तरंगायचे दिवस! (भाग-२)

Submitted by अनया on 21 April, 2013 - 10:51

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

भाग १ : http://www.maayboli.com/taxonomy/term/12715

0khad-2.jpgजल-आनंद!!

हे करता करता सगळ्यांनाच पोहण्याच व्यसन जडल. पोहायची वेळ चुकू नये म्हणून मग शिफ्ट ड्यूटी असणारे सेकंड शिफ्ट मागून घेऊ लागले. कुठल्याही कारणाने उन्हाळ्यात कल्याण सोडायला आम्ही कटकट करायला लागलो. आमच्या तिघींच्या आयांची मात्र बरीच तारांबळ व्हायची. दोन्ही वाढत्या वयातल्या मुलाचं अस मोठ्या प्रमाणातल पोहण, आंबे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे फारच वाईट समीकरण होत! आईनी दोन्ही वेळेच्या म्हणून करून ठेवलेल्या पोळ्या आम्ही एकाच जेवणात फस्त करायचो. पुन्हा दुपारी खायला तयारही असायचो!

आमचे तिघींचे केस चांगले लांब आणि दाट होते. खारट पाण्याने त्या केसांची अवस्था घोड्याच्या शेपटीसारखी व्हायची. पण केस कापावे, लहान केस स्वच्छ करायला सोपे जातील, हे कोणाच्या डोक्यातच आल नाही. आता तिघींनीही मस्तपैकी केस कापून टाकलेत. कल्याणला गेल्यावर तिघी मातांपैकी कोणीतरी ‘आमचे हात तुम्हाला न्हायला घालून घालून भरून यायचे. आता स्वतःच्या हातात आल्यावर इतके छान केस कापून कसे टाकलेत?’ असा तीव्र निषेध व्यक्त करतातच.

सगळ्या मुलगे वर्गाच्या केसांची अवस्थाही काही फार वेगळी नसायची. खाडीवरून येताना एक ‘मोहन केशकर्तनालय’ लागायचं. हे सगळे नाठाळ लोक त्याच्याकडे सगळे एकदम केस कापायला जायचे! त्यादिवशी मोहनच्या कात्रीची धार नक्की जात असणार.

‘पोहून आल्यावर अंघोळ केल्याशिवाय खायला मिळणार नाही,’ असा एक फतवा घरोघरी लागू होता. भूक तर मरणाची लागलेली असायची. त्यामुळे बाथरूममध्ये जाऊन इतक्या त्वरेने आम्ही बाहेर यायचो, की बादलीला सुद्धा नक्की काय घडल, ते कळायच नाही. भरपूर खाऊन आम्ही आमचे उद्योग करायचो. आई मात्र वाळूचा सडा पडलेलं बाथरूम स्वच्छ कर, वाळूने भरलेले कपडे धू अशी काम करायची.

आमचे सगळे गुरुजन गावठी पद्धतीच पोहण शिकलेले होते. पोहण्याचे स्ट्रोक्स वगैरे प्रकार त्यांनाच माहिती नव्हते, तर आम्हाला कुठून माहिती होणार? त्यामुळे पोहताना वेग वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणे, हे तिथल्या नियमात आजिबात बसत नव्हते. हात-पाय पाण्याच्या आतून मारायचे. फार गडबड करायची नाही, हे सतत बजावल जायचं. फ्री-स्टाईल स्ट्रोकसारखे पाण्यावरून हात मारायला लागल, तर त्याला ताबडतोब प्रतिबंध केला जाई. आपला स्टॅमिना सांभाळून हळूहळू जायचं, अशीच पद्धत होती. पुढे जरा आधुनिक पद्धतीच्या पोह्ण्याशी परिचय झाल्यावर, आमच्या ह्या पद्धतीलाही ‘डॉग पॅडल’ अस नावं आहे, हे कळल्यावर आनंदाचा धक्का बसला होता!

