पण माझ्यातला 'मी' आडवा आला

Submitted by ashishcrane on 15 April, 2013 - 02:23

आज बसमध्ये गर्दी नाही हे पाहून अनुने समाधानाने एक मोठ्ठा श्वास घेतला. खूप दिवसांनी असा दिवस आला होता. माणसं शोधता शोधता हल्ली जिथं माणसं नसतील अशी जागा शोधावी लागते. बऱ्याच दिवसांनी खिडकीजवळची सीट रिकामी मिळाली होती. जागा पकडून ती शांत नजरेने लहान मुलं जशी उत्सुकतेने बाहेर बघतात तशी बाहेर बघू लागली. जास्त ट्राफिक नसल्याने बसही वेगाने चालत होती. वारा केसांशी खेळत होता. छान हसली अनु. गालातल्या गालात. एकटीच.
इतक्यात तिला स्वत:जवळच्या पुस्तकाची आठवण झाली. हल्ली 'क्षण' नावाने कथा,कविता आणि लेख प्रकाशित व्हायचे. अनुच्या आवडीचं होतं ते लिखाण. आधी नाही पण हल्ली वाचायला आवडायचं अनुला ते या 'क्षण'मुळेच. यातलं तिला सगळं स्वतःशीच संबंधित आहे असं वाटायचं. आपलंच मन, आपलाच भूतकाळ आपल्या समोर कुणीतरी लिहून ठेवलाय असं वाटायचं.
तिने पुस्तक बाहेर काढलं. वर फुलपाखराचं चित्र होतं. 'थोडंसं मनातलं' असं नाव होतं. खाली 'क्षण-(अवि)' असे लिहिणाऱ्याचे नावही होतं. प्रसन्न मनाने तिने पानं चाळायला सुरुवात केली.

आतल्या दुसऱ्या पानावर दोनच ओळी.

ना विसरलेले...पण थोडे सरलेले...थोडे मुद्दाम घट्ट धरलेले...
ना फक्त तुझे...ना फक्त माझे...हे क्षण आपुले
लिहिलेली प्रत्येक ओळ ह्या ना त्या कारणाने...फक्त तुझ्यासाठीच...
-- अ.वि.

गळ्यातले मंगळसूत्राचा मनी ओठांमध्ये पकडून अनु एकेक शब्द मनापासून वाचत होती.मस्त थंड वारा आणि त्यात अविचं लिखाण. छोटीछोटी सुखं आपल्याला नेहमी बिलगत असतात आपल्याला. आपण मात्र त्यांना तुच्छ मानून जगण्याचा अपमान करत असतो.
हा वारा पण ना अजीब असतो. थंडावला कि सुखद आठवणी पुन्हा आठवून देतो. अनुला तिचा श्रीसोबतचा संसार आठवला. सहा वर्षाचा तिघांचा सुखाचा संसार. अनु, श्री आणि त्यांची लाडकी पियू.
काहीच तक्रार नव्हती. छोटे छोटे रुसवे फुगवे व्हायचे. पण आनंद होता.
वाचता वाचता कुणीतरी बाजूला येऊन बसल्याने तिने बाजूला पाहिले.
"अय्या! सुवि तू ! किती दिवसांनी भेटलीस गं आज! कशी आहेस? कुठे राहतेस? मंगळसूत्र ? म्हणजे लग्न झालेलं दिसतंय. अगं बोल ना!"
"अगं हो हो. किती प्रश्न विचारशील. उत्तर द्यायला वेळ तरी दे. मी मजेत आहे. मुंबईलाच राहते अंधेरीला."
वर्षानुवर्षे भेट न झाल्यासारखे एकमेकींना सगळे प्रश्न विचारून झाले. इतरांची चौकशी करून झाली. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. हा कसा आहे? ती आता तिथे असते, ह्याचे वडील वारले, इ.
"काय वाचतेयस? बघू."
"अगं अविचं 'थोडंसं मनातलं' वाचतेय. किती छान लिहितो ना तो? खूप आवडतं मला त्याने लिहिलेलं."
सुवि काहीच नाही बोलली यावर. चेहऱ्यावरचे भावही काहीसे बदलेले वाटले. अनुलाही ते विचित्र वाटले ते. पण तरीही ती बोलू लागली.
"अगं पण काहीकाही लोक त्याचा तिरस्कार का करतात? वेडासुद्धा बोलतात त्याला."
सुवि यावेळीही काहीच नाही बोलली. मग अनुनेही विषय बदलला.
"सोड जाऊ दे ते. सुवि, अभी कसा आहे गं? काही खबर त्याची?"
"चल मी उतरते. stop आला माझा. भेऊ पुन्हा कधीतरी."
सुवि जाऊ लागली.
"सुवि, ऐक ना उत्तर नाही दिलस तू माझ्या प्रश्नाचं. अभी कसा आहे?"
सुवि उतरू लागली. अनु उत्तराची वाट पाहू लागली. अधीरता होती तिच्या पाणावलेल्या डोळ्यांत.
"सांग ना सुवि."
"अनु, हा अवि म्हणजे आपला अभिजित विचारे. लोक ज्याला वेडा म्हणतात ना तोच अवि."
सुवि उतरली. क्षणांत सगळं शांत झालं. तोच थंड वारा उष्ण वाटू लागला. एक थेंब पापण्यांवरून गालावर विसावला. आता त्या तिथे तिघेच हजार होते. अनु, थेंबाचा शहारा आणि आठवणींचा गराडा.

