'माणूस' अन्यथा मित्रा, नुसतीच उपाधी असते

Submitted by बेफ़िकीर on 20 April, 2013 - 03:54

माणूस ठरवतो काही अन् घडते काही तिसरे
घडलेले बघुनी म्हणतो मी हेच ठरवले होते
किंवा म्हणतो जे झाले तेसुद्धा ठीकच आहे
किंवा म्हणतो की माझे दुर्दैवच असले आहे
किंवा म्हणतो की बहुधा अपुरेच यत्न केले मी
किंवा तो सांगत फिरतो की दोष कुणाचा आहे
किंवा देवाला म्हणतो नवसाला पाव बरे तू
किंवा मंगळ राहूची तो शांतीबिंती करतो
हे सगळे झाल्यावरती जे काय ठरवले होते
ते आपोआपच होते माणूस खुषीने हसतो
मग घेतो श्रेय स्वतःला किंवा देतो देवाला
किंवा नशिबाला देतो किंवा मंगळ राहूला
किंवा दुनियेला देतो किंवा देतो यत्नांना

जे झाले ते का झाले, जे नाही ते का नाही
याचे उत्तर सापडणे ही खरी समाधी असते
'माणूस' अन्यथा मित्रा, नुसतीच उपाधी असते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे झाले ते का झाले, जे नाही ते का नाही
याचे उत्तर सापडणे ही खरी समाधी असते
'माणूस' अन्यथा मित्रा, नुसतीच उपाधी असते..............व्वा.

आवडली कविता.

छान ..... मस्त ओघ आहे कवितेला.
पहिला खंड अगदी पटण्यासारखा.
दुसर्‍या खंडातले "याचे उत्तर सापडणे ही खरी समाधी असते" हे (मला व्यक्तिश:) पटले नाही.
तरीदेखील कवितेतून प्रभावीपणे विचार मांडला गेलाय हे निश्चित.

ग्रेट

एक शेर कालच केला मी तो आठवला

काहून विठ्ठ्ला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला इकडे आणून सोडले आहे

Happy

जे झाले ते का झाले, जे नाही ते का नाही
याचे उत्तर सापडणे ही खरी समाधी असते

अगदी यथार्थ.घटित-अघटितांच्या संतुलनबिंदूवर पोचणे हीच समबुद्धी.

Good.