‘फ्लोटिंग’ हा अजून एक प्रकार अत्यंत लोकप्रीय होता. श्वासाची लय सांभाळत पाण्यावर स्वस्थ पडून राहणे म्हणजे फ्लोटींग! ह्यासाठी भरपूर उत्तेजन मिळायचं.’ थोड जरी दमल्यासारख वाटल, तरी लगेच फ्लोटिंग करा’ हा मंत्र सदैव जपला जायचा. खाडीच पाणी कधीच स्थीर नसायच, प्रवाहाबरोबर आपोआपच वाहात जाता यायचं. आम्ही जिथे पोहायचो, तिथून जवळच विजेच्या ‍किंवा दूरध्वनीच्या तारा ह्या काठावरून त्या काठावर गेल्या होत्या. का कोणास ठावूक, पण त्या तारांखालून जाताना सगळे फ्लोटिंग करत आडवे पडून त्या तारा जाताना बघायचे. पुढे आमच्या एका लांब अंतराच्या मोहिमेत अश्याच एका तारांखालून जाण्याची वेळ आली. त्या मोहिमेत आम्हाला मदत आणि सोबत करण्यासाठी ठाण्यातले काही स्वीमर आमच्या बरोबरच्या बोटीत आले होते. तारा दिसल्याबरोबर सवयीप्रमाणे आम्ही सगळे तारांखाली पोहणे थांबवून आडवे झालो. ठाणेकरांना वाटल की काही प्रॉब्लेम झाला की काय? मदत करण्यासाठी ते बिचारे भराभर हात मारत आमच्यापर्यंत पोचले. तोपर्यंत आम्ही पुन्हा पोहायलाही लागलो होतो. त्यांना ह्या आमच्या अचानक घेतलेल्या ब्रेकची आईडिया कळेचना! आम्ही तरी काय करणार? इतक्या वर्षांची सवय..... दुसर काय?

कल्याणसारख्या लहानश्या गावात ह्या उद्योगांना प्रसिद्धी मिळाली नसती, तरच नवल! काही लोक टॅंकवर पोहायला शिकून आलेले असायचे. माझ्या भावाला अश्याच एका टॅंकरने विचारल ‘ तुम्ही किती खोल पाण्यात पोहता?’ सरळ उत्तर दिल, तर खाडीच्या पाण्यातल्या मिठाला न जागण्याच पाप माथी यायचं. त्यामुळे भावाने अगदी गरीब चेहरा करून ‘ नाही रे, आम्ही शिकाऊ लोक. पाण्याच्या वरूनच पोहतो. तुमच्यासारख तळाजवळून पोहत नाही, त्यामुळे खोली काही कळली नाही बुवा!’ अस उत्तर दिल. ते उत्तर नंतर बरच लोकप्रीय झाल्यामुळे सगळेजण वापरायला लागले.

0khad-21.jpgपोह्ण्याबरोबरचे कारनामे!

खाडीवर मनसोक्त पोहता येत असल्, तरी स्वीमिंग टॅंकसारखा डायव्हिंग बोर्ड मात्र नव्हता. त्यामुळे उड्या, सूर मारता यायचे नाहीत. कधीतरी वाळूने भरलेल्या होड्या रिकाम्या करण्यासाठी म्हणून काठाला लागायच्या. दोन लपलपत्या फळ्यांवरून डोक्यावर वाळूची घमेली घेतलेल्या बायका ये-जा करायच्या. आम्हीही त्यांच्यात घुसून, होडीच्या पाण्याच्या बाजूने दणादण उड्या मारायचो. माझे बाबा तिथून अगदी रेखीव असे सूर मारायचे. मला सूर मारायला शिकवायचा त्यांनी खूप प्रयत्न केला. पण त्यावाचून काही अडत नसल्याने, मी काही त्यांना दाद दिली नाही.

पोहण्यात बऱ्यापैकी प्रगती झाल्यानंतर आम्ही अगदी क्वचित खाडीच्या पुलाच्या खालच्या पट्ट्यांवरून उड्या मारायला जाऊ लागलो. खाडीवर एक ब्रिटीशकालीन पूल होता, ह्याचा उल्लेख मी वर केला आहेच. भरतीच्या प्रवाहाचा फायदा घेत आम्ही काही लोक त्याच्या खाली पोचायचो. दोन्ही बाजूंना हातांच्या कवेत न मावणारे गोल खांब आणि त्यांना जोडणाऱ्या आडव्या आणि तिरप्या पट्ट्या अशी रचना होती. त्या आडव्या पट्ट्यांवर आम्ही जाऊन बसायचो. वरून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीचा एक वेगळाच आवाज यायचा. बाकी ठिकाणी टळटळीत वाटणार ऊन इथे थोड सौम्य वाटायचं. पाण्यापासून दुसऱ्या-तिसऱ्या पट्ट्यांवरून उड्या मारायचा मान पोह्ण्यातल्या ज्येष्ठतेप्रमाणे मिळायचा! वरून पाण्यात उडी मारली की पाणी काळकुट्ट दिसायचं. क्षणभर नक्की कोणत्या दिशेला जायचय, हा गोंधळ व्हायचा. इतके विचार मनात यायला जितका वेळ लागायचा, त्याच्या आतच डोक पाण्याबाहेर यायचं सुद्धा! पुलाखाली पाण्याला प्रवाह जोरात असायचा. त्यामुळे काही जण वर आलेल्याचा हात पकडायला तयारच असायचे! भीती तर वाटायची, उंचावरून पाण्यात पडेपर्यंत पोटात खड्डा पडायचा, पण मजा खूप वाटायची आणि तो उड्या मारायला जायचा मोह काही आवरायचा नाही!