ऑफिसात लक्ष लागलेच नाही तिचे. मनात विचारांची गर्दी झाली होती. मनातल्या मनातच बोलत होती ती, "आपला भूतकाळ अभिशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भविष्य बदलता येतं पण भूतकाळ? भूतकाळ किती ही त्रास देणारा असला तरी तो कधीच बदलता येत नाही. का सोडलं आपण अभिला? उत्तर आहे का आपल्याकडे? चुकीचं होतं का आपण त्याला सोडणं? जर 'हो'; तर मग आपण का वागलो तेव्हा चुकीचे? कधीच एकमेकांचे हात सोडणार नाही अशी जी वचनं आपण दिली ती खोटी होती का? आज जगासमोर गाजलेला अवि आपल्यामुळे इतका गाजतोय याबद्दल आपण खुश व्हावं कि किंचाळावं?"

आज जग त्याला वेडा म्हणतं याला आपणच कारणीभूत आहोत या विचाराने अनु खचत जात होती.
"आज खूप भेटावंसं वाटतंय अभिला. कसा असेल तो? श्रीला कसे सांगावे हे? विसरून जावे का हे? खरंच विसरू शकतो का आपण हे?"
मनातलं चक्रव्यूह भेदणं कठीण जात होतं.मन स्वस्थ बसू देत नव्हतं. पुस्तक हातात घेऊन वाचण्याची हिंमत होत नव्हती. पण पुढे त्रास होणार आहे हे माहित असूनही भावनेपोटी माणूस काही पावलं उचलतोच. चटक्यांशी मैत्रीही काही काळ स्वीकारतोच माणूस.
आतलं एक पान वाचलं. समुद्राच्या फोटोवर एक कडवे छापले होते.

किनाऱ्यावर जाऊ नकोस साजणे,
पटणार नाही तुला सागराचे वागणे,
तुझ्या ध्यानी मनी ही नसेल,
तो वेडा समुद्रही तुझ्यावर रागावला असेल.
-- अवि

रोज वाचता वाचता जे शब्द जिव्हाळ्याचे झाले होते; तेच आज टोचू लागले होते. चवीला गोड बनवले म्हणून विष अमृत नाही बनत ना?
अविच्या वाक्यांचे खरे अर्थ आज कळत होते तिला. ती भरभर पाने पलटू लागली. रस्त्यावर चाबुकवाला यातना होणार हे माहित असूनही अंगावर चाबकाचे फटके मारतोच. कारण? - भूक. शब्दांचे चाबूक अनुवर बरसत होते. जखमा होत होत्या; पण रक्त वाहत नव्हते.

आतले अजून एक पान.
'आपल्याला पर्याय समजणाऱ्या माणसाला माणसाने कधीच निवडू नये.'
पुढचे पान.

माझ्याच शब्दांशी किती झटलो मी,
जुन्याच तुला भेटाया...रोज नव्याने नटलो मी.
टपोऱ्या अश्रूंना तू हि घे मिठीत,
आठवून मला जर कधी तुला पटलो मी.

ओल्यातही कित्येकदा पेटलो मी,
रात्र होती जागी,पालथा जरी लेटलो मी
सुरकुत्या किती आठवणीवर तुझ्या,
विसरण्यास रोज त्यांना भेटलो मी

आठवून तेच तेच सारे बऱ्याचदा विटलो मी,
खुललो समोर दुनियेच्या अन एकांतात मिटलो मी.
लुटलेस तू अन कळूनही सर्व नेहमीच लुटलो मी,
वाचून कळले अर्थ तुला कि,एकदाचा सुटलो मी
-- अवि

घाव, घाव आणि फक्त घाव. तिने सुविला फोन लावला.
"हेल्लो, सुवि? अनु बोलतेय. अभिला भेटायचंय मला. प्लीज. नंबर देशील मला त्याचा? प्लीज."

