंच अनुकरण केलं जात नाही.

आपापली लढाई लढायची...शेवटी द्रौपदी भारतीय समाजातंच आहे...अन दाद मागितली की मानसिक अन शारीरीक जखमा वाढतात हे प्राचीन आहे. नै का !

लेखात मांडलेल्या भावनांशी शंभर टक्के सहमत, सर्वच प्रतिसादांनाही अनुमोदन.

जिथे जिथे ज्याज्या प्रकारे असले प्रकार मुळातूनच थांबवता येतील, तिथे तिथे त्यांना विरोध करण्याचा, थांबविण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत होतो व रहाणारच, ही पुनःप्रतिज्ञा!

शिल्पा तुम्हाला लाखो मोदक.

कुणीतरी तुमचा लेख वाचला सकाळमधल्या पैलतीरमध्ये. अतीशय तीव्रतेने लिहीलयं तुम्ही.

कोणत्या घटकांनी त्याच्यात स्त्री हि फक्त एक वस्तू असल्याची भावना निर्माण केली >>>>> ईथे एका घरात अगदी सगळ्या पाहुण्यांच्या समोर आईने मुलाला (वय५-६ वर्षे) काहितरी काम करायला सांगितले होते काम म्हणजे हे आतन आणुन दे वैगरे आणि जेवताना भाज्या खाल्याच पाहिजे असेही सांगीतले होते तर त्या मुलाच्या वडीलांनी सगळ्यांसमोरच नको आणुन देऊ तिला काय कळतय, नको खाऊस भाज्या तुझ्या आईला काय अक्कल आहे.... असे बोलताना बघितले आहे. ती बाई नंतर सगळ्या बायका गप्पा मारत होतो तेव्हा म्हणाली हे कायमच असच चालू असत.. Sad
तिचा मुलगा कायम आईला अतिशय उद्दाम पणे बोलताना दिसत असे. (पार्क मध्ये, शाळे जवळ).
आम्ही खूप वेळा तिला म्हणायतो तु अस कस बोलून देतेस त्याला.. ओरडत कशी नाहीस.. त्याच उत्तर तिने जेव्हा सगळ्यांना घरी जेवायला बोलावल तेव्हा कळाळ.. नवराच-बायकोला/ माणूस म्हणुन किंमत देत नाही तेच हा मुलगा बघत होता... उद्या जाऊन कुठल्याही स्त्री शी तो विचित्रच वागेल.
वरील घटना अगदी सुशिक्षीत घरात घडते आहे..
असच ज्या घरात चालत असेल तिथल्या मुलांवर हेच संस्कार होत असतिल. आपल्या पुढे येणारी प्रत्येक स्त्री ही तुच्छ वाटायला लागेल..
खरतर (ज्या घरात अजूनही स्त्रीला माणूस म्हणुन वागवत नाहीत) त्या लोकांनी आधी घरातल्या स्त्री ला माणुस म्हणून वागवायला शिकल पाहीजे.. तर उद्या नविन पिढी हे शिकेल त्यांच अनुकरण करेल.

वरच्या प्रमाणे अनेक घटना ज्या आपल्याला माहितीही नसतील त्या स्त्री कडे वस्तू म्हणून बघायला कदाचीत शिकवत असतील

परंतु स्त्रीविषयी समाजाच्या इतर घटका प्रमाणे पोलिसात देखील एक सार्वत्रिक अनास्था आहे. >> हा खरा कळीचा मुद्दा!! दुर्जनाच्या सक्रियतेपेक्षा अधिक घातक सज्जनांची निष्क्रियता असते...

बलत्काराची कृती मग ती कोणत्याही वयाच्या स्त्रीवर असो ती निंदनीयच आहे.

दुर्दैवाने या गुन्ह्यामागे फक्त मनोविकृतीच किंवा लिंगपिसाट प्रवृती हेच कारण नसावे. समाजशास्त्री आणि मनोविकार तज्ञांनी शोध घेतल्यास कदाचित आणखी काही कारणे पुढे येतील.