खाडीच्या त्या पुलाचे नऊ खांब म्हणजे आमच अंतराच माप होत. पाच खांब जाऊन परत आल, म्हणजे खाडी पार करायची तयारी झाली, अस समजण्यात येई. (ते अंतर साधारण एक किलोमीटर आहे, अशी ज्ञानप्राप्ती मला नुकतीच झाली आहे!) कोणीही पहिल्यांदा खाडी पार करणे, म्हणजे उत्सव असायचा. त्याच मानसिक धैर्य वाढवण्यासाठी सगळे पटाईत लोक बरोबर जायचे. त्याबदल्यात त्या भिडूने सर्वाना मग भेळेची पार्टी द्यायची, असा अलिखित पण कडक नियम होता.

आमचा एक अशोक दीक्षित नावाचा मित्र पुलाच्या पाच-सहा खांबांपर्यंत जाऊन परत यायचा. आता क्रॉस करायची तयारी झाली, म्हणून सगळे जमायचे. पण त्या दिवशी त्याला काय व्हायचं कोण जाणे? सात खांब गेला, की गर्रकन वळून मागेच फिरायचा. सगळे ‘अशोक, अरे तू ७५-८० टक्के आला आहेस, समोरचा काठ जास्त जवळ आहे.’ अस समजावायचे. पण नाही. हा हिरो परतच यायचा! सगळ्यांना भेळ खाऊ घालायचा. पुन्हा काही दिवसांनी तीच कथा.. अस दोन-तीन वेळा झाल्यावर मग एकदाची त्याने खाडी क्रॉस केली!! ह्या गोष्टीवरून आम्ही त्याला खूप चिडवायचो. त्याचा वचपा म्हणून की काय, आधी त्याने एकट्याने व नंतर लेकीबरोबर पॉवर लिफ्टिंग मध्ये बरेच विक्रम केले!

काही दिवसातच आम्हा तिघीही मैत्रीणींचीही खाडी पार करायची तयारी झाली. आदल्या दिवशी रात्री झोप लागेना! डोळ्यासमोर पाणीच पाणी दिसत होत. शिवाय आपल्याला टाकून बाकीचे लोक क्रॉस करतील की काय ही एक भीती होतीच. पण सुदैवाने तस काही झालं नाही. आम्ही सगळ्यांनी यशस्वीरीत्या ते टारगेट पूर्ण केल! कल्याणच्या एका संस्थेने आमचा नंतर ह्याबद्दल सत्कारही केला.
आता पोहण्यात आणखी आणखी रंगत यायला लागली. रोज रोज खाडी क्रॉस करायचं वेडच लागल. तेव्हाही वाळूचा उपसा व्हायचा. पण ड्रेझर अगदी कमी होते. त्यामुळे काठावरची दलदल शाबूत होती. खाडी क्रॉस करून पलीकडे गेल्यावर आम्ही दलदलीत उभ राहून थोडा वेळ टाईमपास करायचो. आता आठवून गम्मत वाटते, पण तो चिखल अंगाला फासायचो सुद्धा! खाडीच्या भरती-ओहोटीला जुळवून घेण्यासाठी पलीकडच्या काठावर काही अंतर चालतही जायला लागायचं. त्या काठावर विलायती चिंचांची भरपूर झाड होती. ती खाऊन आणि ह्या काठावर असलेल्या लोकांसाठी खिसे भरून घेऊन आम्ही परतायचो.