सूची नंबर देतच नव्हती. पण अनुचा रडवेला सूर ऐकून शेवटी अनुला नंबर दिलाच तिने.
"हेल्लो, कोण?"
"हेल्लो, अभि?"
"हा. बोलतोय. बोला. आपण कोण?"
"अभि. मी अनु."
दोन मिनिटे फक्त शांतता. त्या शांततेला भंग करणारा श्वासांचा आवाज. अस्तित्व दर्शवणारा. समोर कुणीतरी असूनही बोलत नाहीयेय हे पचवणं कठीण असतं.
"अनु?"
"विसरलास?"
"तुला वाटतं का तसं?"
"भेटायचंय तुला. आज भेटशील?"
"तुला चालेल आपण भेटलं तर?" प्रश्न साधाच होता.पण अनुला टोचलाच जरा.
"पत्ता सांग"
"'काव्या' सदन, म.कर्वे मार्ग."
पत्ता ऐकूनही अनुचा चेहरा उतरलाच. कानात भूतकाळातले शब्द पुन्हा एकदा घुमले. "अनु आपल्या छकुलिचे नाव काव्या ठेवायचे हा आपण."
हाफ-डे सुट्टी घेऊन ती तशीच निघाली अभिच्या घरी.

काव्या सदन. दारावरची बेल थरथरत्या हातांनी वाजवली तिने. मनात विचार होते. पण शब्द साथ देत नव्हते. भूतकाळ मागे नेत होता आणि वर्तमानकाळ सोडायला तयार होत नव्हता.
दार उघडले. दारात अभि होता स्वागताला. तिला वाटले होते कि दार कुणीतरी नोकर उघडेल. पण...
"अनु. ये आत ये."
घर साधं होतं; पण छान होतं.
"अगं विचार कसला करतेस? ये आत. बस आरामात इथे. घरात कुणी नोकर नाहीयेय माझ्या. थांब, पाणी आणतो. थंड देऊ की साधं चालेल?"
"..."
कधीकधी समोरच्याचं साधं वागणं ही बोचतं माणसाला.
"कशी आहेस अनु? आणि श्री कसा आहे?"
"..."
"काहीतरी बोल. काय झालं?"
अनु काहीच बोलत नव्हती.उत्तरं असूनही कधीकधी अनुत्तर का होतो माणूस?
पाणावलेले डोळे चित्र अस्पष्ट करत होते.
"हेय. अनु! काय झालं? रडतेस काय वेड्यासारखी? काही चुकीचं बोललो का मी? तुझ्या मनाला लागेल असे काही बोललो का मी?"
"नाही रे."
"मग?"
"तू माझ्या मनाला लागेल असे काहीच बोलत नाही आहेस हेच छळतंय मला. तुला माझा अजिबात राग नाही आलाय का रे अभि? ओरडावंसं वाटत नाहीयेय का रे तुला? मोठा लेखक झालास. -अवि. आज इतकी लोकं वेड्यासारखी वाचतात तू लिहिलेलं. मी ही त्यातली एक वेडी. आज सुवि भेटली तेव्हा कळलं की, हा अवि म्हणजे आपला अभि आहे."
"आपला??? चुकून बोललीस वाटतं हा शब्द?"
"लेखकच तू. शब्द पकडणारच तू. ओरड मला. पण बोल काहीतरी. वेडा म्हणतात ही लोकं तुला. मीच कारणीभूत आहे ना या सगळ्याला?"
"जो व्याख्येत बसत नाही, त्याला जग 'वेडं' ठरवतं. आज मी त्यांच्या व्याक्येत नाही बसलो म्हणून मी त्यांच्यासाठी वेडाच."
अभिचे शब्द अनुला लागत होते. डोळ्यातले पाणी लपवणे कठीण जात होते म्हणून तिने भिंतींकडे पाहणे सुरु केले. भिंतीवर एक चित्र टांगले होते. हात पसरवलेले चित्र. खाली दोनच वाक्य.

कित्येकदा न विसरता, आलीस तू स्वप्नात परत...
खऱ्यात नाही पण...स्वप्नातही तू माझा हात नाही धरत.
-- अवि

ते वाचून अनुला अजून भरून आले.
"अभि, मुद्दाम नाही केले रे मी हे सगळं. का केलं मी हे याचं उत्तरं आजही नाहीयेय माझ्याकडे. चंचल होते मी. लहान होते. एकमेकांचे हात धरतात; तेव्हा ते कधीच सोडायचे नाही हा अबोल करारनामा त्या कोवळ्या वयात नाही कळला मला."
"अरे वाह! छान बोललीस वाक्य. वापरायला मिळेल कोणत्या तरी कथेत. चालेल ना वापरले तर?"
"..."
"अनु, मी काही बोललोय का तुला? शांत हो आधी. शब्द पण दमतात गं कधीकधी. श्वास घेऊ दे त्यांनाही. हा विषय नकोय मला. एकतर इतक्या दिवसांनी भेटलीस आणि हे सगळं... - सोड तो विषय.
श्री कसा आहे? घरी बाकी सगळे कसे आहेत?"
"तू काही बोलणार आहेस का? कि जाऊ मी?"
"अरे! हे काय? बोलतोच आहे न मी?"
"मी जातेय."
"नवीन काय त्यात? शेवटचे वाक्य तेच होते तुझे."
"..." दोन थेंबांनी पुन्हा घेरलं. अभिमन्यु सापडला. मारला गेला.
"अनु, थांब. हे घे."
अनुच्या हातात अभिने ५ रुपयांचे नाणे ठेवले.
"तुला नसेल आठवत. हा तूच दिलेला कॉईन. जुहूला. आठवतं? 'तुझा' होता पण 'माझा' म्हणून सांभाळला मी."
"...".
ती निघाली तिथून. थोडे अंतर चालली.
"अनु."
हाक आली कानावर. मागे वळून पाहिले तिने.
अभि म्हणाला, "प्रश्न खूप विचारावेसे वाटले होते मला. पण माझ्यातला 'मी' आडवा आला. काळजी घे स्वतःची."
पापण्यांच्या काठाशी आलेले थेंब हातातल्या नाण्यावर टपकन पडले.