दुर्दैवाने या गुन्ह्यामागे फक्त मनोविकृतीच किंवा लिंगपिसाट प्रवृती हेच कारण नसावे. समाजशास्त्री आणि मनोविकार तज्ञांनी शोध घेतल्यास कदाचित आणखी काही कारणे पुढे येतील. >>> जसे?? ***जाम गोंधळात पडलेली रशियन बाहुली**जाम गोंधळात पडलेल्या रशियन बाहुलीच्या पोटातील जाम गोंधळात पडलेली छोटी रशियन बाहुली** जाम गोंधळात पडलेल्या रशियन बाहुलीच्या पोटातील जाम गोंधळात पडलेल्या रशियन बाहुलीच्या पोटातील दुसरी छोटी बाहुली***

लेखातल्या सर्व तीव्र भावनांशी तितक्याच तीव्रतेने सहमत...

अतर्क्य वाईट घटनांवरील उपायसुद्धा अतर्क्यच असायला हवेत...

सर्वच प्रतिक्रिया अतिशय विचार करायला लावण्याऱ्या आहेत. सर्वांचे आभार.
सीमंतिनी "दुर्जनाच्या सक्रियतेपेक्षा अधिक घातक सज्जनांची निष्क्रियता असते..." >> अगदी शत-प्रतिशत सहमत.

ही बातमी सुरूवातीला टीव्हीवर दाखवत होते तेव्हां अंगावर काटा आला. टीव्हीवरची निवेदिकाही कुणाच्याही संवेदनशीलतेचा विचार न करता सगळं वृत्त तपशीलवार सांगत होती. त्यांचा काय दृष्टीकोण असेल ते असो, पण त्यातली क्रूरता सुन्न करून टाकणारी होती. ज्यांना लहान मुली आहेत त्यांची अवस्था आणखी भयाण होती. आता त्या चिमुरडीच्या जिवाचा धोका टळला आहे हे त्यातल्या त्यात समाधान. पण.............. ......असो. !

या घटनेतील आरोपी तरूण आहे. पोलीस कोठडीत त्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला जो पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडला गेला. यावरून त्याला पश्चात्ताप होतोय हे दिसतंय. मग हे कृत्य त्याने का केलं असावं ? त्याचंही उत्तर मिळालं. दुस-या एका बाफवर लिहीलंय ते. त्याने आधी अश्लील फिल्म पाहिली होती. त्या वेडात त्याच्याकडून हे अघोरी कृत्य झालं. ब-याच जणांना अशा फिल्म्स सहज उपलब्ध असणे यात समाजापुढे काही धोका आहे हेच मान्य नाही. आपल्या देशात आजही ज्या विषयावर चर्चा करणं निषिद्ध समजलं जातं त्याचं शिक्षण देणं खूप दूरची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात मुलीचं वयात येणं ही गोष्ट गांभिर्याने घेतली जाते. त्यामागेही मुलगी म्हणजे खानदानकी इज्जत वगैरे असतं. पण मुलग्याचं वयात येणं ??

कुणालाच त्याबद्दल काही वाटत नाही. या वयात मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. ज्याची उत्तरं मग अशी बाहेर शोधली जातात. ते सगळं खरं समजून उत्तरं मिळवली जातात. हे नवं ज्ञान झाल्याचा साक्षात्कार होतो. एकवेळ अज्ञान परवडलं अशी माहिती चोरट्या मार्गाने मिळते ज्यातून विकृती जन्म घेउ शकते. त्यातून प्रत्यक्ष गुन्हा करायला धजावणे हा आणखी वेगळया विश्लेषणाचा विषय आहे. पण वपुंची सभ्य माणूस म्हणजे पाप करायची संधी न मिळालेला ही व्या़ख्या इथं लागू पडते. या मुलाला मोठी स्त्री, मुलगी यांच्यावर हल्ला करणं त्याच्या कुवतीबाहेरचं वाटलं असावं. धाडस झालं नसावं. पण त्या फिल्ममुळे निर्माण झालेली विकृती शमवण्यासाठी त्याच्या नजरेला समोर खेळत असलेली चिमुरडी पड्ली असावी.

अशा घटना घडण्यासाठी कारण ठरणा-या या घटकांचा बंदोबस्त होणं गरजेचं नाही का ?