आम्ही नेहमीच सकाळी अगदी लवकर, म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला पाण्यात असू, अश्या बेताने पोहायला जायचो. मुंबईच्या त्या घामट उन्हाळ्यात थंड पाण्यात शिरल्यावर मनाला आणि तनाला होणारा आल्हाद शब्दात सांगण कठीण आहे. त्या सकाळच्या शांत वेळी हलके हलके वाहणाऱ्या पाण्यात सावकाश पोहताना स्वर्गसुख मिळायचं. वाळूच्या होड्यांवर काम करणाऱ्या काही मजुरांच्या झोपड्या काठावर होत्या. तिथेच एका झोपडीत सगळ्या महिलावर्गाची कपडे बदलायची सोय केली होती. बऱ्याचदा आम्ही पोहण संपवून तिथे जायचो, तेव्हा त्या मावशी चुलीवर भाकरी करत असायच्या. पोहून इतकी मरणाची भूक लागलेली असायची, की त्यांनी ‘खाता का भाकरी?’ अस तोंडदेखल म्हटल असत, तर आम्ही निर्लज्जासारख्या खाऊ, अशी भीती आमच्यासकट सगळ्यांनाच वाटायची!

कल्याणच्या त्या घामट उन्हाळ्यात बऱ्याच वेळा रात्री चक्कर मारायलाही आम्ही खाडीवर जायचो. तेव्हा थंडगार वारा सुटलेला असायचा. वाळूच्या ढीगावर रेलून वर बघितलं, की चमचम करणाऱ्या चांदण्यांनी भरलेलं आभाळ दिसायचं. झोप डोळ्यात दाटून यायची. परत घरी जाऊन दार उघडल, की गरम हवेचा झोत भस्सकन अंगावर यायचा. तेव्हा खाडीवरच झोपता आल असत, तर किती छान झालं असत, अस मनापासून वाटायचं. अश्या रीतीने, त्या काळात आमचा कायमचा पत्ता ‘खाडी आणि तात्पुरता पत्ता ‘घर’, अशी अवस्था होती. बऱ्याच जणांच्या घरचे लोक ह्यावर वैतागायचे. लग्नेच्छू मंडळींच्या घरचे तर फारच! ‘उद्या मुलगी बघायला सुद्धा खाडीवरच बोलावशील बाबा तू,’ असे डायलॉग्ज ऐकायला मिळायचे.

थोड्याच दिवसात पोहण्याव्यतिरिक्त इतरही कल्पनांच्या ग्रूपमध्ये फांद्या फुटू लागल्या. चार मराठी माणसं एकत्र आली, की गणपती बसवतात, अस म्हणतात. पण खाडीवर ते शक्य नसल्याने, दुसऱ्या क्रमांकाची कल्पना म्हणून एक कोजागिरी पौर्णिमा खाडीवर करायची ठरली. मसाला दुध, भेळ वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार होतेच. ‘काय, येताय का चार हात मारायला?’ राजू गुप्तेने नेहमीप्रमाणे माझ्या बाबांना विचारल. बाबाही तयार झाले! त्या काळोख्या रात्री दोघेही नेहमीसारखे पाण्यात उतरले. ‘बाकी काही नाही, पण आपल्याच सावल्या दिसतात, त्याने जरा बिचकल्यासारख झालं’ असा रिपोर्ट मिळाला. असे अत्रंगपणा करण्यात सगळे एकदम पटाइत होते!

त्या ग्रूपमध्ये मराठीचा एक वेगळाच अविष्कार निर्माण झाला होता. आमच्या ग्रुपचे सर्वात ज्येष्ठ मेम्बर आठवले काका, चालताना एक खांदा झुकवून चालायचे. म्हणून त्यांना ‘देवानंद’ आणि एका टकलू काकांना ‘कादरभाई’(संदर्भ : दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ ही मालिका’), राजू गुप्ते सगळ्या बारक्या पोरांना पोहायला शिकवायचा. म्हणून तो झाला गुप्ते गुरुजी किंवा गुगु! विजय वाड सगळ्यात छोटा, त्याला कायम ‘विजय द्वाड’! आता ह्यातले सगळे मोठे झाले. काही निजधामालाही गेले. पोटामागे धावताना बऱ्याच जणांनी कल्याण सोडल. पण अजूनही ग्रूप भेटला की ह्या नावांची त्या सर्वांच्या बायकोमुलांसमोर उजळणी होतेच होते.

भाग ३ : http://www.maayboli.com/node/42692

भाग ४ : http://www.maayboli.com/node/42712

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाथरूममध्ये जाऊन इतक्या त्वरेने आम्ही बाहेर यायचो, की बादलीला सुद्धा नक्की काय घडल, ते कळायच नाही.>>> Lol

वाचनीय लेखमाला

Pages