अभिला भेटून अनु घरी पोहोचली. रस्ता कधी संपला? कसा संपला? रस्त्यात कोण कोण दिसलं? यापैकी एकही प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. सवय होती म्हणून ती घरी पोहोचली होती. दार उघडताच पियू धावत धावत तिच्या पायाशी आली.
"मम्मा. बरं झालं तू आलीस ते. पप्पाला खेळताच येत नाही. चल आपण दोघी खेळूया."
"बरं झालं तू ही आलीस ते. आज मी लवकरच निघालो ऑफिसमधून. मग काय? पियुलाही घेऊन आलो नर्सरीतून. मस्तीखोर झालीय हा खूप हि. हैराण केलंय मघापासून छकुलीने. अगं ये अनु! लक्ष कुठे आहे तुझं? लवकर कशी आलीस? तब्येत ठिक आहे ना तुझी?" अनुच्या कपाळावर हात ठेवून ताप चेक करत श्रीने चौकशी केली.
"..." अनुने काहीच उत्तर दिले नाही. शब्द लपवले तिने; पण पाणावलेले डोळे लपवता नाही आले. ती शांतच आत गेली. श्रीने बऱ्याचदा विचारलेही तिला. पण अनु काहीच बोलली नाही. रात्र झाली. जेवणं आटोपली. अनु बाहेर सोफ्यावर एकटीच बसली होती. समोर टिव्ही चालू होता.ती टिव्ही पहात होती. पण फक्त पहातच होती. पियुला बेडरूममध्ये झोपवून श्रीने समोरचा टिव्ही बंद केला तरी तिला कळले नाही.
"अनु काय झालंय?" त्याने जिव्हाळ्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारले.
अनु मनातच बोलत होती."कसे सांगू तुला श्री मी हे सगळं? समजून घेशील का तू? कधीकधी भूतकाळाचं वर्तमानकाळाशी पटतच नाही. अश्यावेळी भूतकाळ वर्तमानात डोकावू लागला की भविष्य डळमळू लागतं. अभिचे नाव ऐकून कसा वागशील तू? तुझा आवडता लेखक अवि म्हणजे माझ्या भूतकाळाची सावली आहे हे पचेल का तुला? मी आज त्याला भेटली आणि तेही तुला न सांगता. हे तुला कळले तर? तुझ्यातला 'मी' आडवा नाही ना येणार आपल्या नात्यामध्ये? भीती वाटतेय मला."
"अगं बोल ना. काय झालंय?"
"श्री, आज मी अविला भेटली."
"अवि! म्हणजे 'क्षण'चा अवि? अगं, काय सांगतेस काय? तो कुठे भेटला तुला? आईशप्पथ शहाने मला आधी सांगितले असतेस तर एकत्र नसतो का त्याला भेटलो आपण?
कशी आहे तब्येत त्याची? तो वेडा नाहीयेय ना? मी सांगत होतो ना तुला की, तो वेडा नाहीयेय"
"श्री ऐक आधी पूर्ण. अविचे पूर्ण नाव अभिजित विचारे असे आहे."
क्षणात शांतता पांघरली. पंख्याचा आवाज एकटा पडला. हरलेल्या योध्यासारखा श्री सोफ्यावर बसला.
"अनु.." श्री या हाकेत एक वेगळा भाव होता.
काय म्हणायचे त्या भावाला? प्रत्येक भाव शब्दात मांडता येतो का? नाही. शब्द भिक्षा मागत राहतात. पण कधीकधी परिस्थिती शब्दांना भिक घालतच नाही.
अनु उठली आणि सोफ्यावर बसलेल्या श्रीच्या पायांजवळ जमिनीवरच बसली. श्रीच्या मांडीवर डोकं ठेऊन बोलू लागली.
"श्री अभि काहीच नाही बोलला रे मला. त्रास होतोय मला खूप. किमान काहीतरी ओरडायला तरी हवे होते त्याने. काळजी घे म्हणाला रे मला तो."
श्री शून्य नजरेने पाहत होता. तिचे शब्द (बहुतेक) ऐकत होता. त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळ नाचत होता.
मनातल्या मनात प्रश्नांचे थैमान चालू होते.
"अवि. त्याच्या इतक्या कविता आपल्याला आजही आवडतात, ओठांवर आहेत. तो अवि अभि निघावा! अनु आपल्याकडे आली तेव्हा त्याचाच हात सोडून आली होती. आजही तिला त्याच्या बद्दल तीच भावना असेल का?
जर याचं उत्तर 'हो' असे असेल; तर मग मी पापी नाहीयेय का त्यांच्यामध्ये येणारा? त्याच्यासोबत असूनही ती एकटी पडली होती म्हणून आपल्याकडे जेव्हा आली; तेव्हा तिला आपण समजावले का नाही? का स्वीकारले तिला आपण? आणि जर याचं उत्तर 'नाही' असे असेल तर अभिची हाय नाही ना लागणार आपल्या संसाराला?"
अविची वाचलेली वाक्य आठवू लागली त्याला.

