तहान, भूक भोवती, मजेत मी गिळू कसा?(तरही गझल)

Submitted by कर्दनकाळ on 18 April, 2013 - 12:34

तरही गझल
तहान, भूक भोवती, मजेत मी गिळू कसा?
(जगात दु:ख एवढे, सुखात मी जगू कसा?)भूषण कटककरांची ओळ

दुभंगली धरा पुरी, तशात व्योम फाटले....
धरेस शांतवू कसा? नभास या शिवू कसा?

कसाबसाच कोंडला समुद्र लोचनांत मी!
कळे न लोचने तुझी जगा अता पुसू कसा?

अजून जीवनामधे, मुले उभी न राहिली;
अजून कर्जदार मी, मधेच मी थकू कसा?

उठाबशाच काढल्या तमाम यौवनामधे!
उतार या वयामधे, उठू कसा? बसू कसा?

न पाहिले... मला कधी, कुणी कुणी लुबाडले;
भिडस्त मी मुळामधे, कुणास ना म्हणू कसा?

इथेच जन्म घेतला, इथेच वृद्ध जाहलो!
अजून प्रश्न की, इथे रुळू कसा? रुजू कसा?

असाच सैल सैल मी, असाच सैरभैर मी!
विखूरल्या स्वत:स मी, स्वत:च आवरू कसा!!

**************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुभंगली धरा पुरी, तशात व्योम
फाटले....
धरेस शांतवू कसा? नभास या शिवू
कसा?

कसाबसाच कोंडला समुद्र लोचनांत
मी!
कळे न लोचने तुझी जगा अता पुसू
कसा?>>>
सुरेख शेर ..
मक्ताही भिडला..

अजून जीवनामधे, मुले उभी न राहिली;
अजून कर्जदार मी, मधेच मी थकू कसा?

असाच सैल सैल मी, असाच सैरभैर मी!
विखूरल्या स्वत:स मी, स्वत:च आवरू कसा!!

छानच

बाकीचेही आवडलेच आहेत
मतल्यातली पहिली ओळ् उचंबळापोटी केलीत की काय असे वाटले
अजून कितीतरी छान ती तुम्ही नक्कीच करू शकता

धन्यवाद वैभव वसंत कुलकर्णी!

मतल्यातली पहिली ओळ् उचंबळापोटी केलीत की काय असे वाटलेसंपूर्ण गझलच उचंबळ होता ज्याचे बीज भूषणरावांच्या 'जगात दु:ख एवढे, सुखात मी जगू कसा' या मिस-यात होते!

मला आवडली सगळीच गझल Happy
एक असा शेर कोट करता येत नाहीये Happy
पहिली ओळ सोडून सगळ्याच ओळी वाचुन "आहाहा" वाटलं.
पहिली ओळही चांगली आहे पण मला तो "गिळू" शब्द नाही आवडला.
(प्रतिशब्द मला माहीत नाही... मी फक्त मत दिलं Happy )

धन्यवाद रियाजी!
मतला असा होता............
तहान, भूक भोवती, मजेत मी गिळू कसा?
(जगात दु:ख एवढे, सुखात मी जगू कसा?)भूषण कटककरांची ओळ

पहिल्या ओळीतली गिळू कसा? या शब्दयोजनेवर बरेच चिंतन करून मग शेवटी आम्ही त्या शब्दयोजनेला उला मिस-यात स्थान दिले!

गिळणे या क्रियापदाचा अर्थ आहे.......................
घशाखाली उतरवणे/ खाऊन टाकणे/ शोषणे/ग्रासणे/दडपणे/(अपराध) सहन करणे इत्यादी!
यातील घशाखाली उतरवणे हा अर्थ या शेरात चपखलपणे बसतो!

मतल्याचा सुलभ गद्य अर्थ आहे.................. भूक व तहान भोवती असताना, म्हणजेच भोवती इतके भुकेजलेले व तहानलेले/तृषार्त लोक असताना, मी (एकटाच) मजेत (अन्न/पाणी) गिळू कसा? या गोष्टी कशा माझ्या घशाखाली उतरतील?
जगात एवढे दु:ख असताना मी (मात्र) सुखात कसा बरे जगू?

जगातील(अनेक) लोकांना खाण्यापिण्याची देखिल भ्रांत असताना माझ्या घशाखाली अन्न/पाणी कसे बरे मजेत उतरावे?

मला वाटते इतकी मतल्याची फोड तो उमगायला पुरी ठरावी!

...............कर्दनकाळ

मला अर्थ व्यवस्थित कळाला होता पण तरीही तो शब्द आवडला नाही Happy
त्याबद्दल काहीही म्हणणं नाही... सहज मत दिलं Happy

उठाबशाच काढल्या तमाम यौवनामधे!
उतार या वयामधे, उठू कसा? बसू कसा?

Proud

अजून जीवनामधे, मुले उभी न राहिली;
अजून कर्जदार मी, मधेच मी थकू कसा?

असाच सैल सैल मी, असाच सैरभैर मी!
विखूरल्या स्वत:स मी, स्वत:च आवरू कसा!!<<<

दोन्ही शेर मस्त

धन्यवाद

वरील प्रतिसादाशी सहमत

अजून जीवनामधे, मुले उभी न राहिली;
अजून कर्जदार मी, मधेच मी थकू कसा?

असाच सैल सैल मी, असाच सैरभैर मी!
विखूरल्या स्वत:स मी, स्वत:च आवरू कसा

हे दोन्ही शेर फार सुरेख आले आहेत.