गंध फुलांचा विरला हवेत,
आभाळाचे गाणे आता आभाळा सवेत,
सावल्यांनी तुझ्या आज मज गाठलेले,
आठवणीचे तळे साठलेले,
साथ नसशील तू हे कधी न वाटलेले...
--अवि

अनु बडबडत होती. थोडंसं बाहेर आणि बरेचसे आत. मनातच गुदमरत होती. कधीकधी एखाद्याचं आपल्याशी चांगलं वागणंही आपल्याला त्रास देणारं असतं.
कधीकधी आपल्याला वजाबाकीही हवी असते. बेरीज दरवेळी आनंदच देईल असे नाही. श्री चे वागणे गैर नव्हते पण...
अनु श्रीला विसरून श्रीशीच बोलत होती.
"वाईट आहे ना रे मी खूप? त्याला सोडताना काहीच विचार नाही केला मी. कसं वाटलं असेल त्याला तेव्हा? आता या क्षणी मला अभिची खूप आठवण येतेय. काळजी वाटतेय. तुझ्याशी प्रतारणा नाही ना करतंय मी श्री? तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे. संसाराच्या सात वर्षात एकदाही मी इअतर कुणाच्या प्रेमात पडले नाही मी. पण आता या क्षणी...
पण या क्षणी अभिच आठवतोय मला. फक्त अभि."
श्री काहीच बोलत नव्हता.स्वतःच्या बायकोकडून तिच्या भूतकाळातल्या प्रेमाबद्दल ऐकणं सोप्पं असतं का? पण तरीही श्री ते विष पचवत होता. शब्दांत तिची समजूत कशी काढावी हे मात्र त्याला कळत नव्हते.
"श्री,रागावला आहेस का रे माझ्यावर?"
समोर क्षणचा पडलेला अंक हातात घेतला त्याने. आतल्या कुठल्या तरी पानावर लिहिले होते.

बरंय ना??...हत्या झाली.....कत्तल झाली,
तरी कुणाला काही कळलंच नाही......

हात सुटले.....मन तुटले...
रक्ताची त्यामुळे कुठे चिळकांडी नाही,
देह माझा चालताबोलता आहे,जरी त्यात प्राण नाही.....
बरंय ना??...हत्या झाली.....कत्तल झाली,
तरी कुणाला काही कळलंच नाही......

मनं जोडताना कुठले नियम नाही,
नातं तोडतानाही कुठले नियम नाही,
सगळंच विचित्र पण काही उपाय नाही,
सुखात राहा तू.....तुझा यात काही दोष नाही,
बरंय ना??...हत्या झाली.....कत्तल झाली,
तरी कुणाला काही कळलंच नाही......

माझ्या शरीरावर कोणताही वार नाही,
मला दिसतात रक्ताने माखलेले हात तुझे,
पण दुनियेला हात तुझे ते दिसणार नाही,
माझ्या हत्येचा साक्षीदार मीच होतो,
पण मी हि आता जिवंत नाही,
खुशाल जगावे तू...तुला घाबरायची गरज नाही.

बरंय ना??...हत्या झाली.....कत्तल झाली,
तरी कुणाला काही कळलंच नाही......
-- अवि

स्वतःच्या अश्रूंना लपवून शेवटी श्री समजूत काढू लागला.
"अनु, सांभाळ स्वतःला. तू वाईट नाही आहेस. तू माझी प्रतारणाही नाही केली आहेस तू. तुला चुकीची कशी ठरवू मी? पण याक्षणी मी स्वतःला माफ कसे करू? अभिचे नाव ऐकून राग येतोय प्रचंड. पण त्याच्या जागी स्वतःला उभे केले तर पायाखालचे निखारे जाणवतात."
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. दोघांची ही रात्र विचारात गेली, दोघेही स्वतःला आपापल्या परीने दोषी ठरवत होते. रात्र सरली. बोलताना कधीतरी झोप लागली होती दोघांना.
दिवस सरत होते. पण चित्र विचित्र झाले होते. श्री एकटाच गप्प बसायचा. एकेमेकांच्या नजरेत पाहणे कठीण झाले होते. श्री विचारात असायचा. गुद्मरायचा पण काहीच काहीच नाही बोलायचा. अनुच्या आयुष्यात मौन उरले होते. मौन दोघांचे.एक अभिचे आणि दुसरे श्रीचे.
एके दिवशी ऑफिसमधून ती लवकर घरी तेव्हा श्री एकटाच कोपऱ्यात बसून मांडीत डोके घालून बसला होता. दाराच्या आवाजाने त्याने मान वर काढली.
समोरच्या अनुच्या खांद्यांना घटत धरून तो बोलू लागला.
"अनु, बरंय ना??...हत्या झाली.....कत्तल झाली,
तरी कुणाला काही कळलंच नाही...
मी... मी केली ना ती कत्तल? की तू केलीस? की आपण दोघांनी मिळून केली कत्तल?"
अनुच्या अंगावर शहारा येत होता. मनातच किंचाळली ती. "अभि माझ्या संसाराला नजर नाही ना रे लागली तुझी? श्री श्री सांभाळ स्वतःला."
श्री ने हातात पकडलेला क्षण चा अंक पुढे काढला.वाचू लागला. भराभर पाने पलटू लागला.

गेल्यावर हि तुझं मागे राहणं.....आता नेहमीचच झालंय,
निघून जाणं तुझ्या अन् वाट पाहणं माझ्या सवयीच झालंय...
--अवि

तेव्हा असूनही तिथे नव्हतीस, आज नसूनही इथे आहेस
--अवि

पाने पलटत होती. श्री वाचत होता. अनुच्या कानात अभिचे शब्द वाजत होते.
"जो व्याख्येत बसत नाही, त्याला जग 'वेडं' ठरवतं." श्री जगाच्या व्याख्येच्या बाहेर जात होता. अनु घाबरली होती.
श्रीला हॉस्पिटल मध्ये नेले गेले. बरेच दिवस गेले. अभिचा विषय त्याच्यासमोर काढणे अनुने बंद केले होते. हळूहळू श्री ची तब्येत सुधारू लागली.
श्री ला डिसचार्ज मिळाला.
एकेदिवशी श्री म्हणाला, "अनु, क्षण चा या महिन्याचा अंक कुठे गं? वाचायचाच राहिलाय या हॉस्पिटलच्या नादात."
घाबरत घाबरतच अनु म्हणाली, "क्षणचे अंक बंद झाले आहेत श्री. नाही प्रकाशित होत ते आता. माहित नाही का ते."
"अनु, चल अभिला भेटून येऊ."
"काय? वेडा झालायस का तू?"
"मी जातोय. तू येणार आहेस का सोबत?"
अनु मुकाट्याने त्याच्यामागे गेली. पण काव्यासदनला भला मोठा टाळा होता. अभि शहर सोडून गेल्याचे बंगल्याच्या गार्डने सांगितले आणि एक चिट्ठी हातात दिली.
धडधडत्या छाती सोबत अनु आणि श्री ने ती चिठ्ठी वाचली. आत लिहिले होते.

सुखाने संसार करा दोघांनी. माझी कुणाकडून काहीच तक्रार नाही आहे.
-- स्वतःचाच अवि

चिठ्ठी वाचून दोघेही शांत झाले, मनात बोलू लागले.
श्री म्हणाला, "अनु, अवि गेला. आपला संसार सुखी करण्यासाठी शहर सोडून गेला. राग यायचा मला त्याचा. पण कुणीच वाईट नसतं गं.
आपला संसार उध्वस्त करू शकत होता तो, पण नाही केला त्याने. का? कारण त्याच्यातला मी आडवा आला.
तू स्वतःला दोषी मानून त्याच्याकडे माफी मागितलीस. एका क्षणासाठी का होईना मला ही विसरलीस. का? कारण तुझ्यातली तू आडवी आली.
मी तुला समजू शकलो. तुला दोष द्यावासा ही वाटलं खुपदा पण नाही देता आला. माझ्यातला मी आडवा आला.
हा ज्याचा त्याचा 'मी' चांगलाच असतो. वाईट नसतं कुणीही."

"श्री.." भरल्या डोळ्यांनी अनुने श्रीला मिठी मारली.

सगळं इथेच संपलं होतं का? काही कथा संपणारच नसतात. त्यांना तात्पर्य ही नसतं. काय मिळाले यातून अभिला?
नियती कधीच काही नवीन तयार करत नाही.ती फक्त एकाच्या हातातलं काढून दुसऱ्याला देते.

अनु आणि श्री विसरतील का हे सगळं?
प्रत्येक सुखाला दु:खाची आणि प्रत्येक दु:खाला सुखाची एक छोटीसी किनार असते; जी त्या सुखाला किंवा त्या दु:खाला परिपूर्ण होऊच देत नाही.
अंतापर्यंत प्रत्येक दु:ख आणि प्रत्येक सुख अपूर्णच असतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त

". " म्हणजे निशब्द.............
खुप छान लिहलयं. मनाला भिडल आणि भावल सुद्धा.
पु.ले.शु.

अप्रतिम लेखन आहे..खुप आवड्ले
मनाला भिडल, कथेत इतके गुन्तले कि वेळेचे भान रहिले नहि.. पु.ले.शु.. Happy

जर याचं उत्तर 'हो' असे असेल; तर मग मी पापी नाहीयेय का त्यांच्यामध्ये येणारा? त्याच्यासोबत असूनही ती एकटी पडली होती म्हणून आपल्याकडे जेव्हा आली; तेव्हा तिला आपण समजावले का नाही? का स्वीकारले तिला आपण? आणि जर याचं उत्तर 'नाही' असे असेल तर श्रीची हाय नाही ना लागणार आपल्या संसाराला?" >>
इथे अभिची हाय नाही ना लागणार आपल्या संसाराला? असे हवे.
कथेची मांडणी, धाटणी आणि भाषा सुरेख आहे. कथेमध्ये कवितेचा उपयोग पण सुंदर केलेला आहे.
फक्त कथासुत्र भाबडे आणि लेखक पात्रांमध्ये जास्तच गुंतला गेला असे वाटले.

"माणसांच्या सुखाला दु:खाची आणि प्रत्येक दु:खाला सुखाची एक छोटीसी किनार असते; जी त्या सुखाला किंवा त्या दु:खाला परिपूर्ण होऊच देत नाही." हे खरे असले तरी अचानक सामोर्या आलेल्या दु:ख्खाला आपलेसे करणे आणि दु:ख्ख कवटाळुन बसणे यात फरक असतोच ना!

स्त्री ला सहनशीलतेची मुर्ती करुन मखरात बसवु नका असे म्हणतात पण श्रीला या कथेत मुर्खात बसविलेला वाटते. बायको न सांगता पुर्वीच्या प्रियकराला भेटुन त्याच्या परत प्रेमात पडल्यावर त्याला राग येतो पण कोणाचा स्वतःचा की आपण या दोघांच्या मध्ये येतो आणि त्याला असुया वाटते म्हणुन?

प्रेयसी सोडुन जाउन तिचे लग्न झाले आणि तिला मुलगी असताना आपल्या कथेतला अभि हा आपल्या प्रेयसीच्या नवर्याला लवकर बरे वाटावे आणि तिचा संसार सुरळीत व्हावा म्हणुन शहर सोडुन जातो ? त्याला स्वतःचे काही लाइफ नाही काय?

थोडक्यात असे की यात अभि, अनु आणि श्री नियतीच्या तडाख्यात स्वतःला सापडलेले, केविलवाणे
व्यतित करतात तितपत ते नाहित, हे पात्रांनी नसले तरी लेखकाने ओळखले आहे का?

"देवदास" कथा ही देवदासची ट्रॅजेडी होती का देवदासने निर्माण केलेली ट्रॅजेडी होती? शरद्चंद्राच्या लिखाणातुन ही "देवदासने निर्माण केलेली ट्रॅजेडी आहे" हे देवदासला नाही तरी लेखकाला नक्की माहित असल्याचे जाणवते तसे इथे लेखकाला उमगलेले दिसत नाही.

आपल्या पात्रांचे काय चुकले काय नाही आणि कुठे चुकले हे पात्रांना कळले नाही तर ठीक असते पण लेखकालाही कळले नाही तर वाचकाला गोष्ट खटकते. (अत्यंत उत्तम लेखन असुनही).
उदा http://www.maayboli.com/node/21285 या कथेत पात्रे जरी भावनेच्या भरेत चुकली असली तरी ती कुठे आणि काय चुकलीत यात लेखकाला संदेह नाही वा लेखक त्या बाबतीत कन्फ्युज्ड नाही.

निलिमा:

पहिले तर तुम्ही माझी कथा इतकी मन लावून वाचली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
'श्री' चे 'अभि' केले. चूक सुधारली.
---------------------------------------------------
फक्त कथासुत्र भाबडे आणि लेखक पात्रांमध्ये जास्तच गुंतला गेला असे वाटले. +१०००
कारण कथेतले प्रत्येक पत्र खरंच माझ्या आयुष्यातली जवळची माणसे आहेत.

---------------------------------------------------
अचानक सामोर्या आलेल्या दु:ख्खाला आपलेसे करणे आणि दु:ख्ख कवटाळुन बसणे यात फरक असतोच ना!

>> होय फरक असतो. काहीजण तेच दु:ख कवटाळून चालणेच थांबवतात आणि काही लोक त्याच दुखाची ताकद बनवून पुढे चालत राहतात.
माझ्या लिहिण्याचा मुद्दा इतकाच होता की, काही दु:ख माणूस कधीच विसरत नाही. ती त्याच्या अंतापर्यंत त्याच्यासोबत असतात.
मुद्दाम म्हणून नाही पण एखाद्या सुखद प्रसंगाच्या वेळीही अश्या आठवणी वाऱ्याची झुळूक यावी तशी नकळत भेटतात आणि आताचा क्षण याहून काहीतरी वेगळा असू शकला असता याची क्षणभर हा होईना पण जाणीव करून देतात.

>>कधीकधी काही दु:खं पूर्णपणे दु:ख नसतात. त्यामागे काही चांगल्या गोष्टीही घडलेल्या असतात.

म्हणून "माणसांच्या सुखाला दु:खाची आणि प्रत्येक दु:खाला सुखाची एक छोटीसी किनार असते; जी त्या सुखाला किंवा त्या दु:खाला परिपूर्ण होऊच देत नाही." असे म्हटलंय मी.
---------------------------------------------------
श्रीला या कथेत मुर्खात बसविलेला वाटते.
>> कथेतला श्री खरंतर मला मूर्ख ठरवायचा नव्हता. पण तो भाबडा जरूर दाखवायचा होता. सध्या त्याची बायको असलेली अनु ही बायको बनण्यापूर्वी अभिला सोडून त्याच्याजवळ आली होती. अभिच्या जागेवर स्वत: उभे राहून एक क्षण त्याने विचार केला, तर तो स्वतःलाच दोषी मानू शकतो.
श्रीला अनुच आलाही असता पण एक महत्वाची गोष्ट अशी की, अनुच्या भूतकाळातला तिचा प्रियकर अभि हा त्याचा आवडता लेखक होता. त्याने लिहिलेले सगळे श्रीला पटलेले होते. अभिला झालेला त्रास त्याला पटलेला होता. त्यामुळे या त्रासामागाचे कारण आपणच आहोत ही दोष देणारी भावना जास्त तीव्र होते.
त्याच्या वागण्याला मूर्खपणा म्हणावे की इतर काही हे वाचणाऱ्याचे स्वत:चे मत असू शकते. मी लिहिताना दोषीपणाच्या भावनेला जास्त महत्व देऊन लिहिले आहे.
---------------------------------------------------
अभि हा आपल्या प्रेयसीच्या नवर्याला लवकर बरे वाटावे आणि तिचा संसार सुरळीत व्हावा म्हणुन शहर सोडुन जातो ? त्याला स्वतःचे काही लाइफ नाही काय?
>> अभिच्या मनात अनुबद्दल राग नाही असे मी म्हणत नाही. राग नक्की आहे. पण राग असला तरी 'अनु आता आपल्यासोबत नाही आणि आता जिथे कुठे, ज्याच्या सोबत असेल तिथे सुखात रहावी' ह्या भावनेने तो शहर सोडून जातो.
अभिच्या इतर आयुष्याबाद्द्दल मी काहीही मांडले नाहीयेय. त्याग दाखवून त्याला देव नाही बनवायचं मला.

---------------------------------------------------

कथेतलं कोणतेही पात्र चुकीचे वागले की बरोबर वागले हे ठरवण्याचा हक्क मी माझा मानतच नाही.
कारण, मला जो तो स्वतःच्या जागेवर योग्य वाटलाय, म्हणून मी कोणालाच दोष देत नाहीयेय.
आलेल्या परिस्थितीत कोण , कधी आणि कसा वागेल आणि कशाला महत्व देईल याचा १००% अंदाज बांधणे कल्पनाशक्तीच्या बाहेरचे वाटते मला.

मी कथा लिहिताना वर लिहिलेल्या मुद्यांचा विचार करून लिहिली.
Happy

आशिष साहेब
उत्तराबद्दल धन्यवाद. लेखकाला बोलते करायला टीकाच उपयोगी असते. आपले लिखाण सुंदर आहे पण
थोडे वास्तववादी नाही असे वाचक म्हणुन जाणवले ते आपल्याला कळवायचे होते. लेखात आपण खरोखरच न रागावता दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

निलिमा :
लेखकाला बोलते करायला टीकाच उपयोगी असते. +१०००

वाहवा पेक्षा टिकाच आवडते मला...
किमान चुका आणि इतरांची मते तरी कळतात.

वास्तववादी लिहिण्याचा प्रयत्न करेन अशी खोटी आशा मी देणार नाही.
पण जमेल ते मनापासून लिहीन हे नक्की सांगतोय.

धन्यवाद Happy

छान कथा!
कवितेचा उत्तम वापर...
या कथेतील तीनही पात्रे त्यागमुर्ती वाटत आहेत..गै.न.
असो कथा आवडलीच!

सुशांत खुरसाले:
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद Happy

आशिष तुमचं लेखन मला आवडतं.. यावेळीही कथा, कथानक, त्यातली पात्र, त्याग आणि इतर सगळं लक्षात न घेता लेखन आवडलं. बरीचशी वाक्य आवडली, पटली.